शाहीर दादा कोंडके आणि विच्छा

पुनश्च    वि. ग. सातारकर    2020-05-13 06:00:11   

अंक : मोहिनी, जानेवारी १९६८

 लेखाबद्दल थोडेसे :  दादा कोंडकेंनी मराठी चित्रपटसृष्टीत जे यश मिळवले त्याला  केवळ 'चमत्कार' हेच नाव शोभू शकेल. चमत्कारांची मीमांसा करता येत नाही, चमत्कार पुन्हा पुन्हा घडत नाहीत आणि चमत्काराला नमस्कार करण्याशिवाय पर्यायही नसतो.  अनेकांना आज दादा कोंडके माहिती आहेत ते ओळीने नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देणारा कलावंत,लेखक, दिग्दर्शक म्हणून. त्यांच्या ' विच्छा माझी पुरी करा' या वगनाट्याचा आजही दबदबा आहे, परंतु 'विच्छा'ला यश मिळाल्याच्या सुरुवातीच्या काळांत दादांकडे कसे पाहिले जात होते, रंगभूमीवरील त्या चमत्काराचे वर्णन कसे केले जात होते? या प्रश्नांची अतिशय शैलीदार भाषेत उत्तर देणारा हा अत्यंत प्रवाही, प्रभावी  माहितीपूर्ण लेख आहे. हा लेख प्रसिद्ध झाला १९६८ साली, त्यानंतर अवघ्या दोन वर्षात दादांनी 'सोंगाड्या'ची निर्मिती करुन रंगभूमीला 'रामराम' केला. परंतु या लेखात मात्र असे म्हटले आहे की, 'सिनेमांत काम करण्याची विनंती त्यांनी सरळ धुडकावून लावली. सिनेमा हे आपले कार्यक्षेत्रच नव्हे, असे त्यांना वाटते.' भविष्याच्या पोटात काय दडलेले असते कोणी सांगावे? 'तूच माझी चिमणी' या नावाचे नवे वगनाट्य दादा बसवित असल्याचे हा लेख सांगतो, परंतु एकदा सिनेमाचा पडदा पाहिल्यावर दादा तिथेच रमले, त्यामुळे हे नाटक बहुधा आलेच नसावे. दादांच्या 'विच्छा'चे २५० प्रयोग झाल्याच्या निमित्ताने हा लेख लिहिलेला आहे. त्यात लेखक सुरुवातीला म्हणतो, 'हा प्रयोग पहायला गेलो तेव्हा ‘एनी एक्स्ट्रॉ टिकेट प्लीज?’ हा प्रश्न थिएटरमध्ये पाऊल टाकीपर्यंत दहापांचजणांनी तरी मला आर्जवी मुद्रेने विचारला असेल.' विचारणारांनी खरोखरच हा प्रश्न असा इंग्रजीतच विचारला असेल का पन्नास वर्षांपूर्वी? की तो या लेखकाचाच 'भाषिक  गंड' असावा?  भूतकाळात डोकावताना, जुने लेख वाचताना आपण असे प्रश्नही उपस्थित करायला काय हरकत आहे?

जानेवारी १९६८ च्या मोहिनी या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...

**********

अडीचशेवा प्रयोग! मराठी रंगभूमीवर हे भाग्य फार थोड्या कलाकृतींना आजकाल लाभते. बहुतेक नाटकांच्या नशिबी पहिला आणि शेवटचा प्रयोग एकाच दिवशी होण्याचा योग असतो. कितीतरी नाटकाचे ओढूनताणून पांचदहा प्रयोग केले जातात अन् नंतर काळाच्या उदरांत ती कायमची गडप होतात. शंभरावर प्रयोग साजरी करणारी कलाकृती वर्ष-दोन वर्षांतून एखादीच जन्माला येते. अशी वस्तुस्थिती असल्याने दादरच्या शिवाजी मंदिरांत ३० सप्टेंबर १९६७ या दिवशी दुपारी चार वाजतां ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याच्या २५० व्या प्रयोगाला जमलेली तुफान गर्दी पाहिली तेव्हां त्याच्या लोकप्रियतेचे कौतुक वाटले.

‘एनी एक्स्ट्रॉ टिकेट प्लीज?’ हा प्रश्न थिएटरमध्ये पाऊल टाकीपर्यंत दहापांचजणांनी तरी मला आर्जवी मुद्रेने विचारला असेल. तो सुटीचा वार नसूनही ही गर्दी! २५० वा प्रयोग म्हणून खास जाहिरात केलेली नव्हती, की कोणी नामवंत तालेवार अध्यक्ष म्हणून बोलवलेला नव्हता. तो नेहमीसारखा आणखी एक प्रयोग होता. तरीही ही गर्दी! एका लोकनाट्याला! असे लोकनाट्य, की ज्यांत नाचणारी बाई कोणी सिनेसम्राज्ञी नाही. असे लोकनाट्य, की ज्यांत रूपेरी पडद्यावरून ‘डायरेक्ट’ (किंवा इनडायरेक्टही) आलेले कोणी नाही. तरीही ही लोकप्रियता!

जबरदस्त पकड

‘विच्छा माझी पुरी करा’ने लोकनाट्यांच्या लोकप्रियतेचे उच्चांक मोडले असावेत. कांही लोकनाट्यांचे याहून अधिक प्रयोग थिएटरबाहेर झाले असतील. पण या लोकनाट्याचे सारे प्रयोग बंदिस्त नाट्यगृहांत तिकिटे लावून झाले. जनमानसाची अशी जबरदस्त पकड त्याने घेतली आहे की वर्तमानपत्राच्या कोपऱ्यांत त्याची बारीक, सिंगल-कॉलमी, दोनअडीच-इंची जाहिरात झळकली की प्रेक्षक तिकिट काढायला सरसावतात. आजकाल नाटकांच्या ज्या प्रचंड जाहिराती वृत्तपत्रांतून झळकतात, त्यांच्या भाऊगर्दीतून ‘विच्छा माझी पुरी करा’ची जाहिरात एकदम नजरेंत ठसत नाही. पण मराठी प्रेक्षक जाहिरातीच्या भूलभुलैय्याला फारसा फसणारा नाही. खरे सोने कोणते आणि तात्पुरते झळकणारे सोनपितळ कोणते, याची त्याला बरोबर पारख आहे. गलेलठ्ठ जाहिरातींच्या बुजगावण्यांनी न फसतां, तो ‘विच्छा माझी’सारख्या अस्सल कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आवेगाने धावतो.

या लोकनाट्याच्या यशांत प्रमुख वाटा आहे शाहीर दादा कोंडके यांचा. या लोकनाट्याची सगळी इमारत दादा कोंडके या एका खांबावर भक्कमपणे उभी आहे. लेखक वसंत सबनीस आणि इतर कलाकार आपापली कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडतातच पण दादा कोंडके यांचे खास असे महत्त्व मान्य करायलाच हवे. वसंत सबनीस आणि बाकीचे सारे कलावंत आहेत.—नाहीत फक्त दादा कोंडके, अशी घटकाभर कल्पना करू या. छे छे! अशी कशी कल्पना करतां येईल? ही कल्पनाच करणे अशक्य! दादा कोंडके हा तर या लोकनाट्याचा प्राण! ते नसतील तर ‘विच्छा माझी पुरी करा’ होणारच नाही. रामाशिवाय ‘रामायण’ संभवते का? भगवान् श्रीकृष्णावांचून ‘महाभारत’ होईल का? शाहीर कोंडके वगळले तर ‘विच्छा माझी पुरी करा’मध्ये उरेल काय?

गिरणीकामगाराचा पुत्र

तसे दादा कोंडके गेली कांही वर्षे लोकनाट्याच्या क्षेत्रांत वावरत आहेत. पण त्यांना फारसे नांव, फारशी प्रसिद्धी, फारशी लोकप्रियता लाभली नव्हती. ती लाभली ‘विच्छा माझी’ने. त्यांच्या कलागुणांची कदर व्हायला त्यांच्या हाती ‘विच्छा माझी’ यावे लागले. दाजी भाटवडेकरांचे नांव व्हायला ‘तुझें आहे तुजपाशी’चा जन्म व्हावा लागला. दामू केंकरे यांचे अभिनय गुण ‘वाजे पाऊल आपुलें’चा अवतार होईपर्यंत प्रकर्षाने पुढे आले नाहीत.

भोर संस्थानातील इंगवली खेडे हें कोंडके यांचे गांव. दादांचा जन्म मुंबईत झाला—१९३२ साली, गोकुळाष्टमीच्या शुभ दिवशी. दादासाहेब खंडेराव कोंडके हे त्यांचे पूर्ण नांव. वडील मुंबईत गिरणीमध्यें नोकरी करीत. दादांचा आपल्या गांवाशी संबंध येत असे फक्त उन्हाळ्याच्या सुटींत. एरवी ते अस्सल मुंबईकरच आहेत. दादांच्या आजोबांना (आईचे वडील) तमाशा पाहण्याचा मोठा नाद. तो त्यांचा शौक नातवांत उतरला असेल! एरवी दादांच्या नातलगांचा कलाक्षेत्राशी सुतराम संबंध नव्हता.

मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या इतर मुलांप्रमाणे दादाही यथाक्रम शाळेंत जाऊं लागले. इंग्रजी चार इयत्तांपर्यंत शिरोडकर हायस्कूलमध्ये ते होते. त्यापुढचे शिक्षण परळच्या आर्.एम्. भट हायस्कूलमध्ये सुरू झाले. शाळेत असतांना दादांना गाणी म्हणण्याचा नाद कसा आणि केव्हां लागला, हे त्यांनाही ठाऊक नाही. ‘मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तूं चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची’ हे ‘कुंकू’ सिनेमांतले विख्यात गाणे दादा वारंवार म्हणत. ‘चल बेट्या मावळ प्रांतांत, हुरडा खायला शेतांत’ हे त्या काळचे अतिशय लोकप्रिय गाणे दादांच्या जिभेवर वेळींअवेळी नाचत असे.

हूडपणा

दादा इंग्रजी पाचवीत असतांना शाळेचे गॅदरिंग आले. त्यांचा वर्ग (५ वी ब) हूडपणाबद्दल गाजत होता. वर्गशिक्षक बापट म्हणाले, “नुसता हुडपणा करतां, त्यापेक्षां गॅदरिंगसाठी काही कार्यक्रम तरी करा.” दादा आणि त्यांचे सवंगडी यांनी शिक्षकांना ग्वाही दिली, “आम्ही एक छान भावगीत म्हणूं.” या हूड मुलांना असे विश्वासांत घेऊन काहीतरी उद्योगाला लावले म्हणजे ती निवळतील, अशी भाबडी आशा शिक्षकांना वाटली असावी.

गॅदरिंगचा दिवस उजाडला. ‘५ वी ब’चा कार्यक्रम सुरू झाला. दादा आणि त्यांचे सहकारी डोक्यावर मुसलमानी टोप्या घालून रंगमंचावर प्रविष्ट झाले आणि त्यांनी ‘बताव मेरी जान, लखनौ जईयो की बनारस’ ही गाजलेली कव्वाली म्हणायला प्रारंभ केला. तो प्रकार आर्.एम्. भट हायस्कूलसारख्या प्रतिष्ठित शाळेच्या दृष्टीने भयंकर होता. कव्वालीच्या एकदोन ओळी होतात न होतात तोंच पडदा टाकण्यांत आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांवर झालेल्या गहजबाचे वर्णन न केलेलेच बरें!

त्यानंतरच्या कार्यक्रमांत आपल्याला संधी देण्यांत आली नाही, म्हणून कोंडके-कंपू चिडला. कार्यक्रम रात्रीच्या वेळचा होता. आपण मेन फ्यूज उडवला तर कार्यक्रमाचे बारा वाजतील, असा विचार या कंपूने केला. मेन फ्यूजवर हॉकी स्टिक मारण्याचा पराक्रम करण्यात आला. पण शाळेच्या गड्याने नेमके पकडले. शिक्षक प्रिन्सिपॉल    मो. वा दोंदे यांच्यापुढे सर्वांना उभे करण्यांत आले. माफी मागण्याविना गत्यंतरच उरले नाही.

दोंदे यांचा उपदेश

विद्यार्थ्यांच्या हितासाठी डोळ्यांत तेल घालून जपणाऱ्या दोंद्यांना कोंडके-कंपूचे वागणे पाहून फार वाईट वाटले. ते या मुलांना म्हणाले, “तुम्ही उत्साही आहांत. तुमचा उत्साह वाईट कामासाठी न लावतां चांगल्या कामासाठी लावा!”

मुलांना दोंदे यांच्याबद्दल आदर वाटे. त्यांनी दोंदे यांच्या बोलण्याची गंभीरपणे दखल घेतली. कांहीतरी चांगले करायचे, असा निर्धार केला. ४२ सालच्या ‘चले जाव’—चळवळीत या मुलांनी बुलेटिन्स वांटायला प्रारंभ केला. पोलिसांनी सर्वांना अटक केली. माफी मागायची नाही, कोणाची नावे सांगायची नाहीत, हा निर्धार पोलिसकोठडींत या मुलांनी टिकवला. दोन दिवसांनी पोलिसांनी त्यांना सोडून दिले.

४२च्या चळवळीचे वातावरण, अभ्यासाबद्दल अनिच्छा, दुसरे कांहीतरी करावे ही जिद्द — या साऱ्याचा परिणाम झाला आणि मॅट्रिकच्या वर्गातून दादा कोंडके यांनी शाळेला रामराम ठोकला. लेंग्रे या गावचे गंगाराम मास्तर हे दादांच्या वडिलांचे स्नेही. गंगाराम मास्तर पोवाडे म्हणत. भेदिक गाणी रचण्यांत ते मोठे पटाईत होते. वडिलांना काळजी वाटत होती की हा दादा वायां जाणार, कांहीबाही करू लागणार. त्यापेक्षां त्याला गंगाराम मास्तरांच्या संगतींत ठेवून पहावे. ते गंगाराम मास्तरांना म्हणाले, “मास्तर, दादाला तुमच्या हाताखाली घ्या. गाणी म्हणण्याचा त्याला छंद आहे.”

गंगाराम मास्तरांच्या सहवासांत

गंगाराम मास्तरांनी या गोष्टीला मान्यता दिली. तारुण्याची रग अंगी सळसळत असलेल्या दादांना उद्योग मिळाला. मोठ्या हौसेने ते मास्तरांकडे जात आणि गाणी शिकत. मास्तरांच्या लेखणींत विलक्षण रग असे. त्यांचे पोवाडे जोरकस आणि दमदार असत. ते प्रास आणि यमकें छान जमवीत. त्यांनी रचलेला तानाजीचा पोवाडा दादांनी आत्मसात केला. मास्तरांच्या लेखणींतून उतरलेला काशीबाई हणबर यांचा पोवाडा दादा म्हणू लागले. मास्तरांबरोबर रहायचे, गांवोगांव फिरायचे. मास्तरांनी दादांना मुलाप्रमाणे सांभाळले.

मास्तरांच्या बरोबर लेंग्रे या गांवी दादा गेले होते. तेथे दादांचा पोवाडा श्रोत्यांना फार आवडला, स्फूर्तिदायक वाटला. लोकांनी मास्तरांच्या या शिष्याचे खूप कौतुक केले. दादांच्या उत्साहाला नवी टवटवी आली. या काळांत दादांना राजकीय मते फुटली. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकांत ते समाविष्ट झाले. समाजवादी पक्षात ते शिरले. या पक्षाचे त्यांना जबरदस्त आकर्षण. पुढे वाराणशी येथे या पक्षात फाटाफूट झाली, तेव्हा दादांनी पक्षीय राजकारणापासून दूर राहण्याचे ठरवले.

राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकांत दादांनी कामे केली आहेत. ‘पुढारी पाहिजे’ या लोकनाट्यांत ते पडेल ते काम करीत — मग ते झांज वाजवण्याचे असो, तुणतुणें वाजवण्याचें असो की अन्य कांही असो! काम किती महत्त्वाचे आहे याचा विचार त्यांच्या मनात नसे. विचार असे सेवा दलाची कांहीतरी सेवा हातून घडावी एवढाच.

जनता कलापथक

१९५० च्या सुमाराला दादांनी ‘जनता कलापथक’ सुरू केले. हे कलापथक उघडउघड समाजवादी पक्षाचेच होते. सौ. कुसुम कुलकर्णी आणि सौ. कमल पाध्ये ‘जनता कलापथका’च्या कार्यक्रमांत भाग घेत. या कलापथकानेही ‘पुढारी पाहिजे’चे प्रयोग सुरू केले. समाजवादी पक्षाची थोरवी गाण्यासाठी दादांनी नवे सवाल-जबाब लिहिले. रोंग्याची प्रमुख भूमिका मधु कदम हा हरहुन्नरी नट करू लागला. दादा प्रारंभी फक्त गण म्हणण्याचे काम करीत. भूमिका करणे, वाक्ये बोलणे, अभिनय करणे आपल्याला अजिबात जमणार नाही अशी त्यांची समजूत होती. एरवी ते सर्व पात्रांची भाषणे साभिनय म्हणत; पण रंगमंचावर भूमिका करणे आपल्याला जमणे शक्य नाही असे त्यांना वाटे.

‘जनता कलापथक’च्या ‘पुढारी पाहिजे’ला जास्त मागणी येऊ लागली. कारण त्यांत पक्षाचा जोरदार प्रचार असे. जसजसे प्रयोग होऊं लागले तसतशी दादांची भीड चेपू लागली. ते भाई बजरंग या कम्युनिस्ट पुढाऱ्याची भूमिका करू लागले. हळुहळू कधी ही, तर कधी ती याप्रमाणे भूमिका करताकरता ‘पुढारी पाहिजे’तील सर्व भूमिका दादांनी केल्या. रोंग्याचे कामही ते छान करीत. पक्षाचे वर्चस्व दाखवण्याच्या दृष्टीने दादांनी ‘पुढारी पाहिजे’मध्ये सवाल-जबाब लिहिले. त्यामुळे ‘पुढारी पाहिजे’चे यश अधिक वाढले.

व्यंकटेश माडगूळकरांचे ‘बिनबियाचे झाड’ हे लोकनाट्यही दादांनी आपल्या कलापथकामध्ये बसवले. ते स्वतः त्यांत राजाची भूमिका करीत. त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले. ‘राष्ट्र सेवा दल’च्या कलपथकांत वसंत बापटांच्या गैरहजेरीत ही भूमिका करण्यासाठी दादांना आवर्जून बोलवत. आणि आपली वेगळी संस्था असली तरीही दादा तिकडे जात आणि काम करून येत.

गोवा-मुक्तिसंग्रामांत

गोवा-मुक्तिसंग्रामाच्या प्रचारार्थ अमर शेख यांच्या बरोबर दादा सहा महिने हिंडत होते. (गोव्यांतील सर्व निवडणुकींच्या प्रचारासाठीही दादा गेलेले आहेत.) रस्तोरस्ती प्रचारकी गाणीही ते म्हणत. हा अनुभव त्यांना नवा होता. यामुळे ते जनतेच्या अधिक जवळ गेले. जनतेच्या आवडीनिवडी जवळू पाहूं शकले. अमर शेख यांचे जोरदार गाणे हे फार मोठे आकर्षण आहे, हे त्यांच्या ध्यानी आले. तसा पहाडी आवाज ही परमेश्वरी देणगीच! त्यांच्या गायनामुळे त्यांच्या कार्यक्रमांना विलक्षण उठाव येतो. आपल्याजवळ ते नाही, आपण ती उणीव अन्य उपायांनी भरून काढली पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांना वाटू लागले की जनतेला आकृष्ट करून घेतील अशी गाणी आपण रचायला हवीत.

अनेक लोकगीते दादांनी यापूर्वी लिहिली होती. आतां त्यांना विशेष जाणवू लागेल की, ‘पब्लिक’ला पटणारे काव्य लिहायला हवे. चीनबद्दल त्यांनी काव्य रचले,--

‘लाल चिन्यांनो खबरदार, खबरदार जर याल पुढे
मर्द मराठे इथे खडे, शत्रूला चारण्या खडे।।’

या जोशपूर्ण गाण्याची ध्वनिमुद्रिकाही पुढे निघाली. तिच्या मागच्या बाजूला ‘इंच इंच लढवूं’ ही वसंत बापटांची विख्यात कविता.

‘माळ्याच्या माळ्यामंधी कोण ग उभी’ आणि ‘माझं लगीन ठरलंय् गांवाकडे’ ही दादांनी लिहिलेली गाणीही ध्वनिमुद्रित झाली आहेत. ‘मोटेवरचं गाणं गाऊं जोडी बैलाची खिल्लारी’ हे दादांचे गाणे तमाशांत खूप लोकप्रिय ठरले. लक्ष्मी कोल्हापूरकरणीच्या तमाशांत ते नेहमी म्हटले जाते.

‘चिनी आक्रमणाचा फार्स’

‘चिनी आक्रमणाचा फार्स’ हा दादांनी लिहिलेला वग गाजला. ‘हिमालयाच्या शिखरामधुनी डोकावतोय हा लाल चिनी; मुलुख आपला गिळायला टपला, बसलाय बगळा साधूवाणी’ हे दादांचे गाणे एकदम पकड घेणारे ठरले. हा माणूस काव्यांतून आपलीच भावना व्यक्त करतो आहे, असे प्रेक्षकांना मनोमन वाटे. या गाण्याच्या वेळी ते आपोआपच ताल धरीत.

या फार्समध्ये चीनची बाजू मांडणारे एक पात्र दादांनी रंगवलें आहे. त्याच्या तोंडी गाणे आहेः-

‘चाऊ आणि माऊ आपलंच भाऊ
लहान भाऊ जर मागतोय खाऊ
तर भावाच हट आपण पुरवून देऊं’

चीनची तरफदारी करणाऱ्या व्यक्तीची भूमिका राम नगरकर करीत. भारताची बाजू दादा कोंडके स्वतः मांडीत. दोघांचा सवाल-जबाब दीड तास चाले. त्यांत भरपूर रंजकता असे. कांही संवादांच्या वेळी ठिणग्या उडताहेत असा भास होई.

‘कुणाचा कुणाला मेळ नाही’ या लोकनाट्यांत नामू धोब्याची भूमिका दादा अतिशय ढंगदारपणे सजवीत. हा नामू धोबी ते सारे लोकनाट्य खाऊन जाई. ज्यांना दादांचा पूर्वेतिहास ठाऊक नव्हता, ज्यांना दादांच्या कलागुणांची जाणीव नव्हती, त्या प्रेक्षकांच्या लक्षांत येई की हा कलावंत सामान्यांपेक्षां फार निराळा आहे, फार गुणी आहे. हे पाणी न्यारे आहे.

‘बाजारांत तुरी’

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारलेला ‘बाजारांत तुरी’ हा वग दादांनी लिहिला आणि सादर केला. त्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. ती चळवळ संपल्यावर तो वगही संपला. त्याचे फक्त ३०-४० प्रयोगच होऊ शकले.

विनोदी लेखक वसंत सबनीस यांचा ‘खणखणपूरचा राजा’ हा वग दादांनी रंगभूमीवर आणला. या वगापासून दादा बंदिस्त नाट्यगृहांत प्रयोग करू लागले. तोपर्यंत ते सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत. त्यांना तिकिट नसे. जी संस्था कार्यक्रम करी ती जे काय पैसे देईल तेवढेच. अनेक वर्षे खुल्या मैदानांत कार्यक्रम केल्यानंतर दादांना आत्मविश्वास वाटू लागला. आपल्या तिकिट लावून केलेल्या कार्यक्रमांनाही प्रेक्षक मिळतील ही खात्री वाटूं लागली. त्यांनी विचार केली की खुल्या मैदानांतील आपल्या कार्यक्रमांत येणारा प्रेक्षक जागचा हलत नाही. या प्रेक्षकाला आपण बांधून ठेवूं शकतो. हा प्रेक्षक असा बांधून ठेवणे मोठे कठीण असते. कार्यक्रम बिघडूं लागला, रटाळ होऊं लागला की हा प्रेक्षक सरळ चालू लागतो. कारण त्याने कार्यक्रमासाठी पैसे खर्च केलेले नसतात.

योग्य निर्णय

बंदिस्त नाट्यगृहांतला तिकिट काढून आलेला प्रेक्षक पैसे वसूल व्हावेत या इच्छेने थोडा नरम कार्यक्रमही सहन करतो. त्याला वाटते की आतां कार्यक्रम जरी थंडा, निर्जीव वाटत असला तरी पुढे काही वेळाने त्यांत रंग भरेल. या आशेने तो चिकाटीने बसून रहातो. हा सारा हिशेब मनाशी करून दादा ‘खणखणपूरचा राजा’पासून तिकिट लावून कार्यक्रम करू लागले. आणि त्यांचा हा निर्णय योग्य होता, हे पुढील अनुभवावरून ठरले.

‘खणखणपूरचा राजा’मध्ये सबनीसांनी लिहिलेल्या लिखाणांत दादांनी पदरची भर बरीच टाकली. त्यांनी वापरलेल्या या पदरच्या मालमसाल्यामुळे त्या वगाची लज्जत कितीतरी वाढली.

या वगात राजा दारू पिऊन आजारी पडतो. त्याची तब्येत बघायला अनेकजण येतात. शेवटी गवळी येऊन राजाच्या आजाराचे खरे कारण सांगतो. दारूच्या बाटल्यांत पाणी भरून ते राजाला पाजतात आणि तो बरा होतो. त्यामुळे त्या गवळ्याला प्रधान करण्यांत येते, असे गमतीचे कथानक या वगांत आहे. राजाची भूमिका दादा मजेदारपणे करीत.

भाग्य उजळले

दादा कोंडके हे नांव महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानें गाजूं लागले ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीसांच्या लोकनाट्यामुळे. ‘दादा कोंडके आणि पार्टी’ या संस्थेमार्फत दादांनी ते रंगभूमीवर आणले. हे लोकनाट्य दादांनी रंगभूमीवर आणले आणि दादांचे भाग्य उदयाला आले. अलिकडच्या काळांत पांढरपेशा प्रेक्षकांना वेडे करणारे लोकनाट्य हेंच!

तमाशांतला गलिच्छपणा टाळावा, नाटकांतला सोवळेपणा कमी करावा आणि या दोन्ही कलाप्रकारांची सांगड घालावी, दोन्हींचा प्रेक्षकवर्ग खेंचून घ्यावा, या हेतूने सबनीसांनी ‘विच्छा माझी’ हे लोकनाट्य लिहिले. दादांनी या लोकनाट्याचे सोने केले. सबनीसांची इच्छा परिपूर्ण झाली. त्यांना जे साधायचे होते ते पूर्णांशाने साधले. गिरगांव-दादरच्या आणि पुण्यांतील सदाशिव-नारायण पेठेच्या पांढरपेशांच्या माजघरापर्यंत ‘विच्छा माझी’ जाऊन पोंचले आहे. शिवाय तमाशाचा नेहमीचा प्रेक्षकवृंद त्याने आकृष्ट केला आहेच.

या लोकनाट्यांत ‘बतावणी’चा कार्यक्रम होतो. त्यामध्ये वसंत सबनीस स्वतः भाग घेतात. सबनीसांसारखा ख्यातनाम लेखक रंगमंचावर उभा राहात असल्यामुळे या लोकनाट्याला एक आगळी प्रतिष्ठा आणि वेगळे महत्त्व प्राप्त होते.

गुणी कलाकारांचा संच

दादा कोंडके यांनी या लोकनाट्यासाठी गुणी कलाकारांचा संच गोळा केला आहे. संगीताची बाजू तुकाराम शिंदे सांभाळतात. राम नगरकर, नीला कलवाडकर, अलका पाठारे, परशुराम मोहिते यांच्यासारखे कलावंत आपल्या कलेचे दर्शन विनाकसूर आणि मनःपूर्वक घडवतात.

अनेक वग लिहूनलिहून कसलेल्या लेखणीने वसंत सबनीसांनी हे लोकनाट्य लिहिले आहे. वग आणि नाटके यांच्यामुळे सबनीसांना प्रेक्षकांची नाडी काय आहे, याची बरीच कल्पना आलेली आहे. त्यामुळे ‘विच्छा माझी’ची लेखनाची बाजू बरीच भक्कम बनली आहे. गवळण, बतावणी आणि वग हे तिन्ही भाग त्यांना जमून गेले आहेत.

पण सबनीसांची लेखणी आणि गुणी सहकारी कलावंत एवढ्यावरच ‘विच्छा माझी’चा डोलारा उभा राहणे शक्य नव्हते. तो उभा राहण्यांत महत्त्वाचा हात आहे दादा कोंडके यांचा. खरें म्हणजे सबनीस आणि दादा ही जोडी येथे अशी छान जमून गेली आहे की तिची तारीफ कितीही केली तरी ती कमीच पडावी. ही जोडी म्हणजे कृष्णार्जुनयुतीच!

सहजता

‘विच्छा माझी’मधील गवळणींत, बतावणींत आणि वगांत दादा कोंडके काम करीत असतांना काय वाटते?  वाटते की हा माणूस अभिनय बिलकूल करती नाही. हा काय अभिनय आहे?...छे छे! हा अभिनय मुळींच नव्हे! अभिनय म्हटले की कमी-जास्त प्रमाणांत कृत्रिमपणा आला, खोटेपणा आला, नाटकीपणा आला. आणि दादांच्या कामांत तर या गोष्टी अजिबात दिसत नाहीत. आपण रोजच्या जीवनांत वावरतांना काय अभिनय करीत असतो? — नाही. आपण सहजपणे, स्वाभाविकपणे वावरत असतो. आपले बोलणे स्वाभाविक असते, आपल्या हालाचाली स्वाभाविक असतात. दादांच्या कामांत अगदी तस्सा स्वाभाविकपणा दिसतो, सहजता आढळते.

एरवी दहाजणांसारखे सीधेसाधे दिसणारे दादा रंगमंचावर गेले की त्यांच्या अंगी जणू परीसस्पर्श होतो. या साध्या माणसाला एकदम सुवर्णाची झळाळी आणि मोल चढते. त्यांचे नुसते साधे पाहणे अर्थाची भांडारे खुली करते. एखादी छोटीशी हालचाल ते करतात आणि तिकडे प्रेक्षक हसतांहसतां बेजार होतात. ते वाक्ये फेकतात आणि प्रेक्षकांत हास्याचे सागर नाचूं लागतात. त्यांच्या मुखांतून बाहेर पडणारे प्रत्येक वाक्य झेलण्यासाठी प्रेक्षक आपल्या जिवाचे कान करतात अन् त्या वेळी ते कान हत्तीच्या कानांप्रमाणे सुपाएवढे झालेले असतात.

विजेचा संचार

रंगमंचावर गेल्यावर दादांच्या अंगांत वीज प्रवेश करीत असणार! त्याशिवाय का त्यांच्या हालचालींत असा अजब चपळपणा येतो? त्यांचे सारे शरीर चार तास नुसते लवलवत असते. ते माना वेळावणे, ती पायांची परस्परांना मिठी, ते तिरपेतिरपे मागे सरकणे....प्रत्येक अणूरेणू त्या त्या वेळी त्यांच्या मनांत येणारी गोष्ट ठणठणीतपणे बोलून दाखवतो. मुद्राभिनयावर एवढे प्रभुत्व असणारे कलावंत आज मराठी रंगभूमीवर कितीसे दिसतात?

दादांचा अभिनय उत्स्फूर्त असतो. ते कोणत्याही अभिनयशाळेत गेलेले नाहीत. कोणत्याही ‘मेथड’चे ते चेले नाहीत. इतकी पावले मोजून पुढे सरकायचे, हात इतके इंच वर उचलायचा, असे गणित त्यांच्याजवळ नाही. आणि तरीही त्यांना सारे कसे छान जमते. त्यांचा प्रत्येक पवित्रा त्या त्या प्रसंगाला शोभणारा असतो. नव्हे, दुसरा कोणताही पवित्रा त्या प्रसंगाची शान वाढवणे शक्यच नसते.

जणूं तलवारींचे वार

पट्टीचा पोहणारा पाण्यावर ज्या कौशल्याने हात मारतो, त्याच कौशल्याने दादा आपली वाक्यें फेंकतात. सराईत तलवार बहाद्दराचे तलवारीचे जसे वार, तसे दादांचे वाक्यांचे वार! वाक्य कसें फेंकावें, केवढा ‘विराम’ घेऊन फेंकावें, कोणत्या लयींत फेंकावें, त्यांत कोणत्या शब्दावर खास आघात असावा, हे सारे दादांना आपोआप समजते. आवाजाचा चढउतार त्यांना आपसुकच जमतो. नुसत्या बोलण्यातूनही ते अचूक भावाभिव्यक्ती करू शकतात. आणि ते बोलणे सुयोग्य अभिनयाने नटलेले असल्यामुळे त्याची खुमारी अनंत पटींनीं वाढते.

लेखकाने लिहिलेले तेवढेच आणि तेच बोलण्याचे बंधन नटावर असते नाटकांत! लोकनाट्यांत हे बंधन नसते. येथे उत्स्फूर्त विनोद करायला परवानगी असते, नव्हे, तसा प्रासंगिक आणि उत्स्फूर्त विनोद केला नाही तर लोकनाट्य मिळमिळीत, अळणी बनेल. प्रसंगांना साजेसे उत्स्फूर्त विनोद करण्यात दादांचा हातखंडा आहे. ते असे विनोद करतात हे लोकांना ठाऊक आहे. म्हणून लोक त्यांच्या तोंडून कोणते वाक्य येणार, याची आतुरतेने वाट पाहतात. दादा अनेक चमकदार वाक्ये सहज बोलून जातात. त्यांचे विनोद ताजे असतात. ते कधी ‘मराठ्यां’तील शिवीगाळीची टिंगल उडवतील, तर कधी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘गौरीशंकर’ यासारख्या नाटकांची गंमत करतील. चालू परिस्थितीवर बोट ठेवणारे, स्थानिक वातावरणाला शोभून दिसणारे, विनोद ते हमखास करतात. या बाबतींत त्यांची तेज बुद्धी चांगले काम देते.

पालटते भाव

दादांचा चेहरा कसा आहे? रंगमंचावर ते असले म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचे सत्य स्वरूप ओळखणेच अशक्य! आतां तो निरागस दिसतो, तर निमिषार्धात पक्का इब्लिस! मिनिटाला तो भोळाभाबडा वाटेल, तर दुसऱ्याच मिनिटाला तो सीमेचा मिस्किल दिसेल. क्षणांत रागीट, तर क्षणांत लडिवाळ. तो प्रेमळ आहे असे मनांत येते न येते तोंच तो द्वेषी दिसू लागतो. चित्रपटांत क्षणाक्षणाला दृश्ये पालटावीत तसे दादांच्या मुद्रेवरचे भाव पालटतात.

नेपथ्य, प्रकाशयोजना, चेहऱ्यांची रंगरंगोटी, पोशाखाचा दिमाख, फिरता-सरकता रंगमंच, दादांना कांही कांही लागत नाही. सबनीसांचे सरस लिखाण आणि आपला अभिनय व हजरजबाबीपणा, एवढे भांडवल त्यांना पुरते. एवढ्या भांडवलावर ते प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवतात. नुसते खिळवून नव्हे, त्याला पुन्हा येण्याची ओढ निर्माण करतात. ‘विच्छा माझी’चे प्रयोग पुन्हापुन्हा पाहणारे प्रेक्षक असंख्य आहेत. विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनी बऱ्याच वेळा तो प्रयोग पाहिला आहे. दुःख विसरण्याचा तो उत्तम उपाय आहे, असे आशाबाई जाहीरपणे बोलल्या आहेत.

दादांपुढचा आदर्श

तल्लक बुद्धीचा तमासगीर दादू मारुती इंदुलीकर याला दादा फार मानतात. शीघ्र विनोद करणारा त्याच्यासारखा दुसरा कोणीही दिसत नाही. त्याचा ‘मल्हारराव होळकर’ हा वग दादांनी दहा वेळा पाहिला. प्रत्येक वेळी तो कितीतरी नवे ऐकवीत होता. सारे पदरचे, आपोआप सुचलेले! दादू हा जिवंत तमाशा आहे, अभ्यास करण्याजोगा तमाशा आहे, असे दादा मानतात.

दादा स्वतः पदरचे विनोद वापरीत असले तरी सर्वांनींच तसे करावे हे त्यांना मान्य नाही. तालमीत जे शिस्तशीरपणे बसवले असेल, तेवढेच कलावंतांनी केले पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असतो. ‘विच्छा माझी’च्या तालमी ते नेहमी घेतात. कारण वाक्यांतले शब्द मागेपुढे पडले तर विनोद वाया जातो, यांची जाणीव त्यांना आहे.

प्रेक्षकांचा आनंद

विनोद वायां गेला तर प्रेक्षक मठ्ठ आहेत, त्यांना काही कळत नाही, यासारखे दोषारोप दादा कधीच करीत नाहीत. आपलेच काहीतरी चुकले असेल असे मानून, काय चुकले याचा शोध ते घेतात. लोकांना न कळणारा, त्यांना आळस आणणारा कार्यक्रम आपण देतांच कामा नये, अशी दादांची भावना असते. त्यांचे म्हणणे असे की लोक आनंद घेण्यासाठी येतात; आपण हलगर्जीपणा करून त्यांचा आनंद बिघडवतां कामा नये.

प्रेक्षकांची प्रतारणा होता कामा नये, हे तत्त्व दादा कमालीचे जपतात. ज्या दिवशी प्रयोग असतो त्या दिवशी ते खात नाहीत. नुसत्या चहावर असतात. आपण खाल्ले तर अंगात बोजडपणा येईल ही भीती त्यांना वाटते. कार्यक्रम संपल्यावर ते भरपेट खातात. तोपर्यंत नाही. आपल्या खाण्याने आणि पिण्याने कार्यक्रमांचे मातेरे करणारे कांही कलाकार मराठी रंगभूमीवर आहेत. या मंडळींनी दादांचा कित्ता समोर ठेवून संयम पाळला तर?

मुंबईची लावणी

मुंबईबाहेर ‘विच्छा माझी’चा प्रयोग असला म्हणजे दादा त्यामध्ये मुंबईची लावणी सादर करतात. ती लिहिली आहे त्यांनीच. नवरा-बायकोच्या संवादांत मुंबईचे मार्मिक दर्शन ही लावणी घडवते. तिच्यांत अधूनमधून ते चुरचुरीत वाक्ये बोलतात. ही लावणी तासभर चालते. खूप रंगते. दादा हे हाडाचे कलावंत असल्याने प्रेक्षकांना आनंद देणे आणि स्वतः आनंद घेणे यांत त्यांचा जीव रमतो. घड्याळाकडे पाहून कार्यक्रम करणे त्यांच्या तब्येतीला तितकेसे मानवत नाही. मुंबईला घड्याळाची ताबेदारी मानावीच लागते. याचे उट्टे ते बाहेरगांवी काढतात. बाहेर त्यांचे ‘विच्छा माझी’ पाच तांस चालते.

‘विच्छा माझी’चे प्रयोग शहरांतही रंगतात आणि छोट्या गावांतही. हे लोकनाट्य घेऊन दादांनी विदर्भ-मराठवाड्याचा पहिला दौर काढला, तेव्हा आर्थिक नुकसान सोसावे लागले. दादांनी ओळखले की आपल्या कार्यक्रमाची कल्पना लोकांना नसल्याने हे घडले. त्यांनी आत्मविश्वासाने त्याच भागांत पुन्हा दौर काढून ‘हाऊस फुल्ल’ उत्पन्न गांवोगांवी घेतले.

लोकनाट्यांत अफाट यश मिळवलेले दादा नाटक-सिनेमांत दिसत नाहीत. सिनेमांत काम करण्याची विनंती त्यांनी सरळ धुडकावून लावली. सिनेमा हे आपले कार्यक्षेत्रच नव्हे, असे त्यांना वाटते. ‘वरातीमागून घोडं’ या जगदीश दळवींच्या नाटकांत त्यांनी भूमिका पत्करली होती. तालमी नीट न होतांच ते नाटक रंगभूमीवर आले आणि कोसळले. त्या नाटकांतल्या कलावंतांचा अनुभवही त्यांना चांगला आलेला नाही. म्हणून नाटकांत कामे करण्याबद्दल ते उदासीन आहेत.

आणखी दहा वर्षे

आणखी दहा वर्षे तरी नवेनवे वग सादर करण्याची आणि त्यांत भूमिका करण्याची दादांची इच्छा आहे. आपल्या बोलण्याचा प्रेक्षकांना कंटाळा येण्यापूर्वी, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आपली शक्ती कमी होण्यापूर्वी आपण निवृत्त व्हावे असे त्यांना वाटते. लोकांनी ‘नको’ म्हणण्या अगोदरच आपण त्यांच्यासमोरून अदृश्य व्हावे, या मताचे ते आहेत.

‘विच्छा माझी’च्या पाठोपाठ ‘तूंच माझी चिमणी’ हा नवा वग दादा रंगभूमीवर आणतील. ‘खणखणपूरचा राजा’चे नाव बदलून तो वग ‘मलाच आपली म्हना’ या नांवाने दादा सादर करणार आहेत — त्यामध्ये बरेच फेरफार करून. असेच नवेनवे वग त्यांनी सादर करावेत. निवृत्त होण्याचा विचार न करता जनतेला सदैव हंसवत ठेवावे!

**********

लेखक – वि. ग. सातारकर

Google Key Words - Dada Kondke, Loknatya, Vichcha Majhi Puri kara, V.G. Satarkar

नाटक रसास्वाद , व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.