साहित्यिकांची वामकुक्षी निर्वेध चालू आहे!

आणीबाणी    अशोक शहाणे    2018-06-06 06:00:25   

अशोक शहाणे हे मराठी साहित्य विश्वातलं आणि विचारविश्वातलं अबलख नाव. त्यांच्या चौखूर उधळण्यातून वेळोवेळी अनेकांच्या डोळ्यांत वास्तवाची धूळ गेली आणि अनेकांच्या सामाजिक-साहित्यिक वकुबाविषय़ी प्रश्नचिन्हेही निर्माण झाली. आणिबाणीच्या काळात शहाणे चाळीशीचे होते.  अल्पकाळातच बंद पडलेल्या दोन नियतकालिकांचे जन्मदाते असूनही त्यांचा दबदबा (की दहशत?) निर्माण झाला होता. आणीबाणीमुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आला, असं म्हणताना, मुळात सेन्सॉर व्हावं असं काही मराठी साहित्यिक लिहितच कुठे होते, अशा रोकड्या सवालासह त्यांनी दुर्गा भागवतांपासून तर जयवंत दळवींपर्यत मराठी साहित्य विश्वाच्या वामकुक्षीवर आपल्या लेखात गुलेलीतून नेम धरला होता. आणीबाणी विशेषांकांतर्गत हा दुसरा लेख. रूचीच्या अंकात तो १९७८ साली प्रकाशित झाला होता-

********

गोष्टींना सुरुवात तशी कितीतरी आधीपासनंच झालेली होती.

उदाहरणार्थ राजा ढाले वगैरे अनियतकालिकांच्या आघाडीवरली मंडळी दलित साहित्याचा सवता सुभा मांडायची खटपट करत होती. सतीश काळसेकर वगैरे लोकं गुलाबी छटा जास्ती लालसर करून टाकत होते. त्यातनंच पुढं मग दलित पँथर पण निघाली. सतीश आपला ट्रेड युनियन नि त्या नावानं मग तथाकथित पुरोगामी साहित्य वगैरे भानगडीत गुंतून पडला. आम्ही मंडळी त्यांना जरा थोरली. आम्ही हातपाय आवरून चुपचाप होतो. अनियतकालिकं सगळीच थंडावून गेली होती. तथाकथित सामाजिक-राजकीय चळवळीत ह्या पोरांना जास्ती रस वाटायला लागला होता.

कुणी म्हणेल हे आपलं त्या-त्या माणसाच्या स्वभावानुरूप होतं. चंद्रकांत खोत कुठं असलं काही करत होता? तोसुद्धा अनियतकालिकवालाच ना? पण तिकडं लांब औरंगाबादेलासुद्धा ‘वाचा’ बंद करून नेमाडेपंत विद्यापीठातल्या शिक्षकांच्याच प्रश्नांत डोकं घालून होते. दरम्यानच्या काळात त्यांनी लिहून हातावेगळ्या करून टाकलेल्या ‘बिढार’, ‘जरीला’ ह्या कादंबऱ्यातनंसुद्धा ‘कोसला’ तलं सूत्र अबाधित राहिलेलं नव्हतं. चांगदेव पाटलाच्या निमित्तानं आपल्या कॉलेज शिक्षणाचं एक भयंकर चित्रच ह्या कादंबऱ्यातनं उभं रहात होतं.

एकूण नव्या पिढीची बहुतेक सगळी क्रियाशील मंडळी, त्यात आपण नाही, आपल्या कृतीतनं मराठी साहित्याच्या एका उणिवेवर बरोब्बर बोट ठेवत होती. की अलीकडच्या प्रस्थापित मराठी साहित्याला समाजाचं काही सोयरसुतक राहिलेलं नाही. ह्यांच्या लिखाणाला समाजातल्या अंत:प्रवाहाची डूब नाही. किंबहुना गेल्या पाचपंचवीस वर्षांत हे असंच असायला हवं अशी भूमिका साहित्यातल्या - एव्हाना -म्हाताऱ्या  झालेल्या मंडळींनी हिरीरीने मांडलीय. मराठी साहित्यात इत:पर बंडखोरीवजा काही लिहिलं गेलं तर ते नागवेपणानं सेक्सभोवतीच घोटाळणारं असायला हवं, असं पण सगळ्यांना वाटायला लागलं होतं का काय कोण जाणे. पण अशी उदाहरणं उदंड आहेत.

तर गोष्टींना सुरुवात ही अशी कितीतरी आधीपासनंच झालेली होती.

त्यामुळं नंतर आणीबाणी प्रत्यक्षात आली तेव्हा आमचे मित्र दि. बा. मोकाशी मोठ्या चपखलपणे म्हणालेच की सेन्सर व्हावं असं आपण पूर्वी तरी काय लिहीत होतो? त्यामुळे आपण मनमुराद आपली पूर्वीची चाकोरी धरून राहिलो तर सेन्सरचा आपल्याला काय जाच होणाराय? मग उगा सेन्सरशिपबद्दल आपण कशाला ओरडायचं? हे भलतंच प्रांजळ झालं. तितकंच बिनतोड. ह्याला काही उत्तरच नाही. सरकार लाख का सेन्सर बसवेना, सेन्सर करावं असं आपल्या लिखाणात काही नसेलच तर मग उगा आरडाओरडा कसला! अन्‌ ह्याकरता आपल्याला तोशीस तर काहीच नाही. आपण आपलं पूर्वीसारखंच आपल्याला वाटतं तेच लिहायचं. त्यात सेन्सरला आक्षेपार्ह काही सापडायचंच नाही. तर मग असेना का सेन्सरशिप. तिचा ललित साहित्याला काहीच बाध नाही. - हे आमच्या मोकाशीचं अगदी नेहमीप्रमाणं शांत, थंड पण ठणठणीत मत.  

आमचे जयवंत दळवी मात्र आणीबाणीमुळे अस्वस्थ झालेले. कदाचित त्यातल्या बेसुमार धरपकडीमुळे असतील, कदाचित सभोवार पसरवलेल्या दहशतीमुळे असतील, तर कदाचित छापावयाच्या आधी सगळंच सेन्सरकडनं पास करून घ्यायला लागत असल्यामुळं पण असतील. अशा दळवींची एक कादंबरी ऐन आणीबाणीतल्या पहिल्या दिवाळीत ‘श्री’च्या अंकात आली. नावसुद्धा आता आठवत नाही. पण नेहमीसारखीच होती. आता मुळात कोणत्याही घटनेचे साहित्यात पडसाद उमटायलाच हवेत अशी सक्ती तर नाहीच. अन्‌ समजा उमटायचेच असतील तरी ते अमुक इतक्याच वेळात असाही काही दंडक नाही. त्यामुळं आणीबाणीमुळं कातावलेल्या दळवींनी लगेच काही जोरदार लिहावं अशी अपेक्षा बाळगणंच मुळात चूक. तरी आमचे विद्याधर पुंडलिक वेगळीच एक उत्पत्ती द्यायला लागले की ही कादंबरी हा दळवींना अनुभव आहे अन्‌ आणीबाणी वगैरे हा मनाचा भाग झाला.

म्हणजे मग सर्वच ललित साहित्य हे अनुभवाच्या पातळीवर असेल तर हा अगदीच थिल्लरपणा झाला. किंवा मग आणीबाणीबद्दलची प्रतिक्रिया ही मतांच्या पातळीपेक्षा खोलात रुजलीच नाही बहुतेक. अनुभवाची पातळी तिनं गाठलीच नाही. अन्‌ तरी सेन्सरशिपचा फटका अगदी ‘आलोचने’ पासून ‘सत्यकथे’ पर्यंत सगळ्यांना कोणत्या का निमित्तानं होईना बसला होता. पण हा बहुतेक अपवादात्मकच मानला त्यांनी. बाकी सेन्सरवाल्यांनी आडकाठी आणावी असं लिहीतच कोण आलं होतं हेच खरं. दुर्गा भागवत तुरुंगात गेल्या ते अगदी स्वच्छ सांगायचे तर विनाकारणच. मिसाखाली पकडायचं कारण खुद्द सरकार सांगत नव्हतं, तर आपण आणखी कारणं कशाला पुरवा! पण तरी निदानपक्षी लिखाणामुळे किंवा लेखक म्हणून तरी नाहीच नाही. त्या लेखक होत्या, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या हे सगळं खरं असलं तरी लागू नव्हतं. तेव्हा त्या तुरुंगात गेल्या ते एक नागरीक म्हणून. नागरी स्वातंत्र्याचा वसा घेऊन.

अन्‌ मग त्याच सुमाराला एकदा कमल देसाईंनी चाटच पाडलं. त्यांनी सांगून टाकलं की आमचं सौंदर्यशास्त्र एकूणएक नैतिक मूल्यं मानूनच चालतं. ह्याचा अर्थ त्यांचा जो असेल तो असो. पण एकूण त्यांच्या मनानं सौंदर्यशास्त्राला नि पर्यायानं सौंदर्यशास्त्राची सामग्री असलेल्या साहित्य वगैरे कलांना नैतिक अधिष्ठान म्हणजे परत काही का असेना पण असतंच. ती काही आम्ही शास्त्रबाह्य गोड नाही मानत. इतकं होतं तोपर्यंत सतीश, नेरूरकर वगैरे पुरोगामी लेखकांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना सेन्सरशिप आपल्या हाती सोपवायची विनंती केली होती. दलित पँथरमध्ये ढाले-ढसाळ फळ्या पडल्या होत्या. सत्यकथा वगैरे मासिकं नेहमीसारखीच निघत होती. याशिवाय घरी बसल्याबसल्या काही लिहून ठेवत असतील. उदाहरणार्थ पु. शि. रेग्यांनी काही कविता लिहून ठेवून दिल्या होत्या. आणखीही कुणी नक्कीच लिहून ठेवून दिलं असेल.

ह्या सबंध काळात वर्तमानपत्रांनी भलतीच अजोड कामगिरी बजावली. सेन्सरशिपचा फटका त्यांना उघडच जास्ती बसला होता. अन्‌ त्याचमुळं का काय त्यांनीच सर्वात जास्त शेपूट घातलं. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून टेंभा मिरवणाऱ्या  मंडळींना सरकारने थोडंसं खरवडल्याबरोबर जे बाहेर पडलं ते पितळ होतं असंसुद्धा म्हणणं धाडसाचंच होईल. इतकं होईपर्यंत अचानक इंदिराबाईंनी निवडणुका जाहीर केल्या. याद राखून ठेवा म्हणून वर्तमानपत्रांना दम भरून त्यांचे हात जरा ढिले केले गेले. वर्तमानपत्रांनी पण काय होतंय कुणास ठाऊक, उगीच धोका कशाला पत्करा असा पवित्रा घेऊन प्रचाराच्या बातम्या दिल्या. अन्‌ त्यातच शेवटी निवडणुकांचा निकाल लागला.

आणीबाणी उठली. सेन्सरशिप आपोआपच गेली. आणीबाणीच्या काळात कुठंतरी सामाजिक-राजकीय परिस्थितीनं ललित साहित्यातसुद्धा प्रवेश केला असं पु. शि. रेग्यांचंदेखील म्हणणं पडलं. म्हणजे ‘निरंकुश: कवय:’ हे त्रिकालाबाधितच असायला हवं. कवीवर अंकुश असताच कामा नये. तसा अंकुश कुणी ठेवू पाहील तर मग कवीनं पहिल्यांदा निरंकुश व्हायला खटपट करायला हवी. पण फक्त निरंकुश असला की माणूस कवी होतोच असंही नाही. पण कवी असलेला माणूस मात्र निरंकुशच असायला हवा. अन्‌ आणीबाणीत कवीला हा निरंकुशपणा लाभत नव्हता, एवढं तरी कबूल करायलाच हवं.

रेगे हे कलावाद्यांचे मोठे अध्वर्यू. त्यांच्यात प्रोफेसरी साचेबंदपणा नावाला नव्हता. त्यामुळंच बहुतेक आपली भूमिका ह्या आणीबाणीच्या संदर्भात तपासून बघायला हवी एवढं त्यांना कबूल होते. म्हणजे होते, तू मांड तर खरं, मग बघू या काय निघतं ते. माझ्या हातानं मांडून वगैरे काही झाले नाही. ‘लिपी’ निघायचं जर पक्कं झालं असतं तर मग काही खर्डा तयार केलासुद्धा असता. पण ‘लिपी’ चं बारगळलं अन्‌ रेगे सुद्धा एकाएकी सगळ्याच्या पलीकडे गेले.

त्याच सुमारास आणखी बोलणं झालं होतं चित्रकार गोडश्यांशी. त्याचं म्हणणं जास्ती ठाशीव होतं. की ह्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतानं लोकशाहीबद्दलच्या जगातल्या विचाराला एक आध्यात्मिक डूब देऊन टाकलीय. ह्याच्या आधी ही नव्हतीच. ही भारताची खास कॉंट्रिब्यूशन. ह्याच्यामागे अर्थातच देशात हजारो वर्षापासनं होत गेलेली मनाची घडण उभी आहे. हे निव्वळ एकोणीस महिन्यांतल्या बळजबरीच्या नसबंदीचं फलित नव्हे. ही गोष्टच वेगळ्या पातळीवरची होऊन गेली. हे सगळे सांगणारं टिपण पण ते तयार करणार होते. ‘लिपी’ची कल्पना बारगळली तसं हे सगळं बासनातलं बासनातच राहून गेलं.

अरुण लिमयांनी आणीबाणीतल्या कविता छापून काही होणं शक्य नव्हतंच. विनय हर्डीकरांचा ‘जनांचा प्रवाहो’ अगदीच उथळ निघाला. बाकी वर्तमानपत्रं माफीबिफी मागून आपण मोकळे झाल्याच्या समाधानात वावरायला लागली. अन्‌ आणीबाणीच्या निवडणुकीत दरिद्री निरक्षर उपाशी तापाशी लोकांनी आपला मतदानाचा हक्क वापरून मूठभर शहरी शिकल्यासवरलेल्यांच्या हातच्या लेखण्या मोकळ्या केल्या का काय असा सवाल खरोखरीच उभा राहिला. तुतारी कुणीतरी आणून देईल तरच आपण फुंकर मारू अशी काहीशी भूमिका ह्या लिहिता वाचता येणाऱ्या  मंडळींनी आपोआपच घेतली होती. ह्या मंडळींनी आणीबाणीच्या काळात नाव घ्यावं असं काही केलंच नव्हतं. त्यामुळं आणीबाणी गेल्याबरोबर ती विसरून जाणे त्यांच्या पथ्यावर पडल्याजोगं होतं.

पण हा प्रकार होता तरी काय, ह्याच्यात आपला हात होता तरी नेमका कुठं, अन्‌ अनुभवाच्या पातळीवर जाईल असं काही आपल्याला वाटलंच नाही ते का, माणूस म्हणून तर सोडाच पण कसंही का होईना  निव्वळ जगण्याचासुद्धा लोकांचा हक्क हिरावून घेतला गेला तरी आपण आपले निरूपद्रवी तथाकथित ललित साहित्यच कसे काय प्रसवत राहिलो अन्‌ मग आजूबाजूच्या लोकांशी आपला काही सबंध आहे का नाही, का आपला ओनरशिप ब्लॉक  एवढंच आपलं जग, अन्‌ मग हे असंच ठीक असलं तर मग आपण लिहितो त्यात तथ्य तरी कितपत येणार वगैरे हजार प्रश्न वास्तविक पडायला हवे होते. ते पडले नाहीत म्हणजेच आमची वामकुक्षी निर्वेध चालू आहे.

********

लेखक-अशोक शहाणे; अंक- रुची; वर्ष- दिवाळी १९७८ शोधटिपा - emergency , आणीबाणी , दुर्गा भागवत, अरुण लिमये , राजा ढाले ,  कमल देसाई , जयवंत दळवी , विनय हर्डीकर , पु. शि. रेगे


चिंतन , राजकारण , रुची , आणीबाणी

प्रतिक्रिया

 1. Vivek Govilkar

    2 महिन्यांपूर्वी

  अशोक शहाण्यांचा हा लेख म्हणजे बाष्कळ शेरेबाजीने भरलेला आहे. दुर्गा भागवतांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून यशवंतराव चव्हाणांच्या उपस्थितीत आणीबाणीविरुद्ध ठणठणीत भूमिका घेतली होती हे शहाण्यांना माहीत असायला हवे होते. स्वतः शहाण्यांनी कुठे काय विशेष केले होते त्या काळात?

 2. Vinesh Salvi

    2 महिन्यांपूर्वी

  लेख...प्रतिक्रिया आणि आज कोरोना काळात लेख वाचला...पूर्वीचे साहित्यच दर्जेदार होते...

 3. Amogh

    4 वर्षांपूर्वी

  खास2

 4. Amogh

    4 वर्षांपूर्वी

  अप्रतिम???

 5. shubhadabodas

    4 वर्षांपूर्वी

  सर्वंकष आढावा घेतला आहे

 6. Makarand

    4 वर्षांपूर्वी

  अत्यंत परखड,मराठी साहित्य जगताची क्ष किरण तपासणी

 7. maheshbapat63

    4 वर्षांपूर्वी

  परखड!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen