मराठी शाळा - तगते आणि फोफावते सुद्धा ...


जून महिना हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठीही तसा कंटाळवाणाच असतो. शैक्षणिक वर्ष सुरू होतं. "शाळेचं रहाटगाडगं आता सुरू होणार आणि आपली वर्षभर त्यातून सुटका नाही" असं स्वतःला बजावून विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही मनाची तयारी करत असतात.

पण डोंबिवलीतल्या टिळकनगर बाल विद्या मंदिरात वेगळीच लगबग सुरू होती. विद्यार्थी मोठया आनंदानी शाळेत व्हरांड्यातून धावत होते आणि शिक्षक नवीन वर्गखोल्या सजवण्यात दंग होते. नवीन वर्गखोल्या, पंख्या-दिव्यांपासून फळे , प्रोजेक्टर आणि CCTV पर्यंत सर्व नवीन गोष्टी पाहून मुलं तर हरखून गेली होती.

अन्यत्र मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असताना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने आपल्या परिसराचा कायापालट केला आहे. २०१५ साली शाळेची १६ खोल्यांची इमारत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली आणि आज १७ जून २०१९ या दिवशी आणखी १४ खोल्यांची दुसरी इमारत विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. या दोन्ही इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर उजेड असणाऱ्या हवेशीर वर्गखोल्या, भरपूर संख्येत असलेली स्वच्छतागृहे, प्रशस्त व्हरांडा, सर्व वर्गखोल्यांमध्ये असलेली audio-visual, CCTV इत्यादी सुवीधा.

अर्थातच या सर्वांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला. खरंतर एक अनुदानित शाळा चालविताना महिन्याचं विजेचं बिल भरतानाच मेटाकुटीला यायला येत होतं. साठ वर्ष जुनी इमारत दुरुस्त करायलाही पैसे पुरे पडत नव्हते. या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने इतक्या मोठ्या खर्चाची तरतूद करायची हा एक यक्षप्रश्न कार्यकारी मंडळासमोर होता. परंतु मंडळाने समाजात जाऊन धनसंग्रहाचा विषय मांडायचा असं ठरवलं आणि न-भूतो असा प्रतिसाद मिळाला.

मंडळाचे सभासद, शाळेचे माजी विद्यार्थी, हितचिंतक, दानशूर व्यक्ती, कॉर्पोरेट कंपन्या अशी समाजातील सज्जनशक्ती ठामपणे पाठीशी उभी राहिली आणि सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या दोन इमारती दिमाखाने उभ्या राहिल्या. तुटपुंजी क्षमता असणाऱ्या आमच्या मंडळाचा हा जगन्नाथाचा रथ समजानेच ओढला. या कालावधीत खरोखरीच समाजातील विविध स्तरातल्या लोकांशी संपर्क आला आणि एखादया चांगल्या, समाजोपयोगी कार्यासाठी भगवंत समाजपुरुषाच्या रुपात कसा उभा राहतो याची प्रचिती आम्ही घेतली.

समाजपुरुषाचं हे ऋण कधीही न फिटणारं आहे आणि याबद्दल टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ कायम कृतज्ञ राहील. गेल्या सुमारे पासष्ट वर्षात शाळेने जे नाव कमावले आहे त्याचे प्रत्यंतरही या निमित्ताने आले. उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी कटिबद्ध असलेला शिक्षकवृंद आणि विविध अडचणीमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकारी मंडळ याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून गेली काही वर्षे सातत्याने दरवर्षी विद्यार्थी प्रवेशाची संख्या वाढते आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात, या एका शाळेत ४०३ नवीन प्रवेश करून एक विक्रम प्रस्थापित केला आणि आनंदाची बाब म्हणजे या वर्षी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ,मागील वर्षीपेक्षा जास्त प्रवेश होत आहेत. सर्वांनी संस्थेवर दाखविलेला हा विश्वास आम्ही वारंवार सार्थ करू असे नम्रपणे सांगावेसे वाटते.

**********

लेखक- आशीर्वाद बोंद्रे

कार्यवाह,  टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली


सोशल मिडीया , अवांतर , आशीर्वाद बोंद्रे

प्रतिक्रिया

  1. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    हे वाचुन अतिशय आनंद झाला टिळक नगर संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन

  2. Reewa

      6 वर्षांपूर्वी

    अशा प्रकारची शैक्षणिक चळवळ ही काळाची गरज आहे. आणि मुलांचं शिक्षण मातृभाषेत व्हावं, ही तळमळ असलेले पालक हीसुद्धा! अभिनंदन आणि धन्यवाद!

  3. श्याम केळकर

      6 वर्षांपूर्वी

    मी सहमत आहे.

  4.   6 वर्षांपूर्वी

    असे व्हायला हवे. तरच आपण महाराष्ट्र राज्य असे म्हणू शकतो.

  5. Shyam

      6 वर्षांपूर्वी

    असे व्हायला हवे. तरच आपण महाराष्ट्र राज्य असे म्हणू शकतो.

  6. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    चांगलं काम करण्याची ऊर्जा आणि मराठी टिकावं म्हणून लेख न लिहिता कृती करणे म्हणजे खरोखरच आजच्या काळात जगन्नाथ रथ ओढून आणणेच आहे. मराठी शाळांना कमी होत असताना हे काम करुन दाखवणे खरंच कमाल. सर्वांच्या जिद्दीला सलाम. अशी बुद्धी शासनाला आली आणि municipal school revive केल्या तर मराठी टक्का नक्की वाढेल. पण इच्छा शक्तीचा अभाव !!! काय करणार

  7. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    खरोखरच समाजाने अशा शाळा टिकवल्या पाहिजेत. लोकांच्या सहभागातून मोठी कामे होतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen