अमेरिकेतील शालेय शिक्षण : पुस्तकापल्याडचे शिक्षण (भाग - २)


"शाळेच्या कॅम्पसमध्ये मारामारी करणाऱ्या अथवा मारामारीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारणत: तीन ते पाच दिवस निलंबित केलं जातं. विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाच्या समस्या सोडवण्यासाठी बहुतेक सर्व शाळांत समुपदेशक असतात. हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी सतत संपर्कात राहतात. अमेरिकेतील शाळांत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे; त्यामुळे वर्गाबाहेर अथवा वर्गात शिक्षा झालेली मुलं दिसली नाहीत." - गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा, अमेरिकेचे शालेय शिक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या या लेखमालिकेतील हा दुसरा लेख -
अमेरिकन शालेय शिक्षणात किंडरगार्टन ते बारावीपर्यंतच्या (K-12) शिक्षणात ग्रेडस्चा समावेश होतो. या शिक्षण पद्धतीला ‘K-12 पॅटर्न’ या नावानं ओळखलं जातं. किंडरगार्टन ते पाचवीपर्यंतच्या इयत्तांचा समावेश प्रायमरी स्कूल्समध्ये (एलिमेंटरी स्कूल्स) होतो. साधारणतः पाचव्या वर्षी मुलं किंडरगार्टनमध्ये प्रवेश घेतात. प्रायमरी स्कूलमध्ये इंग्रजी भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या मूलभूत विषयांबरोबरच शारीरिक शिक्षण, संगणक, कला, संगीत या विषयांचंही शिक्षण दिलं जातं. प्रायमरीच्या वर्गात सर्वसाधारणपणे विद्यार्थी-संख्या २० ते २५च्या आसपास असते. किंडरगार्टनमध्ये मुलांचे गट पाडून, स्वत: शिक्षिका त्यांच्याजवळ बसून त्यांना शिकवतात.
इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळांना ‘मिडल स्कूल्स’ अथवा ‘ज्युनियर हाय’ असं संबोधलं जातं. १० ते ११ वय वर्ष असलेल्या मुलांना या शाळांत प्रवेश दिला जातो. किशोरवयीन मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्या शाळेतच पूर्ण होऊ शकतील, या हेतूने या शाळांची स्थापना करण्यात आली आहे. या स्तरावर इंग्रजी भाषा (वाचन, लेखन), गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, संगणक हे विषय अनिवार्य आहेत. याशिवाय शारीरिक शिक्षण, संगीत, कला, या विषयांचंही शिक्षण दिलं जातं.
माध्यमिक शाळांना ‘हायस्कूल’ संबोधलं जातं. इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या इयत्तांचा समावेश हायस्कूल्समध्ये होतो. या शाळांत १४ ते १५ वर्षे असलेल्या मुलांना इयत्ता नववीत प्रवेश मिळतो. इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मुलांना फ्रेशमेन, दहावीतल्या मुलांना सोफोमोर्स (sophomores), अकरावीतल्या मुलांना ज्युनिअर्स तर इयत्ता बारावीतल्या मुलांना सीनियर्स म्हणून संबोधलं जातं.
माध्यमिक स्तरावर इंग्रजी भाषा (वाचन, लेखन, व्याकरण), इंग्रजी साहित्य (अमेरिकन, युरोपियन, ब्रिटिश) गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र (जगाचा इतिहास, अमेरिकेचा इतिहास), कॉम्प्युटर सायन्स हे विषय अनिवार्य आहेत. यासोबतच एक परदेशी भाषा अभ्यासावी लागते. यात प्रामुख्याने स्पॅनिश, चिनी, जपानी, अरबी, व्हिएतनामी, जर्मन, फ्रेंच, पंजाबी या भाषा अभ्यासाव्या लागतात. व्हिज्युअल अ‍ॅण्ड परफॉर्मिंग आर्टस् (ड्रामा, डान्स, थिएटर, म्युझिक, व्हिज्युअल आर्टस्) यांसारख्या विविध कलांचं शिक्षण दिलं जातं. शारीरिक शिक्षणात व्हॉलीबॉल, टेनिस, बास्केटबॉल, बॅडिमिंटन, स्विमिंग, गोल्फ, सॉफ्टबॉल, बेसबॉल, रेस्लिंग यांसारखे अनेक क्रीडा प्रकार शिकवले जातात.

आरोग्यविषयक जाणिवा मुलांमध्ये विकसित होण्यासाठी आरोग्य शिक्षण हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जातो. याशिवाय टेबल टेनिस क्लब, फॅशन क्लब, मार्शल आर्टस् क्लब, सायन्स क्लब, कल्चर क्लब, नेचर क्लब, एन्व्हायर्नमेंट अवेअरनेस क्लब यांसारखे वेगवेगळे क्लब शाळांमध्ये असतात. सॅनफ्रान्सिस्कोमधील एका शाळेत तर यांसारखे ४० क्लब होते.
अमेरिकेतील शहरी शाळा असो वा ग्रामीण शाळा, या दोन्हीही प्रकारच्या शाळांत सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. बहुतेक सर्वच शाळांतली ग्रंथालये सुसज्ज आहेत. या ग्रंथालयांत वृत्तपत्रे, मासिके, संदर्भग्रंथ, बालसाहित्य अशी क्रमवारी आढळते. मुलांना इथे मोकळेपणाने फिरून त्यांना हवे ते पुस्तक शोधायची परवानगी असते. ग्रंथालयांचे संगणकीकरण झाले असल्याने कोणते पुस्तक ग्रंथालयात उपलब्ध आहे, ते लगेच कळण्याचीही सुविधा या शाळांतल्या ग्रंथालयात असते. मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज अशी क्रीडांगणे आहेत. ग्रामीण भागांतील शाळांत टेनिस कोर्टस्, बेसबॉल कोर्टस्, बेसबॉल फिल्डस्, सॉकर फिल्डस् आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीही शाळांत विद्यार्थीसंख्या आपल्या शाळांच्या तुलनेत फारच कमी आहे. प्रत्येक वर्गात कमीत-कमी २५ आणि जास्तीत जास्त ४० एवढी विद्यार्थीसंख्या असते.

खेडेगावातल्या ज्या शाळांना आम्ही भेटी दिल्या, त्यातल्या काही शाळांना अ‍ॅग्रिकल्चर फार्म होते. या फार्मवर ऋतूप्रमाणे पिकांची लागवड केली जाते. इथे मुलेच शेतात पिकांची लागवड करतात. त्याचे संगोपन करतात. विक्रीयोग्य झाल्यास फुले, फळे आणि भाज्या यांची विक्री करतात. शाळांच्या ‘ग्रीन हाऊस’मध्ये फुलझाडांची वाढ करून त्यांची विक्री केली जाते. या शाळांना पशुपालन विभाग असतो. त्यात मुलं मेंढ्या आणि डुकरांची पिल्लं विकत आणून त्यांची देखभाल करतात. विशिष्ट कालावधीनंतर ते त्यांना फेअरमध्ये विकतात. याशिवाय या शाळांना वेल्डिंगचाही विभाग असतो. इथे त्यांना वेल्डिंगचे प्रशिक्षण देण्याची सोय आहे.
भूकंप, आग, दहशतवादी हल्ले यांसारख्या अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना धैर्याने तोंड देता यावे, यासाठी शाळांत किमान वर्षांतून एकदा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. वर्गामध्ये व्हाइट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डॉक्युमेंट कॅमेरा, ओव्हर हेड प्रोजेक्टर्स, संगणक असे तंत्रज्ञान शिक्षकांच्या मदतीला असते. वर्गात बाकांऐवजी खुर्च्या असतात. त्यामुळे त्या गटकार्य करण्याच्या दृष्टीने हव्या तशा फिरवता येतात.
प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांसाठी १०-१२ संगणक असतात. अमेरिकेत पाच दिवसांचा आठवडा असल्याने शाळांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस चालते. बहुतेक शाळा सकाळी आठ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चालतात. शनिवार आणि रविवार या शाळांना साप्ताहिक सुट्टी असते. अमेरिकन शाळांतील वर्ग हे शिक्षकांच्या नावानं ओळखले जातात. प्रत्येक शाळेतील तासिकांचा कालावधी वेगवेगळा असतो. मी भेट दिलेल्या काही शाळांत ५६ मिनिटांचा एक तास होता. तर काही शाळांत तो ९० मिनिटांचा होता. एक तास संपल्यानंतर मुलं आपापल्या बॅगा घेऊन दुसऱ्या वर्गात जातात. प्रत्येक तासिकेनंतर चार ते पाच मिनिटांची छोटी सुट्टी असते. शिक्षक मात्र दिवसभर एकाच वर्गात थांबतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लॉकर्स असतात. ही लॉकर्स उघडण्यासाठी काही कोड नंबर्स असतात. या लॉकर्समुळे मुलांना रोज शाळेत दप्तर आणण्याची गरज नसते.
शाळांच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यापासून ते त्यांची विक्री करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत मुलं सहभागी होतात. काही शाळांत पाकशास्त्र हा विषय शिकवला जात असल्यानं इथे सर्व प्रक्रियेत मुलं उत्साहानं काम करताना दिसत होती. एका शाळेत तर मुलांच्या घरच्या आर्थिक परिस्थतीनुसार मुलांना खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी पैसे आकारले जातात. गरीब मुलांना नाश्ता आणि जेवण  मोफत दिलं जातं. या सर्वच कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांचे दर मुलांना परवडतील असे होते. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण मुलांना भरपेट मिळत असे. खाद्यपदार्थांत रोजच्या रोज बदल असे. शाळांत कमालीची स्वच्छता होती. स्वच्छतागृहं (वॉश रूम्स) अगदी स्वच्छ होती.  
शालेय वातावरण अध्ययन प्रक्रियेला पूरक आणि पोषक असावं, यासाठी शाळांनी विद्यार्थीहित आणि सुरक्षा लक्षात घेऊन नियम तयार केले आहेत. या नियमावलीत मुख्यत: विद्यार्थ्यांनी नियमित आणि वेळेवर शाळेत येणं, वर्गात प्रवेश करताना आणि वर्गाबाहेर जाताना परवानगी घेणं, शिक्षकांना सहकार्य करणं, त्यांच्याबद्दल आदर बाळगणं, शाळेतील सोयी-सुविधांचा योग्य तो उपयोग करणं, शाळेतील साहित्याची काळजी घेणं, इतर विद्यार्थ्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणं, यांसारख्या अनेक बाबींचा मुख्यत: समावेश आहे. या नियमांचं पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या अशा चांगल्या वर्तनाबद्दल प्रगतिपुस्तकात नोंद केली जाते.  नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद आहे.
मुलांच्या वर्तन समस्यांनुसार मुलांना समुपदेशन केलं जातं. प्राथमिक स्वरूपाच्या समस्या असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलवून समज दिली जाते. समस्या गंभीर स्वरूपाची असल्यास पालक आणि विद्यार्थी यांना कधी एकत्रितपणे, तर कधी वेगवेगळं बोलवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
शाळेत सहा आठवड्यांच्या काळात, तीन वेळेस उशिरा आल्यास अथवा अनुपस्थित राहिल्यास, अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकात ‘U’(Unsatisfactory) अशी नोंद केली जाते. याशिवाय पालकांशीही संपर्क साधला जातो. या मुलांना शनिवारी शाळेत बोलावलं जातं किंवा शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर दीड ते दोन तास समाजसेवा करायला सांगितली जाते.
शाळेतील उपकरणं आणि साहित्याचं नुकसान करणाऱ्या विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थी आणि शिक्षकांशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, शाळेच्या परिसरात असभ्य भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच वर्गात मोबाइल, आयपॉड इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रगतिपुस्तकात ‘U’ असा शेरा दिला जातो. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य शालेय उपक्रम यांमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. याउलट, शाळेनं ठरवून दिलेल्या नियमाचं पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘E’ (Excellent) असा शेरा प्रगतिपुस्तकात दिला जातो.
शाळेच्या कॅम्पसमध्ये मारामारी करणाऱ्या अथवा मारामारीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारणत: तीन ते पाच दिवस निलंबित केलं जातं. शाळांत कुठल्याही प्रकारची शस्त्रास्त्रं जवळ बाळगायला विद्यार्थ्यांना मनाई आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाच्या समस्या सोडवण्यासाठी बहुतेक सर्व शाळांत समुपदेशक असतात. हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी सतत संपर्कात राहतात. अमेरिकेतील शाळांत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे; त्यामुळे वर्गाबाहेर अथवा वर्गात शिक्षा झालेली मुलं दिसली नाहीत.
(क्रमश:)
- मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता
 

 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शालेय शिक्षण , प्रयोगशील शिक्षण , अमेरिकेतील शिक्षण , मच्छिंद्र बोऱ्हाडे , नंदादीप विद्यालय , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...