fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

साकेत महाविद्यालयात रंगला श्रावण महोत्सव!

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ह्या दृष्टीने मराठी भाषा व  वाङ्‍मय मंडळांचे स्थान महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही मराठी प्रथमच्या अंकातून वाङ्‍मय मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील महाविद्यालयांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप काय असते हे परस्परांना कळेल आणि आदानप्रदानही होईल. भाषासंवर्धनाच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतरांनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळेल. मराठी भाषेच्या ह्या पडत्या काळात मराठी भाषा व वाङ्‍मय मंडळांकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषाजाणिवा वृद्धिंगत करून त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे, त्यांना आपल्या भाषिक, सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे यासाठी जी मंडळे अग्रेसर राहतील त्यांना प्रसिद्धी देणे मराठी प्रथमला महत्त्वाचे वाटते. मंडळांच्या समन्वयक प्राध्यापकांना व विद्यार्थिप्रमुखांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक लिहायला विसरू नये. आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा. कल्याण येथील साकेत महाविद्यालयातील श्रावण सोहळ्याचा हा वृत्तांत…

साहित्य पाठवण्याचा पत्ताः marathipratham@gmail.com

मराठी प्रथम दुवा: https://bahuvidh.com/marathipratham

संपर्क क्र. – डॉ. प्रकाश परब (९८९२८१६२४०), साधना गोरे (९९८७७७३८०२)

———————————————————————————————————————————————————————————————————

बदलत्या जीवनशैलीत हळूहळू आपली संस्कृती, आपली परंपरा लोप पावत चालली आहे. नव्या पिढीपर्यंत हा सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी साकेत महाविद्यालयात दि.३० ऑगस्ट २०१९ रोजी श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन साकेत विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती ममता सिंग यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रिया नेरलेकर यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना उलगडून सांगताना त्यांनी सांगितले की, ‘श्रावण हा सगळ्या महिन्याचा राजा. या श्रावणाचे विविध पैलू आहेत. हे पैलू उलगडण्याचा प्रयत्न कला विभागातील विद्यार्थ्यांनी केला आहे.’

श्रावणाचे विविध पैलू उलगडत जाणारा हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. त्यात विद्यार्थ्यांनी श्रावण महिन्याचे महत्त्व, श्रावणातील सणसमारंभ यांची सविस्तर माहिती दिली. सणांचा मुख्य उद्देश आणि त्याचे बदलते विकृत स्वरूप आणि सध्याच्या परिस्थितीत सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रावण महिन्यात येणाऱ्या राष्ट्रीय सणांचा (टिळक पुण्यतिथी, कारगील विजय दिन, स्वातंत्र्य दिन) देखील विद्यार्थांनी परिचय करून दिला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रावण महिन्याची गीते सादर केली. त्यात अमराठी भाषकांचा देखील समावेश होता हे विशेष. विद्यार्थ्यांनी मराठी ‘श्रावण कवितांचे’ पोस्टर करून त्यांच्यातील सर्जकतेला वाट करून दिली. मौखिक कथा परंपरा विशद करून दाखवताना विद्यार्थ्यांनी शुक्रवारची कहाणी सादर केली आणि त्यातून होणारे संस्कार स्पष्ट केले. श्रावणातील सगळ्यात मनोरंजक गोष्ट म्हणजे मंगळागौरीचे खेळ. विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस खेळ खेळून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचा समारोप हळदीकुंकू आणि विद्यार्थ्यांनी आणलेल्या श्रावणातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन झाला.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. साकेत कुमार, सीईओ श्रीमती शोभा नायर, संचालक श्री. सनोजकुमार, प्राचार्य डॉ. एस. के.राजू यांनी प्रोहोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला विभागाच्या विद्यार्थिनी तन्वी कदम आणि श्रेया वुइके यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. शहाजी कांबळे, प्रा.संजय चौधरी, प्रा.प्रसिना बिजू, प्रा. प्रकाश जाधव, प्रा. राजेश्री मुंढे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रा. प्रणाली भोसले आणि प्रा. शलाका चव्हाण यांचा मोलाचा सहभाग होता.

– प्रा. प्रिया नेरलेकर

(कल्याण येथील साकेत महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu