मुंबईत आता काही दिवसांनी मान्सूनचं आगमन होईल. बदाबदा पाऊस पडत राहील. गाड्या उशिराने धावतील, पाणी साचेल, लोकांचा वैताग वाढेल, नालेसफाईचं राजकारण पुन्हा वर येईल पण मुंबईकर धावत राहील, आपण हे सगळं करून काय साध्य करतोय, त्याने काय मिळणार, ही धडपड खरंच इतकी गरजेची आहे याचा काहीही विचार न करता तो धावत राहील.
मुंबई तुम्हाला असंच गुंतवून ठेवते, विचार करायला वेळ देत नाही. एक दिवस ते शहर सोडावं लागतं आणि काळच थांबला की काय असं वाटतं. आज मुंबई सोडून बरोब्बर दोन वर्षं झाली. या दोन वर्षांत मुंबई सोडल्यावर कसं वाटलं हा प्रश्न मी स्वत:ला कधी विचारलाच नाही. कारण मुंबई शरीराने सुटली असली तरी तिची आठवण यावी असे प्रसंग रोज घडत असतात. माझ्या कामात मुंबई केंद्रस्थानी असते. त्यामुळे तिचा विसर पडणं सहजासहजी शक्य नाही.
मुंबई या शहरावर इतकं लिहून बोलून झालंय की मुंबईत न राहणाऱ्या माणसालाही मुंबईची चांगलीच ओळख होते. पण मुंबईची ओळख होणं तितकंसं सोपं नाही. त्यासाठी तिथे रहावं लागतं. नुसतं रहावं लागत नाही तर तिच्या प्रेमात पडावं लागतं. तिची जादू अनुभवायला तिच्याशी एकरुप व्हावं लागतं. एकदा ते झालं की मग ती आयुष्यभर तुमचा पिच्छा सोडत नाही. वरकरणी पाहता तिथे राहणं म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ सारखंच आहे.
दमट वातावरण, नजर जाईल तिथपर्यंत माणसं, एक विशिष्ट वास एक ना अनेक. तरी हे शहर अगदी विशेष आहे. पुलं म्हणतात तसं मुंबईला भूतकाळ ठाऊक नाही. मुंबईला फक्त वर्तमान आणि भविष्यकाळच माहिती आहे. त्यामुळे तिथलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं आणि विचार फक्त भविष्याचाच होतो. म्हणूनच की काय कदाचित मुंबईकडे मागे वळून पाहिलंच नव्हतं. मुंबईत कामानिमित्त आधी जायचो तेव्हा मला अजिबात आवडायची नाही. इथे यायची वेळ कधीच यायला नको अशी मी कायम प्रार्थना करायचो आणि शेवटी तिथेच यावं लागलं.
तिथे एक दोन महिन्यातच ती आपलीशी वाटू लागली. बाहेरून येणाऱ्या तमाम लोकांसारखं मुंबईने मला सामावून घेतलं. आमची लगेच मैत्री झाली आणि या शहराची सौंदर्यस्थळं लक्षात येऊ लागली. त्याला कारणीभूत होती इथली लोकं. कायम मदतीला धावून येणारी तरीही अलिप्त राहणारी. आसपासच्या लोकांना जज करणं, नको तितकी ढवळाढवळ करणं इथल्या संस्कृतीतच नाही. आयुष्यात कितीही संघर्ष असला तरी चेहरा हसरा ठेवणार. सुरू होऊन लगेच संपणाऱ्या घराला आपलंसं करणार
आजूबाजूती परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याला तोंड देणार. आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता तर इथल्या पाचवीला पुजली आहे. चार लोकांच्या कुटुंबाला 27 मजली घरं बांधणारे लोक आहेत तर 27 जणांसाठी एक संडास असणाऱ्या चाळीत राहणारे लोकही इथे आहेत. डबल सीट चित्रपटात मुक्ता बर्वे म्हणते तसं 19व्या मजल्यावर राहणाऱ्या घराचे दिवे रात्री झोपेच्या वेळी सत्ताड सुरू असतात आणि त्याच इमारतीच्या खाली राहणारे मजूर मात्र ढाराढूर झोपले असतात. ते अगदी खरं आहे.
स्वप्नं आणि मुंबई समानार्थी शब्द आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाची एक कथा आहे. तो किंवा ती पहिल्यांदा आली तेव्हाची कथा सांगताना ती व्यक्ती गुंगून जाते. लोकलचे धक्के, फसवणुकीचे प्रसंग, वडापावने दिलेला सहारा या टिपिकल स्टोऱ्या असतात. पण तरी त्या ऐकताना मजा येते. मी मुंबईत आलो ती चांगली नोकरी मिळाली म्हणून. इथे आल्यावर सगळ्यात आधी नजरेत भरला तो Professional attitude. मुंबईतले लोक काम आणि वेळेबाबत अतिशय काटेकोर आहेत. ते आत्मसात केलं तर त्याचा आयुष्यभर फायदा होतो.
उद्यमशीलता तर अगदी रक्तातच असते. पैसा कितीही कमी असला तरी त्या पैशात हौसमौज, सणवार कौटुंबिक जबाबदाऱ्यांची कसरत पार पाडताना लोक पाहिले. अशा अनेक कारणांमुळे मला वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर बरंच शिकायला मिळालं. असं असलं तरी मुंबईतले शेवटचे काही महिने फार कठीण होते. त्या काळात कलणारा प्रत्येक दिवस निराशेचा अंधार घेऊन येत असे. खूप प्रयत्न करूनही वाट दिसत नव्हती. शेवटी बीबीसीच्या नावाने आशेचा किरण डोकावला आणि आयुष्य पुन्हा योग्य मार्गावर आलं.
मुंबईत तीन वर्षं राहून मुंबई बरंच बघायचं राहिलं. वेळ हे त्यामागे एक कारण होतंच आणि अंतर खूप असल्याने जमलं नाही. मात्र तीन वर्षांत जी मुंबई दिसली ती सुंदर आणि रोमँटिक होती. मुंबईत आलो तेव्हा आमच्या लग्नाला चार महिने झाले होते. त्यामुळे वैवाहिक आयुष्याचा महत्त्वाचा काळही तिथे गेला. एकमेकांना कधी बोलून दाखवलं नसलं तरी त्या काळात आम्ही दोघांनी प्रचंड कष्ट केले.
आज मागे वळून पाहताना क्या ‘कोई नई बात नजर आती है हम मे’ असा प्रश्न जेव्हा स्वत:ला विचारतो तेव्हा स्वत:त झालेले खूप बदल प्रकर्षाने दिसतात. तीन वर्षांत मुंबईने आमच्या पारड्यात भरपूर काही घातलं. मुंबईच्या ऋणातून मुक्त होणं केवळ अशक्य आहे. 9 जून 2017 ला जेव्हा विमान दिल्लीकडे झेपावलं तेव्हा विमानाच्या खिडकीतून मुंबई जितकी डोळ्यात साठवता येईल तितकी साठवून घेतली. मनात तर ती कायमच साठली आहे.
**********
लेखक - श्री. रोहन नामजोशी
सोशल मिडीया
, अवांतर
, रोहन नामजोशी
, मुंबई
मंदार केळकर
4 वर्षांपूर्वीमुंबई ने अनेक गोष्टी शिकवल्या, मग त्या वानगी दाखल सांगायला हव्या होत्या नाही का? स्वताहात खूप बदल झाले, मग त्यातले एखाद दोन का सांगितले नाहीत.. बऱ्यापैकी स्मरणरंजनात्मक लिहिलंय
pradip.1966
6 वर्षांपूर्वीखुपच सुंदर लेख ......
[email protected]
6 वर्षांपूर्वीछान लिहिलंय ..तीन वर्षांत मुंबई येवढी प्रेमात पाडते हे नवलच !