गांधीहत्येपूर्वीचा ११ वा महिना... मुक्काम नौखाली


स्वातंत्र्य मिळण्याच्या आणि सत्ता हस्तांतरणाच्या हालचाली दिल्लीत सुरू होत्या तेव्हा कलकत्त्यात हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या होत्या.  त्या दंगली शांत करण्यासाठी महात्मा गांधींनी ७ नोव्हेंबर १९४६ ला नौखालीत पोचले. गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील अनेक असामान्य पैलूंपैकी त्यांचे धैर्य ही एक अत्यंत महत्वाची बाब. गांधीजी नौखालीत असताना कर्नाटकमधील एक मराठी छायाचित्रकार-पत्रकार नारायणराव कुलकर्णी हे  गांधीजींची छायाचित्रे आणि स्वाक्षरी मिळविण्यासाठी तिथे गेले होते. त्या दौऱ्याची तयारी, तपशील आणि गांधीजींसोबतचा अनुभव यावर आधारित हा लेख त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या एप्रिल १९४७ च्या अंकासाठी लिहिला होता. आज महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे, त्या निमित्तानं ही उजळणी-महान कार्याच्या सिद्धीसाठी महात्मा गांधींची अभूतपूर्व पायी यात्रा

गेल्या फेब्रुवारी महिन्यांत मला नौखालीला जाण्याची आणि गांधीजींची भेट घेण्याची महत्त्वाची संधी मिळाली.

कर्नाटकांत प्रेस-फोटोग्राफर म्हणून काम करीत असतांना बहुतेक सगळ्या हिंदी पुढाऱ्यांचे फोटो व स्वाक्षऱ्या मी मिळविल्या आहेत; पण छायाचित्रांच्या या संग्रहांत अद्याप गांधीजींचा स्वाक्षरीयुक्त फोटो नव्हता. हा फोटो मिळविण्याकरिता गेल्या वर्षापासून मी प्रयत्न करीत होतो. त्यासाठी मी मुद्दाम मुंबईस भरलेल्या ए. आय्. सी. सी. च्या बैठकीला गेलो होतो. पण गांधीजी मुंबईस असूनही बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत. कदाचित् गांधीजींची स्वारी मीरत काँग्रेसच्या अधिवेशनास येईल या आशेने मी मीरतलाही गेलो होतो; पण बंगाल सोडून ते आले नाहीत. शेवटी मीच नौखालीला जाण्याचे ठरविले.

“सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः ” या न्यायाने प्रथम पैशाची व्यवस्था करणे भाग होते. फोटोग्राफीचे सामान भलतेच महाग झाले आणि मी तर फोटो कॅमेऱ्याबरोबर सिने-कॅमेरा आमि फिल्मही घेतली! इतक्या लांबवरच्या प्रवासाला कोणीतरी सोबती असावा असे वाटले आणि माझे सोलापूरचे फोटोग्राफर स्नेही श्री. स्वामी यांना विचारतांच ते माझ्याबरोबर येण्यास आनंदाने तयार झाले. गांधीजींच्या कार्याचें छायाचित्रण करतां करतां आपणांस तिकडील परिस्थितीही डोळ्यांच्या कॅमेऱ्यांनी पाहतां येईल हा विचार अत्यंत प्रेरक वाटला. सर्व सिद्धता झाल्यावर ता. २० जानेवारी रोजी मी विजापूरहून निघालो.

जातांना मुंबईस फोटोग्राफीचे आणखी बरेच साहित्य घेतले. मुंबईहून प्रथम दिल्लीस गेलो. तेथे कर्नाटकचे पुढारी श्री. रंगराव दिवाकर यांची भेट घेऊन त्यांना मी माझा मनोदय कळविला. त्यांनी पटना समितीचे बंगाली सभासद श्री. गुहा आणि श्री. भूपेंद्रकुमार दत्त यांच्याशी माझा परिचय करून दिला. या दोघांनी बंगाल प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या चिटणिसांना पत्र देऊन माझ्या कार्यास महत्त्वाचा हातभार लावला.

दिल्लीहून कलकत्त्यास येऊन प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या चिटणिसांची गाठ घेतली. नंतर रेल्वेने गोलांडापर्यंत प्रवास झाला. तेथून चांदपूरपर्यंत पद्मा नदीतून स्टीमरने व पुन्हा चांदपूर ते चौमुहानीपर्यंत रेल्वेने प्रवास झाला. चौमुहानी ते दत्तपारापर्यंत मोटारीने जावे लागते.

यापुढील मार्गावर मात्र कोणतेही वाहन नाही. प्रवास पायींच करावा लागतो. दत्तपाऱ्याहून श्रीनगर तीन मैलांवर आहे. गांधीजींचा मुक्काम दिवशी श्रीनगरलाच होता.

आम्ही दत्तपाऱ्याला एक कुली ठरविला त्याने आमचे सामान तीन मैल येतां-जातां वाहून आणले आणि दोन रुपये देतांच त्याला परमावधीचा आनंद झाला! कलकत्ता स्टेशनवर गाडींतील सामान फक्त स्टेशनाबाहेर काढण्यासाठीच आम्हांला तीन रुपये हमाली द्यावी लागली होती! त्या मानाने तीन मैल ओझी वाहण्यास दोन रुपये हमाली म्हणजे कांहीच नव्हे. पण नौखालींतील जनतेचे दारिद्र्य इतके कमालीचे, की त्यांना दोन रुपये म्हणजे मोठी संपदा वाटावी! तो हमाल माझ्याबरोबर तीन दिवस होता.

श्रीनगरला मी ता. ५ फेब्रुवारी १९४७ रोजी आलो. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी मी गांधीजींचे दर्शन घेतले. सकाळी मी गांधीजींच्या मुक्कामाला आलो त्या वेळी त्यांचा स्नानविधी चालला होता. मालिश, आंघोळ इत्यादी कार्यक्रमाला त्यांना सुमारे दोन तास लागतात. एकीकडे हे कार्यक्रम चालू असतां ते श्री. निर्मल बोस यांच्याशी संभाषण करीत असतात. या संभाषणांत देशपरदेशच्या बातम्या, घटना आणि त्यांवरील विचारविमर्श हे विषय येतात. श्री. निर्मल बोस हे गांधीजींच्या दौऱ्याचे सूत्रधार आहेत.

गांधीजींच्या सान्निध्यांतच ती रात्र घालवली अशी माझी इच्छा होती. पण श्री. बोस म्हणाले, “कोणाही परस्थ माणसानं आमच्याबरोबर आश्रमांत राहूं नये अशी गांधीजींची इच्छा आहे. तुम्हाला रात्रीचा मुक्काम दुसरीकडे करावा लागेल!” जवळच असलेल्या खिलपाना या गावी मी ती रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी परत श्रीनगरला आलो. गांधीजी तेथून धर्मपूरला निघण्याच्या तयारींत होते. सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी ते आश्रमाबाहेर आले आणि “तो कर्नाटकी फोटोग्राफर कुठं आहे?” म्हणून हिंदुस्थानी भाषेंत चौकशी केली. मी पुढे होऊन नमस्कार केला. परप्रांतांतून इकडे आल्याबद्दल त्यांनी माझी चांगलीच हजेरी घेतली! ते म्हणाले, “तुम्ही इकडे येण्यासाठी जो पैसा खर्च केला तो नौखाली फंडासाठी किंवा हरिजन निधीसाठी तुम्हांल देतां आला असता. तुमच्यासारखी त्रयस्थ मंडळी इकडे येण्यानं माझ्या कार्यात व्यत्यय आल्याशिवाय राहात नाही. माझ्या या म्हणण्याला तुम्ही अवश्य प्रसिद्धी द्या.” बंगालचे मुख्य प्रधान मि. सुऱ्हावर्दी यांची लेखी परवानगी असल्याशिवाय नौखाली-टिपोरा या भागांत आपद्ग्रस्तांना मदत देण्याचे कार्य करण्यास गांधीजी अनुमती देत नाही, असे मला कळले.

धर्मपूरला गांधीजी जातांना मी त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांच्या कार्यक्रमाची बरीच छायाचित्रें आणि चलचित्रे मी घेतली. सकाळची वेळ, दाट धुके, पश्चिमाभिमुख रस्ता, आसपास दाट झाडी, शेतें आणि पाणथळ व चिखलांच्या जागा यांमुळे मनासारखे फोटो घेणे कठीण झाले. गांधीजी चालतांना त्यांच्याबरोबर पुढून खादी-प्रतिष्ठानचे एक बंगाली गृहस्थ चालत असतात. ते बरेच जाडजूड असल्याने समोरून फोटो घेतांना गांधीजींचे सम्यक दर्शन होत नाही. मी त्या गृहस्थांना जरा बाजूला होण्याची विनंती केली; पण ते म्हणाले, “गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे मी त्यांच्या पुरोभागी चालतो. त्यांच्या इच्छेविरुद्ध मी कसा बाजूला होऊं?” त्यामुळे तर माझी अडचण अधिकच वाढली. तथापी बाजूच्या शेतांत राहून, अनुकूल वळणे गाठून मी गांधीजींचे व त्यांच्या पथकाचे फोटो घेतले. गांधींबरोबर बंगाल प्रांतिक सरकारने पोषाखी आणि सी. आय. डी. पोलिसांची पार्टी ठेवली आहे. याशिवाय कर्नल मोहनसिंग हे आय. एन. ए. मधील गृहस्थ संरक्षक म्हणून गांधींच्या बरोबर असतात.

धर्मपूरला जातांना वाटेंत गांधीजी मुसलमानांच्या वस्तीपाशी थोडा वेळ थांबले. तेथील लोकांनी त्यांना फुलांफळांचा नजराणा दिला. ती फुले आणि फळे गांधीजींनी मुलांना वांटली. धर्मपूर येथे संध्याकाळच्या प्रार्थनेलाही मी हजर राहिलो. गांधीजींचा निरोप घेतांना मी त्यांना कानडी स्वाक्षरी मागितली. ते हसून म्हणाले, “कानडी सही करण्याचं विसरून गेलो आहे.” त्यांनी आपली पुस्तकें चाळली आणि आपल्या कानडी सहीचा नमुना काढून त्याप्रमाणे सही करून दिली. कानडी आणि बंगाली या दोन भाषा त्यांना अवगत नाहीत. त्यानंतर मी त्यांच्या हातीं एक पत्र दिले. ते वाचून पाहतांच त्यांच्या अंतःकरणांतील भावना हाललेल्या दिसल्या. ते महादेव देसाई यांचे मला १९४२ साली आलेले पत्र होते. शैक्षणिक चित्रपट काढण्यासंबंधी मी त्या वेळी प्रयत्नांत होतो. आताही आहे. या कार्याला गांधीजींचा आशीर्वाद असावा अशी मागणी मी महादेवभाईंना केली होती; त्या पत्राला हे उत्तर होते. त्या पत्राखाली गांधीजींनी नागरी लिपींत सही केली. पत्र इंग्रजीत असल्याने त्यावर इंग्रजी सही असावी अशी माझी विनंती ऐकून गांधीजी म्हणाले, “पांच रुपये पडतील माझ्या सहीला!” मी पांच रुपये देऊ केले; पण ते त्यांनी न घेतां इंग्रजी सही दिली.

गांधीजींबरोबर राहण्याची माझी इच्छा होती. तथापी त्यांच्या इच्छेविरुद्ध वागणे मला अशक्य होते. त्यांचा निरोप घेऊन मी जवळच्या नयाखोला या गावी गेलो. वसईचे डॉक्टर एल. एस. गव्हाणकर हे या ठिकाणी आपद्ग्रस्तांना उपचार व सहाय्य करण्याचे काम करीत असतात. मराठी बोलणारा एक गृहस्थ आपल्याकडे आला आहे हे पाहून त्यांना परमावधीचा आनंद झाला. थोड्याच अवधींत आम्ही एकमेकांचे मित्र बनलो. डॉक्टरसाहेबांचे वैशिष्ट्य हे, की मुसलमान समाजाची श्रद्धा त्यांनी संपादन केली आहे. जनान्यांत कोणी आजारी पडले तरी डॉ. गव्हाणकरांनाच बोलवणे यायचे! मुसलमान समाजाचे प्रेम संपादन केलेल्या या तरुण महाराष्ट्रीय डॉक्टरांचे कर्तृत्व पाहून गांधीजींनीदेखील उद्गार काढले, “यू आर मोअर फॉर्च्युनेट दॅन मी!”

याच ठिकाणी मला आणखी दोन स्त्री-कार्यकर्त्यांचा परिचय झाला. त्यांपैकी कु. वीणा दास हिचे नांव अखिल भारतांत प्रसिद्ध झालेले आहे. विद्यापीठाच्या पदवीदान समांरभांत या तरुणीने बंगालचे गव्हर्नर सर स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळी झाडून नऊ वर्षांची सजा भोगली होती. १९३९ साली तिची सुटका झाली असून आता तिने गांधीजींच्या अहिंसेचा अंगीकार केला आहे. दुसरी तरुणी कु. मृदुला दत्त ही वनस्पतिशास्त्रांत संशोधन करणारी विद्यार्थिनी असून आता तिने अभ्यास सोडून कु. वीणा दास यांच्याबरोबर आपद्ग्रस्तांना साहाय्य देण्याचे काम हाती घेतले आहे.

या दौऱ्यांत मला दोन माणसे भेटली. त्यांपैकी एक मुसलमान होता. त्याने नौखालींतील अत्याचारांत दहा हिंदु कुटुंबे वांचविली होती. दुसरा हिंदु होता. गावाची जाळपोळ झाली तेव्हा तो दोन दिवस झाडावर जाऊन बसला होता. जाळपोळ इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली, की साठसत्तर फूट उंच वाढलेल्या नारळी-पोफळीचे शेंडे जळून गेल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.

येतांना परत कलकत्त्यास गेलो. गांधीजींच्या निवासस्थानाकडे जातांनाही मी कलकत्ता येथील मदत-केंद्रे पाहिली होती. एकंदर मदत-केंद्रे सात असून त्यांपैकी चार काँग्रेसने चालविली आहेत. हिंदु महासभेनेही एक केंद्र चालविले आहे; पण तिकडे लोकांची फारशी गर्दी दिसली नाही. मुस्लिम केंद्राकडेही विशेष लोक नव्हते. काँग्रेसच्या केंद्रांत तीस हजार निराश्रित होते. आता त्यांपैकी निम्म्याहून जास्त लोक गांधीजींच्या उपदेशाप्रमाणे परत आपल्या गावी गेले आहेत. अन्न, वस्त्र, औषधें व प्रवासखर्च पुरविण्याचें काम या केंद्रांमार्फत चालते. खास आगगाड्या सोडण्याचीदेखील व्यवस्था या मदत-केंद्रांनी केली होती. मारवाडी रिलीफ सोसायटीनेही प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

नौखालीचे प्रादेशिक वैशिष्ट्य उल्लेखनीय आहे. आपल्याकडे कारवार जिल्ह्यांत जशी गर्द झाडी दिसते, तशी इकडे झाडी आहे. पण नौखालींत डोंगर मुळीच नाहीत व झाडें ही जंगलांत आपोआप वाढलेली नसून लागवड केलेली आहेत. नारळी, सुपारी व केळीची झाडें विशेष. गंगानदी, तिचे फाटे व उपनद्या यांनी हा भाग बेटासारखा, मुख्य प्रदेशापासून अलग झाला आहे. वाहतुकीची साधने जवळजवळ नाहीत. पाऊस-पाण्याची अत्यंत विपुलता, त्यामुळे जिकडे-तिकडे हिरवेंगार दिसते. काटेकुटे मुळीच नाहीत. हिंस्र श्वापदें मात्र फार. कोल्ह्यांचा कळप तर मी प्रत्यक्षच पाहिला. या प्रदेशांत दगड मुळीच आढळत नाहीत. देवळांतल्या मूर्ति बहुतेक मातीच्या असतात आणि वर्षांतून एकदा त्यांचे विसर्जन करून दुसऱ्या मूर्ति स्थापतात. नदीकाठावर कपडे धुण्यासाठीही दगड आढळत नाहीत. सुपारीच्या सोटावर कपडे धुवावे लागतात. घरें बहुतेक झाप्याची असतात. श्रीमंतांची घरे विटांची असतात.

सर्वत्र बंगाली भाषा आहे. उर्दू भाषेचे नांवही ऐकू येत नाही. मुसलमानांचे कुराणही बंगाली भाषेंत आहे. तेथील मुसलमानही दाढी ठेवीत नाहीत आणि हिंदूही लुंगी नेसतात. दोघांचा आहार-बिहार सारखाच. भाषा, पोषाख आणि अन्न तिन्ही एकच असल्याने हिंदू आणि मुसलमान यांचे सामाजिक जीवन सारखे असल्यास नवल नाही. पण जात्यांध पुढाऱ्यांनी जातीय विषाची बीजें जनतेच्या मनांत पेरली आणि त्याचा परिणाम अनर्थकारक झाला. रस्त्याने जातांना जळलेली घरें, मंदिरे व मशिही दिसतात. हिंदूंच्या घरांवरील सांस्कृतिक चिन्हें नाहीशी करून त्या जागी उर्दू शब्द जबरदस्तीने काढलेले दिसतात. याच्या उलट प्रकारचीही दृश्ये दिसतात. ही दृश्ये पाहतांच मन उद्विग्न होते; आणि एकाच राष्ट्रांत जन्मलेल्या दोन जमाती एकमेकांत भांडून, मारामारी करून कोणता स्वार्थ साधणार याबद्दल उद्वेग वाटतो!

जाती द्वेषाचे निर्मूलन होऊन जातीय सलोखा स्थापन व्हावा आणि हिंदू व मुसलमान बंधुभावाने एकमेकांशेजारी राहण्यास उद्युक्त व्हावे यासाठी गांधीजींनी नौखालीचा दौरा काढला आहे. गांधीजींच्या या अंगीकृत कार्यास यश येणें हे गांधीजींच्या माहात्म्यावर जितके अवलंबून आहे, त्यापेक्षाही आपल्या प्रत्येकाच्या सदिच्छेवर ते जास्त अवलंबून आहे.

**********

लेखक- नारायणराव कुलकर्णी

(अंक – किर्लोस्कर, एप्रिल १९४७)

 

 

 

इतिहास , किर्लोस्कर , अनुभव कथन

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.