अशीच जावी काही वर्षे आणि सावट यावे पुढचे


दोन लेख, दोन भावना यातलं अंतर केवळ दीड वर्षाचं परंतु त्यात केवढी तफावत? पुनश्चच्या वाचकांनी विनय हर्डीकर यांच्या 'जनांचा प्रवाहो चालला' या पुस्तकातला लेख 'अवांतर' या सदरात वाचला. आणिबाणी उठल्यानंतर लगेचच म्हणजे १९७७ च्या एप्रिल महिन्यातला तो लेख होता आणि त्यात 'दुसऱ्या स्वातंत्र्याचा' आनंद काठोकाठ भरून वाहताना दिसत होता. त्यानंतर दीड वर्षांनी, १९७८च्या दिवाळीत रुचीच्या अंकात आलेला लेख आज देत आहोत. हे दोन लेख निवडण्यामागं एक सूत्र आहे. आधीचा लेख होता तो आणिबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींना लोकांनी धडा शिकवला याचं समाधान आणि निवडणुकीच्या राजकारणात जे एरवी तगले नसते अशा चारित्र्यसंपन्न नेत्यांना सत्तेत जागा मिळाल्याच्या आनंदाचा. परंतु दरम्यानच्या दीड वर्षात हर्डिकरांचा पुरेसा अपेक्षाभंग झाला असावा. प्रस्तुत लेख साहित्यिकांच्या दुटप्पी आणि कचखाऊ बोलण्या-वागण्यावर टीका करत सुरू होतो,साहित्याच्या समीक्षेकडे जातो आणि अखेर सर्वव्यापी निराशा व्यक्त करण्याकडे वाटचाल करतो. हा लेख प्रसिध्द झाल्यावर आठ-दहा महिन्यातच निवडणूक होऊन काँग्रेस आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. हर्डीकरांना मात्र द्रष्टाच म्हटले पाहिजे. कारण आज ४० वर्षांनी हा लेख पुनः वाचकांसमोर आणला जात असताना पक्षांची नावे बदलली आहेत, परिस्थिती बरीचशी तीच आहे. तेव्हा ज्यांनी प्रत्यक्ष आणिबाणी लादली त्यांच्यावर आता अप्रत्यक्ष आणिबाणीच्या नावानं ओरड करायची वेळ आली आहे. हर्डिकरांनी निवडलेले शिर्षक भविष्यसूचक होते की काय?

********

‘जनाचा प्रवाहो चालिला’चा साहित्यविषयक after-math तुम्ही लिहावा’ असं संपादकांनी सुचवलं आहे म्हणून त्यापासूनच सुरुवात करतो. पुस्तकावर साधारण दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिला प्रकार असतो सर्वसाधारण वाचकांच्या प्रतिक्रियांचा आणि दुसरा असतो साहित्य क्षेत्रातल्या मंडळींच्या, म्हणजे लेखक, समीक्षक, प्राध्यापक आणि सर्वसाधारण ज्यांना आपण बुद्धिजीवी म्हणून ओळखतो त्याच्या प्रतिक्रियांचा. त्यामधला विषयाला प्रस्तुत भाग तेवढा सांगतो. सामान्य वाचकाला पुस्तक आवडते, आणि त्याला खरी उत्सुकता असते ती ज्यांच्यावर मी प्रकट-अप्रकट टीका केली आहे त्यांना काय वाटलं ते जाणून घेण्याची. पु.ल. काय म्हणाले, पाध्ये काय म्हणाले, करंदीकरांची काय, असे प्रश्न ही मंडळी परत परत विचारतात. माझी टीका त्यांना रास्त वाटत असते आणि या मंडळींनी त्यावर विचार करून स्वत:ची भूमिका मांडावी अशी त्यांची अपेक्षा दिसते. यातच वर्तमानपत्री पद्धतीची वाग्युद्धं वाचण्याची सवय असण्याचा एक भागही असतोच. परंतु तो कमी असतो असं पत्रातल्या इतर मजकुरावरून वाटतं. दुसरीकडे साहित्यिकांच्या ज्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येतात त्या एखाददुसरा अपवाद वगळला तर शैली, निवेदन, निरीक्षण, संवेदना, पुस्तकाचा घाट वगैरे गोष्टींचा विचार अधिक असतो. साहित्यिक बुद्धिजीवी मंडळीबद्दल मी जे काही लिहिले, सामाजिक जाणीवेसंबंधी जे ओबडधोबड विचार प्रकट केले, या मंडळींकडून ज्या अपेक्षा ठेवल्या त्याबद्दल फारसं या गटाकडून ऐकायला मिळत नाही. एक प्रकारची सहेतुक diplomatic(-) शांतता त्या संवादात असते. सामान्य वाचकांच्या अपेक्षा आणि मान्यवर साहित्यिकांची ही मुत्सद्दी भूमिका यामध्ये फार अंतर पडते आहे; म्हणूनच या विषयाची आजही चर्चा करणे आवश्यक झाले आहे.

निर्भय टीका हवीच हा लेख लिहिताना एक पथ्य पाळायचं असं ठरवलं आहे. यावेळी कुणाचं नाव घेऊन लिहायचं नाही, याला कारणं दोन; पहिलं असं की अनेक जणांनी पत्रातून किंवा प्रत्यक्ष बोलण्यातून मी ज्या साहित्यिकांचा उल्लेख माझ्या पुस्तकात केला आहे, ते सगळे आमच्या मनातून पार उतरले, त्यांचं आता काही वाचावंसं वाटत नाही असं कळवलं आहे. मला ही भूमिका फार टोकाची, चुकीची वाटते. एवढंच नव्हे तर आपल्या लिहिण्यामागे असा काहीच उद्देश नसताना तसं झाल्याचं पाहून वाईटही वाटतं. ही काही वॉशिंग्टनची कुऱ्हाड नव्हती. अशा पत्रांना मी मुद्दाम उत्तरं पाठवून हे मत दुरुस्त करावं, त्याचा पुनर्विचार करायलाच हवा असं विनवतो. दुसरं कारण असं की व्यक्तिगत उल्लेखाचा सूक्ष्म संदर्भ तपासून मग त्याविषयी बोलण्याचं किंवा न बोलण्याचं धैर्य आणि औदार्य आपल्याकडे अजूनही दुर्मिळ आहे. माणसं एकतर भयानक चिडतात किंवा दु:खीकष्टी होऊन आतल्याआत कुढत राहतात, संवाद तोडतात. यालाही एखादाच एक अपवाद असतो.

याच्यापलीकडचे एक कारण आहे. साहित्य-कला यांच्याविषयी बोलताना सतत आणीबाणीच्या काळाचा संदर्भ महत्त्वाचा मानून बोलणं, त्याचा आपल्या निवडशक्तीवर परिणाम होऊ देणंही फार टोकाचं होईल, घातक ठरू शकेल. निर्भयपणे विधायक टीका करण्यावरचा माझा विश्वास अजूनही ठाम आहे. मात्र यावेळी पद्धत थोडी वेगळी वापरून पाहणार आहे. काळाचा रागरंग ओळखून मराठी लेखकांनी आपल्या भूमिका गेल्या दीडदोन वर्षांत ठरवल्या. निर्बंध शिथिल झाल्यावर साहित्यिक फार मोठ्या संख्येनं, उत्साहानं निवडणुकीच्या प्रचारात पडले, त्यातच शंकरराव चव्हाण यांच्या उर्मट उद्‌गारांची भर पडली आणि चांगलंच मोहळ उठलं. लोकांनाही आपले आवडते लेखक आपल्या आवडीच्या कामासाठी लागलेले पाहून आनंद झाला. लेखकांनीही त्यात धोका असूनही मागे राहायचं नाही असं ठरवलं. त्यांना जनतेचा प्रतिसादही फार मोठा मिळाला. एक पुस्तक हजार माणसांपर्यंत पोचायला वर्षानुवर्ष लागत होती. आता एका झंझावाती दौऱ्यातच हजारो लोकांशी संवाद करता आला. काही जणांच्या बाबतीत ही संख्या लाखांच्या घरात गेली. शहरी, ग्रामीण भेदही गळून पडले आणि शहरी जनतेचा सुरक्षित, विचारी धूर्तपणा व ग्रामीण जानपदांचा भोळाभाबडा, व्यवहारचतुर इमानीपणा यांतही या काळात खूप तादात्म्य झाले. म्हणूनच प्रचंड मतदान एकाच दिशेने झाले आणि रातोरात इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले.

इतरांप्रमाणेच साहित्यिक मंडळींनाही आनंद झाला. त्यांनी तो निरनिराळ्या प्रकारे प्रकट केला. सभा, परिसंवाद, पानसुपारी इथपासून ते इंदिरा गांधी पडल्यावर ‘बाई पडली, बाई पडली’ असे फोन रात्रभर आपल्या मित्रमंडळींना करण्यापर्यंतच्या अनेक तऱ्हा त्यात होत्या! सामाजिक सहभागाचं जंक्शन आनंदोत्सवाचे, सहभागाचे हे क्षण येऊन गेले, साजरे झाले आणि राजकीय धकाधकीमागून दूर जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ती तशी होणं अपेक्षितच होय. कारण राजकारण आणि साहित्य ही क्षेत्रं जवळची असली तरी त्यांचे विलिनीकरण होणार नव्हतं, तसा आग्रह धरण्याचे काही कारणच नव्हतं. प्रश्न एवढाच होता की राजकीय सहभागापासून सुरू झालेल्या परतीच्या प्रवासात मराठी साहित्यिक एकदम निरंकुशा: कवय:पर्यंत येऊन धडकतात की मध्ये एक सामाजिक सहभागाचं जंक्शन लागतं हे ओळखून तिथे आपली गाडी काही काळ उभी करून काही नवे रस्ते फुटू शकतील का हे पाहतात की नाही याचा. तिथे मात्र फार मोठी निराशा पदरात पडते आहे. थोडं अलंकारिक बोलायचे म्हणजे त्या स्टेशनात ठाण मांडून बसलेल्या अनेक सत्याग्रही मंडळींना शिताफीनं टाळून, त्यांच्याकडे समंजस हात हलवत गाडी झपाट्याने मार्ग जाताना दिसते आहे.

हे जर असेच चाललं तर मर्ढेकर म्हणाले होते त्या धर्तीवर ‘अशीच जावी काही वर्षे आणिक सावट यावे पुढचे’ अशा प्रकारची अगतिक पुनरावृत्ती आपल्याही बाबतीत घडणं खरोखरीच अटळ आहे. अर्थात हे सारं करताना अतिशय मनमोहक अशी पहिल्या प्रतीची शिताफी वापरली जाते. अनेक ठिकाणी जातो, अनेक वेळा जाणकार मंडळींशी बोलतो, या बोलण्याची देखील एक पद्धत ठरून गेली आहे. प्रथम पुस्तकाबद्दल अभिनंदन. मग मी जरा आवाज काढतो की हे अनुभव सगळ्यांना घेणं शक्य होतं. पण त्यांनी का घेतले नाहीत? यावरची मखलाशी गंमतीदार असते. आम्हाला माहीतच नव्हतं, संकट इतकं मोठं आहे याची कल्पनाच कुणी दिली नव्हती, आमची क्षेत्रे नाही म्हटलं तरी वेगळी पडतातच, आणि प्रत्येकाची कपॅसिटी लिमिटेड असणार, ती ओळखूनच पावलं टाकली पाहिजेत, आम्ही साफ घाबरलो, काही म्हणा हे कबूल केलंच पाहिजे. काही महाभाग तर असं सांगतात की बाहेर राहणं महत्त्वाचं होतं, डोकं शांत ठेवून विचार करणारेही काही लोक हवेत म्हणून आम्ही निष्क्रिय राहणे पसंत केलं.

यांच्या असं लक्षात येत नाही की संकटकाळी स्वत:ची चामडी बचावणारा निर्णय स्वत: घ्यायचा नसतो. भोवतीच्या मंडळींनी तसा निर्णय घेऊन तो तुमच्यावर लावायचा असतो, अन्यथा तुमचा ‘योग्य’ निर्णय इतरांना स्वार्थी वाटण्याची शक्यता असते. एवढं झालं की मग सुरू होतात आपणही परिस्थितीचं गांभीर्य ध्यानात येताच कसे अस्वथ झालो. प्रतीकात्मक निषेध आपण कसा केला, स्थानबद्धाच्या चुलत-मावस भावाला घरात कसा आश्रय दिला यांच्या हकीकती. यात मधूनमधून ‘तुमच्यासारखं धाडस आमचं नाही हे तर मान्यच पण…’ अशी फोडणी असते, आणि मी मुकाट्यानं ऐकत असतो, वाचत राहतो. अनुभव आधी घेऊन, तो सामाजिक संदर्भाशी जोडून मग निर्मिती केली पाहिजे या विचाराची मात्र कोणीही मनापासून चर्चा करीत नाहीच. अनेक प्रकारे मुद्द्याला बगल देता येते. कालिदास महाकवी – त्याला काय होती सामाजिक जाणीव? शेक्सपिअरच घ्या की, नाहीतर आपले ज्ञानेश्वर. एवढा विलासी देवगिरीचा राजा पण ज्ञानेश्वरीत त्याच्या विलासाचं कुठं काय प्रतिबिंब पडलं? आणि एलियटचे नंतर नंतर काय झालं; सार्बच्या नाटकांचे काय? मर्ढेकरांची सांगड तुम्ही कशी घालणार? त्यांचे दोन तुकडे कसे जोडणार? मी चक्रावून जातो, बावचळतो. आता एलियटचे ‘नंतर नंतर’ काय झालं, याचं उत्तर मी एकदम अभ्यास न करता कसं देणार! आणि इतक्या निरनिराळ्या कालखंडातली, देशांतली, भाषांतली नावं घेतल्यावर कुठे कुठे पुरा पडणार! मी क्षीण आवाजात पण सामाजिक जाणीवेची निकड हे आपल्या विसाव्या शतकातले प्रकरण आहे. या शतकाच्या इतिहासाचे ते प्रॉडक्ट आहे वगैरे म्हणायला गेलो की लगेच एकदा कलाकृती म्हटलं की विसावं शतक असा वेगळा तुकडा काढता येणारच नाही असा मुद्दा तयारच असतो.

वाद सुरू होतो. गोलगोल फिरू लागतो. माझ्या मांडणीच्या दगडावर मंडळी आपली जुनीच आर्ग्युमेंटस घासून पुसून पाजळून घेतात. तरुण लेखकाचं ऐकून घेतलं आणि मग झकास ऐकवलं अशा आनंदात घरी जातात. समाजनिरपेक्ष साहित्य निर्मितीचा पारा परत सगळीकडे ओघळतो, धावू लागतो. 'हिंमत' या इंग्लिश साप्ताहिकाचा संपादकीय चमू, ज्याने आणीबाणीतल्या हुकुमशाहीसमोर मान तुकवण्यास नकार दिला होता. तत्त्वज्ञानाचं आडरान दुसरीकडे आहेत काही डावी मंडळी. त्यांचं म्हणणं दुसऱ्या टोकाचं असतं. मीही काहीतरी गोड, उदारमतवादी, सर्वसमावेशक भूमिका घेऊन मूळ कारणाकडे पाठच फिरवतो आहे असा त्यांचा दावा आहे. धर्म, वर्ग, उत्पादनसाधने, त्यांची मालकी, संघटनेमधून निर्माण होणारा आणि कलहातून बलशाली होणारा तत्त्वज्ञानाचा शक्तिमान सर्वव्यापीपणा यांच्या आडरानात नेऊन मला ही मंडळी जास्तच गोंधळात पडतात. एकीकडे त्यांचा दृष्टिकोण मला अतिशय ढोबळ वाटतो तर दुसरीकडे अनेक नवनवीन संकल्पना, त्यांचे संकर, परिभाषेचा प्रचंड भस्मासुर सहज वापरणारी त्यांची शैली गोंधळून टाकते, कधी कधी तर न्यूनगंड येईल की काय अशी धास्ती वाटते.

अर्थात या सर्वांशीच वाद-संवाद करण्यात आनंदही असतोच. पण वादाच्या गदारोळानंतर थोडा शांत विचार केला की माझ्या असं ध्यानात येतं की आणीबाणीनंतर या वादांना परत एकदा निमित्त आलं, धार आली. गुणात्मक बदल मात्र फार थोडा झाला आहे. शैली आणि परिभाषा अधिक सफाईदार झाली आहे. अवस्था मात्र ‘आम्हास आम्ही पुन्हा पहावे’ अशी कंटाळवाणीच आहे. असं का होतं याची चर्चा करायला हवी. शांतपणानं, संयमानं! सर्वोदयी द्रष्टेपणा आणीबाणीचं संकट मोठं आहे हे आम्हाला कळलं नाही याची खंत का वाटू नये? केवळ एक वरकरणी विनम्र वाटणारी कबुली देऊन मग मात्र सगळ्यांना झोडायचं, चेष्टा करायची हा प्रकार पत्रकारांत जास्त दिसतो आहे, पण साहित्यिकसुद्धा काही मागे नाहीत. प्रतिकात्मक निषेध करण्याचे प्रसंग वेगळे असतात. आणीबाणीचा काळ ही प्रत्यक्ष निषेध करण्याची वेळ होती. हे समजा एकदा कळलं नाही. पुन्हा कळावं म्हणून काही विचारपरिवर्तन करण्याची गरजही आम्ही मान्य करायला तयार नाही.

शहा आयोगाचे पुस्तक तयार करत असताना एका सर्वोदयी कार्यकर्त्याचं एक पत्र हातात आलं. इंदिरा गांधींची पावलं हुकुमशाहीकडे पडताहेत हे त्यानं ७३ सालीच ओळखलं होतं. अगदी स्पष्ट भाषेत लिहिलं होतं. सर्वोदयी लोक मराठी लेखकांपेक्षा राजकारणाला जरा जास्त जवळचे, पण काही राजकारणी नव्हेत. त्या कार्यकर्त्याला आणीबाणीचा धोका जाणवला. कारण तो ज्या सामाजिक समस्यांची उकल करू पाहत होता. त्यांची काही उत्तरं तरी राजकारणी मंडळींच्या हाती होती. म्हणून त्यानं ते बरोबर ताडलं. आणि आणीबाणी जारी होऊन वर्षभर झालं तरी साहित्यिकांना जाग आली नाही. कशी येणार? त्यांचा समाजाशी असलेला सबंध होता नाइलाजाचा, तडजोडीचा. सामाजिक समस्या वगैरे त्यांना वर्ज्यच. निदान अशा काही कार्यकर्त्यांची ओळख, मैत्री? ते तर अशक्यच. इतकी आत्मकेंद्रितता लेखक आणि त्यांच्या संस्थांमधून भरलेली. प्रत्येक समारंभात, संमेलनात मानापमानाचे साग्रसंगीत प्रयोग. संघर्ष मुळातच अगदी व्यक्तिगत.

अगदी पुण्याच्या संमेलनात देखील अशा संघर्षाला वरकरणी तात्त्विक मुलामा दिला असला तरी मुळाशी वैयक्तिक हेवेदावे होते, मत्सर होता, सूडबुद्धीलादेखील काही प्रमाणात होती. अशा प्रकारची आत्मकेंद्रीत वृत्ती कमी करण्याडे काही विशेष कल अजूनही दिसत नाही. ‘आणीबाणी’ या शब्दानं दलित मंडळींचा आणि साहित्यिकांचा खूप फायदा करून दिला. दलित आणि त्यांचे वकिली वृत्तीचे कैवारी यांना ‘पावणे दोन वर्षाच्या आणीबाणीविरुद्ध सगळे लढले पण आमच्या दोन हजार वर्षांच्या आणीबाणीविरुद्ध...’ असं एक टाळीचं वाक्य मिळालं, तर साहित्यिकांपैकी काहींनी निर्मितिक्षम कलावंत हा नेहमीच आणीबाणीमधलं जिणं जगत असतो असा एक कलावादी धाटणीचा पण खास व्यक्तिवादी सूर लावून पाहिला. तो फार जणांनी उचलून मात्र धरला नाही. पण ही नेहमीची आणीबाणी हे काय गौडबंगाल आहे? साहित्यनिर्मितीमधल्या प्रसववेदना ही माणसं फार सीरीयसली घेतात की काय? निर्मितीच्या क्षणीचे मनोव्यापार अत्यंत उत्कट असतात, विकल करणारे असतात हे मान्य. सामाजिक नीतिमत्ता, समाजाचा उदारपणा अथवा अनुदारपणा यांचे ताणही कलावंत अनुभवत असतो हेही खरं आहे.

पण म्हणून एकदम आणीबाणी? अशा प्रकारचे ताण कोणत्या सामाजिक व्यवहारात नाहीत? ‘रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग’ हा अनुभव प्रत्येक पातळीवर प्रत्येकाला येतच असतो! साहित्यिकाला कदाचित तो जास्त उत्कटतेनं येत असेल. पण म्हणून त्याला आणीबाणीचा अनुभव म्हणून कसं चालेल? एक अनुभव एका व्यक्तीचा, दुसरा सगळ्या समाजाचा. त्यांची योग्यता एकच कशी होईल? आणि खरोखरच स्वत:वर अशी आणीबाणी ओढवून घेऊन, समाजाचा फार मोठा रोष पत्करून लिहिण्याचे धैर्य तरी किती जण दाखवतात? कुणाविरुद्धही काही तीव्र प्रतिक्रिया उमटली तर मित्रमंडळी, ओळखीचे राजकीय कार्यकर्ते पोलीस-संरक्षण, वर्तमानपत्रं, पत्रकं या सगळ्यांचा आधार मिळतो आणि सरसकट तुरुंगाची धास्ती नसते. आणीबाणीत ती होती आणि ज्या आधारांचा उल्लेख केला ते सगळे कापलेले होते. तेव्हा हे अनुभव सारख्याच तोलाचे आहेत आणि नेहमीच आणीबाणीत जगणारांना एखाद्या दीड-पावणेदोन वर्षं टिकलेला आणीबाणीचे काय होय, हा सोयीस्कर बचाव चुकीचा आहे. दलित मंडळीही अशीच चूक करत आहेत, त्यांना उत्तर देण्याची ही जागा नाही. कदाचित साहित्यिकांनाही हे अती वाटलं असावं म्हणून त्यांनी फारसा गवगवा केला नाही.

असे दुटप्पीपणा स्वातंत्र्याची एक निष्ठा म्हणून जपणूक करणं म्हणजे सोयीसवडीनं त्यावर भाषणं ठोकणं, लिहिणं, संकटकाळी मुत्सद्दीपणे दबून राहणं, प्रतिकात्मक गोष्टी करणं, संकट जाताच परत जोराची भाषणं ठोकणं, जास्त स्पष्ट लेख लिहिणं आणि कलावंताच्या स्वातंत्र्याचे इशारे आपल्या पोकळीत ओरडणं अशी विचित्र समजूत साहित्यक्षेत्रात मान्यता पावली आहे, अजून अबाधित आहे. आपल्या निष्ठा आपण आचरणात आणाव्या लागतात. त्यांची किंमत चुकवावी लागते. जितकं स्वातंत्र्य अधिक अबाधित हवं तितकी किंमत जास्त पडते असे साधे विचार कळतात, पण वळत नाहीत. अनुभव-आचारजीवन यात सुसंगती असावी हे कुणाला पटत नाही. एका विचारवंताकडे गेलो होतो, मान्यवर गृहस्थ. मी आधीच प्रश्नावली दिली होती. मी आधीच प्रश्नावली दिली होती. भेटीत तुम्हीच बोलायचं आहे हे सांगितलं होतं. चार दिवसमध्ये सवड ठेवून भेटली. पाऊण तास आम्ही समोर बसलो. पण बाबा एक अक्षर बोलला नाही. पाऊण तास झाल्यावर उर्मटपणे आत चालता झाला, जेवायला. ‘तुम्हाला नुसतं बसून राहायचं आहे, बसून रहा!’

हे सद्‌गृहस्थ त्यांच्या घरी येणाऱ्या अनेकांना अशीच वागणूक देतात, हाताखालच्या प्राध्यापकांना गड्यासारखे राबवतात आणि लोकशाही वगैरेवर भाषणं देतात. आणीबाणीच्या काळात यांनी म्हणे प्रक्षोभक भाषणं केली. त्यांच्या भागातले लोक धरून चालले की ती भाषणं त्यांनी पुण्या-मुंबईकडं केली, पुण्या-मुंबईच्या लोकांना वाटे की हे आपल्या भागात जागृती करत होते. असा दुटप्पी माणूस. ज्याच्या अंगी किमान सभ्यपणा, सुसंस्कृतपणा देखील नाही, तो लोकशाहीचे धडे देणार! आता या माणसानं आपल्या भाषणांचं पुस्तकही छापलंय! असे ‘आपण कोरडे पाषाण’ असणारे लोक आमच्याकडे लोकशाहीवादी म्हणून मिरवतात तरी कसे? आचार-विचार-उच्चार यांत किमान सुसंगती असावी, प्रामाणिकपणा असावा हे बहुतेक साहित्यिकांना पटतच नाही. कलावंत, विचारवंत यांची व्यक्तिमत्त्वं दुभंगलेलीच असणार, असायचीच अशी एक विलक्षण घातक समजूत सगळीकडे रूढ झाली आहे. ‘रोज स्वत:च्या बायकोला बडवणारा उत्तम प्रेमकथा लिहू शकेल’ असं भडक समर्थनही ऐकू येतं, तर कलाकारांचं मन तसं विस्कळीत असतं, अनेक बाबतीत defiant-बेमुर्वत असतं असं तात्त्विक कारणही दिलं जातं!

तसं कोणत्याही व्यक्तीचं मन विसंगत नसतं का? आणि तरीही त्यात ‘भ्रमातला क्रमही’ नसतो का? बाकी सगळीकडे धडाधड defiant असणारा माणूस एकदम आणीबाणीशी मात्र जुळवून घेतो, दबतो. ती गेली की परत defiant होतो. ही काय भानगड? की बोलायचं एक, करायचे दुसरं हा आपला हक्कच आहे असं लेखक मानतात? सामाजिक मान्यता मिळायची असेल तर मात्र वर्तनात सुसंगतीच लागते. स्वत:च्या बऱ्यावाईट विचारांची किंमत देण्याचा निधडेपणा समाजाला मानवतो. लोक पाठिंबा देत नाहीत, पण मूक आसवांनी श्रद्धांजली वाहतात. सामाजिक मान्यता एक जाऊ दे पण कोणत्याही कर्तृत्वसंपन्न जीवनात अशी निधडी सुसंगती दिसते. मग क्षेत्र साहित्याचे असो की राजकारणाचं की धर्म-संस्कृतीचं! परस्परविरोधी वागणुकीचा डांगोरा पिटायचा, तो आमचा हक्क आहे असं मानायचं यांतून क्षणिक प्रसिद्धी मिळेल, मिळतेच आहे, परंतु मोठ्या दर्जाचं श्रीमंत ‘कर्तृत्वही’ निर्माण होणार नाही. होत नाह ही तर वस्तुस्थिती आहे. आणीबाणीतल्या कविता, कथा. नाटक-कादंबऱ्या कलादृष्ट्या अगदी सामान्य आहेत. कारण त्यामागचा अनुभवच बेताचा आहे. ती केवळ कारागिरीची उदाहरणं आहेत, त्या त्या प्रमाणात कमी अधिक सफाईदार आहेत.

मर्ढेकरांकडे दुर्लक्ष मराठी साहित्यात हा अनुभव शून्य कलावाद कुठून घुसला? खरं म्हणजे फडके, खांडेकर यांचा काळ जरा ओसरल्यावर मर्ढेकर, कुसुमाग्रज, गाडगीळ, माडगूळकर वगैरे मंडळींनी काही खास नवीन जाणिवा आणल्या होत्या. स्वातंत्र्य जवळ आलेलं असताना आणि ते आवाक्यात आल्यावर आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हीत नवीनता आली, परंपरेचं विरेचन झालं, हिणकस भाग निघून गेला, नवीनताही दोन्ही अंगांनी समृद्ध झाली. प्रादेशिक कादंबरी, शहरी मध्यम वर्गीयांची एलीअनेटेड स्थिती सांगणारी कादंबरी यांचाही याच काळात उदय झाला. विशाखा ते कोसला असा हा वीस वर्षांचा टप्पा वाङ्‌मयदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न. पण याच काळात समीक्षेचं गाडं कुठे तरी वाट चुकून भरकटलं. त्याचं खापर मात्र आता मर्ढेकरांच्यावर आपण फोडतो आहोत. सौंदर्यानुभवाची स्वायत्तता सगळ्यांनी उचलून धरली, नव्हे एखाद्या परवान्यासारखा तिचा वापरही केला. आणि निर्मितीच्या ज्ञानात्मक, व्यवहारात्मक अंगांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. निर्मितीच्या क्षेत्रात स्वत: मर्ढेकरांनीच ‘लेखनपूर्व आणि लेखनगर्भ’ अशा आत्मनिष्ठेची जबरदस्त लक्ष्मणरेषा आखून ठेवली होती, अनुभवाची सामाजिकता ओळखून त्या अनुभवाशी एकनिष्ठ राहून स्वत:च्या हिंमतीच्या (हा त्यांचाच शब्द) जोरावर कलावंताने प्रवास करायचा असतो, असं जे मर्ढेकर म्हणाले ते सगळे एकतर विसरले किंवा त्यांनी बुध्याच दुर्लक्ष केलं.

परिणाम व्हायचा तोच झाला. निर्मिती व अनुभव यांचं नातं इतकं क्षीण झालं की ते असायला लागतं याची जाणीव देखील नष्ट झाली. या भानगडीत सामाजिक अनुभव तर फारच दूर गेले. राहता राहिला व्यक्तिगत अनुभव. मानसशास्त्रीय आणि लैंगिक वाङ्‌मयाला खूपच बहर आला. प्रथम तो प्रामाणिक होता. उत्तरोत्तर प्रसिद्धीच्या अभिलाषेमध्ये सापडून सवंग झाला, भडक झाला. त्याविरुद्ध समाजाची प्रतिक्रिया उमटताच कलावंताच्या स्वातंत्र्याचा गवगवा सुरू झाला आणि समाजाला अश्लील वाटणारं, मुळीच न समजणारं लिहिण्याचं स्वातंत्र्य एवढाच कलावंताच्या स्वातंत्र्याचा अर्थ समाजानं घेतला. कसोटीची वेळ आली तेव्हा लेखकाचं स्वातंत्र्य गेल्याबद्दल जनसामान्यांना काही वाटलं नाही, व जनसामान्यांना कसली आलीय स्वातंत्र्याची जाण, आणि चाड, म्हणणाऱ्या लेखकांना इतरांचे मूलभूत हक्क गेले म्हणून काही फार कढ आले नाहीत. जीवन आणि कला यातलं फसवं द्वंद्व अशा प्रकारे पराकोटीला गेलं. हे आता पुढच्या काळात टाळता आलं पाहिजे. बा. सी. मर्ढेकर साहित्यिकांनी प्रतिभेची वगैरे फार डिंग मारू नये. जीवनाच्या सर्व क्षेत्रात काहीतरी नवीन कर्तृत्व प्रस्थापित करणारे सर्वच प्रतिभावंतच असतात, उद्योग, व्यापार, राजकारण, शेती, समाजसेवा, वैद्यक, धर्म-संस्कृती, संघटना, युद्ध आणि अशा अनेक क्षेत्रात प्रतिभावंत असतात, ती क्षेत्रे समृद्ध करत असतात. त्यांच्या प्रतिभाव्यापारांचं स्वरूपच असं असतं की सामाजिक संदर्भाचा विचार डावलून चालत नाही.

त्यामुळं त्यांच्याबाबतीत रूढ सामाजिक विचारसरणी विरुद्ध प्रतिभावंताची निर्मिती असं द्वंद्व फार काळ टिकत नाही, दोन्हीच्या आघात प्रत्याघातातून निर्मितीचा प्रवाह अखंड चालतो. त्याला उसंत नसते. ही उसंत कलेच्या क्षेत्रात आहे, साहित्याच्या क्षेत्रात आहे. इतर क्षेत्रातली प्रतिभा हेरून तिचा आपल्या माध्यमाला अनुकूल असा आविष्कार करण्यासाठी लेखकांनी ही उसंत वापरली पाहिजे. जास्तीत जास्त जाणीवपूर्वक शोध घेऊन मानवी व्यवहाराची नवनवीन क्षेत्रं सहभागाच्या नम्र प्रेरणेमधून चाचपली पाहिजेत. सहभाग फार मोठा शब्द झाला. बंधनकारक झाला; पण निदान सहप्रवास झाला पाहिजे. मराठी समीक्षकांना हे विचार नवीन वाटण्याचं कारण नाही. ३५ वर्षांपूवी, १९४३ मध्ये कुसुमावती देशपांडे साहित्यिकांना उद्देशून म्हणाल्या, ‘‘...आज आपल्या मन:शक्तींना आवरून आत्मकेंद्रित करण्यापेक्षा त्यांना समाजाचे संशोधन करण्यासाठी, बाह्यविश्वाच्या दाही दिशा धुंडाळून काढण्यासाठी, वास्तवतेचे विश्लेषण करण्यासाठी, सत्याची दीक्षा देऊन दूर पाठवणे अत्यंत अवश्य आहे. हे कार्य करीत असता स्वत:च्या अंतरंगाची जी ओळख होईल ती अर्थात आपल्याला हवी आहे, नव्हे तीच ओळख आपल्याला हवी आहे. कृतींतून जी स्वत:ची ओळख घडून येते तीच मोलाची आहे.’’ स्वातंत्र्य अगदी तोंडावर आलेलं असताना त्यांनी हे विचार मांडले त्यात तत्कालीन विचारप्रणालीशी तादात्म्य होतं.

स्वातंत्र्य मिळताच नवनवीन क्षेत्रं धुंडाळून, पत्करून एक नवा देश घडवण्याची स्वप्नं त्याकाळच्या विचारी माणसांना पडत होती आणि कुसुमावतीबाई आपल्या क्षेत्रात तशाच प्रकारची स्वप्नं रंगवत होत्या, नव्या वाटांकडे अंगुली निर्देश करत होत्या, इतरही क्षेत्रातली सामाजिक जाणीव उत्तरोत्तर कमी झाली आणि साहित्य क्षेत्रातली तर लुप्त होण्याच्या बेतात आली. काही जण असं म्हणतात की याबाबतीत इतर समाजापेक्षा वेगळं असं लेखकांनी काय केलं? सगळेच स्वार्थी झाले तसे साहित्यिकही झाले. वरवर दिसायला हे निर्दोष दिसतं पण याबाबतीत आपण चारचौघांसारखे आहोत असं म्हणणारे हेच महाभाग जेव्हा आपल्या वेगळ्या स्वातंत्र्याचे नारे देऊ लागतात तेव्हा हा दंभ आहे की आत्मवंचना तेच कळेनासं होतं. फॉर्मविषयी एक काहीतरी चमत्कारिक कल्पना होऊन बसलेल्या आहेत. कोणत्याही कलाकृतीला तिचं स्वतंत्र व्यक्तित्व प्राप्त होऊन पूर्णत्व येतं ते फॉर्ममुळेच; हे सर्वांना मान्य होण्यासारखं आहे. घोळ आहे तो हा फॉर्म कसा साकार होतो ते समजून घेण्यात. अतिशय सावध, जागरूक राहून फॉर्म तयार करायचा असतो असं बरेच लोक मानतात.

कुणीतरी एक सांगतो म्हणून कादंबऱ्या छोट्याच्या मोठ्या मोठ्याच्या लहान करतात. पुनर्लेखन करतात. काही जण तर शेवटी मजकूर मशीनवर चढला तरी हा शब्द काढून तो घाल असं करत असतात. अशा तऱ्हेनं व्यक्त होणारा अनुभव वाचकानं मात्र - जसा व्यक्त झाला आहे तसा - स्वायत्त मानला पाहिजे. म्हणजेच कितीही कारागिरी, डागडुजी, रंगसफेदी, असली-नकलीपणा असला तरी उत्स्फूर्त, स्वायत्त कलाविलासाचंच श्रेय दिलं पाहिजे. मुळात आधी फॉर्म पक्का करून मग त्यात आशय भरण्यातच काहीतरी घोटाळा आहे. निर्मितीची मागणी घेऊन समोर येणारा अनुभवच आपला आशय आणि फॉर्म काही प्रमाणात निश्चित करत असतो. पुढले संस्कार निर्मात्याची प्रतिभा करते व निर्मितीप्रक्रियेत फॉर्म उत्क्रांत होत जातो. कलावंताच्या दृष्टीने तो एक अनुभव असतो, एक गवसणं असतं. Form is a discovery. फॉर्मचं बुजगावणं किती?

अशा प्रकारे पहिला आराखडा तयार झाल्यावर किरकोळ बदल होतात, करणं अटळ असतं परंतु तयार झालेल्या Form शी विसंगत बदल करता येत नाही. डागडुजी तर मुळीच करता येत नाही. कलाकृतीचा तोल विस्कटतो. इकडे तर रूपबंद, कल्पबंद अशी गोडगोड नावं देऊन नवनवे ‘आकार’ तयार करण्याची स्पर्धाच चालली आहे. ‘हे दोन फॉर्म मोडून मी हा तिसरा फॉर्म तयार केला’ असं ही मंडळी बेधडक सांगतात तेव्हा त्यांची कीव येते. अशा रूपब्धांवर त्यातला आशय पूर्णपणे बाजूला ठेवून दोन दोन दिवस सेमिनार चालतात. बरोबरच आहे, जिथे कलावंताच्या व्यक्तित्वाचे तुकडे मान्य करूनच समीक्षेची सुरुवात होते, तिथे कलाकृतीचे तुकडे झाले तर नवल ते काय? विशिष्ट सामाजिक परिस्थितीत विशिष्ट आशय निर्मितीसाठी दार ठोठावू लागतो तेव्हाच विशिष्ट नवे फॉर्म ही ठळक होऊ लागतात. त्यासाठीही गरज निर्माण व्हावी लागते, तिची उत्कट अनुभूती कलावंताला यावी लागते. कलावंत जितका एकलकोंडा, जितका समूहापासून दूर तितकी ही जाण दुर्मिळ होते. एरवी ज्याला फॉर्म, रचनातत्व वगैरे मोठमोठे शब्द वापरले जातात त्याला ‘शब्दावर हुकुमत असली आणि भाषेची लय तोंडवळणी पडली की कविता लिहिणं फारसं कठीण नसतं’ असं स्वत: मर्ढेकरच म्हणाले होते. हा फॉर्मचा आटापिटा त्यांनी इतका सामान्य मानला होता.

मर्ढेकरांच्यावर आपण फार अन्याय करतो आहोत की काय? त्यांना मराठीतल्या सौंदर्यवादी समीक्षेचे जनक मानून, त्यांचं व्यक्तित्व-वाङ्‌मय, सौंदर्यशास्त्र साहित्य यात द्वैत आहे असं मानून आपण बहुतेक स्वत:ची सोय करतो आहोत. मर्ढेकरांचा सुसंगत शोध घेण्याचा प्रयत्न मी अन्यत्र केला आहे, परंतु एखाद्या माणसाचे काही मधलेच सिद्धांत उचलून ते वापरणे हा अपराध आहे. केशवसुत म्हणाले त्याप्रमाणे ‘आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जग नवे आम्हास खेळावया’ असं मानायचं, आसपासचे ‘सारेही बडिवार’ तुच्छ मानायचे. मात्र वेळ येताच ‘पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते?’ ही जबाबदारी देखील झटकून टाकायची हा कोणता संधीसाधूपणा? हे सुरलोक आणायचं असेल तर पृथ्वीच्या सांप्रत स्थितीची कळ मनात उमटल्याखेरीज लेखकांच्या हातून काय घडणार? स्वत: मर्ढेकरांनीच बालकवीचे शब्द निवडून ' परजीवास्तव जेथ आतडे कळवळुन येई। त्या हृदयाविण स्वर्ग दुजा या ब्रह्मांडी नाही।। ' अशीच पृथ्वीवरच्या स्वर्गाची व्याख्या केली. अशी व्यापक करुणा, सहभाग, सहप्रवास यातूनच निर्माण होईल.

अशा प्रकारच्या सहभागाकडे, सहप्रवासाकडे निर्मितीक्षम मंडळींना ढकलत राहाणं हे समीक्षेचं काम आहे. ढकलणं जरा जाचक वाटले तर तिकडे निर्देश करणं असं म्हणू या. पण सध्या इतकं अंतर पडलं आहे की थोडंसं ढकलावंच लागणार आहे. अमक्या सामाजिक परिस्थितीवर लिहा असं समीक्षकानं म्हणू नये, त्या परिस्थितीचा संदर्भ तुमच्या लिखाणात अजिबात सुटला आहे एवढंच त्यानं दाखवून द्यावं प्रत्येक लेखकानं हा सहभाग आपल्या ताकदीनं घ्यायचा आहे, आपली वाट आपणच निवडून, शोधून, आपणच ठेचा खाऊन काट्याकुट्यांनी ओरबाडून घ्यायचे आहे. यातून साहित्यावर काय उपकार व्हायचे असतील ते सावकाश होवोत पण स्वत:वर मात्र अनंत उपकार होतील. साहित्यात एक प्रचंड उत्पादन वेड शिरलं आहे. ते कमी होईल हा एक लगेच होण्यासारखा फायदा आहेच. हे निर्णय लेखकानं स्वत: घ्यायचे आहेत. स्वत:चं व्यक्तिमत्त्व बंदिस्त न करता आणि स्वत: बंदिस्त राहून उगीचच फॉर्मची खोटी मोडतोड न करता स्वत:च्या सवयी, पूर्वग्रह, कलानिर्मितीबद्दलच्या गोड कल्पना यात मोडतोड मराठी लेखकांनी करावी. स्वत:ला थोडंसं मोडावं, फाडावं, समाज जीवनाच्या नवनवीन अंगांपुढे एक्पोझ करावं. नवे फॉर्म आपोआप सुचतील, हिंमत असेल तर प्रत्यक्ष होतील. त्याची काळजी करायचं कारण नाही. नाहीतरी इतके दिवस या साऱ्या पासून वेगळं राहून असा काय दिव्य प्रकाश पाडला ते आपण पाहतोच.

आणीबाणीची तार आत्माविष्कार ही निर्मितीची एक प्रमुख प्रेरणा असणार. संवाद ही सुद्धा तितकीच प्रमुख प्रेरणा आहे. किंबहुना आत्माविष्कार व संवाद यात पुष्कळच तादात्मताही आहे. ‘तुका म्हणे होय। मनाशी संवाद। आपुलाची वाद। आपणाशी।।’ अशा काव्यमय शब्दातून ती फार छान व्यक्त झालेली आढळते. 'The poet is a man speaking to men' हे १८ व्या शतकातला रोमँटिक वर्डस्वर्थ आणि विसाव्या शतकातला मार्क्सिस्ट सार्त्र दोघेही म्हणतात तेव्हा हा संवादच त्यांना अभिप्रेत असतो जो spontaneous overflow of powerful feelings मधून आकार घेतो, प्रकट होतो. जीवनविषयक आस्था, पराकोटीची करुणा असेल, भोवतालच्या जीवनाच्या दबावाखाली जर संवेदना पक्की झाली असेल तर अशा प्रकारचा संवाद हा आपोआपच निर्माण होईल. वाङ्‌मयाचं जीवनाशी असलेलं नातं अनेक स्वरूपात, अनेक पातळ्यांवर अनेक गुंतागंतीची व त्यामुळे मनमोहक अशी रूपं धारण करून प्रकट होताना दिसेल. त्याचा शोध घेऊन होणारी निर्मिती सुद्धा स्वतंत्र असूनही तुटून निघालेली, तत्कालीन समाजजीवनाशी पूर्णत: अप्रस्तुत (irrelevant) अशी असणार नाही.

माझ्या डोळ्यांपुढे एक गंमतीदार उदाहरण नेहमी येतं. ती analogy समोर ठेवतो व संपवतो. पूर्वीच्या काळात भरल्या घरात तार आली की ती उघडायच्या आधीच रडारड सुरू व्हायची. संकटच आलेले असणार या खात्रीनं माणसं हक्काबक्का होऊन जायची. आणीबाणीच्या कालखंडात अशी तार - सामाजिक जाणिवेची - आपल्या साहित्यिकांना केली आहे. उघडून वाचायच्या आधीच रडारड सुरू झालेली आहे. उघडून पाहू या कदाचित आत शुभ संदेश असेल. या काळाचा संदेश हा मयताची बातमी सांगणारा महार आहे, की ‘उठा जी हो मायबाप पुरे झाली झोप’ असं म्हणणारा एकनाथांचा जागल्या आहे हे त्याच्याशी बोलून त्याचं म्हणणं समजून घेतल्याशिवाय आपल्याला कसं कळेल ?

लेखक- विनय हर्डीकर ; अंक- रुची ; वर्ष- दिवाळी १९७८


समाजकारण , राजकारण , आणीबाणी , विनय हर्डीकर

प्रतिक्रिया

  1. subkem

      7 वर्षांपूर्वी

    >>अमक्या सामाजिक परिस्थितीवर लिहा असं समीक्षकानं म्हणू नये, त्या परिस्थितीचा संदर्भ तुमच्या लिखाणात अजिबात सुटला आहे एवढंच त्यानं दाखवून द्यावं<< असं हर्डीकरांनी ह्या लेखात लिहिलय. प्रत्यक्षात मात्र मान्यवर समीक्षक लोक केवळ संदर्भाची उणीव दाखवून थांबत नसतात. अमुक आशय, संदर्भ लेखनात असला पाहिजे ह्यासाठी लेखकावर हुशारीने दबाव आणला जात असतो. मान्यवर समीक्षकांना अपेक्षित असलेला संदर्भ लेखनात नसेल तर त्या लेखकाची दखल घेणं बंद होतं. सामाजिक परिस्थितीची जाणीव अशा साध्या वर्णनामागे एका राजकीय विचारसरणीला बांधून घ्या असा छुपा आग्रह असतो. लेखकाच्या सृजनशीलतेला असेलला हा धोका हर्डीकरांना ७८ साली नीट समजला नसेल पण २१ व्या शतकातील वाचकांनी ह्याबाबत सजग राहायची गरज आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen