आणीबाणी म्हणजे काय रे भाऊ?

आणीबाणी    रमेश पतंगे    2018-06-28 20:00:40   

१९७६ पासून दरवर्षी जून महिन्यात आणीबाणी हा विषय, विविध माध्यमांत चर्चेला असतोचं. सध्याही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणीबाणी आणू इच्छितात असे मिडियातील एका गटाचे म्हणणे आहे. पैकी काहींच्या मते तर मोदींनी अघोषित आणीबाणी लादलीच आहे. या सर्वाचा उहापोह करणारा लेख श्री. रमेश पतंगे यांनी महा एमटीबी या संकेतस्थळावर परवा लिहिला. आणीबाणीच्या सदर चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज सोशल मिडिया सदरात तो लेख वाचा- ******** इंदिरा गांधींनी १९७५ साली देशात आणीबाणी पुकारून ती जवळजवळ २१ महिने ठेवली, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले, सर्वांची बोलती बंद केली. सव्वा लाखांहून अधिक लोकांना तुरुंगात टाकले, सर्व देशच तुरूंग करून टाकला. हे काम त्यांनी फार चांगले केले. आता तुम्ही विचाराल, हे चांगले कसे काय? जून आला की सगळे लोक आणीबाणी आठवून तिच्यावर तुटून पडतात. त्यांचे तुटून पडणे योग्यच असते, पण तरीदेखील इंदिरा गांधींनी एक चांगले काम केले, असे म्हणायला पाहिजे. ते चांगले अशासाठी की, त्यांनी ‘आणीबाणी’ हा शब्द देशाला दिला आणि त्याचा अनुभवसुद्धा दिला. यामुळे मोदींचे शासन म्हणजे दुसरी आणीबाणी आहे, असली भन्नाट वटवट करण्यासाठी विषय लोकांना कसा मिळाला असता? मोदींवर इतर कुठल्याही कारणांनी टीका करता येत नाही, केली तर ती हास्यास्पद होते. म्हणून आता मोदींचे शासन म्हणजे दुसरी आणीबाणी आहे, अशा प्रकारची भाषा एकमेकांची स्पर्धा करीत अनेक लोक मांडताना दिसतात.

आपल्यापैकी अनेकजण वेळ घालविण्यासाठी का होईना, दूरदर्शन वाहिन्यांवरील संवादाचे कार्यक्रम ऐकत असाल. अशा कार्यक्रमात तीच ती माणसे, तेच ते बोलत असतात. तुम्ही म्हणाल, त्यात विशेष काही नाही. कारण, मराठी वाहिन्यांवर ज्या कौटुंबिक मालिका चालतात, त्यात तेच ते संवाद ऐकण्याची आम्हाला सवय झालेली आहे, म्हणून दूरदर्शनवरील चर्चांच्या कार्यक्रमांत तीच ती वटवट ऐकण्याची आमच्या कानांना सवय झालेली आहे. हे वटवट करणारे बायकोच्या नथीतून तीर मारणारे हनमंतराव आहेत. यातील अनेकांनी आणीबाणी काय असते, याचा अनुभव घेतलेला नाही आणि ज्यांनी ती पाहिली, तेव्हा ते आपल्या घरात चार भिंतींच्या आड सुरक्षित बसून राहिलेले होते. आणीबाणीचा कालखंड संपून आता ४० वर्षे झालेली आहेत, म्हणजे दोन पिढ्या झाल्या. या नव्या पिढीला आणीबाणीतील ‘आणीबाणी’ हा शब्द सोडला, तर काहीही माहीत नसते. अशा अज्ञानी लोकांपुढे वाट्टेल ते बोलायला काय जाते, आपल्या स्वतःचेही काही जात नाही आणि आपल्या बापाचेही काही जात नाही.

वाऱ्यावरची वरात हे पु. ल. देशपांडे यांचे मनसोक्त हसविणारे नाट्य आहे. त्यात एका शाळेतील दोन मुलांचा एक नाट्यप्रवेश पु. ल. यांनी एकपात्री करून दाखविलेला आहे. लहान भाऊ मोठ्या भावाला विचारतो,“दारू म्हणजे काय रे?” भाऊ म्हणतो,“दारू म्हणजे एक प्रकारचे मादक पेय असते.” लहान भाऊ विचारतो,“मादक म्हणजे काय रे?” भाऊ म्हणतो,“आता तुला कसे सांगू, (डोकं खाजवून) जे प्यायले असता माणूस असंबद्ध बडबड करतो.” “असंबद्ध म्हणजे काय रे भाऊ?” भाऊ म्हणतो,“मी तर तुझ्यापुढे हातच टेकले, (पुन्हा डोके खाजवून) म्हणजे आपली आई जशी बडबड करतात तसे.” वगैरे. दोन भावांतील हा संवाद आणीबाणीवर कसा असेल? “आणीबाणी म्हणजे काय रे भाऊ?” “अरे! आणी म्हणजे ‘मी आणी तू’ यातला आणी, बाणी म्हणजे वाणी, आपण जे बोलतो त्याला हिंदीत ‘बाणी’ म्हणतात. “मग ‘आणीबाणी’चा नेमका अर्थ कोणता?” “अरे भाऊ, बाणीचा बिनडोक वापर करून मी आणि तू मिळून जे मोदींवर चिखल फेकतात तिला म्हणायचे ‘आणीची बाणी - आणीबाणी’ भाषेतील शब्दांचे अर्थ तेव्हाच समजतात, जेव्हा त्या शब्दाची आपल्याला अनुभूती येते. थंड, गरम, गार, तिखट, गोड, कडू इत्यादी शब्द अनुभवाने समजतात. अनुभव नसेल तर जर कुणी म्हणाला, ”मी गरम आइस्क्रीम खाल्ले, तिखट खूप कडू होते, उकळते पाणी खूप गार वाटले.” तर व्याकरणाच्या दृष्टीने वाक्ये ठीक असतील, परंतु अर्थाच्या दृष्टीने हास्यास्पद असतात. आताची परिस्थिती आणीबाणीसारखी आहे, असे जे म्हणतात, ते मी गरम आइस्क्रीम खाल्ले असे म्हणत असतात. यासाठी आणीबाणी काय असते, हे पहिले जाणून घेतले पाहिजे.

आपला देश राज्यघटनेप्रमाणे चालतो. राज्यघटनेने भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा अधिकार जीवन जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा आहे. हा अधिकार राज्यघटनेत असल्यामुळे पवित्र आहे, असे नसून तो राज्यघटनेने स्वीकारलेला असल्यामुळे राज्यघटना पवित्र झालेली आहे. हा अधिकार जेव्हा पहिला माणूस जन्माला आला, तेव्हापासून त्याला प्राप्त झालेला आहे. तो त्याच्या अस्तित्त्वाचा भक्कम आधार आहे. या स्वातंत्र्याच्या अधिकारातून ‘मी तसा तू’ या भावनेतून समतेचा अधिकार निर्माण होतो. मनुष्य म्हणून सर्व मानव समान आहेत, त्याच्यात भेद करता येत नाही, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याच्या अधिकारात दुसरा विषय येतो, तो म्हणजे विचारस्वातंत्र्याचा. जे विचार मनात आले ते प्रकट करण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. जे विचार मनात आले आणि अभिव्यक्त झाले, त्याची अंमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा पुढचा अधिकार झाला. अंमलबजावणी करीत असताना समविचारी लोकांना बरोबर घेणे, त्यांचे संघटन बांधणे, हे झाले संघटन स्वातंत्र्य. मी माणूस आहे आणि माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे. त्या दैवी शक्तीची उपासना माझ्या आवडीप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्य मला हवे. इतके सगळे विषय जीवन जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य यात येतात. याचे रक्षण ज्याचे त्याने करायचे आहे. माणूस समाजात राहतो, म्हणून समाजाने करायचे आहे आणि समाज नीट चालावा म्हणून माणसाने राज्यव्यवस्था निर्माण केली, त्या राज्यव्यवस्थेचे हे काम आहे.

ही राज्यव्यवस्था जेव्हा अनियंत्रित होते, मनाला येईल तसे कायदे करू लागते, तेव्हा ती जुलूमशाहीत परावर्तित होते. काही लोकांना असे वाटते की, सत्तेवर मीच कायम असलो पाहिजे. मी गेल्यानंतर माझ्या मुलाकडे किंवा मुलीकडे ती सत्ता यावी, या सत्तेला कोणी आव्हान देऊ नये, जो कुणी देण्याचा प्रयत्न करील, तो चिरडला जाईल. हे चिरडण्याचे कायदे जेव्हा राज्यसत्ता करू लागते तेव्हा आणीबाणी निर्माण होते. आणीबाणीमध्ये माणसाच्या जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार काढून घेण्यात येतो. हा एक अधिकार काढून घेतला की, वर सांगितल्याप्रमाणे या अधिकारातून उत्पन्न झालेले अन्य सर्व अधिकार आपोआप समाप्त होतात. आपल्या पौराणिक वाङ्मयात प्रल्हादाची कथा येते. तो दानी असतो. त्याच्याकडे दान मागायला एक ब्राह्मण येतो, तो त्याच्याकडे त्याचे शील मागतो. राजा त्याला शील देऊन टाकतो. शील दिल्याबरोबर सरस्वती त्याला सोडून जाते. सरस्वतीच्या मागोमाग लक्ष्मी जायला निघते आणि लक्ष्मीच्या मागोमाग राजलक्ष्मी जायला निघते. तेव्हा राजा विचारतो,“तुम्ही मला सोडून का चाललात?” तेव्हा त्या म्हणतात,“आम्ही सर्व शीलाच्या आश्रयाने राहतो, जेथे शील तेथे आम्ही.” जेथे जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, तेथे स्वातंत्र्य आहे, समता आहे, उपासना स्वातंत्र्य आहे. जेथे जीवन जगण्याचा अधिकारच जातो, तेथे त्याच्याबरोबर आपोआप सर्व जाते.

आणीबाणी याचा अर्थ अशी परिस्थिती ज्यात व्यक्तीच्या जीवन जगण्याचा अधिकार आणि त्याचे स्वातंत्र्य समाप्त होते. १९७५ सालच्या इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीने व्यक्तीच्या जीवन जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य समाप्त केले होते. या अधिकाराबरोबर भाषणस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, उपासनास्वातंत्र्य, मानवी समता सर्व समाप्त झाले. न्यायालये इंदिरा गांधींची बटिक झाली. इंदिरा गांधींविरुद्ध निर्णय देण्याचे धाडस एकाही न्यायमूर्तीला झाले नाही. अपवाद फक्त हंसराज खन्ना यांचा आहे. (संदर्भ- आम्ही आणि आमचे संविधान- लेखक- रमेश पतंगे) इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणून फार चांगले केले, असे जे सुरुवातीला म्हटले, त्याकडे येऊया. इंदिरा गांधींच्या आणीबाणीमुळे सर्व मूखंडांना ‘आज देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती आहे,’ असे मादक पदार्थाच्या सेवनानंतर बेताल बडबडीसाठी वाक्य कसे बरे मिळाले असते? आज देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती आहे, तरीही पुरस्कारवापसीचे स्वातंत्र्य आहे, तरीही वाट्टेल ती बडबड करण्याचे स्वातंत्र्य आहे तरीही, मोदी खोटारडे आहेत, असे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, ज्या विजयाचा देशाच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही, त्या भीमा-कोरेगाव विजयाचा उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य आहे, तरीही 'भारत तेरे हजार तुकडे होंगे,’ हे म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे, न्यूडसारखा चित्रपट दाखविण्याचे स्वातंत्र्य आहे, मी देश सोडून जाईन म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे, ख्रिश्चनांनी मोदींच्या विरुद्ध उभे राहण्याचे स्वातंत्र्य आहे आणि बिशपचे म्हणणे कसे योग्य आहे, हे म्हणण्याचे स्वातंत्र्यदेखील रिबेरिओ यांना आहे, जे सर्वोच्च न्यायालय आणीबाणीत मुके झाले होते, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना, पत्रकार परिषद घेण्याचे स्वातंत्र्य आहे, तरीही देशात ‘आणीबाणीसदृश्य’ परिस्थिती आहे, असे आपल्याला सातत्याने उपदेशाचे डोस पाजणारे सांगत असतात.

ते त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, ते त्यांचे विचारस्वातंत्र्य आहे आणि तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे, मग आपल्याकडे कोणता मूलभूत अधिकार आहे? आपल्याकडे त्यांच्यापेक्षाही भारी असा मूलभूत अधिकार आहे. तो अधिकार आहे- आपले कान बंद करून घेण्याचा. जगातील कोणतीही राज्यसत्ता किंवा वटवटसत्ता मी म्हणेन ते ऐकलेच पाहिजे, याची आपल्यावर सक्ती करू शकत नाही. कोणाचीही वटवट आपल्याला बंद करता येणार नाही, परंतु ती त्याने एकट्यानेच ऐकावी, हे आपण करू शकतो. दुसरी गोष्ट आपण करू शकतो - ती पहिल्या गोष्टीइतकीच महत्त्वाची आहे. ती म्हणजे या वटवटीला मतदानाच्या माध्यमातून आपण जबरदस्त उत्तर देऊ शकतो.

********

लेखक- रमेश पतंगे;  साभार -महा एमटीबी ; २६ जून २०१८    


राजकारण , आणीबाणी , रमेश पतंगे

प्रतिक्रिया

 1. Prakash Hirlekar

    4 महिन्यांपूर्वी

  उत्तम विवेचन.त्यावेळी लढा देऊन भारतात दुसरी स्वातंत्र्याची पहाट आणणाऱ्या सर्वांना आदरपूर्वक वंदन.त्यानंतर संविधानात केलेल्या घटनादुरूस्त्यांमुळे आता तशी आणीबाणी आणणे हे काहीसे अशक्यप्राय आहे. हे विरोधकही जाणतात.पण वातावरण सतत ज्वलंत ठेवणे.ही त्यांची मज बूरी आहे.

 2. Hemant Marathe

    4 महिन्यांपूर्वी

  शब्दांची फोड उत्तम. चांगले विवेचन

 3. sharadnaik

    4 वर्षांपूर्वी

  वसंतराव छान विवेचन.

 4. Tulasidas

    4 वर्षांपूर्वी

  Sadhya pun aghoshit anibani chalu ahe he nischit. Lekhak kunachi baju mandato ahe te lagech dhyanat yet. Mi Vasant Deshapande she sahamat she.

 5. varshagokhale

    4 वर्षांपूर्वी

  एकदम बरोबर!

 6. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  वसंतराव, छान लिहिलंय. पण या महिन्यातले लेख सर्व वाचक वाचू शकतील याच सदरातील होते. या महिन्यापासून तंबी दुराई देखील सशुल्क सभासद वाचू शकतील अशी मोकळीक मिळाली होती. त्यामुळे त्यांचे लेख देखील खुले होते. कुठले लेख वाचायला अडचण आली ते जरूर कळवा.

 7. vasant deshpande

    4 वर्षांपूर्वी

  आणीबाणीचा विषय वेगवेगळ्या प्रकारे सादर करण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे. मला सगळे लेख वाचायला मिळाले नाहीत, कारण आपण केलेली वाचकांची वर्गवारी आणि सामान्यांबरोबर राहण्याचा माझा हट्ट. असो. मी कोणत्याही पक्षाशी बांधून घेण्याच्याविरुद्ध आहे कारण एकदा ते स्वीकारले की रमेश पतंगे म्हणतात ते ''विचार स्वातंत्र्य'' पक्षविचारसरणीकडे गहाण ठेवावे लागते. त्याचा मला तिटकारा आहे. त्यामुळे अनेकवेळा ''ना घरका ना घाटका'' अशी अवस्था होते. ती मी स्वखुशीने स्वीकारली आहे. हे सांगण्याचे कारण पुढे मी जे काही मांडले आहे ते योग्य संदर्भात घेतले तर विचारी वाचकांना आवडेल अशी माझी धारणा आहे. श्री. रमेश पतंगे हे विशिष्ट विचारसरणीशी बांधलेले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत हे त्यांनी लिहिलेले जे काही थोडेफार वाचले आहे त्यावरून माझे मत झाले आहे. त्यामुळे त्यांचे हे लेखनही समर्थनार्थ आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याबद्दल काही न लिहिता मूळ विषयाकडे यावे असे वाटते. मूळ विषय ''आणीबाणी हा आहे आणि ती पुकारणे अथवा अनुभवणे'' हा आहे . ज्याच्या हाती सत्ता असते तो/ती आणीबाणी पुकारतो/ते आणि आमच्यासारखे सामान्य नागरिक ती अनुभवतात. तिच्याबद्दल उघडअथवा गुप्तरित्या निषेध व्यक्त करतात. कारण राज्यव्यवहारानुसार सत्ताधिशाला त्यांनी तसे अधिकार दिलेले असतात. एकदा अधिकार हाती आले की ते आपल्या ''आतल्या आवाजा''नुसार सत्ता राबवायला सुरुवात करतात. त्यांच्याभोवती तोपर्यंत पुरेसे तोंडपुजे जमा झालेले असतात आणि मग बारुआप्रमाणे त्यांना ''राजा(पुढारी) चूक असूच शकत नाही'', असे वाटू लागते ते उघडपणे तसे म्हणू लागतात. त्यात आपला सूर मिसळला नाही तर पुढा-याच्या मर्जीतून अपण उतरू या भीतीने इतर तोंडपूजेही तेच करू लागतात. आधीच स्वतःबद्दल अवास्तव ग्रह करून घेतलेल्या पुढा-याला त्यात सुरक्षितता वाटते आणि त्याची घसरण जोरात सुरू होते. विषय राजकीय आणीबाणीचा असला तरी सर्वच सामाजिक संस्थांत त्याचे प्रत्यंतर येते. संदर्भ राजकीय असल्याने आपण आपल्या देशातल्या राजकीय पक्षांकडे वळलो तर काय आढळते? सर्वच पक्षातले पुढारी याच स्वभावाचे आहेत. ते स्वतः आपापल्या पक्षात याच मनोवृत्तीचे पोषण करतात. याची स्पष्ट लक्षणे दोन आहेत. एक विरोधी मते डावलून तोंडपुजे गोळा करायचे आणि दोन आपले जैविक वारस गादीवर बसवायचे. हे जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत ख-या अर्थाने लोकशाही आपल्या देशात येणार नाही, रुजणार नाही. तो पर्यंत सर्वच पुढा-यांचा आपण लोकशाही वृत्तीचे आहोत आणि दुसरे हुकूमशाही वृत्तीचे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न चालू राहणार आणि त्यांच्यातील जो चलाख असेल तो/ती यात यशस्वी होणार. तो निदान पाच वर्षे आपणावर राज्य करीत राहणार. कारणआपण स्वतःच्या मनात डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की अजूनही आपल्या मनातलीसुद्धा सरंजामशाही संपलेली नाही.

 8. Pramod Sabnis

    4 वर्षांपूर्वी

  फारच मुद्देसुद विवेचनवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen