भय इथले संपत नाही

संपादकीय    संपादकीय    2020-03-18 10:00:24   

सोमवारपासून मुंबई-ठाणे आणि अन्य गर्दीच्या शहरांतील शाळा-कॉलेजेस करोना भयामुळे बंद झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर कमी-अधिक फरकाने हीच परिस्थिती असेल.  मुलं आता शाळेऐवजी इमारतींखाली, मैदानात खेळताना दिसू लागली आहेत. पालकांना करोनाला घराबाहेर आणि मुलांना घरात कसं ठेवायचं हा मोठाच पेच पडला आहे. काही ठिकाणी पालकांना ही मुलं घरात असताना वर्क फ्रॉम होम कसं करावं हे कळत नाहीये. अर्धवट काहीतरी झालंय. म्हणावं तर सुट्टी आहे पण त्या सुट्टीचा आनंद (?) घरातच बसून लुटायचा आहे. बाहेरगावी सहलीसाठी सोडा, आपल्याच शहरात सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमायला बंदी आहे. ही परिस्थिती तशी असामान्यच. आपल्यापैकी काही जणांना २०१६ च्या नोटाबंदीची आठवण झाली असेल. तेव्हाही असेच; पैसे आहेत पण त्या पैशाचा काही उपयोग नाही अशी विचित्र परिस्थिती तयार झाली होती. तेव्हाची परिस्थिती निवळायला कित्येक महिने गेले. आता यावेळी काय होणार याचा कोणालाच कसलाच अंदाज येत नाहीये. अशा या जबरदस्तीच्या घरवासात तुमची करमणूक करण्याकरता दोन गोष्टी सांगतो. शक्यता आहे याआधी आपण त्या ऐकल्या/वाचल्या असतील. पण आपले नावच 'पुनश्च' आहे म्हटल्यावर पुनरावृत्तीचा दोष काही आमच्यावर येणार नाही. तर ही पहिली गोष्ट पहा... एकदा वेधशाळा आपला अंदाज वर्तवते. पुढची दोन वर्ष पाऊस पडणार नाही. झालं. बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते. सगळेच या भावी संकटाचा विचार करून हवालदिल होतात. आता येणारा कठीण काळ कसा काढावा यावर विचार करायला लागतात. हल्लीसारखेच दिवसभर आपले काम धंदे सोडून याचं विषयावर चर्चा करीत बसतात. दिवस मावळतो. दुसरा दिवस उजाडतो. सगळेच 'आता पुढे काय होणार?' या चिंतेत आपले दैनिक व्यवहार विसरतात. पण एक शेतकरी आपली बैलांची जोडी घेऊन शेताकडे निघतो. वाटेत लोक मोठ्या अचंब्याने त्याच्याकडे पाहत असतात. आपापसात कुजबुजत असतात. शेवटी त्यांच्यातला एक पुढे होऊन त्या शेतकऱ्याला अडवतो. विचारतो... 'बाबारे ही बैल जोडी घेऊन तू कुठे निघाला आहेस?' 'आपल्या शेतात. नांगरणी करायला'. शेतकरी उत्तरतो. 'तू काल वेधशाळेने वर्तवलेला अंदाज ऐकला नाहीस का?' 'हो, ऐकला' 'मग आता पुढची दोन वर्ष पाऊस पडणार नाहीये हेही तुला ठाऊक असेलच...' 'हो. ठाऊक आहे मला.' 'मग जर पाऊसच पडणार नाहीये तर तू ही बैल जोडी घेऊन शेताकडे का निघाला आहेस? तुझी ही मेहनत वायाच जाणार आहे हे तुला समजत नाही का?' 'हो. मला ते समजतं. पण मी याकरता शेतात नांगरणी करण्यासाठी या बैल जोडीला घेऊन निघालो आहे की 'याचा काही फायदा नाही..' असा विचार करून जर मी आणि हे बैल आत्ता घरात बसलो तर पुढे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा आम्ही नांगरणी करू शकणार नाही. कारण तोपर्यंत आमची ती सवयच मोडलेली असेल. ती सवय राहावी आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा उपयोगात यावी म्हणून मला आज शेतात जाणे भाग आहे'. किती सुंदर आहे ना ही कथा? आधी ऐकली/वाचली असेल तरीही सध्याच्या काळात पुनश्च ऐकायला/वाचायला किती समर्पक आहे. या कथेतून काय बोध घ्यायचा हे मी आपल्यासारख्या चाणाक्ष आणि सुजाण वाचकाला वेगळे सांगायला हवे ? स्टीफन कोव्हे च्या seven habbits of highly effective people या प्रसिद्ध पुस्तकात एक खूप छान संकल्पना आहे. एरिया ऑफ एन्फ़्लुअन्स आणि एरिया ऑफ कन्सर्न. एरिया ऑफ कन्सर्न म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींविषयी काळजी/भीती आहे. आणि एरिया ऑफ एन्फ़्लुअन्स म्हणजे आपला ज्या गोष्टींवर प्रभाव आहे किंवा (साध्या भाषेत) ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत. आता सध्याच्या करोना भयाबाबत आपण वरील दोन्ही संकल्पनांचा विचार करू. आपल्या सर्वांना काळजी/भीती आहे की करोना मुळे मला किंवा माझ्या कुटुंबातील सर्वांना जीवाचा धोका आहे. आणि आपण जरी जगणार असू तरी यामुळे जो व्यावहारिक तोटा होणार आहे त्याला मी तोंड कसे द्यावे? दुसरीकडे, माझा एरिया ऑफ एन्फ़्लुअन्स कोणता? माझा कोणत्या गोष्टींवर प्रभाव आहे? मी आणि माझे कुटुंबीय या कठीण काळात जी काळजी घेऊ शकतो त्यावर माझा प्रभाव आहे. त्यापलीकडे उर्वरित जग, त्यांचे आणि आपले सरकार, तो विषाणू यांच्यावर माझा काहीही प्रभाव नाही. मग कोव्हे यांच्या म्हणण्यानुसार एकतर आपले भय (एरिया ऑफ कन्सर्न) कमी करूया किंवा आपल्या प्रभावाखालील (एरिया ऑफ एन्फ़्लुअन्स) गोष्टी वाढवूया. म्हणजेच मी माझ्या कुटुंबियांपलीकडे माझी बिल्डींग, माझा परिसर, माझे शहर यांनाही आपापली काळजी घेण्यास सक्षम बनवू शकतो का? याचा विचार करा. आपल्या प्रभावातील ज्या ज्या गोष्टी करणे आपल्याला शक्य आहे त्या पूर्ण करायचा प्रयत्न करूया. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरील गोष्टीतल्या शेतकऱ्याप्रमाणे आपापल्या जमिनीवर पाय गाडून उभे राहूया. आपल्या समोर सततच दोन (किंवा त्याहून जास्त) पर्याय असतात. आपण कोणता पर्याय निवडतो त्यावर भविष्य अवलंबून असते. येणारा काळ कठीण तर आहेच पण त्यातही आपण काही संधी शोधूया. घरात मुलांबरोबर चांगले चित्रपट पाहूया. गप्पा मारुया. खेळ खेळूया. कपाट आवरूया. आजवर केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊया. आणि हो पुनश्च/बहुविध वरील इतके दिवस न वाचल्यामुळे साचलेले सगळे लेख वाचून टाकूया. आपल्या साईटचे नवीन होम पेज पाहिले की नाही? साहित्यातील शबरी आपल्याला निवडक साहित्य घेऊन आलेली आहे. प्रभूरामांनी म्हणजे आपण वाचकांनी त्या बोरंरूपी साहित्याचा आस्वाद मात्र घ्यायला हवा. येणाऱ्या काही दिवसात आपल्याला मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपल्या पुनश्च नियतकालिकातील निवडक २-३ लेख आम्ही रोज आपल्याशी शेअर करू. ज्यांनी अजूनही आपला ९१५२२५५२३५ हा क्रमांक सेव्ह केला नसेल त्यांनी आजच करून टाका. आपण आपल्या सगळ्यांची whatsapp वर broadcast लिस्ट बनवलेली असल्याने आपल्या मोबाईलमध्ये वरील नंबर सेव्ह नसेल तर आपल्याला आमचा एकही मेसेज मिळणार नाही. पुनश्च वरील सगळेच लेख आपण अगदी काळजीपूर्वक निवडलेलेच असतात. पण हे काही लेख...first among equals या प्रकारातले आहेत. ते नक्की वाचा... तेव्हा मिळणाऱ्या वेळेचा पुरेपूर सदुपयोग करा. स्वतःची आणि आपल्या संपर्कातील सगळ्यांची काळजी घ्या... **********

संपादकीय

प्रतिक्रिया

  1. shivaji65

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान

  2. Tanu

      5 वर्षांपूर्वी

    योग्य पर्याय निवडल्याने भविष्य चांगले होते आणि कठीण काळातही वेळेचा सदुपयोग करण्याबाबत उत्तम उदाहरण दिले आहे. धन्यवाद

  3. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    मस्त !

  4. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    भय ईथले संपत नाही ...हे अत्यंत सुंदर शीर्षक वास्तवाशी मिळतेजुळते ....!

  5. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    Thanks !

  6. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर व उभारी धरण्यास सहायक

  7. SHRIKANT22

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान

  8. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    मस्त

  9. लेखा त्रैलोक्य

      5 वर्षांपूर्वी

    खुप चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडला आहे.

  10. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान.

  11. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खूपच छान व प्रेरणादायी



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen