मराठी नियतकालिकांचा इतिहास..

संपादकीय    संपादकीय    2017-09-11 16:01:57   

नियतकालिक म्हणजे नियमित जे प्रकाशित होते ते. रोज प्रसिद्ध होणारे ते दैनिक, आठवड्यातून एकदा ते साप्ताहिक, पंधरवड्यातून एकदा ते पाक्षिक , महिन्यातून एकदा ते मासिक, दोन/तीन महिन्यांनी ते द्वैमासिक/त्रैमासिक, आणि वर्षातून एकदा ते वार्षिक ( उदा. दिवाळी अंक )

मराठीतलं पहिलं छापील पुस्तक निघाले १८०५ साली डॉ. विल्यम कॅरे याचं "द ग्रामर ऑफ मरहट्ट लँग्वेज". तेही या ख्रिस्ती माणसाने त्यांच्या धर्मप्रसारासाठी काढलेले. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र काढलं बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२मध्ये "दर्पण" या नावाने. पण खरंतर त्यातला सगळा मजकूर मराठीत नसे. काही इंग्रजीमध्ये देखील असे. म्हणून सगळा मजकूर मराठीत असणारे पहिले नियतकालिक असण्याचा मान "मुंबई अखबार" या १८४० साली निघालेल्या वृत्तपत्राला जातो.

दीर्घकाळ टिकलेले व संपादक भाऊ महाजन यांच्या तिखट राजकीय लेखनाने गाजलेले "प्रभाकर" हे पत्र १८४१ साली सुरु झाले. लोकहितवादींची सुप्रसिद्ध 'शतपत्रे' याच पत्रात प्रथम प्रसिद्ध झाली. याच भाऊ महाजन यांनी "धुमकेतू" नावाचे साप्ताहिकही काही दिवस चालवले. तिथपासून मग १८४२ मध्ये ज्ञानोदय , १८४९ सालचे ज्ञानप्रकाश ( जे पुढे १०३ वर्षे चालून १ जाने १९५१ रोजी बंद पडले), इंदुप्रकाश (संपादक विष्णुशास्त्री पंडित), सुधारकांवर टीका करणारे "वर्तमानदीपिका" अशा या नियतकालिकांची परंपरा सुरु झाली. याच वर्तमानदीपिकेत येणाऱ्या लेखांचा समाचार घेण्यासाठी भाऊंनी वर उल्लेख केलेले धुमकेतू साप्ताहिक सुरु केले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तर त्यांच्या उण्यापुऱ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात (१८५०-१८८२ ) मासिक "निबंधमाला" ( १८७४-१८८१ ) आणि केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली. १८३२ पासून आता २०१७पर्यंत हजारो नियतकालिके सुरु झाली असतील. त्यातील काही काळ चालून बंद पडली असतील अशांची संख्या लक्षणीय. पण म्हणून पुढचा नवीन नियतकालिक चालू करणारा बिचकायचा अजिबात नाही. तो त्याला हव्या असणाऱ्या विषयाचं नियतकालिक सुरु करायचाच. मराठी माणसाला व्यक्त होण्याची किती आस आहे पहा..

याच परंपरेतील काही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या नियतकालिकांमध्ये कालानुक्रमे मनोरंजन, केरळकोकीळ, पुरुषार्थ, विविधवृत्त, विविधज्ञानविस्तार, प्रसाद ; त्यानंतरच्या काळातील किर्लोस्कर, युगवाणी, माणूस, सत्यकथा, अभिरुची, सोबत, साधना, अमृत, विचित्रविश्व, विज्ञानयुग आणि अलीकडील अंतर्नाद, रुची शब्द, ललित, अनुभव, अक्षरवैदर्भी, परिवर्तनाचा वाटसरू, आजचा सुधारक यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि ही परंपरा आजही अर्थक्रांती , शिक्षण विषयाला वाहिलेले 'जडणघडण' , पर्यावरणावरील 'भवताल' , मुलांसाठीचे 'वयम्' या मासिकांनी सुरु ठेवली आहे. हे सर्व मी माझ्या अल्पज्ञानानुसार सांगत आहे. यात अजून भरपूर नावांची भर पडू शकेल याची मला खात्री आहे. तरीही यात आपण वृत्तपत्र समूहाची जी साप्ताहिके आहेत उदा. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, विवेक याचा उल्लेख केलेला नाही. एकाच वेळी एकापेक्षा जास्त भाषांतून निघणाऱ्या 'चित्रलेखा'चाही उल्लेख राहिलाच.

स्वातंत्र्य पूर्व म्हणजे १९४७ च्या आधी सुरु झालेली नियतकालिके मुख्यत्वे दोन विषयांवर केंद्रित असायची. समाजसुधारणा आणि स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार/प्रचार. खूप तात्विक वाद चालायचा दोघांच्यात. आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा ? अगदी हमरीतुमरीवर येऊन हा वाद चाले. एरवी असलेले चांगले मित्र या वादांमुळे दुरावल्याची भरपूर उदाहरणे सापडतील. पण दोन्ही पक्षांनी केलेल्या मेहेनतीचे फळ स्वातंत्र्योत्तर काळातील आमची आताची पिढी चाखत आहे. स्वातंत्र्य तर मिळालेले आहेच पण समाज सुधारणांनाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. जाती, लिंग, धर्म, वर्गभेदांपलीकडे जाऊन सर्वांना समान संधी मिळू लागली आहे. जागतिक दर्जाचे साहित्य अनुवादातून मराठीत आणणे, विज्ञान/शिक्षणाचा प्रसार, जीवनाचा सर्वांगीण रसरशीत अनुभव घेण्यासाठी कविता/चित्रपट/हस्तचित्रे/छायाचित्रे यांचा रसास्वाद घेणे हे त्या त्या विषयाला वाहून घेतलेल्या नियतकालीकांमुळेच शक्य झाले आहे. मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या अनेक साहित्यकृतींचा जन्म या नियतकालिकांमधूनच झाला आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात नियतकालिकांची कामगिरी सुवर्णाक्षराने लिहावी अशीच आहे यात शंका नाही.

सध्या प्रबोधनपर मजकूरापेक्षा मनोरंजनपर मजकूर असणाऱ्या नियतकालिकांना भरपूर मागणी आहे. पण डिजिटल माध्यमामुळे या दोघांचीही अवस्था गोंधळलेली अशीच आहे. Google Key Words - History of Periodicals, Marathi Periodicals, Darpan, A Grammar of the Mahratta Language, William Carey, Indian Periodicals during British Era.


इतिहास , मराठी नियतकालिक , मराठी नियतकालिकांचा इतिहास , भाषा

प्रतिक्रिया

  1. Abhay Bapat

      3 वर्षांपूर्वी

    किर्लोस्करमधून अनेक लेखकांनी लेखन केले, विविध विषयांवर केले. शक्य झाले तर निवडक किर्लोस्कर असे सदर सुरु करा.

  2. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात पण महत्वाचे.माहितीत भर म्हणून लिहिते.माझा मराठी नियतकालिकात परीक्षणाचा अभ्यास आहे.पीएच डी.

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    vichitavishve che lekh astel tat post kara

  4.   5 वर्षांपूर्वी

    खूपच छान माहिती सर

  5. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    सुचवल्याबद्दल धन्यवाद. असाच प्रतिसाद देत राहा...

  6. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    आचार्य अत्रे यांचे मराठा मधील अग्रलेख प्रसिद्ध करा, खासकरुन सावरकर, आंबेडकर किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ ह्या विषयावरील लेख

  7. डा व्यंकटेश अंबादास लिगदे

      7 वर्षांपूर्वी

    फारच छान माहीती अजब आणि रिया प्रकाशकांनी 50 रू त पुस्तक योजना काढली त्यात मी चक्क मधुबाला वरच पुस्तक घेतल गोपाल गोडसेचे 55 कोटीचे बळी घेऊन वाचले पुनश्च मुळे पुन्हा वाचण करता आल

  8. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    मराठी नियतकालिकांचा इतिहास "लेखक :रामचंद्र गोविंद कानडे यांचे कर्नाटक पब्लिशिंग हाऊसने १९३८ साली प्रसिद्ध केलेले पुस्तक संदर्भासाठी उत्तम आहे .

  9. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    Weekly",Belgaon Samachar"started in 1863(4th Jjuly)The editor was Bhikaji Haripant Samant.The current editor is Mr.Madhukar Mahadev Samant. Sorry,as I can not use Devnagari fonts.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen