दिवाळी अंक येता घरा..

संपादकीय    संपादकीय    2020-12-02 10:00:02   

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक अभिमानास्पद सांस्कृतिक परंपरा आहे म्हणता म्हणताच या वर्षी जुलैच्या आसपास बहुतेक दिवाळी अंकांचे संपादक द्विधा मनस्थितीत होते. लोक दरवर्षीप्रमाणे अंक विकत घेतील का ? जाहिराती मिळतील का? काढलाच अंक तर तो डिजिटल काढावा की छापील? छापील काढला तर नेहमीएवढाच काढावा की कमी छापावा?...या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. उपमा कदाचित असभ्य वाटेल, परंतु दिवाळी अंक काढण्याचं व्यसन हे मद्यासारखं आहे. संध्याकाळ झाली की मद्यपींची पाऊले जशी मद्यालयाच्या दिशेने वळतात, तसं जून-जुलैच्या सुमारास अनेकांना दिवाळी दिसायला लागते. त्यातही जे अट्टल दिवाळी अंक संपादक आहेत, त्यांना तर फेब्रुवारीपासूनच वेध लागलेले असतात. मात्र त्याच महिन्यात कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि सगळे वातावरण गढुळले. मात्र आज डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी अंकांचे जे चित्र आहे ते सुखावणारे आहे आणि मराठी वाचकांच्या सांस्कृतिकतेवर शिक्कामोर्तब करणारेही आहे.

‘लेखकांशी बोलून अंकाची आखणी करुन ठेवू आणि अगदी नाहीच जमलं छापायला तर रद्द करु’अशी खूणगाठ मनाशी बांधत अनेकांनी लेखकांशी संपर्क साधला. काहींनी छापायचाच असं ठरवून प्रतींची संख्या मर्यादित ठेवण्याचं ठरवलं. काहींनी सरळ सरळ डिजिटलचा मार्ग धरला. काहींनी लेखकांना कल्पना दिली, अंक छापला तर मानधन देऊ, कृपया सहकार्य करा. दिवाळी अंकाची नशा ना संपादकांना स्वस्थ बसू देत नव्हती, ना लेखकांना, ना वाचकांना.

‘यंदाच्या दिवाळी अंकात काय वाचाल’अशा शीर्षकाचा एक लेख बहुविधचे मित्र रविप्रकाश कुलकर्णी दरवर्षी ललितमध्ये लिहित असतात. पण त्यांना माहिती देण्याबाबतही यंदा संपादकांचा उत्साह कमी होता, तो अंक निघण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळेच. परंतु अखेर दिवाळीच्या आसपास, थोडे उशीराने का होईना दिवाळी अंक बाजारात आले आणि करोनाच्या काळातली उदासी, मरगळ झटकून वाचकांनीही त्याचे चांगले स्वागत केले. जरवर्षी मराठीत साधारण ४५०च्या आसपास दिवाळी अंक निघतात, यावर्षी त्यांची संख्या ३००च्या जवळपास असावी. परंतु बहुतांश महत्वाचे अंक यावर्षी निघाले आणि काहींच्या बाबतीत तर त्या अंकांना नेहमीपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला. साडेचारशे अंकांच्या गर्दीत साधारण पन्नासेक अंक असे असतात, ज्यांना ‘महत्वाचे’,‘प्रमुख’ वगैरे म्हटलं जातं. या अंकांमध्ये काय महत्वाचं आलं आहे याचा आढावा हा फार मोठा विषय ठरेल, कारण अनेक उत्तम कथा आणि लेख दिवाळी अंकात आहेत. 

मात्र दिवाळी अंकांबाबतच्या काही गोष्टींची नोंद करावी लागेल. ‘बहुविध’चा एक घटक असलेल्या ललित या मासिकाचे संपादक अशोक कोठावळे यांनी महाराष्ट्र टाइम्स, दीपावली, कालनिर्णय, अनुभव आणि अक्षर या पाच अंकाच्या संचाच्या एकत्र विक्रीची योजना जाहीर केली तिला अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला. तर रूचीचे संपादक आणि बहुविध मित्रमंडळातील एक सुदेश हिंगलासपूरकर यांनी मौज, रूची, ऋतुरंग, पद्मगंधा, अंतर्नाद या पाच अंकाच्या संचाची विक्री केली तिलाही तडाखेबंद प्रतिसाद मिळाला. पाठोपाठ ‘आवाज’सारखा हक्काची वाचकसंख्या असलेल्या अंकानेही डौल कायम ठेवला. आवाजचे हे सत्तरावे वर्ष होते. केवळ काही दिवसांत वातावरण बदलले आणि बाजारात या अंकांचा दरवळ सर्वत्र पसरला.

याच उत्साही वातावरणात कळलेल्या दोन अतिशय सकारात्मक बाबी सांगाव्या लागतील. करोनामुळे अनेकांच्या व्यवसायात दरवर्षीसारखी स्थिती नव्हती.  अरूण शेवते यांनी ऋतुरंग या दिवाळी अंकातून लेखक व जाहिरातदार दोघांशीही दीर्घकाळ मैत्र जपले आहे. दरवर्षी ऋतुरंगला जाहिराती देत आलेल्या परंतु यावर्षी आर्थिक फटका बसल्याने ज्यांना ते शक्य नव्हते, अशांच्या जाहिराती केवळ सद्भभावना म्हणून त्यांनी छापल्या आणि ऋणानुबंध कायम ठेवले. रोहन प्रकाशनाचे प्रदीप चंपानेरकर यांनाही असाच अनुभव आला. वंदना बोकिल यांच्या ‘संवादसेतू’या दिवाळी अंकात रोहन प्रकाशनाची जाहिरात दरवर्षी असते. याही वर्षी त्यांनी चंपानेरकरांना फोन करून, दिवाळी अंकासाठी तुमच्या जाहिरातीचे आर्टवर्क पाठवायला सांगितले. चंपारेनकर म्हणाले, " या वर्षी जाहिरात नको " , तेंव्हा बोकिल त्यांना म्हणाल्या," मी तुम्हाला फक्त जाहिरातीचं आर्टवर्क मागितलं आहे, बिल पाठवणारच नाहीये ".. 

साहित्याप्रती, दिवाळी अंकाप्रती आणि एकमेकांप्रती असलेल्या या सदिच्छांमुळेच दिवाळी अंकांचा प्रकाश कायम राहिला आहे. यावर्षी बहुविधच्या प्लॅटफॉर्मवर दिवाळी अंक उपलब्ध करुन देण्याचं आम्ही ठरवलं होतं. परंतु तांत्रिक बदलाचं काम पूर्ण होण्याचं थोडं लांबलं, त्यामुळे ते शक्य झालं नाही. पुढच्या वर्षी नक्की देऊ. बहुविध आणि बहुविधवरील विविध डिजिटल नियतकालिकेही तुमच्या अशा सदिच्छांच्या पाठबळावरच दिवसेंदिवस अधिक लोकांपर्यत पोचत आहेत. भेटत राहू, बोलत राहू. कोरोनाचा संपत आलेला कहर लवकर संपो आणि आयुष्याचा, जगण्याचा बहर पूर्ववत पहायला मिळो या शुभेच्छा.प्रतिक्रिया

  1. Makji Tembe

      5 आठवड्या पूर्वी

    Excellent Editorial.(2020). So happy to read such an expressive and to the point, coverage our great Literary Deepawali 🪔.. ‘publication’..tradition! Best wishes for 2021!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen