निमित्त- शरद जोशी यांची जयंती ( ३ सप्टेंबर १९३५ )
**** "
तुझे पत्र कालच सुरेशचंद्र म्हात्रे यांनी दाखवले. पत्रातील तुझी भावना पाहुन दाटून आले. दहा वर्षांपुर्वी आल्पसमध्ये गिर्यारोहण करणारा, खरोखरच सणसणीत प्रकृतीचा मनुष्य पार संपायच्या आसपास येतो, हे कसे काय? तीन उपोषणे, सोळा तुरुंगवास, चार हजारावर सभा, रात्रीचा प्रवास, राहण्यासाहण्याच्या गैरसोई, खाण्यापिण्यातील अनियमितपणा, एवढी दगदग लक्षात घेतली तरी प्रकृतीवर एवढा विपरीत परिणाम व्हायला नको होता असे वाटते. जनसामान्यांच्या बाजूने उठणार्यांना हा काय शाप आहे?...
इस्पितळात इथे पडल्यापडल्या या प्रश्नांची उत्तरे मीही शोधतो आहे. काही काही प्रकाशकिरण सापडतातही. संघटनेच्या कामाला काहींनी संन्याश्याचे वैभव म्हंटले होते. त्या वर्णनाने एकेकाळी मीही खुप सुखावलो होतो. आमच्या विचारांच्या मस्तीत आम्ही सर्वतोपरी तयारी केली, ती आपापले जीवन उधळून देण्याची. मग परिणाम हाच निघाला, की आमचे जीवच उधळले जाऊ लागले... आम्ही वस्तुवादी रणनीती म्हणून केवळ सत्याग्रह, कायदेभंग स्वीकारला. पण ही साधने हाताळता हाताळता त्यातल्या अध्यात्माने आम्हालाच गिळून, पछाडून टाकले की काय? कळीकाळालाही नमवून मृत्युंजय होऊ या भावनेऐवजी पराभवातली काव्यमय रोमांचकता आम्हाला रुचू लागली आहे की काय?... गेल्या काही वर्षात मी आयुष्याच्या उतरणीला लागलो आहे अशा मनाच्या अवस्थेत गेलो होतो. उरलेल्या काळात हाती घेतलेले काम जितके पुढे नेता येईल तितके न्यायचे, या कल्पनेतच समाधान मानू लागलो होतो. आज मी ठरवतो आहे या राखेतुन मी उड्डाण घेणार आहे. अगदी वैयक्तिक पातळीवरसुद्धा मी उताराला लागलेलो नाही. नव्या टेकडीवर चढायला सुरुवात करतो आहे." -शरद जोशी [ जन्म - ३ सप्टेंबर १९३५, निधन -१२ डिसेंबर २०१५] **** - श्री. शरद जोशी यांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्याने पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये दाखल केलेले होते. श्री. मोहन गुंजाळ यांनी त्यांच्या तब्येतीविषयी वाटणारी काळजी एका पत्राद्वारे ३ जाने. १९८६ ला व्यक्त केली असता त्याला श्री. जोशी यांनी हे दिलेले उत्तर- संदर्भ - सत्येन मोहनराव गुंजाळ, "मोहन गुंजाळ स्मृतिग्रंथ," जनशक्ति वाचक चळवळ प्रकाशन. ********** श्री. हरी नरके यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार
शरद जोशी- एक स्मरण
मासिकांची उलटता पाने
हरी नरके
2021-07-02 12:00:02
maheshbapat63
7 वर्षांपूर्वीशेवट चा उतारा प्रेरणादायी। अश्या अवस्थेत ही जिद्द दाखवतो।
manjiriv
7 वर्षांपूर्वीयांच्या बद्दल खूप ऐकलं आहे. पार्ले टिळक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै. मा.सी. पेंढारकरांचे हे विद्यार्थी होते. पेंढारकर यांच्या नावे पुरस्कार देण्यासंबंधी त्यांचे समितीला मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. पत्रातली काही काही वाक्य मनाला भिडणारी आहेत.
Mrudula
7 वर्षांपूर्वीस्वार्थाचा जराही विचार न करता सर्वस्व झोकून देऊन समाजहितासाठी आपली शक्ती-बुद्धी समर्पित करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची ही अशी शोकांतिका व्हावी ना?