रुसवे, भांडणे, प्रेम, असूया...पुन्हा या!

संपादकीय    संपादकीय    2020-09-24 00:50:16   

‘पुनश्च’ चा पहिला सदस्य २०१७च्या सप्टेंबर महिन्यात झाला होता. मराठी संस्कृती, भाषा आणि त्या भाषेतून आपल्यापर्यंत वाहात येणारा, उत्तम वाचनातून उत्तम माणूस घडविण्याचा संस्कार हीच ‘पुनश्च’ची बांधिलकी होती आणि असेलही. त्या पहिल्या सदस्याच्या सदिच्छांचा गुणाकार होत आज आपण ‘पुनश्च परिवार’ म्हणावा एवढा गोतावळा जमा केलेला आहे आणि तो वाढतो आहे. याबद्दल सर्व सदस्यांचे हार्दिक आभार. वर्तमानाची आव्हाने आहेत आणि ती सोपी नाहीत. आपल्या आयुष्यातील सहा महिने असे वगळावे लागतील, असं आपल्यापैकी कोणालाही वाटलं नव्हतं. दिवसाअखेरीस बँकेतला क्लार्क टॅली करतो आणि एखाद्या रक्कमेचा घोळ त्याला काही केल्या सापडतच नाही, तसं आपलं काही वर्षांनी होईल. मार्च ते सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांत आपण काय बरं केलं होतं? या १८० दिवसांचा हिशेब लागता लागणार नाही. खरं तर १८० हा आताचा आकडा आहे, आहे ती स्थिती किती दिवस राहील ते कोणाला ठावूक आहे? "मला सहा महिने जर घरी बसून काम करता आलं ना, तर मी मिळालेल्या वेळेत वाचायची राहिलेली पुस्तके वाचेन, पिक्चर बघेन, गार्डनिंगमध्ये थोडं लक्ष घालेन, बरंच काही ऐकायचं राहिलेलं आहे ते ऐकेन, कुटुंबासोबत वेळ घालवेन" ...किती रोमॅटिक वाटतं ना ऐकायला आणि बोलायलाही. पण प्रत्यक्षात या ‘रिकाम्या’ सहा महिन्यांत आपली मनःस्थिती कशी झाली आहे? आता आपल्या लक्षात आलं की विरंगुळ्यासाठी, बौद्धिक आनंदासाठी, कलासंपन्न आयुष्य जगण्यासाठी आपण या ज्या काही अनुषंगिक गोष्टी करतो, त्या सर्व म्हणजे आपल्या जेवणातील लोणची आणि चटण्याप्रमाणे आहेत. आपलं जेवण आहे, आपलं कर्तृत्व! आपलं कर्म! आपण एक व्यक्ती म्हणून, कुटुंबप्रमुख म्हणून जो काही व्यवसाय, नोकरी पत्करली असेल ती नोकरी हे आपले जेवण असते. आपले जगणे त्या एका कर्माभोवती, कर्तव्याभोवती फिरत असते. आपण एखाद्या व्यवस्थेचा-व्यवसायाचा भाग असतो. आपण एखाद्या कार्यालयाचा भाग असतो. जगरहाटीची गाडी दिसामासानं, मिनिटा तासानं पुढे जात असताना त्या गाडीचा आपण एक स्पेअर पार्ट असतो. गाडी एका जागी थांबली तर हळू हळू स्पेअर पार्ट गंजू लागतात. गेल्या सहा महिन्यानं आपल्या आयुष्याला, जगण्याला अशाच गंजण्याची एक छोटीसी झलक दाखवली आहे. नुसती लोणची, चटण्या खाऊ म्हटलं तर आपलं जे होईल तसं आता झालं आहे, कारण वेळ मिळाला तर किंवा वेळ काढून करावयाच्या या सर्व गोष्टी आहेत, वेळ घालवण्यासाठी त्या आपण फार काळ करु शकत नाही. कथा, कादंबरी, चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांतून ज्या कथा, घटना, प्रसंग, संघर्ष, प्रेम, राग, सूड दाखलेले असतात ते जर निर्माण व्हायला हवे असेल तर माणसे एकमेकांना भेटली पाहिजेत, भांडली पाहिजेत, भिडली पाहिजेत, रडली पाहिजेत, रागावली पाहिजेत. यातलं काहीच होत नसेल तर मग कथा तरी कशा खऱ्या वाटतील? सगळी माणसे सदैव घरात, एकमेकांसोबत कैद आणि जगाचे व्यवहार बंद या अवस्थेत आपली स्थिती कशी होते असं जर कुणी विचारलं तर आता प्रत्येकाकडे सांगायला काहीतरी असणार. पाच ते सात दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेत कुठेतरी माकडसदृष्य मानव दोन पायांवर चालू लागला त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो क्रांत्या होऊन आपण इथे पोचलो आहेत. तहान, भूक, नैसर्गिक विधी, मैथुन आणि पुनरूत्पादन एवढेच ज्यांचे जिवीतकर्तव्य होते, त्या काळी मानव कसा राहात असेल याची कणभर का होईना आपल्याला आता कल्पना आली आहे. एका करोना व्हायरसने जगभरात माणसाला वेठीला धरले आहे. एका अभ्यासानुसार माणसाला, प्राण्यांना संसर्ग करु शकतील असे साधारण ३ लाख २० हजार व्हायरस पृथ्वीतलावर आहेत. अधिक माहितीसाठी हा ब्लॉग वाचा (https://www.virology.ws/2013/09/06/how-many-viruses-on-earth/) विचार करा, एका व्हायरसने आपली ही अवस्था केली, आणखी एक एक व्हायरस असा आपले हात पाय पसरत गेला तर आपली अवस्था काय होईल? पण तसे होणार नाही. व्हायरसचे तीन लाख २० हजार प्रकार आहेत हे शोधून काढणारा माणूस काही इथेच स्वस्थ बसणार नाही. जग सहा महिने थांबले आहे, ते ‘पॉझ’च्या बटनावर पुन्हा बोट ठेवले की हळूहळू पूर्वपदावर येईल. परंतु तेंव्हा तुम्ही आम्ही थोडे तरी वेगळे असू. किती वेगळे असू हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर, संवेदनशिलतेवर अवलंबून आहे, परंतु असू एवढे निश्चित. धर्म आणि देव या संकल्पना माणसाने व्यक्तीच्या, समाजाच्या सामाजिक, कौटुबिक वर्तनावर भीतीचे, पाप-पुण्याच्या कल्पनेचे, नैतिकतेचे झाकण ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत, हे माहिती असूनही त्यांच्या खरेपणाची फार चिकित्सा आपण करत नाही. कारण सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोन्ही गटांचे ‘अशा झाकणाची समाजाला गरज आहे’ याबाबत दोघांचेही एकमत असते. मात्र या देवादिकांचे एजंट असल्याचा दावा करणारे बाबा, महाराज, स्वामी हे सगळेच किती पोकळ आहेत हे आपल्याला या सहा महिन्यांत दिसून आले. एका सूक्ष्म, क्षुल्लक व्हायरसपुढे तुमचे अंगारे, धुपारे आणि प्रवचन चालत नाहीत तर तुम्ही कसले जगण्याचा मार्ग बिर्ग दाखवणार? आम्हाला शाब्दीक भूल देणे हा मुळात तुमच्याच जगण्याचा मार्ग आहे, कसलीही सिद्धी बिद्धी प्राप्त नसणारी आपण सामान्य माणसे करोनाच्या काळात जेवढी भयभीत आहोत, तेवढीच ही साधू मंडळीही भयभीत असल्याचे आपण पाहिले. वीजेवर स्वार होऊन आलेली औद्योगिक क्रांती, त्याच वीजेचा हात धरुन आलेले इंटरनेट आणि इंटरनेटची लेकरे असलेली समाजमाध्यमे, ओटीटी हे सगळे नसते तर आपले गेल्या सहा महिन्यात काय झाले असते याचा विचार करा आणि या माध्यमांसोबत घालवायला चोविसही तास उपलब्ध झाले की काय होते याचा अनुभवही लक्षात घ्या. काय, कुठे, किती आणि कसे याचे भान असेल तरच जगण्याचा, वागण्याचा सुवर्णमध्य आपल्याला सापडू शकतो, हे आपल्याला करोनाकाळाने शिकवले आहे. यातला भान हा शब्द महत्वाचा आहे. भान येण्यासाठी तुमचे मन खुले हवे आणि खुलेपणा येण्यासाठी बुद्धीला खुराक आवश्यक असतो. बुद्धीला तेलपाणी करत राहणे गरजेचे असते. समुहात राहण्याचे, समाजात वावरण्याचे आणि सामुहिक जगण्याचे महत्व पुन्हा एकदा पटवून देणारा हा करोना काळ अधिक लांबू नये, राग-रूसवे, भांडणे, प्रेम, असूया, स्पर्धा, चोऱ्यामाऱ्या, लांड्यालबाड्या यांनी युक्त असलेले हे जग पुन्हा एकदा जगण्यासाठी लवकरात लवकर मोकळे व्हावे अशी अपेक्षा करत राहू- पुनश्च, पुनश्च...आणि ‘पुनश्च परिवार’ राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून मराठी भाषेचा विश्वव्यापी’ संसार उभा करेल अशी उमेद      बाळगूया. आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये साहित्यप्रेमी निश्चितच असतील त्यांना ‘पुनश्च परिवार’शी जोडून तुम्ही हे काम करु शकता.

संपादकीय

प्रतिक्रिया

  1. Asmita Phadke

      4 वर्षांपूर्वी

    Oh my god, Read it today. Very good editorial .

  2. dhananjay deshpande

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे

  3. dhananjay deshpande

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख आहे

  4. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    👌👌

  5. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    निश्चितच

  6. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख आवडला

  7. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    वाह, मस्त

  8. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    छान

  9. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen