विसुभाऊ राजवाड्यांचे व्यक्तित्व

पुनश्च    दि. वि. काळे    2020-05-09 06:00:50   

अंक : सह्याद्री, फेब्रुवारी १९५३

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी मराठीत आदर्श संशोधनाचे उदाहरण घालून दिले. अनेक अस्सल कागदपत्रे शोधून काढली. संशोधन, व्याकरण, भाषाशास्त्र अशा अनेक अंगांनी त्यांनी मराठी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रास मोल प्राप्त करुन दिले.   'महाराष्ट्राचा वसाहतकाळ', 'राधामाधव विलासचंपू', 'महिकावतीची बखर', 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' आदि दस्तावेजांमुळे राजवाडे यांच्या संशोधनाचे मोल लक्षात येते. त्यांनी अत्यंत कष्टाने ही जूनी कागदपत्रे शोधून काढली. 'राधामाधव विलासचंपू' हे शहाजी महाराजांचे चरित्र आहे तर 'महिकावतीची बखर' ही केळवे-माहिम परिसराचा म्हणजे उत्तर कोकणाचा इतिहास सांगणारी बखर आहे. ती  १४व्या शतकात लिहिली गेली होती आणि प्रत्यक्ष बखरीत लिहिलेला इतिहास साधारणतः इसवी सन ११३८-४० च्या आसपासचा आहे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हा लेख लिहिताना तर त्यांनी पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या विवाहापासून, म्हणजे महाभारतपूर्व काळातील उदाहरणांपासून टिपणे काढली होती. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अशा व्यक्तींच्या स्वभावाची, वागण्याची, सामाजिक आचारांची उकल करणे सोपे नसते. वर वर अनेकदा अशा व्यक्ती एककल्ली, विक्षिप्त, तऱ्हेवाईकही वाटू शकतात. राजवाडे यांच्या निधनाला  २६ वर्षे झाली तेंव्हा म्हणजे १९५३ साली लिहिलेल्या या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वातील अशा विविध पैलूंचा उहापोह आहे. त्यांच्याविषयी वाचल्यावर अनेकांना त्यांनी गोळा केलेले, संशोधन-साहित्य वाचावेसे वाटेल, राजवाडे यांचे हे संपूर्ण संशोधन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर वाचता येईल. जवळपास १२०० पृष्ठे भरतील एवढा मजकूर तिथे जतन केलेला आहे.

स्वदेश आणि स्वभाषाभिमानाला कृतिशील तात्विक अधिष्ठान  मिळून  देण्यासाठी अविरत कष्टलेले इतिहासाचार्य  वि.का.  राजवाडे (१२ जुलै १८६४ – ३१ डिसेंबर १९२६).  'अभ्यासोनी प्रकटावे'  हे धेय्य उराशी बाळगून अवघे आयुष्य इतिहास संशोधनाच्या कार्याला समर्पित करणाऱ्या  या ज्ञानोपासकाच्या  असाधारण व्यक्तित्वाचा आणि कार्याचा  परिचय  करून देणारा हा लेख.  

**********

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या  निधनाला २६ वर्षे झाली. म्हणजे आज तिशी-चाळिशींत असलेल्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसणार किंवा त्यांच्याबद्दल फारसे ऐकलेले नसणार. म्हणून अशांच्या माहितीसाठी त्यांच्या रूपगुणांबद्दल कांही ठळक गोष्टी प्रथम थोडक्यांत नमूद करणे उपयुक्त ठरेल.

थोडक्यांत रूपगुणदर्शन

राजवाडे चांगले गौरवर्ण, मध्यम चणीचे, तालमीने कसलेल्या पीळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या भव्य कपाळपट्टीवर बहुधा विचारमग्नतेचा आणि एक प्रकारच्या अलिप्ततेचा कायमचा ठसा असल्यामुळे लोकांना दुर्वास-दर्शन किंवा उग्रता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असे. त्यांचा आवाज भारदार, गंभीर असून त्यांना एकेक शब्द सावकाश विशिष्ट आघातासह उच्चारून ऐकणाऱ्याच्या मनावर ठसविण्याची लकब असे. त्यांनी बी.ए. परीक्षेची पदवी कांही महिन्यांतच अभ्यास करुन मिळविली, नाना शास्त्रांचा अभ्यास केवळ ग्रंथ वाचून केला आणि मानभावांच्या ‘लीळा-संवाद’ ह्या सांकेतिक लिपींतील ग्रंथाचे लिपिसंकेत केवळ १३ दिवसांच्या मननाने उलगडून दाखविले; यावरून त्यांची बुद्धिमत्ता दिसते. राष्ट्रोद्धारार्थ ऐतिहासिक व भाषिक संशोधन आवश्यक आहे, असा मनाशी सिद्धान्त बांधून त्यांनी आमरण त्यासाठी फकिरी पत्करली, पण त्याची टिमकी वाजविली नाही. इतिहासशास्त्राच मराठीत पाया घातला, राष्ट्रविकासाचे सिद्धान्त बांधून दाखविले व शिवाजी-रामदास-माधवराव पेशवे यांचा उल्लेख करण्याची व्यापक बुद्धी ठेवली. राष्ट्रोद्धारविवेचक पुरुषांत महाराष्ट्रांत त्यांचे स्थान एवढे मोठे समजले गेले की, लोकशिक्षण मासिक (द्वितीयावतार, पहिलाच अंक) आणि प्रगती साप्ताहिक (पहिलेच वर्ष) ह्या त्यांच्या निधनानंतर वर्ष दोन वर्षांच्या अंतराने निघालेल्या प्रमुख नियतकालिकांना लौकरांत लौकर आपली श्रद्धांजली त्यांस अर्पण करावीशी वाटली. खरे-भांडारकरांसारखे त्यांनी सलग इतिहास लिहून इतिहास हा विषय साधारणांत लोकप्रिय केला नाही; पण इतिहास-विवेचनाच्या अनुषंगाने इतिहासांतील समाजशास्त्र व संस्कृतिविकासशास्त्र याचे विश्र्वरूप दर्शवून राष्ट्रोद्धाराचा शास्त्रपूत मार्ग दिग्दर्शित केला. आपले ज्ञान समाजाला देण्याला ते इतके उत्सुक होते की, ‘कोणताही हक्क राखून ठेवला नाही’ असे आपल्या ग्रंथांवर छापण्याचा जगावेगळा आग्रह त्यांनी दाखविला. त्यांनी जमा केलेला दुर्मिळ संग्रह कोणा परदेशस्थाच्या हवाली करून त्यांना स्वार्थ साधावयाचा असता तर ते लक्षाधीश झाले असते. सुस्थित राहावी म्हणूनच कोणा संस्थानिकाकडे सोपविलेल्या हस्तलिखितांबद्दल त्यांना खर्चही भागण्यापुरते द्रव्य मिळाले नाही हे अनेकांना माहीत आहे; परंतु सगळ्याच गोष्टींचे गुरुस्थान पश्र्चिमेकडे देणाऱ्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालून महाराष्ट्रेतिहासाचे गुरुस्थान महाराष्ट्रांतच आहे याची जाणीव करुन देण्यासाठीच त्यांनी एवढा जंगी खटाटोप केला.

‘राजवाडे-संशोधनमंडळा’चे कार्य

अशा या महापुरुषाचे स्मारक करण्याचा विचार त्यांच्या निधनोत्तर आठ-दहा दिवसांतच पुणे व धुळे येथे भरलेल्या दुखवट्याच्या सभात होणे अगदी साहजिकच होते. साधारण एका महिन्याच्या आंतच त्यांच्या अंतकालपूर्व निवासाचे — आणि अर्थात त्यांच्या संशोधित कागद-संग्रहाचे वगैरे — स्थान धुळे हेच सर्वानुमते ‘राजवाडे संशोधन मंडळ’चे ठिकाण ठरले. नुकताच त्यांच्या तिथीप्रमाणे (मार्ग. वद्य १२) सव्वीसाव्या स्मृतिदिवशी (दि.१४ डिसें.) राजवाडे संशोधन मंडळाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यांत आला. त्या वेळी प्रकट केलेल्या इतिवृत्तावरून आरंभीच योजिल्याप्रमाणे राजवाड्यांच्या स्मृतीची बहुविध पार्थिव साधने — राजवाडे  संशोधन मंदिर ही नांवाची स्मारक इमारत, पुतळा, तैलचित्र (१९३२); धातुकोशाचे दोन भाग (१९३८, १९४२) व ज्ञानेश्र्वरीचा नववा अध्याय (१९३२) छापणे, स्फुट निबंध व इतिहासाची साधने यांचे प्रकाशन (१९३२-१९४५); चरित्रलेखन (१९४६) आणि प्रसिद्धाप्रसिद्ध लेख व जमविलेला हस्तलिखितादी साधनसंग्रह एकत्र ठेवण्यासाठी संग्रहालय (१९४२ पासून चालू, परंतु अजून वाढ हवी); ही राजवाडे स्मारक मंडळानेच बहुतांशी सिद्ध केली आहेत असे म्हणावयास हरकत नाही. हे काम बहुतेक धुळ्याचे कार्यकर्ते श्री. भास्कर वामन भट व श्री. शंकर श्रीकृष्ण देव प्रभूतींनीच संपादन केले आणि खेदाची गोष्ट अशी की, हे समाधानकारक निवेदन करण्यासाठीच जणू ह्या रौप्यमहोत्सवानंतर तेराव्याच दिवशी श्री. तात्यासाहेब भट हे राजवाड्यांच्या भेटीसाठी निजधामी निघून गेले. राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याचा एवढा मोठा आधारस्तंभ अशा रीतीने गमावल्यामुळे राजवाडे स्मारकासंबंधी यापुढील जबाबदारीचे काम आता अन्य कोणी अंगावर घेणे आवश्यक झाले आहे.

‘पुनर्मुद्रण-मंडळ’ पाहिजे

राजवाड्यांच्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या खंडांच्या सर्व प्रस्तावना आणि कांही दुर्मिळ होत चाललेले प्रकाशित निबंध तीन खंडांत पुनर्मुद्रित करुन चित्रशाळेनेही या स्मारक योजनेत महत्त्वाचा भाग उचलला आहे. परंतु हे लिखाण केवळ जसेच्या तसे छापले आहे, तसे छापण्यांत विशेष अर्थ नाही. ते प्रथम छापले त्यानंतरच्या ३०-४० वर्षांत नवी साधने, नवी शास्त्रे, नवे विचार उपलब्ध झाले आहेत. त्यांच्या आधारे आपली विधाने राजवाडे हयात असते तर त्यांनी खासच सुधारली असती. परंतु त्यांच्या अभावी आता ‘टीपा देऊन योग्य ती शुद्धी किंवा पुष्टीची जोड दणे’ अवश्य झालेले आहे. तसे करावयाचे नसेल किंवा तसे करण्याची बौद्धिक वा आर्थिक समृद्धी हाताशी नसले तर मग पुनर्मुद्रणाचा उद्योग करण्यांत अर्थच नाही. वास्तविक हे काम एखाद्या सर्वसाधनश्रीमंत अशा ‘राजवाडे पुनर्मुद्रण मंडळा’च्या स्वाधीन करण्याची आवश्यकता आहे.

हे काम अंगावर घेण्याचा आत्मविश्र्वास त्यांनाच वाटेल की ज्यांनी राजवाड्यांनी अभ्यासिलेल्या नाना शास्त्रांत पारंगतता मिळविली असले. अशांनी मग राजवाड्यांनी एकेका शाखेंत मांडलेली प्रमेये आणि प्रकट केलेले विचार एकत्र करुन त्यांवर यथायोग्य प्रमाणांत परस्परांत चर्चा करावी आणि त्या चर्चेच्या अनुरोधाने राजवाडेप्रणीत विचारलेखांचे संशोधन व पुनर्मुद्रण करावे. यापुढे राजवाड्यांचे स्मृतिदिन साजरे करूं इच्छिणाऱ्यांनी स्मृतिदिनाचे स्वरूप प्रयत्नपूर्वक अशाच कांही तऱ्हेचे बनविले तरच सव्वीस वर्षांनी होत असलेल्या या जागृतीचे खरे फळ पदरांत पडेल.

असामान्य व्यक्तित्वाचा शोध

पण राजवाड्यांसंबंधीचे आपले कोणतेही कर्तव्य यथायोग्य बजावण्याची पात्रता मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्या तीस वर्षांच्या अविरत उद्योगाचे रहस्य प्रथम समजले पाहिजे. एरवी त्यांचे असामान्य व्यक्तित्व आपल्या ध्यानांत येणार नाही.

राजवाडे बुद्धिमान, विद्वान, अभ्यासक, चिकित्सक, स्वार्थत्यागी, इतिहासादिशास्त्र संशोधक, स्वराज्याकांक्षी, देशभक्त होते इत्यादी विशेषणांनी सूचित होणारा नमुना, त्या प्रत्येकांतील राजवाड्यांचे स्वतंत्र तंत्र आणि उत्कट वैशिष्ट्य ध्यानांत न आल्यामुळे, आपल्याला परिचित आहे असे उगाचच वाटते. आणि चिकित्सा न करतांच ‘आम्ही तेंच म्हणतो’ अशा थाटांत हे सर्व स्वीकारून झाल्यावर त्यावेगळे जे कांही राजवाडेपण राजवाड्यांत राहिले आणि ज्याचे काय करावे याचे ज्ञान लोकांना होईना, त्याला त्यांनी ‘विक्षिप्तपणा’ असे नांव देऊन आपले समाधान करुन घेतले! या त्यांच्या ‘विक्षिप्तपणा’चे पृथक्करण केले पाहिजे. कारण हा त्यांचा विक्षिप्तपणा म्हणजेच त्यांचे वैशिष्ट्य किंवा असामान्यत्व, अनन्यसाधारणत्व.

नीट्झ्शेची वृत्ती

हे राजवाडेपण ओळखणारे जे समानधर्मे होते त्यांपैकी एकाने म्हणजे त्यांचे चुलते आहिताग्नी राजवाडे यांनी आपला ‘नीट्झ्शेचा ख्रिस्तांतक आणि ख्रिस्तांतक नीट्झ्शे’ हा महत्त्वाचा ग्रंथ आपल्या या असामान्य पुतण्याच्या ‘स्मरणार्थ’ जनतेला सादर केला आहे (१९३१) आणि त्याच्या समर्थनार्थ ‘ नीट्झ्शेच्या वृत्तीचा महाराष्ट्रांतील एकच बाणेदार विवेचक’ असे विश्र्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे नेमके आणि वेचक शब्दांत वर्णन केले आहे. आता नीट्झ्शे वृत्तीचा म्हणजे कसा? तर असा. नीट्झ्शेच्या प्रस्तावनेचे हे पहिलेच वाक्य पाहा आणि नीट्झ्शेच्या वृत्तीचा अंदाज कराः- “हा ग्रंथ फार थोड्या लोकांकरिता आहे. त्यांपैकी अद्याप एकही उत्पन्न झाला असेल की नाही याची शंका आहे... ज्या विद्यमान लेखकांच्या कृतीचा आजच सर्वत्र बोलबाला चालला आहे अशांच्या वर्गांत मी आपले नांव समाविष्ट करुन घेण्याची चूक कशी करावी? उद्याचा काळ हाच माझ्या प्रभावाच काळ आहे. कांही ग्रंथकार आपल्या मृत्यूच्या पश्र्चात जन्मास येतात.”

राजवाड्यांनी असे कोठे नेमके लिहिलेले आढळणार नाही. तथापि त्यांची इतर लुंग्यांसुंग्यांबद्दलची तुच्छताबुद्धी हरघडी दिसून येई. त्यांनी क्षुद्र वाटणाऱ्या माणसाला द्विपाद (Biped), हस्तक (underling) म्हणावे, कित्येकांचे एकेरी उल्लेख करावे हे नित्याचेच होते. त्यांच्या ऐतिहासिक लिखाणांत ग्रँट डफ सारख्या परकी इतिहासाकारांच्याच नव्हे तर स्वकीय इतिहासकारांच्या देखील चुकांची इतकी आणि अशी रेवडी उडविलेली असावयाची की त्यांच्या अहंमन्यतेला चॅथॅमच्या शब्दांत “I know I can save history and nobody else can,” असे स्वरूप देण्यास हरकत वाटत नाही. आणि त्यांची ही खात्री किती यथार्थ होती ह्याचे दुसरे कोणतेही इतिहासशास्त्रविषयक क्लिष्ट उदाहरण न देतां फक्त त्यांच्या १९१३ तील जुन्या लोकशिक्षणांतील “महाराष्ट्रांतील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद” या सर्व लोकांना समजेल व आवडेल अशा एका (चित्रशाळा—राजवाडे लेखसंग्रह, भाग ३ मधील पृ. १६९-१८४) लेखाचेच उदाहरण देतो.

कृत्रिम निळीचा दाखला

या लेखावरून समाजेतिहासाचा समावेश करणारी त्यांची राष्ट्रेतिहासाबद्दलची व्यापक कल्पना आणि खोल तपशिलांत जाऊन गणितागत पद्धतीने ती अमलांत आणण्याची त्यांची असामान्य पात्रता; समाजहित, बुद्धि-बुद्धिमान, प्रतिभा-प्रतिभावान, कर्ता आणि कर्तृत्व अशा महत्त्वाच्या शब्दांची नर्भीड चर्चा करण्यांत आणि त्या कसोट्यां समाजांत विद्यमान असलेल्या कार्यकर्त्यांना लावून दाखविण्यांत प्रतीत झालेली निर्भयता; इंग्लंडांतील समान स्वरूपाच्या झालेल्या अन्य संदर्भांतील सुप्रसिद्ध व्यक्तींच्या शोधाची कल्पना एका ग्रंथांत आढळतांच लगोलग ती स्वदेशाला लाऊन पाहण्याची तत्परता आणि तळमळ ही दिसून येतात. या लेखांत त्यांनी मिळालेल्या माहितीचा पुरता छडा लावून त्यांतून देशहितासाठी इंग्लंडाची शास्त्रीय दृष्ट्या समृद्धता व आपल्या देशाची सर्व बाजूंनी निकृष्टावस्था यांचे यथार्थ दर्शन घडविले. आणि त्यांतून “(शास्त्रव्यवहार) आपल्या समाजांत बिलकूल नाही व ब्रिटिश साम्राज्यांत सर्वस्वी आहे, असा प्रकार आहे आणि याचा अर्थ असा होतो की, कोणत्या वेळी आपल्या समाजावर प्राणांतिक संकट ओढवेल याचा नियम नाही” असा रासायनिक संकलनाने होणाऱ्या निळीचा दाखला देऊन आपल्या देशाच्या भवितव्याबद्दल भयानक इशारा देऊन ठेविला आहे. अनेक शतकांच्या इतिहासाच्या अभ्यासाने शुद्ध झालेल्या तरल बुद्धीच्या या शास्त्रीय आविष्काराचे दर्शन म्हणजेच त्यांचे द्रष्टेपण. त्यांचे हे सर्वच विवेचन जितके सडेतोड, मार्मिक आणि अपरिहार्यतः तार्किक तितकेच भव्य वाटते. (त्यांतील पृष्ठ १६९ वरील आरंभीची ‘मराठा’ याची जाति-स्थलनिरपेक्ष कल्पना पहा.)

आत्मप्रत्यय आणि निर्भीडपणा

राजवाड्यांच्या प्रस्तुत लेखांतील मूल्यग्राही विवेचन प्रमुखतत्वाने व्यक्तिनामांशी निगडित असल्यामुळे त्या वेळी शिष्टाचाराचा भंग झाल्यासारखे वाटले व तसा ध्वनि त्या वेळच्या टीकाकारांनी कित्येकांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याच्या नांवाखाली काढला नाही असे नाही. हा निर्भीडपणा जगांत आपण कांही विशेष कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला आहे अशा आत्मप्रत्ययाने येतो. हा धसमुसळेपणा किंवा जॉन्सन् किंवा आपल्याकडील केतकरांच्या सारख्या मोठ्या माणसांत आढळून येणारा अनौपचारिकपणा (unconventionalness) म्हणजेच महापुरुषत्व आणि त्याचा गौरव आहिताग्नि राजवाड्यांनी आपल्या स्मरणनिर्देशाने करण्याची ती संधी घेतलेली आहे.

राजवाड्यांनी आपल्या शिक्षणाची कथा ग्रंथमालेत स्वानुभवदर्शनाच्या स्वरूपांत सांगितली आहे त्यांत देखील हीच, मळलेला मार्ग न अनुसरण्याची वृत्ती दिसून येते. तींतील अहंकार कोणाला आवडो किंवा न आवडो, परंतु अनेक शास्त्रांचा अभ्यास केवळ ग्रंथांच्या वाचनाने, तासनतास ग्रंथालयांत बसून केला यांतील स्वावलंबनाची पराकाष्ठा नाकारतां येणार नाही. मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी गुरुमुखाशिवाय झालेल्या अभ्यासांत सुसंगती येईलच असे नाही. आणि केवळ ग्रंथावरुन फ्रेंचचा अभ्यास झाल्यामुळे त्यांच्या उच्चारांत आलेले दोष एका फ्रेंच भाषापरिचित असलेल्या विदुषीच्या ध्यानांत आले या आठवणींत त्यांच्या या एकांडेगिरींतील प्रमुख गुण व प्रमुख दोष यांचे एकदमच दिग्दर्शन होते.

सामान्यत्वाची कोंडी फोडण्याचे उद्योग

पदवीधर होण्यापूर्वीच गृहस्थाश्रमी झालेल्या राजवाड्यांनी पदवी घेतल्यानंतर या जगांत चारचौघांसारखे नादण्याचा प्रयत्न करुन पाहिला नाही असे नाही; परंतु जबरदस्तीचा गृहस्थाश्रम आणि मामुली हायस्कुलांतील शिक्षकगिरी यांचा हा प्रयोग पत्नीच्या निधनामुळे तीनच वर्षांत संपुष्टांत आला आणि त्या वेळी रूढ असलेल्या चिपळूणकर-टिळकांच्या पंथांत हा जगावेगळ्या मनोवैभवाचा तरुण मोठ्या हिरीरीने सामील झाला. लगोलग सभोवार पसरलेल्या हीन व स्वाभिमानशून्य सामान्यत्वाची कोंडी फोडण्याच्या व राष्ट्रोद्धाराची महत्त्वाकांक्षा सफल करण्याच्या निश्र्चयाने परकीयांनी रूढ केलेले तेजोभंगी इतिहास खोडून काढण्याच्या म्हणजे साधन-संशोधनाच्या खडतर मार्गाला राजवाडे फकीरी पत्करून लागले. राजवाड्यांच्या लिखाणापेक्षा त्यांच्या अवतीभोवतीच्या संभाषणावरून देखील त्यांचे मनोगत अजमावतां येते. त्या वेळच्या स्वातंत्र्यसंपादनार्थ चाललेल्या नुसत्या चळवळीपेक्षा समाजावर आलेले संन्यासमालिन्य धुवून टाकून समाजाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करुन देणे अवश्य आहे आणि हे काम साधनपूत इतिहास-निर्मितीने, सर्वांगीण इतिहासदर्शनाने होईल अशा श्रद्धेने ते तातडीने, चकाटीने, उतिवळीने कामाला लागले. समोर होत असलेला ऱ्हास वांचविण्याच्या तळमळीने ते स्वतः जेवढे काम करीत तेवढे काम दुसरा कोणी करीत नव्हता, त्यांना करण्यास मदत देत नव्हता एवढेच नव्हे, तर त्यांनी महात्यागाने व भगीरथ प्रयत्न करुन मिळविलेली सामग्री छापण्यासही कोणी तयार नव्हता, याचा त्यांना विलक्षण राग येई आणि म्हणूनच ते समाजावर आणि धनवान संस्थानिकांवर त्या प्रसिद्ध प्रस्तावनेतल्याप्रमाणे चडफडून टीका करीत. ह्या समाजोद्धाराच्या कामांत म्हणजे शब्दशः समाजाची पातळी वर चढविण्यासाठी, आवश्यक असलेली ऐतिहासिक पार्श्र्वभूमीची सजावट आमूलाग्र संपूर्ण करण्यासाठीच ते नौयाकरणी,भाषिक व व्युत्पत्तिविषयक संशोधनांत पुढे पुढे पडले. हे सर्व विषय वाटतात तितके सुलभ किंवा सहजगम्य नाहीत हे ध्यानांत घेतां फिरून एकदा त्यांच्या स्वयंप्रेरणेचे कौतुक वाटते आणि कुशाग्र बुद्धीचे सर्वगामित्व व असामान्यत्वच प्रत्ययास येते.

शास्त्रनिष्ठेचा आग्रह

त्यांनी आपल्या देशाचे व जगाचे सर्वांगीण अवलोकन केले. या गतितहासाच्या अभ्यासाचा निष्कर्ष म्हणून आपल्या समाजाने शास्त्रनिष्ठा स्वीकारली पाहिजे हा त्यांचा आग्रह हे त्यांचे नजरेंत भरणारे वैशिष्ट्य होय. राजवाड्यांची शास्त्रनिष्ठा ही केवळ बुद्धिनिष्ठा नसून जीवननिष्ठा होती; आणि या त्यांच्या निष्ठेच्या संबंधांत ते कोणत्याही प्रकारे प्रतारणा किंवा तडजोड करण्यास तयार नसल्यामुळेच त्यांच्या वर्तनांतील तुसडेपणा किंवा फटकळपणा प्रादुर्भूत होई. त्यांची सफेद कपड्यांची आवड, त्यांचा आहार-विहार, राहण्याच्या झोपण्याच्या जागेसंबंधी चोखंदळपणा, आणि कैक प्रसंगी आढळून येणारा त्यांचा न समजण्यासारखा भासणार भ्याडपणा वगैरे देखील त्यांतूनच निघे. त्यांचे जग निर्भय पण वैचारिक पावित्र्याचे होते. प्रत्यक्ष आचाराचे म्हणजे तडजोडीचे किंवा संभवावर विसंबण्याचे क्षेत्र त्यांच्या कक्षेंत येत नव्हते. त्यांचा पवित्रा द्रष्ट्याचा होता. ते विचार प्रधान (man of thought) होते. कृतिप्रधान (man of action) नव्हते, हे आपण ओळखू शकतो. नुसता विचार करणारा इसम फक्त एकान्तिक सिद्धान्त मांडील. व्यावहारिक इसम व्यवहार सांभाळील. राजवाड्यांना व्यवहार सांभाळता येत नसे — त्यासाठी अवश्य तो मानसिक तोल सांभाळण्याची तयारी करण्यास त्यांच्या सर्व आयुष्यांत त्यांना उसंतच मिळाली नाही. परंतु त्यांना ‘कृती’ची ओढ लागलेली त्यांच्या एका फार प्रसिद्ध पावलेल्या हस्तलेखावरुन  स्पष्ट  अशी दिसते. १९०८ मध्ये ते लिहितात (आपण १०० वर्षे जगणार अशा विश्र्वासाने) “४६ वे वर्ष लागले. ५४ राहिली. त्यांत सर्व जगताला हितकारक व राष्ट्राला पोषक अशी कृति होवो. आजपर्यंत फक्त स्मृती राष्ट्रीय तयार करण्यांत काळ गेला. यापुढे कृती कृती कृती झाली पाहिजे. नाही तर व्यर्थ.” राजवाड्यांचे जीवन ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे त्यांना ते केवळ पोकळ शब्द आहेत असे कधीच वाटणार नाही.

प्रामाणिक कळकळीची विविध अंगे

राजवाड्यांचे सामान्य बुद्धीच्या एकाच माणसाला न पेलणाऱ्या विविध क्षेत्रांतील संशोधन आणि त्यांची ही कृतीबद्दलची ओढ ही दोन्ही त्यांच्या प्रामाणिक कळकळीचीच अंगे होते. आपण अंगीकारलेले काम “एकेकट्याच्या सान्निपातिक तडफेने फार तुटपुंजे, असमाधानकारक व कनिष्ठ प्रतीचे होते ही गोष्ट ४० वर्षांच्या (?) अनुभवाने कायम ठरल्यासारखी असल्यामुळे संघशक्तीचा आश्रय केल्यावांचून दुसरा उपाय नाही.” असे त्यांनी सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेतच (ऑक्टो. १९०५) लिहिले होते आणि इतिहास मंडळाची सांगोपांग योजनाही मांडली होती. पण प्रत्यक्ष ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ स्थापन होण्यास १९१० साल उजाडले आणि पुढे ७-८ वर्षांनी त्या मंडळांतून त्यांनी आपले अंगच काढून घेतले. त्यांनी ‘समाजशास्त्र मंडळ’ काढले ते एक वर्ष टिकले! त्यांनी ‘सोसायटी टु सजेस्ट लेजिस्लेशन’ किंवा ‘शासनसूचक मंडळी’ काढण्याचे योजिले होते. पण ते मंडळ निघालेच नाही. ‘शास्त्रसंशोधन मंडळा’ची तीच गत झाली. ‘आरोग्य मंडळ’च्या उत्पादकांपैकी ते होते. ते कांही दिवस उत्साहाने चालले. पण पुढे वर्गणी देण्यास आपल्याजवळ दमडाही नाही असे कळवून त्यांनी आपले नांव काढून टाकण्यास सुचविले.

राष्ट्रविकासाची अनन्यसाधारण भावना

त्यांच्या तळमळीबद्दल कोणालाही शंका घेतां येणार नाही, परंतु त्यांची निष्ठा आणि त्यांचा व्यवहार यांचा मेळ बसूं शकण्यासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व समतोल राहू शकले नाही हे त्यांच्या आत्यंतिक कळकळीचेच लक्षण समजले पाहिजे. डॉ. केतकर या कांहीशा समानधर्मी प्रतिभावान माणसाने त्यांच्या या वृत्तीचा अंदाज घेतला आहे (विद्यासेवक, जाने. १९२७, पृ. ४३-४४४, ‘राजवाडे यांची जीवनपद्धती’) तो या संबंधांत विचारांत घेण्यासारखा आहे. “एका क्षेत्राचा अभ्यास करून ते टाकून दुसरे क्षेत्र घ्यावे ही त्यांची वृत्ती होती. पण ती ‘ज्याक ऑफ ऑल ट्रेडस’ सारखी नव्हती; तर त्या वृत्तीची कारणे फार खोल होती. त्यांच्याशी गप्पा मारतांना त्यांच्यांत एका गोष्टीची जाणीव दिसे व ती जाणीव म्हटली म्हणजे आपणच पहिले राष्ट्रविकासाच्या भावनेने कामांत पडलेले संशोधक आहोंत ही होय.... या प्रकारच्या जाणिवेमुळे महाराष्ट्राच्या बुद्धीस एक प्रकारे चालना देण्यासाठी त्यांनी अनेक क्षेत्रांत संशोधन (इतिहास, भाषा, व्याकरण, व्युत्पत्ती) स्वतः आपल्या अंगावर घेतले असावे आणि ज्या विषयामध्ये किंवा ज्या प्रकारच्या संशोधनाममध्ये पारंगतता मिळविली त्या क्षेत्रांतच कार्य न करतां त्या क्षेत्रांचाही त्याग करावयास त्यांचे मन तयार झाले असावे. १९१८-१९ च्या सुमारास त्यांचे लक्ष या प्रकारच्या अभ्यासावरुन एकाएकी उडून त्यांनी पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांवरची पुष्कळशी पुस्तके पाहून टाकली आणि इतिहास-संशोधन आणि भाषाशास्त्र-संशोधन टाकून देऊन फिजिसिस्ट किंवा केमिस्ट बनण्याच्या आपला विचार आहे हे कळविल्याची अनेक मंडळींस आठवण असेल.... (याच वेळची त्यांच्या शास्त्रसंशोधन मंडळाची व ते बारगळ्याची कहाणी आहे!) ... अर्थात् राजवाडे हे आपल्या आयुष्याकडे इतिहाससंशोधक या (एकाच) नात्याने पाहत नसून संस्कृतिविकासप्रवर्तक या नात्याने पाहत होते आणि त्यांची खरी किंमत ओळखणाराने त्यांच्या आयुष्याचे याच दृष्टीने अवगमन केले पाहिजे.”

मराठ्यांच्या पराभवाचे मूळ कारण

राजवाड्यांचे मन इतिहासाचे म्हणून कार्य करतांना सुद्धा इतिहासकालांतील एखादी विशिष्ट राजकीय घडामोड किंवा एखाद्या व्यक्तीचे यशापयश यांच्या तपशिलांत न रमतां ते या फुटकळ प्रसंगांचे निमित्त करुन चटकन महाराष्ट्राचे एकराष्ट्रीकरण आणि त्याची सांस्कृतिक पार्श्र्वभूमी यांच्याकडे वळे ते याच त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेच्या परिपूर्तीकरिता. त्यांच्या इतिहासाला मामुली स्थलकालव्यक्तिनिष्ठ प्रसंगकथनाचे रूप न मिळतां समाजशास्त्राचे फार व्यापक स्वरूप मिळते आणि राजकारणाचा देखील विचार ते समाजव्यवहाराचे एक महत्त्वाचे अंग म्हणूनच करतात. त्यांचे पहिले प्रकाशन पानिपतच्या युद्धाबद्दल होते आणि साहजिकच त्यांत मराठ्यांचा पराभव कसा झाला आणि पुढे मराठेशाही कां बुडाली या तात्त्विक आणि खरोखर राष्ट्रीय प्रश्र्नाचे उत्तर हुडकतांना त्यांनी “आठराव्या शतकाच्या पूर्वार्धात व उत्तरार्धांत मराठ्यांची संस्कृती युरोपांतील प्रगत राष्ट्रांच्या संस्कृतीहून कमी दर्जाची होती,” म्हणजे त्या वेळी युरोपमध्ये प्रगत असलेल्या मुद्रणकलादि भौतिक विद्या, जागतिक इतिहास-भूगोलाचे यथार्थ ज्ञान आणि युद्धांत विजय मिळविण्यास आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे या बाबतींत आपले लोक त्यांच्या मागे पडले, हे त्यांनी हेरून काढले व मांडले. त्यानंतर आपले लोक असे मागे पडण्याचे तरी कारण काय? त्यांना शोध लावण्याची बुद्धी कां झाली नाही? त्यांची सामाजिक आणि बौद्धिक घडण कोठे कमी पडली की काय? हे शोधून काढण्यासाठी त्यांना मराठ्यांच्या एकंदर संस्कृतीचा मागोवा अर्थात घ्यावासा वाटला, आणि संस्कृतीच्या उत्क्रांतीचे भाषा हे जे प्रमुख अंग आणि गमक ते त्यांनी संशोधनाच्या भट्टींत घालून सांस्कृतिक तपशील हुडकून काढण्यासाठी त्याची कसून परीक्षा चालविली.

राजवाड्यांचे ठोकताळे

पण हे सर्व करतांना शिवाजी महाराजांच्या वेळचा जयिष्णुवर्धिष्णु मराठी समाज आणि नंतरचा पराभव पावलेला व तुलना करतां हीनदीन झालेला, ‘मुमूर्षु’आढळणारा मराठी समाज यांबद्दल शास्त्रीय खुलासा देण्याची त्यांची धडपड चालू होती. हेतू हा की या पृथक्करणाभ्यासांतून भावी समाजोद्धाराची दिशा दिसावी. या त्यांच्या एकंदर वैचारिक अभ्यासाचे तपशीलवार दर्शन हा खरोखर स्वतंत्र विचाराचाच विषय आहे. परंतु त्यांनी या संबंधांत बसविलेले आणि आजच्या जमान्यांतील प्रगत विचारांशी पडताळून पाहतां येण्यासारखे ठोकताळे ध्यानांत घेण्यासारखे आहेत. पहिली गोष्ट अशी की, महाराष्ट्रांतले क्षत्रिय व ब्राह्मण हे दोन वर्ण साहजिकच उच्च संस्कृतीचे असले, तरी त्यांच्या संस्कृतीचे भौतिक शास्त्रविषयक अंग अगदीच मागासलेले राहिले होते. हत्यारांत आपले लोक फार मागे असल्याचे शेवटच्या झटापटींत ठरले. याचे कारण असे की “उत्तम रेखीव व नेमके हत्यार होण्याला शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रांत व्हावी लागते ती त्या काळी महाराष्ट्रांत नव्हती.” (२) दुसरी गोष्ट अशी की या श्रेष्ठ वर्णियांना साह्यभूत होणारा जो मराठा क्षत्रिय, मराठा कुणबी, शूद्र कुणबी, नागवंशी, महारप्रभृति बहुजन-समाज त्यांची सांस्कृतिक उन्नती करण्याकडे या श्रेष्ठ लोकांनी आधीच लक्ष न दिल्यामुळे ते प्रगतींतील आपला आवश्यक कार्यभागही करण्यास असमर्थ ठरले. (३) आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, शिवाजी महाराजांच्या काळी मराठ्यांच्या पराक्रमाला रामदासांचे तत्त्वज्ञान पाठीशी राहून तेज देण्याला समर्थ झाले, पण उत्तरकालांत ते आध्यात्मिक तपोबल निस्तेज होऊन राष्ट्राची नैतिक पातळी घसरली आणि राष्ट्राचा सर्व बाजूंनी अधःपात झाला.

भौतिक शास्त्रीय दृष्टीची आवश्यकता

राजवाड्यांच्या पृथकरणक्षमतेतील निर्भेळ सत्यान्वेषणाची दृष्टी आणि विचारवैभवाचा भव्य आवाका वर दिलेल्या सिद्धान्तांच्या त्रोटक दिग्दर्शनावरुनही ध्यानांत येण्यास हरकत पडणार नाही. त्याचाच पडसाद त्यांच्या एकंदर जीवनांत आणि आचार-विचारांतत पडला असल्यास नवल नाही. त्यांची मते म्हणजे त्यांच्या ह्या विचारपूर्वक झालेल्या खात्रीची निवळ प्रतिबिंबे आहेत. या संबंधांत आचार्य जावडेकरांनी राजवाडे तिलांजली अंकांत केलेले वर्णन यथार्थ असल्यामुळे येथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. (तिलांजली, अंक ४६-४७) आचार्य जावडेकर म्हणतात, “पाश्र्चात्यांच्या भौतिक शास्त्रीय संस्कृतीचा व कर्तबगारीचा ते गौरव करीत, भौतिक विद्येंतील प्रावीण्य हे एक राष्ट्रीय जीवनाच्या व वैभवाच्या दृष्टीने मानवी संस्कृतीचे अवश्य अंग आहे असे ते समजत आणि त्या संस्कृतीचा अंगीकार करण्याचा ते लोकांना उपदेशही करीत. आमच्या देशांतील निवृत्तिमार्गी तत्त्वज्ञानाचा त्यांना तिटकारा असे. हे तत्त्वज्ञान राष्ट्राला हतबल करते या दृष्टीने त्यांनी भक्तिमार्गीय साधुसंतांवरही कडक टीका केली आहे. भौतिक शास्त्रीय दृष्टी सामान्य लोकांत प्रसृत होऊन जगताची राहाटी कार्यकारणभावाला धरून चालली आहे हा विश्र्वास लोकांत बाणल्याखेरीज अनेक देवदेवतांना नवससायास करुन ऐहिक वैभवाची वांच्छा करण्याचा धर्मभोळेपणा समाजांतून नष्ट होणार नाही, असे त्यांना वाटत असे; त्यामुळे त्यांनी एके ठिकाणी या भोळ्या धर्मभावनेच्या युगाला “देवकल्पनेचे असत्य युग” असे म्हटले आहे.”

इतिहासाचार्य राजवाड्यांचा अन्य तऱ्हेने उदोउदो करणाऱ्यांना ह्या वर्णनांतील कठोर वास्तवशास्त्रवादी राजवाड्यांना साक्षात्कार कितपत झालेला आहे हा खरोखर प्रश्र्नच आहे.

साहित्यशैलीचा अभ्यास

आता आणखी एकाच मुद्याचा ओझरता उल्लेख करावयाचा तो राजवाड्यांच्या साहित्यशैलीचा अभ्यास करण्याच्या आवश्यकतेबद्दलचा. राजवाड्यांनी आपल्या समकालीनांचा आंग्लगंड कटाक्षाने टाकून गहनांतील गहन विषय मातृभाषेंतून लिहिण्याचा विडा उचलला आणि तो आपला पण पुरा केला, ही त्यांची बहादुरी होय. पारतंत्र्यविरोधी प्रचारतंत्र म्हणून लोकांचे मन आकर्षून घेऊं शकलेल्या वक्रोक्तिपूर्ण आणि भावनोद्दीपक वक्तृत्व-लेखनापेक्षा जगांतील तत्त्वज्ञानाचा आढावा घेऊन लोकमान्यांनी ‘कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य’ यांसारखी गीतरहस्यांतील प्रकरणे लिहिणे किंवा राजवाड्यांनी अनेकविध साधनांचा विचार करुन “विकार व विचारप्रदर्शनाच्या साधनांची इतिहासपूर्व व इतिहासोतत्तर उत्क्रान्ति” उलगडून दाखविणे, यांची जात निराळी आहे. गीतारहस्यासारखा गहन तत्त्वज्ञानाचा विषय देखील आपली मराठी भाषा सहज पेलू शकते ह्या तिच्या सामर्थ्याचा शोध लावून देणाऱ्या टिळकांच्या लेखनशैलींतील गंभीर ओघ आणि मर्मग्राही ओज हे इतर कोणाला दिसत नसले तरी मराठी मूर्तस्वरूप घेऊन बोलूं लागेल तर तिला ते आपले भूषण आहे असे प्रांजलपणे कबूलच करावे लागेल. त्यांनी हाताळलेले अनेक विषय आणि त्यांतील शास्त्रीय सिद्धान्तांची शुद्ध मराठींतील सुस्पष्ट मांडणी ध्यानांत घेतां राजवाड्यांच्याबद्दल देखील तेच म्हणावे लागेल. देशी भाषेत आजपर्यंत अपरिचित असलेले गहन विषय मांडण्यासाठी मराठीला टिळक-राजवाड्यांनी जे वांकवून वळण दिले तेंच तिला आगामी काळांत परदेशांतील विविध शास्त्रीय विचारसंपत्ती आत्मसात करण्याच्या कामी उपयोगी पडेल यांत तिळमात्र शंका नाही. १९२६ च्या पुण्याच्या पहिल्या शारदोपासक-संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून राजवाड्यांनी मराठी भाषेच्या गती-प्रगतीबद्दल, जागतीक परिभाषा-स्वीकृतीबद्दल आणि मराठीचा उत्तरोत्तर संकोच होणारा थांबविण्याबद्दल जे मौलिक विचार मांडले आहेत ते तर केव्हाही अभ्यसनीय आहेतच, पण ते ज्या आत्मविश्र्वासाने प्रकट झाले आहेत ती शैलीची जातही अनुकरणीय म्हणून अर्थात अभ्यसनीय आहे.

**********

लेखक – श्री. दि. वि. काळे

अधिकचे दुवे   -
  1. पुनश्चच्या संग्रहातील हा लेख अवश्य वाचा. -वि. का. राजवाडे : आठवणी आणि आख्यायिकाअंक- वसंत; वर्ष- जुलै १९६४
  2. मराठी विश्वकोश नोंद - राजवाडे विश्वनाथ काशिनाथ  
  3.  इतिहासाचार्य वि.का. राजवाडे समग्र साहित्य - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रस्तुत
Google Key Words - V.K. Rajwade, Indian Historian, Historian Rajwade, Biography of V.K. Rajwade

सह्याद्री , व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.