गाणाऱ्याचे पोर : राघवेंद्र भीमसेन जोशी


पंडितजींचं लहानपण , कलेसाठी घेतलेले कष्ट , गुरुंचा राग सहन करत केलेली संगीत साधना, मामेबहिणीशी झालेलं लग्न (सुनंदा कट्टी), आणि मग दोन मुलं झाल्यानंतर तिस-या मुलाच्या जन्मानंतर काहीच दिवसात पंडितजींनी शिष्येबरोबर (वत्सला मुधोळकर) केलेलं लग्न , मग काही दिवसांनंतर लपून छपून परत पहिल्या बायको-मुलांशी वाढवलेले संबंध, संसारात दुस-या बायकोचा आयुष्यभर वरचष्मा राहणं असे टप्पे आहेत.

या सगळ्या घटनाक्रमामुळे पहिल्या कुटुंबातल्या मुलांच्या वाट्याला आलेली अवहेलना , अपमान , कुचंबणा, ओढग्रस्तीची परिस्थिती याचं चित्रण पुस्तकात आहे. निर्मितीचा क्षण पकडणं‌ अवघड ,थकवणारं , बेभान करणारं असतं. कलेचा ध्यास माणसाला बाकी जगापासून वेगळं पाडतो. कलासक्त माणसाला व्यावहारिक जगाची फुटपट्टी लावून मोजणं शक्य नसतं. पण तरी एकदा का कुटुंब तयार झालं की प्रापंचिक जबाबदा-या येतात आणि त्या पारही पाडाव्या लागतात.

स्वत:च्या वडिलांची एक व्यक्ती , नवरा आणि बाप म्हणून चिकित्सा करणं खरं तर अवघड काम. त्या त्या वेळी जसे पटतील तसे निर्णय घेतले गेलेले असतात. पण अनुभवाने आपल्यापुरती काही मतं बनतात. ती लेखकाने मांडली आहेत. आईची परवड बघत लहानाचा मोठा होणं , पंडितजी मुलांच्या मुंजी ,लग्न , नातवंडांची बारशी अशा कार्यक्रमांना यायचे. तरीही या कुटुंबाचा कुठेही जाहीर उल्लेख न होणं, काहीही चूक नसताना‌ सतत अन्याय सोसावा लागणं यामुळे झालेली कडवट भावना कधीच दूर होत नाही.

या माणसावर आपला पहिला हक्क , अधिकार असूनही त्याच्याकडून थोड्या का होईना प्रेमाची याचना या कुटुंबाला आयुष्यभर करत रहावी लागते. आपल्या हक्काचं दुस-याच्या वाट्याला जाण्याचं वैषम्य वाटत राहतं. दुस-यांच्या मेहरबानीवर जगावं लागतं. पैसाअडका, इस्टेट जाऊ दे पण आपल्याला कलेच्या प्रांतात गती असतानाही इतक्या महान कलावंताकडून कलाही शिकायला मिळाली नाही याचं वैषम्य वाटत राहतं. त्यामुळे या पुस्तकात लेखकाचा कणसूर लागणं स्वाभाविकच वाटतं.

पुस्तकात एकदाच दुस-या पत्नीच्या नावाचा उल्लेख आहे. नंतर 'त्या', 'त्या घरी', 'त्यांच्याकडे' असे उल्लेख आहेत. त्यावरुनही दोन्ही कुटुंबातला दुरावा लक्षात येतो. वृद्धापकाळीही पंडितजींचे कसे हाल झाले ते वाचून वाईट वाटतं. आजारी वडिलांनाही लेखकाला भेटू दिलं जात नाही. त्यासाठीही भांडावं लागतं. आजूबाजूला असणारे लोक प्रसिद्वी आणि पैशासाठी उपयोग करुन घेणारे असले की काय होतं हे वाचून मन विषण्ण होतं.

कलेबाबत संवेदनशील असणा-या कलाकारांच्या हातून मोहापायी काही वेळा भावनेच्या भरात काही निर्णय घेतले जातात आणि त्याचा त्रास ज्यांचा काहीही दोष नाही अशा लहान मुलांना भोगावा लागतो. कलेच्या क्षेत्रात पूर्णत्व गाठलेला कलाकार माणूस म्हणून, वडील म्हणून सामान्य ठरु शकतो , प्रसंगी दुराव्याने वागू शकतो. कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिचे पाय मातीचेच असतात हे वाचताना जाणवतं.

पेपरमध्ये वेळोवेळी आलेल्या इस्टेटीच्या कोर्टकज्जाच्या बातम्या , दोन्ही कुटुंबातल्या लोकांच्या परस्परविरोधी मुलाखती , पंडितजींवर वेळोवेळी पेपरमध्ये आलेले लेख हे सगळं वाचून दोन्ही कुटुंबातली अस्वस्थता ज्यांना माहित आहे त्यांच्या दृष्टीने पुस्तकात नवीन असं काही नाही. हा सगळा त्याचाच विस्तार म्हणता येईल.

पुस्तकात साधी सोपी भाषा आहे मित्राला मनातलं सांगितल्यासारखी. घटनाक्रमात तोचतोचपणा जाणवतो. सांगितीक कारकीर्दीबद्दल कमी लिहिलं आहे. एकूणात एकदा वाचायला हरकत नाही.

**********

लेखिका- माधवी शहाडे   


सोशल मिडीया , पुस्तक परिचय

प्रतिक्रिया

  1. avinashjee

      6 वर्षांपूर्वी

    लेख छान !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen