न हसणाऱ्या वाचकांचा मी ऋणी आहे

पुनश्च    वसंत सरवटे    2020-07-25 06:00:37   

अंक : ललित - दिवाळी १९६९

लेखाबद्दल थोडेसे : बुद्धीगम्य विनोद आपल्याला खळखळून हसवत नाही, तो केवळ गालावर खळी पाडतो. परिस्थितीजन्य विनोद कोणालाही रिझवू शकतो. भाषा, समाज, संस्कृती यावरील शाब्दिक कोट्या कळायला वाचन, समज आणि आकलन तिन्हीची गरज असते. वसंत सरवटे यांनी व्यंगचित्रकार म्हणून नेहमीच बौद्धिक विनोदाची कास धरली. त्यांच्या एका चित्रात बंगल्याला 'नेस्ट' असे नाव दिलेली व्यक्ती फाटकावर बसलेल्या पक्ष्यांना काठीने उडवून लावत असल्याचे रेखाटले होते. ही गंमत कळायला चित्र निट बघावे लागते. एकदा त्यांनी कोल्हापुरी चपलांचा जोड चित्रात दाखवला होता. त्यात एक चप्पल दुसरीला म्हणते, अगं आपण आयुष्यभर कोल्हापुरात राहिलो, पण अंबाबाईचं दर्शन काही घेता आल नाही आपल्याला...

तर असे हे वसंत सरवटे केवळ उत्तम चित्रकारच नव्हते, तर लेखकही तेवढेच उत्तम होते, त्यांचे निरिक्षण अफाट होते, याचा प्रत्यय हा लेख देतो. तो हसवतो, खळी पाडतो, चकीत करतो आणि आपल्याला  अनुभवश्रीमंत करतो. हा लेख वाचल्यावर असं वाटेल की आजचा शनिवार सार्थकी लागला! ललित दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...********

माझे न हसणारे वाचकही अनेक आहेत अन् त्यांची मधूनमधून भेट होत असते. विशेषतः कलाक्षेत्रापासून संपूर्णपणे भिन्न असलेल्या स्थापत्यशास्त्राच्या विश्र्वात मी काम करीत असल्याने माझ्या आजूबाजूच्या अनेकांचा साहित्याशी किंवा चित्रकलेशी क्वचितच संबंध आलेला असतो. त्यामुळे न हसणारे वाचक कोणत्याही क्षणी समोर येण्याची शक्यता मी गृहित धरलेली आहे, त्यामुळे मी त्यांना तसा मुळीच बिचकत नाही.

मुळीच बिचकत नाही म्हणजे जेव्हा अशा वाचकांच्या (किंवा न-वाचकांच्या) माझ्याशी direct भेटीचा प्रसंग असतो तेव्हा. परंतु अशा प्रसंगी ओळख करून देणारा मध्यस्थ नावाचा भयंकर प्राणी हजर असला की मात्र मला कापरे भरते. त्या भीतीने सुशिक्षित मराठी माणसापासून दूर पळण्याचा मी विचार करू लागतो. सुशिक्षित, मराठी किंवा सुशिक्षित मराठी यांपैकी एकाबरोबरही माझा काहीही तंटा नाही. पण सुशिक्षित मराठी माणूस म्हटला की तो मराठी मासिके, पुस्तके वाचत असणारच, वाचत असताना त्यानं माझी विनोदी चित्रं पाहिली असणारच, असा उगाचच समज माझी ओळख करून देणाऱ्यानं का करून घ्यावा हे मला अद्याप समजलेले नाही. मी मात्र त्यामुळं नसत्या प्रसंगात ओढला जातो.

हा मध्यस्थ परिचायकानं माझ्या मनात प्रथम धास्ती बसवली ती मी कॉलेजमध्ये असताना. त्या वेळी मी पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये होतो. अन् त्या सुमारास “वसंत” मासिकाने दिवाळी अंकासाठी हास्यचित्रांची एक चढाओढ लावली होती आणि त्यामध्ये मी पाठवलेल्या चित्राला बक्षिस मिळालं होतं. आता ही काही अखिल महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत असली पाहिजे अशी घटना नव्हे. त्याआधी माझी ‘हंस’ (मोहिनीचा, मला वाटतं जन्म व्हायचा होता), क्वचित् ‘किर्लोस्कर’ ‘वाङ्मयशोभा’मध्ये तुरळक चित्रं प्रसिद्ध झालेली होती हे खरं; पण त्यामुळं काही सुप्रसिद्ध वगैरे मी झालेला नव्हतोच आणि “वसंत”मधील बक्षिसाने कीर्तीत फार मोठा फरक पडणार होता असेही मला वाटत नव्हते. पण हॉस्टेलमधल्या माझ्या रूमपार्टनरला तसं वाटत नसावं हे उघड होतं. आमच्या खोलीत येणाऱ्या त्याच्या प्रत्येक नातलगाला, मित्राला माझी ओळख करून देण्याचा त्याचा उत्साह केवळ अनिवार्य होता अन् अशा वेळी खालीलप्रमाणे संवाद घडेः

“हे अमुक अमुक! याचं नाव तुम्ही एकलंच असेल!”

थोडी स्तब्धता. आठवण्याचा प्रयत्न, मगः “नाही.”

“वसंत मासिक तुम्ही नेहमी पाहाता की नाही?”

आणखी थोडी स्तब्धता. मगः “नाही.”

“निदान या वर्षीचा दिवाळी अंक तरी?”

यावेळी अधिक लौकर उत्तर येतः “नाही बुवा. काही पाहण्यात आला नाही.”

“मग अवश्य पाहा! त्या अंकातील चढाओढीत याला पहिलं बक्षिस मिळालं आहे!”

हा प्रसंग दर दोन-चार दिवसांनी एकदा तरी घडे. माझी ओळख करून देण्याचा त्याचा अट्टाहास मला काही केल्या समजत नसे. या प्रसंगातील प्रत्येक नाहीच्या वेळी मला उगाचच अधिक अधिक ओशाळल्यासारखे वाटायचे. सुदैवाने पुढेपुढे ही प्रश्र्नोत्तराची पद्धती त्यानं बंद करून संवादाची गाडी पहिल्या वाक्यावरून मधली स्टेशनं गाळून शेवटच्या वाक्यावर आणायला सुरुवात केली, तेव्हा परिस्थिती काहीशी सुसाध्य झाली. पण काहीशीच. कारण ९९ टक्के वेळा नवीन माणसाच्या चेहऱ्यावर काही चमकल्याचं दिसायचं नाही. शेवटी मी या परिचयाची एवढी दहशत घेतली की त्याच्याकडे कोणी पाहुणे आले की काहीतरी निमित्त काढून मी बाहेर जाऊ लागलो.

अशा प्रकारच्या सुशिक्षित प्रौढ माणसाखेरीज इतर ठिकाणाहूनही धोका निर्माण होऊ शकतो याचा नुकताच मला अनुभव आला.

आमच्या नात्यातील एका लग्नाला मी गेलो असता माझ्या कॉलेजमधील एका फार जुन्या मित्राची भेट झाली. बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळं दोघांनी एकमेकांची चौकशी केली. त्यानंतर बोलता बोलता तो म्हणालाः “हल्ली खूप चित्रं येतात तुझी. पाहतो आम्ही. माझा मुलगा तर बरोब्बर ओळखतो तुझी चित्रं.” हा मुलगा ७/८ वर्षांचा. मी कौतुकानं म्हटलं, “हो का? वा! वा!” पण एवढ्यावर त्याचं समाधान झालं नव्हतं. त्यानं शेजारी खेळत असलेल्या दुसऱ्या एका मुलाला आपल्या मुलाला बोलवायला सांगितलं. मी म्हणालो, “जाऊ दे रे! खेळत असेल. कशाला बोलावतोस?” पण त्यानं बोलावणं पाठवलंच. आजूबाजूची मंडळी आता आमच्याकडे अधिक लक्ष देऊन पाहायला लागतात. काही वेळात मुलगा आज्ञाधारकपणे येतो.

“अविनाश! ह्यांना ओळखलंस का?” (ओळखीचे प्रश्र्न! बापरे! येथे सुद्धा? प्रथम भेटीतच हा छोटा मुलगा मला कसा ओळखणार?)

“नाही बाबा.” क्षणार्धात उत्तर.

“अरे, तू मासिकातली व्यंगचित्रं नेहमी पाहातोस ना? आपल्याकडे येणाऱ्या निरनिराळ्या मासिकांतली?”

“हो.” (चला! एक “नाही” वाचला!!)

“त्या सर्वात कुणाची चित्रं तुला जास्तीत जास्त आवडतात?”

उत्तर नाही. थोड्या वेळानेः

“अरे, तू मला नेहमी तर दाखवत असतोस.”

थोडा वेळ. उत्तर नाहीच.

“आठवत नाही का तुला? तू मला दाखवतोस. मग मी तुला सांगतो, आपल्या काकांची आहेत ती म्हणून!”

एव्हाना आजूबाजूला मंडळी जमा झालेली असतात. संवाद ऐकायला. पण पोराला काही आठवत नाही ते नाहीच. शेवटी नाद सोडून माझा मित्र त्याला खेळायला जायला सांगतो. माझ्याकडे वळून म्हणतोः

“निराशा केली लेकानं माझी!”

मी म्हणालोः

“त्यानं नाही! मी केली निराशा तुझी!”

परिचयकाची ही जात बरी म्हणायला लावणारी दुसरी एक असते. वरील प्रकारच्या परिचयकानं निदान माझी चित्रं प्रत्यक्ष पाहिलेली तरी असतात व त्यासंबंधी त्याला माहिती असते. पण दुसऱ्या प्रकारच्या परिचयकानं फक्त माझी चित्रं प्रसिद्ध होतात असं ऐकलेलं असतं. क्वचित् एखादं चित्र पाहिलेलं असेल, नाही असं नाही. पण ते तेवढंच. आता अशा माणसानं माझी ओळख करून देतांना माझ्या चित्रांविषयी बोलायलाच हवं का? पण ते तर हे गृहस्थ करतात, पण उत्साहाच्या भरात माझ्या पदरात जरा जादाच माप टाकतात. “ह्यांची चित्रं तुम्ही पाहाता की नाही? सगळ्या मासिकांतून असतात. भयंकर विनोद.”  आणि एवढं सांगून पुरं होणार नाही असं वाटून माझी चित्रं कोणकोणत्या मासिकांतून येतात त्याची यादी द्यायला सुरवात करतात... “वसंत,” थोडं आठवून... “किर्लोस्कर”... अधिक आठवून...  “अमृत... झालंच तर ते आपलं हे हो!” आणखी कोणकोणत्या हो? आणखी नाव प्रयत्न करून आठवत नाही असं पाहून माझी मदत घेऊ पाहतात. आता मी काय मदत देणार कपाळ? खरी गोष्ट अशी आहे की गेल्या जवळजवळ १६/१७ वर्षांत “वसंत”मध्ये माझं काहीही आलेलं नाही;  “किर्लोस्कर”मध्ये अगदी तुरळकपणे न् “अमृत”मध्ये तर रेघसुद्धा नाही! पण त्या गृहस्थांना (बहुधा माझ्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळं) प्रथम आठवतं “वसंत” मग “किर्लोस्कर” न् मग “अमृत” (ज्ञान व मनोरंजन) बस्स ! अर्थात् या किंवा इतर कोणत्याही नामावळीमुळं काही फारसा फरक पडतो असं नाही. कारण नवीन माणसाच्या चेहऱ्यावर एवढ्या बारीकसारीक तपशीलानंसुद्धा बऱ्याच वेळा काही हालचालीचा पत्ता दिसत नाहीच.

ज्या माणसांना ओळख करून दिली जाते त्यांचेही प्रकार आहेत. त्यांपैकी एक वरीलप्रमाणे उत्साहपूर्ण परिचय चालू असता चेहऱ्यावर काही फरक न दाखवता शांत असतो. परिचय सोहळा पूर्ण झाला की शांतपणे जाहीर करतो-

“मी मराठी मासिक वाचत नाही! एकदम trash! मजूकर काय, चित्रं काय, व्यंगचित्रं काय, सर्व Childish. मी आपला Readers’ Digest, Life आणि  Time वाचतो!” हा न वाचणारा न हसणारा वाचक दुसऱ्या प्रकारांतील वाचक. “हे व्यंगचित्रकार, यांची विनोदी चित्रं तुम्ही पाहिली असतीलच” असं म्हणायचा अवकाश की तो हसायला सुरुवात करतो. परिचय पूर्ण होईपर्यंत स्मितहास्यापासून सुरुवात करून मजल दरमजल करीत खोखोवरून गडगडाटापर्यंत पोचतो. माझ्या चित्रांच्या केवळ स्मरणाने एका माणसाला एवढे हसू यावं याचं मला अजब वाटायला लागतं. आत कुठे तरी सुखवायलासुद्धा लागते. हसं आवरता आवरता तो म्हणत असतोः “वा! परवांच्या मोहिनीच्या दिवाळी अंकातील तुमची ती चित्रमाला आठवली की अगदी हसू आवरत नाही बघा! (येथपर्यंत सर्व ठिक असतं) अहो काय बरं नाव? ती हो, ती “अश्रु”... इथे माझ्या मनात एव्हाना निर्माण झालेली माझीच प्रतिमा खळकन् फुटते. म्हणजे हे दुसऱ्याच्या चित्राविषयी बोलत आहेत तर ! मनातली सर्व उबदार भावना थंड होते. असा हा हसणारा, वाचणारा अन् विसरणारा वाचक.

वाचणारा व न विसरणारा असा एक वाचक असतो. ह्यानं चित्रे पाहिलेली असतात. ती त्याच्या लक्षात राहिलेली असतात. अन् बरोबर माझ्याच चित्रांविषयी तो बोलत असतो. ओळख झाल्यावर हा म्हणतोः “वा! तुमची चित्रे मी नेहमी पाहतो. परवा अमुक अमुक मासिकाच्या अमुक महिन्याच्या अंकात आले आहे. छान वाटलं.” एवढं बोलून लगेच “पण काही म्हणा, लक्ष्मणची चित्रे म्हणजे ग्रेट बरं का! कमाल आहे त्याची.” लक्ष्मणच्या चित्राचा मी स्वतः फार चाहता आहे आणि त्याच्या चित्रापासून मला निश्चितच फार मोठा आनंद मिळतो. तरीसुद्धा माझ्या चित्राविषयी बोलून झाल्यावर थोडा वेळ त्यांनी जाऊ दिला असता तर बरं झालं असतं, असं वाटल्याखेरीज राहत नाही.

एकदा तर एका गृहस्थांनी माझी सपशेल विकेटच घेतली. माझी ओळख करून दिल्यावर हे हसून म्हणतातः “म्हणजे काय? सरवटे हे नाव तर फार सुप्रसिद्धच आहे. माझ्या तर कित्ती वर्षांपासून परिचयाचं आहे!” मी मनात म्हणतोः “एका तरी व्यक्तीपर्यंत माझं नाव पोहोचलं आहे म्हणायचं!” पण त्याचे पुढचे शब्द ऐकल्यावर माझा त्रिफळाच उडाला. ते म्हणालेः “साहजिक आहे. मी पी.डब्ल्यू.डी.मध्ये आहे आणि सरवटे आमचे कित्ती तरी वर्षांपासून सुपरिंटेंडंट आहेत. फार सज्जन माणूस पाहा. तुमचे कोणी नात्याचे लागतात का हो?”

या भाबड्या वाचकाखेरीज माझ्या चित्रातला विषय झाल्यामुळं संतप्त झालेले व त्यामुळं हसण्याचं विसरून गेलेलेही वाचक असतात. आठ वर्षांपूर्वी “किर्लोस्कर”च्या खास मुंबई अंकात मुंबईतील सांस्कृतिक जीवनासंबंधी “वरची पातळी” या नावानं मी एक चित्रमाला काढली होती. त्यामध्ये मुंबईतील साहित्य, नाट्य, संगीत इ. प्रांतांशी संबंधित अशा व्यक्तींच्या डायरीतील पानांचे (खोट्या खोट्या) त्यांच्या त्यांच्या हस्ताक्षरातले दर्शन घडवले होते. व शेजारी त्यांचे व्यक्तिचित्र (अर्थातच काल्पनिक) दिले होते. हे करताना एकेका व्यक्तिदर्शनानं मुंबईतील दोन-दोन तीन-तीन व्यक्तींचे बेमालूम मिश्रण केले होते. त्यामध्ये कोणाचाही अपमान करावा वा दुखवावे असा मुळीच हेतू नव्हता. काही व्यक्तींविषयी मी नुसते ऐकले होते. पाहिलेसुद्धा नव्हते. मग ओळख कुठली? तरीही काही व्यक्तींनी ती माला प्रसिद्ध होण्यापूर्वी सुगावा लागल्याने, संपादकांशी पत्रव्यवहार करून, ती छापू नये असा दबाव आणायचा प्रयत्न केला! काहींनी माझ्याशी बरेच दिवस बोलणे सोडले. साहित्याशी संबंध असलेल्या व्यक्तींची ही प्रतिक्रिया, तर एखादी सामान्य व्यक्ती आपले चित्रण विनोदी चित्रात आले म्हणून रागावून बसली तरी त्यात आश्चर्य काय? तेव्हा अशा तऱ्हेच्या वाचकाबद्दल येथे मी काही सांगायचं नाहीं असं ठरवलं आहे.

विनोदनिर्मितीशी संबंध असलेला कलावंत नेहमी विनोदी बोलत असावा, नेहमी विनोदी वागत असावा, असा एक निष्कारण समज सर्वसामान्य जनतेने करून घेतलेला असतो. त्यामुळं माझी प्रत्यक्ष ओळख झाल्यावर एखाद म्हणतोः “तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्हीच अशी चित्रे काढत असाल, तुम्ही इतके हे असाल, असं वाटत नाही!” आता यावर काय बोलणार? (अन् “हे” म्हणजे नक्की काय हो?)

व्यंगचित्रकारानं विनोदी बोलावं अशी एखाद्याची अपेक्षा एक वेळ समजण्यासारखी आहे; पण त्यानं व्यंगचित्रासारखं दिसावं असं एखाद्याला वाटलं तर त्याला काय उत्तर द्याल? माझी एका प्रौढ स्त्रीबरोबर ओळख करून दिल्यावर त्या म्हणतात कशाः “तुम्ही इतकी चित्रं काढता तेव्हा मला वाटलं तुम्ही व्यंगचित्रासारखे दिसत असाल!” (ह्या बाई स्वतः डॉक्टर असून मॅटर्निटी होम चालवतात, तर या कशा दिसाव्यात अशी लोकांनी अपेक्षा करायची?)

मध्यस्थामार्फत ओळख करून घेण्याच्या प्रसंगाइतकाच दुसऱ्या एका प्रकाराबद्दल मी कानाला खडा लावून घेतला आहे. एखादा माझी चित्रं पाहत असेल तर जवळपास राहण्याचं मी टाळतो. काही वेळा अवघड प्रसंग निर्माण होण्याची शक्यता असते. यावरून मला सुरुवातीला मी कोल्हापुरात असतानाचा एक प्रसंग आठवतो. त्यावेळी नुकतीच इकडे तिकडे चित्रे द्यायला मी सुरुवात केली होती. चित्रं तयार झाल्यावर ती संपादकांकडे नेऊन देताना, पोर्टफोलियो, निदान कागदी पिशवी वगैरेतून नेण्याइतका रुबाब वाढला नव्हता. मी आपला अशा कामासाठी एखादं हाताशी असलेलं मासिक वापरायचा. आकाराच्या दृष्टीनं Life, Saturday Evening Post आणि Colier’s ह्या मासिकांचा अंक फार सोयीस्कर असे. मी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो की संपादक माझ्या हातातील मासिकाकडे दृष्टिक्षेप टाकून विचारायचे. “हे काय आणलंयत?” मी म्हणायचा, “ही तुमच्यासाठी चित्रं” आणि मासिक उघडून त्यातून चित्रं काढायला लागलो की ते म्हणायचे, “बघू हो मासिक कसलं आहे ते?” मी मासिक दिलं की १५-२० मिनिटं मग ते मासिक चाळण्यात घालवतच. त्यातील प्रत्येक पानाचं, चित्राचं रसग्रहण होई. “काय सुंदर चित्रं हो! अशी कला हवी!” हास्यचित्रं असली की हशाचा गडगडाट होई आणि “काय चमकदार कल्पना! तुम्ही असं काही तरी काढायला शिका!” असा मला उपदेश. इतका वेळ माझ्या चित्रांची गाडी सायडिंगलाच पडलेली असायची. त्याची त्यांना आठवण होई. मग ते विचारीत, “तुही काय आणलं होतंत?” पण इतकं सर्व झाल्यावर माझी स्वतःची चित्रं त्यांना दाखवण्याची इतकी लाज वाटायची, की काही विचारू नका. मग काही दिवसांनी मी एक करू लागलो. मी त्यांच्यासाठी व्यंगचित्रं तयार केली असतील तर ती Lifeच्या अंकातून नेई (कारण त्यात व्यंगचित्रं नसत) आणि पुढे पुढे तर सरळ “पुढारी”त गुंडाळून न्यायला लागलो.

वरील अपवादात्मक प्रसंग सोडला तरी माझे हास्यचित्र माझ्यासमोर कोणी पाहू लागला की अजूनही माझ्या मनात धडधड होऊ लागते हे मात्र खरे. गंभीर चित्र अन् हास्यचित्र यात अशा वेळी एक महत्त्वाचा फरक आहे. गंभीर चित्र एखाद्याला आवडले नाही तर तो फार तर काही बोलणार नाही. अन् समजले नाही तर मुळीच बोलणार नाही. (‘काय तरी मॉडर्न आहे. आपल्याला कळणं शक्य नाही’ म्हणून सोडून देईल) पण विनोदी चित्राच्या बाबतीत तो गप्प बसणार नाही. तो म्हणेलः  “कल्पना काही कळली नाही हो! काय, विनोद काय आहे यात?” आता कुणी असं विचारलं की माझ्या मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो की याला खरंच कळलेलं नाही की आवडलेलं नाही? काही का असेना, स्वतःची चित्रं स्वतः समजावून सांगण्याच्या फंदात मात्र सहसा पडायचं नाही, असा एक नियम मी स्वतःला घालून घेतला आहे. कारण, खरं तर मुळातच विनोद समजावून सांगणं अवघड; चित्रातील विनोद समजावून सांगणं तर त्याहून अवघड. स्वतःच्या चित्राच्या बाबतीत तर जसजसा शब्दाच्या जंगलात जावं तसतसा गुंता अधिकाधिक वाढत जातो, आणि आपण स्वतः अधिकाधिक केविलवाणे होत जातो, असा माझा अनुभव. कारण, खऱ्या अर्थानं दृश्य असलेल्या विनोदाची जातच अशी आहे की, तो शब्दात पकडणं अशक्यच. आणि कितीही शब्द खर्ची घातले तरी संपूर्णपणे समजावणे अशक्य आहे.

शिवाय सर्वच विनोद सर्वांना समजेल असं नाहीच. कारण, विनोद समजण्यासाठी संवेदनाक्षम मन व विनोदबुद्धी यांच्याइतकीच पूर्वानुभवाची जरूर आहे. त्याच्या अभावी काही विनोद कळला तरी उपभोगता येणार नाहीत. उदा. मुंबईमधील लोकलगाड्यांमधील गर्दी, बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे व ऐन वेळी त्यांच्या प्लॅटफॉर्म बदलण्याच्या सवयीमुळे घडणारे विनोद, कोल्हापूर, नाशिक येथील वाचकांना पूर्णांशानं आकलन होणं कठीण आहे. हास्यचित्रातील विनोदाला आणखी एक फांदा असतो. चित्रातील विनोद केवळ चित्राच्या साहाय्याने समजून घेण्यासाठी वाचकाच्या मनाला काही पूर्वशिक्षणाची जरूर आहे, अन् आपल्याकडे अद्याप हे शिक्षण बव्हंशी वाचकांच्या बाबतीतल प्रथमावस्थेतच आहे. त्यामुळं विनोदी चित्राबाबत अनाकलनीयतेची तक्रार अधिक असते.

चित्रातील अपुऱ्या किंवा अक्षम अभिव्यक्तीमुळं ते अनाकलनीय ठरले तर तो चित्राचा दोष हे मला मान्य. पण एखादे चित्र जेव्हा काही व्यक्तींना समजते तेव्हा ते अनाकलनीय कसे, हे मला कळत नाही. माझ्या “खडा मारायचा झाला तर!” या पुस्तकावर लिहिताना एका समीक्षकानं म्हटलं होतं -- “कधी कधी हा विनोद फार सूक्ष्म होतो. त्यात ज्याला गम्य नाही त्याला तो विनोद आकलन होऊ शकत नाही. विनोद समजावून घ्यावा लागणं हा त्याचा पराभव आहे.” यावर मी त्यांना लिहिलेल्या खाजगी पत्रात म्हटलं होतं -- “इथे मी तुमच्याशी सहमत आहे; फक्त माझ्या दृष्टीने एवढाच फरक करतो की, हा पराभव वाचकाचा!” सर्वांना विनोद समजावा हे मान्य; पण सर्वांना समजणाराच विनोद निर्माण करावा असा आग्रह धरला तर नव्या नव्या वाटा कशा शोधल्या जाणार?

अनाकलनीयतेचे हे त्रांगडं एकंदरीत मला तरी अनाकलनीयच वाटत आलं आहे. एकदा मी वीणाच्या मुखपृष्ठासाठी अगदी साधी कल्पना, सर्वांना कळावी म्हणून काढली. आता कोणासही ती समजण्यास मुळीसुद्धा अडचण येऊ नये अशी आशा होती. चित्र प्रसिद्ध झाल्यावर एक गृहस्थ मला म्हणतात, -- “चित्राची कल्पना काही ध्यानात नाही आली.” मी चकितच झालो अन् म्हणालोः “त्यात काय अवघड आहे?” आणि कल्पना सांगितली. यावर ते म्हणतात, -- “ही तर माझ्या लक्षात आली होती. पण मी म्हटलं तुमचं चित्र अन् ते इतकं साधं कसं असणार? त्याची खोच दुसरीकडे कुठं तरी असणार, म्हणून मी ती शोधत राहिलो.”

तर हे असं आहे!

आपल्याकडील काही वाचक तर फारच अनभिज्ञ असतात. काही विचारतात, -- “ह्या चित्रांच्या कल्पना तुम्ही काढता की संपादक देतात?” (विनोदी लेखकाला असं कुणी विचारत असेल काय?) तर काहींना शंका येते, -- “ही चित्रं हातानं काढलीयत् की छापलेली आहेत?”

माझे एक साहित्यिक मित्र काही वर्षांपूर्वी माझी original चित्रे पाहून म्हणाले, “तुमची रेखाटणं उत्तम आहेत की. आता तुम्ही हळूहळू गंभीर कथाचित्रे व मुखपृष्ठांकडे वळायला हरकत नाही.” म्हणजे शिकाऊ शिंप्याला जसे सुरुवातीला बटणं लावायला किंवा कोट उसवायला देतात तशी व्यंगचित्रं काढायचा सराव झाल्यावर मग गंभीर चित्रं, अशी या गृहस्थाची भावना! व्यंगचित्रकला ही स्वतंत्र कला आहे याचा काही साहित्यिकांना सुद्धा जर पत्ता नाही तर सामान्य वाचकाचं काय!

काही वेळा माझे लेखकमित्र मला म्हणतात, ‘‘तुमचं एक बरं आहे. तुमच्या चित्रांना भाषेचं बंधन नाही. तेव्हा कोणत्याही भाषेतील मासिकात तुम्हांला प्रवेश आहे.’’ त्या बाबतीतला एक मजेशीर अनुभव सांगण्यासारखा आहे. काही दिवसांपूर्वी, मुंबईतील एका प्रकाशनसंस्थेकडून माझ्या हास्याचित्रांचं इंग्रजीतून पुस्तक काढण्यासाठी विचारणा झाली. तेव्हा श्री. श्री. पु. भागवत व मी दोघांनी माझ्या चित्रातील अमराठी माणसांना समजू शकतील अशी चित्रं निवडली. भागवतांच्या घरून परत येताना, वाटेत माझ्या ऑफिसमधील सिंधी सहकारी हिंगोराणी राहातो, त्याच्याकडे उतरून त्याला ती चित्रं दाखवून, त्याची प्रतिक्रिया काय होते पाहावे असा मी विचार केला. माझ्या चित्रांविषयी त्यानं ऐकलं होतं व आपल्याला एकदा तुझी चित्रं दाखव असं अनेक वेळा तो मला पूर्वी म्हणत असे. घरी त्यानं माझं उत्तम स्वागत केलं. माझ्या हातून निवडलेल्या चित्रांची वही त्यानं मागून घेतली. मधूनच उघडून पानं इकडे तिकडे चाळली. थोडी काही निरखून पाहिली. मग मला म्हणला, ‘‘ये तो तुमने अच्छा निकाला है. लेकिन उसका आयडिया हमको समझाओ ना.’’ मी समजलो. म्हणालो, ‘‘होय! केव्हा तरी एकदा ते करायचं आहे!’’

असे हे वाचक!

मी सुरुवातीला म्हटलं आहे की न हसणाऱ्या वाचकांना मी बिचकत नाही. त्यांच्या भेटीनं मला मनस्ताप वगैरे काहीच होत नाही. कारण, न हसणाऱ्या वाचकांप्रमाणेच हसणाराही वाचक मधून मधून भेटत असतोच. उलट, न हसणारे वाचक अधून मधून भेटतात तेव्हा ते जगातील माझ्या स्थानाची योग्य जाणीव माझ्या मनात कायम जागती ठेवून माझ्यावर मोठं ऋण निर्माण करीत असतात असंच मला वाटतं.

हे न भेटते तर जगातील एकंदर व्यवहारातील माझ्या स्थानाविषयी माझ्या मनात काय काय कल्पना होऊन बसल्या असत्या, कुणास ठाऊक!

जगातल्या स्थानाची जाणीव न हसणाऱ्या वाचकांनी जागृत ठेवली आहे, तर साहित्यातल्या माझ्या स्थानाची (येथे मला निव्वळ जागा, एवढाच अर्थ सुचवायचा आहे; ‘‘उच्च’’ ‘‘आगळे’’ इ. अर्थानं नव्हे) जाणीव सतत करून देणारा एकच न हसणारा वाचक ह्या जगात आहे. तो म्हणजे खुद्द मीच. एखादी कल्पना सहज सुचते तेव्हा केव्हातरी किंचित् हसू येत असले तर येते. (अनेक कल्पना गंभीर परिस्थितीतच सुचतात) परंतु नंतर ती कागदावर आणण्यासाठी धडपड सुरू होते तेव्हा, ती कल्पना कशी मांडावी, कोणत्या प्रसंगातून उभारणी करावी, चित्रांची रचना कशी करावी, रेषा कशी वापरावी, शब्दयोजना कशी व किती असावी, ह्या चक्रीवादळातून निभावून चित्र कागदावर उमटल्यानंतरसुद्धा चित्राचा ब्ल़ॉक चांगला होईल का, ब्लॉक चांगला झाला तरी चांगले छापले जाईल का, अन् हे सर्व झाल्यानंतर मूळ कल्पना योग्य तऱ्हेने व्यक्त झाली आहे का, इ. इ. विचारानी मन घेरले जाते अन् या जंजाळात हसू कोठल्याकोठे नाहीसे झालेले असते. अशा गंभीर घडामोडी मनात घडतात म्हणून तर काही निर्मिती होते. नाही तरी विनोदी प्रसंगाला मी केवळ हसत राहिलो असतो तर एकटाच हसत राहिलो असतो.

********

लेखक - वसंत सरवटे

अंक – ललित - दिवाळी १९६९

Google Key Words - Vasant Sarvate, Marathi Cartoonist, Caricature Artist, Lalit Diwali Ank.

विनोद , ललित

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.