इश्श!


इश्श या मराठी शब्दाचा शब्दकोशांत दिलेला अर्थ आहे- राग, नापसंती, तिरस्कार, आग्रह वगैरे दाखवण्याच्या वेळी स्त्रीच्या तोंडून निघणारा हा उद्गार आहे. परंतु पुरुषांना आणि स्रियांनासुद्धा चांंगलेच माहिती आहे की, शब्दांत किंवा शब्दकोशांत सांगता येणार नाही, अशा अनेक अर्थच्छटा 'इश्श'ला आहेत. त्यापैकी असंख्य छटांचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. प्रभाकर बेंद्रे यांनी या लेखात 'इश्श' चा मजेदार मागोवा घेतलेला आहे. १९५१ साली प्रसिद्ध झालेला हा हलका फुलका लेख  नकळतच मराठी मानसिकतेत गेल्या अर्धशतकात झालेल्या बदलांवरही विचार करायला भाग पाडतो.अंक – यशवंत, डिसेंबर १९५१

स्त्रियांच्या तोंडी नेहमी आढळणारा साधा, अर्थपूर्ण पण अर्थशून्य शब्द.

आणि अखेरीस माझं मलाच हसू आलं. मनांतल्या मनांत मी खूप खूप हसलो! ज्या वेळी माझ्या खोलीत कुणी डोकावून पाहिलं असतं तर त्याला शंका आली असती की, ‘हा मनुष्य वेडा तर नाही? याला वेड तर लागलं नाही ना!’ आणि खरोखरीच त्याने मला वेड्यांतच काढले असते.

परंतु त्या वेळी माझ्या खोलीत कुणीच येणं शक्य नव्हतं! कारण एकतर मी लिहीत असताना खोलीचे दार आतून बंद करीत असतो व त्याप्रमाणे त्याही वेळी मी दार आतून बंद केलेलेच होते; व दुसरे म्हणजे घरांत मी व माझी बायको याखेरीज तिसरं माणूसच नव्हतं! आणि या वेळी माझी पत्नी धुणं धुण्यासाठी विहिरीवर गेलेली होती!

तेव्हां ‘मी वेडा आहे’ असं ठरविणारा एखादा ‘शहाणा’ त्या वेळी खोलीत नव्हता हे मला समजले व मनास जरा बरे वाटले!

परंतु मला कुणी ‘वेडा’ ठरविलं नव्हतं तरी, माझं मन मात्र मला ‘वेडा’ म्हणू लागलं होतं! आणि ‘लेखक’ हा ‘वेडा’ असतो हा अनुभव मला त्या वेळी येऊ लागला होता.

परंतु असं होण्याचं कारण काय? कारण हेच की ‘इश्श’ या विषयावर एखादा चटकदार व शैलीदार लघुनिबंध लिहावा ही कल्पना त्या वेळी माझ्या मनांत आली होती व एकापेक्षां एक सरस व सुंदर विचार आणि कल्पना माझ्या मनांत तरळू लागल्या होत्या!

आणि खरंच माणसाला असा अनुभव नेहमी येतो की, मनांत सुंदर सुंदर कल्पना, विनोदी विचार व विनोदी कल्पना आठवू लागल्या म्हणजे त्याचं त्यालाच हसू येतं, मनाला एक प्रकारचे सात्विक समाधान लाभतं!

निदान मला तरी ‘इश्श’ या विषयावर कल्पना ज्या वेळी सुचू लागल्या, त्या वेळी समाधान वाटलं व हसू आलं.

आणि म्हणूनच मी मनाशीच हसू लागलो!

माझ्या या आनंदांत कुणाला तरी सहभागी करावं या हेतूने मी चटकन खोलीचे दार उघडले, गॅलरीत येऊन उभा राहिलो व विहिरीवर खाली मान घालून धुणं धूत असलेल्या माझ्या पत्नीला हांक मारू लागलो – ‘अग ए, जरा वर ये पाहू, एक गंमत सांगायची आहे तुला.’

‘काय ते तिथूनच सांगा ना, मी जरा एवढे लुगडं कुसकरून घेते आणि येते.’ सौभाग्यवतीने वर मान करून उत्तर दिले.

‘अग वर आल्याशिवाय तुला गंमत सांगता येणार नाही.’ मी जरा हसूनच म्हणालो.

‘बरं आले हं’ – एवढेच ती म्हणाली, व चटकन् धाकट्या सुधीरला कडेवर घेऊन ती जवळ जवळ धांवतच वर आली.

‘काय गंमत आहे एवढी’ – तिने आल्याबरोबर मला हसूनच प्रश्न केला.

‘अग आज मी एका सुंदर विषयावर निबंध लिहिणार आहे. ओळख पाहूं विषय!’ मी विचारले.

‘इश्श! मला अडाणी व अशिक्षित बायकोला कसला कळतो निबंध अन् कथा, मी काय सांगणार विषय--’ ती म्हणाली.

तिच्या या उत्तराने मला जरा चीडच आली होती. ‘छे! तुम्ही बायका ह्या अशाच! तुम्हाला नवऱ्याचे हित व सुख कांहीच कळत नाही--’ मी जरा चिडूनच म्हटले.

‘इश्श! रागवायचं काय कारण आहे त्यांत? तुमच्या मानाने मी खरंच अशिक्षित आहे म्हणून म्हणाले मी. तुम्हीच सांगा पाहू विषय--’ जरा लाडिकपणे ती म्हणाली.

‘सांगू?’ मी विचारले.

‘हं सांगा ना--’

‘अग आज मी ‘इश्श!’ या विषयावर निबंध लिहिणार आहे--’ जरा हसूनच मी म्हणालो.

‘इश्श! भलतंच कांही तरी? ‘इश्श’ वर काय लिहिणार तुम्ही—तो का निबंधाचा विषय आहे?’ तिने अज्ञान प्रगट केले.

‘अग लघुनिबंधाला कोणताही विषय चालतो. बघ, आतां तुला लिहूनच दाखवतो. पण काय ग ‘इश्श!’चा अर्थ सांगशील का?’

‘इश्श! अहो त्याला कसला आहे अर्थ?’ तिने लाजून उत्तर दिले.

‘बरं, जा तूं. मी आतां निबंध लिहूनच तुला वाचून दाखवतो.’ मी म्हणालो.

सौभाग्यवती हसतच सुधीरला घेऊन खाली निघून गेली.

मी ‘इश्श’ वर निबंध लिहिण्याचे ठरविले.

सुरवातीलचा मी ‘इश्श’ शब्दाचा अर्थ शोधू लागलो. सरस्वती कोश, शब्दकोश, अर्थकोश, ज्ञानकोश—सारी कोशागरे मी शोधून त्यांत ‘इश्श’ शब्दाचा अर्थ पाहू लागलो—तास झाला, सव्वातास झाला, परंतु ‘इश्श’ शब्दाचा निश्र्चित व सुटसुटीत अर्थ मला कुठल्याच पुस्तकांत किंवा कोशांत सापडला नाही!

माझा मलाच राग आला. परंतु रागावून काय उपयोग होता?

शेवटी व्यवहारांत ‘इश्श’चे किती अर्थ होऊ शकतात त्याचे मी निरीक्षण करू लागलो.

खरेच ‘इश्श!’ या शब्दाचे अर्थ किती भिन्न आहेत व किती विविध प्रसंगांनी हा शब्द वापरला जातो!

इश्श हा शब्द प्रेमाचा द्योतक आहे, की लज्जेचा, की रागाचा, की सहानुभूतीचा, की वात्सल्याचा की नुसता व्यावहारिक—कांहीच बोध होत नाही.

मात्र प्रत्येक स्त्री—मग ती कुमारी असो, माता असो, विधवा असो किंवा वृद्धा असो, ती इश्शचा हमखास उपयोग करते असा मात्र प्रत्येकाचा अनुभव आहे.

प्रथम प्रथम मला वाटले ‘इश्श’ शब्द फक्त प्रेमाचा द्योतक आहे. परंतु बारकाईने निरीक्षण केल्यावर मला असं आढळून आलं की, हा शब्द प्रेमाचा द्योतक तर आहेच, परंतु येरव्ही देखील या शब्दाचा उपयोग स्त्रियांकडून केला जातो.स्त्रिया आपले प्रेम, होकार, नकार, राग, द्वेष, मत्सर, इ.इ. सारे भाव ‘इश्श’ या एकाच शब्दाने व्यक्त करू शकतात.

‘इश्श! कुणी पाहिलं तर काय म्हणेल?’

‘इश्श! तुम्हाला हे शोभत नाही आतां!’

‘इश्श! हे काय वेड्यासारखे बोलणे तुमचे!’

‘इश्श! भलतंच काही तरी.’

‘इश्श! तिचं वागणं मोठं विचित्रच!’

‘इश्श! भावोजी तुम्हाला कांही लाज बिज?’

‘इश्श! येवढी शिकली सवरली, परंतु मर्यादा नाही.--’

अशी किती तरी वाक्ये स्त्रियांच्या मुखांतून बाहेर पडतांना आढळतात. तुम्ही कुणाच्याही घरी जा व घरांतील स्त्रियांची बोलणी जरा बारकाईने ऐका, तुम्हाला ‘इश्श!’ हा शब्द कितीतरी वेळा व किती तरी प्रसंगाने ऐकू येईल.

‘इश्श!’ या शब्दाचा निश्र्चित अर्थ शोधणं मोठं कठीण आहे. मात्र हा शब्द स्त्रियांचे भाषावैभव होय व ढालही होय. आपल्या शत्रूपासून त्या त्याच शब्दाने बचाव करू शकतील, आपल्या मित्रांनाही त्या याच शब्दाने आपलसं करतील. इश्श हा शब्द स्त्रियांना प्राणापेक्षाही प्रिय असतो. कारण त्यांत त्यांचे जीवन ओतलेले असते.

प्रेम असो, राग असो, लज्जा असो, घृणा असो, तिरस्कार असो, संमती असो, नकार असो, हेवादेवा असो—काहीही असो, स्त्रिया यात एका शब्दाने सारे भाव व्यक्त करू शकतात! त्यांना हा शब्द वापरताना कंटाळा कधीच येणार नाही. स्त्री रागावली आहे की प्रेमांत आहे हे तिच्या ‘इश्श!’ या शब्दाच्या उच्चारण्याच्या पद्धतीवरून ओळखूं येते. प्रत्येक वेळी चेहऱ्यावरील भाव व इश्श शब्द उच्चारतांना काढलेला आवाज (उच्चार) यांत फरक पडतो.

गंमत अशी की, हा शब्द फक्त मराठी भाषेतच आढळतो. बंगाली, कानडी, उर्दू, इंग्रजी, युरोपियन इ. भाषेंत हा शब्द आढळत नाही. त्या स्त्रिया ‘इश्श’ शब्दाचा वापर करीत नाहीत. मराठीत हा शब्द कसा रूढ झाला हे सांगणं मोठं कठीणच—नदीचे मूळ जसे शोधूं नये तसे ‘इश्श’चे मूळ शोधू नये हेच खरे!

मराठी भाषेतील अनेक टीकाकार, साहित्यिक, शब्दकोशकार इ. यांना या शब्दाचा अर्थ सांगता येईल की नाही याचीही मला शंकाच वाटते.

परंतु या शब्दांत सौंदर्य आहे, कला आहे. व्यवहार आहे. स्त्रियांचे स्वभाव, आवडीनिवडी, मते, ध्येय, आशा-निराशा, आकांक्षा, संकोच, लज्जा, भीती, प्रेम—सारे त्यांच्या इश्श या शब्दाच्या उच्चारावरून आपणांस कळूं शकते. व्यवहारांत पदोपदी व घटकोघटकी स्त्रिया या शब्दाचा वापर करतात. या शब्दांत जेवढा अर्थ भरलेला आहे तेवढाच तो निरर्थक देखील आहे. कित्येक वेळां स्त्रिया पण, परंतु, व, आणि, इ. शब्दाप्रमाणे ‘इश्श’ या शब्दाचा निरर्थक रीतीने उपयोग करतात.

जगांतील काव्य, तत्त्वज्ञान, कला व व्यवहार यांचा संगम ‘इश्श’ या शब्दांत झालेला आढळतो. या एकाच शब्दाचा किती तऱ्हेने उपयोग होतो हे सांगता येणं कठीणच. प्रत्यक्ष स्त्रीला देखील ते सांगता येणार नाही!

इश्श शब्दाचा अर्थ, त्याचा उपयोग व त्याची आवश्यकता यावर कितीही लिहिलं तरी ते अपुरेच पडणार. इंग्रजी स्त्रिया किंवा परकीय स्त्रियांनी या शब्दाचा उपयोग केल्यास किती अनर्थ माजतील हे सांगणे नकोच.

स्त्रीचा स्वभाव व तिच्या आवडीनिवडी तिच्या ‘इश्श’ शब्दावरून तुम्हांला कळतील. परमेश्र्वराने स्त्रीत्वाचा विकास करण्यासाठी या शब्दाचे लेणे दिलेले आहे. ‘इश्श’ हा शब्द स्त्रियांचे लेणे होय, अस्त्र होय व पालुपद होय. एखाद्या स्त्रीच्या (मात्र महाराष्ट्रीय) तोंडांतून ‘इश्श’ शब्दच निघाला नाही तर इतर स्त्रिया तोंडांत बोटे घालून म्हणतील—‘इश्श! ही बाई मोठी विचित्रच दिसते.’ उलट एखाद्या पुरुषाच्या तोंडांतून चुकून ‘इश्श’ शब्द निघाला तर केवढा अनर्थ व गोंधळ होईल याची कल्पनाच करतां येणार नाही.

मी बराच वेळ लिहित राहिलो असतो, परंतु इतक्यात सुधीरला घेऊन माझी पत्नी वर येऊन हलकेच म्हणाली—‘इश्श! अजून निबंध पुरा झाला नाही? कमाल आहे हो तुमची! येवढं काय लिहिलंय दाखवा तरी गडे--’

चटकन मी लिहिलेले बाड तिच्या हातांत दिले. ती वाचू लागली--‘इश्श?’ लेखक—

आणि मी हसूं लागलो! पत्नीने आतां उच्चारलेल्या ‘इश्श’चा अर्थ काय, काय भावना त्यांत होती हे मला उमगलेच नाही; आणि मला अजूनही ‘इश्श’चा अर्थ कळलेला नाही, हेही मान्य करावयासच हवे.

**********

लेखक – श्री. प्रभाकर बेंद्रे, एम्.ए.

अतिरिक्त दुवे -

१) शिरीष कणेकर यांचा याच विषयावरील एक धमाल लेख वाचा दैनिक सामनामधून - https://www.saamana.com/shireesh-kanekar-article-2/

२) 'इश्श ' या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली असावी यासंबंधी चर्चा इंटरनेटवर सापडली. त्याचा उतारा आपल्या चोखंदळ वाचकांसाठी खाली देत आहोत.

**

सबंध मराठी भाषाच तमिळपासून झाली अशी उपपत्ती माडणारे विश्वनाथ खैरे यांनीदेखील त्यांच्या 'मराठी भाषेचे मूळ' या पुस्तकात, तमिळमधून मराठीत आलेल्या शब्दांच्या यादीत अय्या-इश्शची नोंद केलेली दिसत नाही. याचा अर्थ असा घ्यावा लागेल की हे शब्द तमिळमधून मराठीत जसेच्या तसे आले नाहीत.
परंतु, त्यांच्या 'अडगुलं मडगुलं' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे---
"इश्श या बहुढंगी उद्गाराचे मूळ आद्य भाषाचार्यांनी इतर अनेक शब्दांप्रमाणेच संस्कृतात शोधण्याचा प्रयत्‍न केला. विस्र(हा शब्द आजानुकर्णांनी त्यांच्या एका गूढकथेत वापरला आहे !) म्हणजे मांसाची घाण.त्यावरून इश्शरं-इश्शरे अशी एक, तर र्‍हीच्छ्‌-ईच्छ्‌-इश्श-इशी अशी दुसरी उपपत्ती त्यांनी लावली.

"इश्शच्या जवळपासच्या उच्चाराचा शब्द संस्कृतात नाही हे उघडच आहे. तमिळ कोशात मात्र ईशि आणि शी हे शब्द धिक्कार, तिरस्कार, उबग या अर्थाचे उद्गार म्हणून सापडतात. कानडीतही इस्‌ आणि इस्सि याच अर्थाचे आहेत. या दोन भाषांत समान शब्द असले म्हणजे प्रथमपणाचा मान तमिळ शब्दाला असतो. तेव्हा मराठी बोलण्यात इश्श हा शब्द तमिळमधूनच आला असे म्हणता येईल.

"अशा गोष्टीत सब घोडे बारा टक्के करता येत नाहीत. 'इश्श' इतकाच प्रचारातला शब्द 'हुश्श' हा आहे. तो तमिळमध्ये नाही, पण कानडीत आहे. कानडी ही पण द्रविड कुळातली भाषा, आणि मराठीहून जुनी. तेव्हा तो मराठी भाषकांच्या बोलण्यात कन्नड भाषकांकडून आला असावा. थोडक्यात, प्रत्येक शब्दाचे मूळ तमिळ असे काही म्हणता येणार नाही."

विश्वनाथ खैरे पुढे लिहितात.--"स्त्रियांची शब्दशक्ती आणि शब्दभक्तीही पुरुषांहून अधिक असते. मराठी स्त्रियांना आपले ठेवणीतले शब्द तमिळ आहेत असे कळले तर आश्चर्य वाटेल, आणि त्यांच्या तोंडून सहजच 'अय्या' असा आश्चर्योद्गार निघेल. पुढचे वाचले तर, पुन्हा अय्या म्हणण्याची पाळी. कारण हा मराठी अय्या 'मद्रासी अय्या'पेक्षाही खास तमिळ आहे. ऐ म्हणजे आश्चर्य किंवा नवल, तर ऐयम्‌ म्हणजे संदेह. या दोन्हींच्या अर्थसंयोगातून 'अय्या' हा नवलाचा उद्गार मराठीत आला यात काय नवल! मद्रासी 'अय्या' मात्र संस्कृत 'आर्य'वरून आला असे अनेक तमिळ पंडित मानतात."--

वाचक्‍नवी

**

ललित , यशवंत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.