लक्ष्मीची पावलं
***
बराचवेळ ओवी पलंगावर पडून होती. काहीवेळाने तिला झोप लागली. एक दोन तासानंतर ती अचानक दचकून जागी झाली तेव्हा सगळीकडे निजानिज झाली होती. तिने मोबाईल उघडला तेव्हा शार्दूलचे आठ मिस कॉल आणि पंधरा मेसेज दिसले. तिने शार्दूलला फोन लावला. पूर्ण रिंग वाजण्याआधीच त्याने तो उचलला.
“कुठे होतीस तू? किती फोन करतोय मी तुला”
“अरे डोळा लागला होता.” ओवी जांभयी देत उत्तरली.
“काय गं? तब्येत वगैरे बरी आहे ना?”
“हो रे. बरी आहे. खूप थकवा आलाय आणि खूप टेन्शन आलंय.”
“वेडाबाई टेन्शन कसलं घेताय एवढं. फक्त घरी यायचंय.”
“हे फक्त घरी येणं नाही. त्याला किती बाजू आहेत हे कळतंय का तुला?”
“अगं ते काही समाजशास्त्र आहे का त्याला अनेक बाजू असायला? ते फक्त शास्त्र आहे"असं म्हणून तो स्वत:च हसायला लागला. ओवी काहीच बोलली नाही.
“हे बघ मला असं वाटतं की आत्ता ही बोलायची योग्य वेळ नाही. उद्या सकाळी मला एक तास वेळ आहे. नंतर गौरीची गडबड आहे. आपण भेटू आणि बोलू.”
ओवीने फोन ठेवला तेव्हा तिच्या डोळ्यातली झोप पूर्णपणे उडाली होती. खोलीत तसाच अंधार ठेवून ती बाल्कनीत गेली. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. आपल्याला नक्की कशाचं टेन्शन आलंय याचा शोध घेण्याचा तिने प्रयत्न केला. असं स्वत:शी बोलून प्रश्न सोडवण्याची तिला सवय होती. स्वत: जमलं नाही तर शार्दूलला गाठायचं हा तिचा शिरस्ता होता. आता खरंतर शार्दूल हाच प्रश्न होता. अगदी अर्थाअर्थी प्रश्न नसला तरी या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. खरंतर प्रश्न काय आहे हेच तिला कळलं नव्हतं. ....
बारावीच्या निकालानंतर एकदा ती अशीच अस्वस्थ झाली होती. बारावीनंतर इंजिनिअरिंगला जावं अशी तिच्या घरच्यांची इच्छा होती. पण ओवीला समाजशास्त्रात संशोधन करायचं होतं. आजुबाजुचा समाज, त्यांची सुखं दु:खं चालीरिती, पद्धती या गोष्टीत तिला प्रचंड रस होता. इंजिनिअरिंग तिला म्हणूनच नको होतं. तेव्हा पालकांसमोर आपली बाजू कशी मांडावी हे उत्तमरित्या शार्दूलने तिला सांगितलं होतं. या वयातही याच्यात इतकी मॅच्युरिटी कशी आहे याचं तिला तेव्हा आणि वेळोवेळी आश्चर्य वाटायचं.
खरंतर त्या प्रसंगापासूनच ओवीचं मन शार्दूलकडे ओढ घ्यायला लागलं. एकत्र शिकत असताना दोघं एकमेकांना भेटायचे. पण बारावीनंतर मार्ग वेगळे झाले तेव्हापासून त्यांना एकमेकांविषयी जास्त ओढ वाटायला लागली. त्यांचं भेटणं कमी झालं नव्हतं तरी सहवास कमी झाला नव्हता. कॉलेजच्या काळात दोघंही खूप काही काही शिकले. शार्दूल अभ्यासाबरोबर नाटकं, CAT चा अभ्यास असं बरंच काहीकाही करत होता. ...
यावर्षीच्या १४ फेब्रुवारीला ती दोघं झेड ब्रिज वर टाईमपास करत उभे होते. आजुबाजुच्या युगुलांच्या प्रेमाला बहर आला होता. ती दोघं त्या सगळ्यांकडे पाहून हसत होती. तेवढ्यात शार्दूलने तिला विचारलं.
“ओवी हे किती छोटं आणि छान नाव आहे ना?”
“हो आत्याने ठेवलंय.”
“लग्नानंतर नाव बदलण्याबद्दल तुझं काय मत आहे?”
“शट अप.... तू माझं नाव अजिबात बदलायचं नाहीस.”
ओवी एकदम बोलून गेली आणि शांत झाली. आपण काय बोलून गेलो तिचं तिलाच कळलं नाही. शार्दूल काहीच बोलला नाही. मग म्हणाला,
“मी ..... तर असं काहीच म्हटलं नाही. तुला का असं वाटलं?”
त्या क्षणाला ओवी सगळ्यात सुंदर लाजली होती. तो क्षण कॅमेऱ्यात का टिपला नाही याची रुखरुख शार्दूलला आजही लागून आहे. थोडक्या शब्दात 'शब्दापलीकडचं' दोघांनाही कळलं होतं. ... दुसऱ्या दिवशी सकाळी शार्दूल आणि ओवी गुडलक मध्ये भेटले. गुडलकच्या पायऱ्या त्यांच्या अगदी आवडीच्या होत्या. तिथे बसून त्यांनी कितीतरी चर्चा केल्या होत्या. आजही तिथे ते बसले होते.
“यार शार्दूल आपण इतके मोठे कधी झालो? लग्नबिग्न, सूनबिन माझ्या पोटात जाम खड्डा पडलाय रे.”
“शेवटी किती दिवस सारसबागची मटकी उसळ आणि चॉकलेट सँडविच खाणार ना. कधीतरी मोठं व्हावंच लागेल की.” शार्दूल उत्तरला.
“पण तरीही बघ ना. जेव्हापासून मला कळलंय की मला तुझ्या घरी यायचंय आहे, मला सगळंच वेगळं दिसायला लागलंय रे. काकू, काका, तुझं घर, श्लोक (शार्दूलचा भाऊ) सगळे वेगळे भासताहेत. नात्याचं नाव बदललं की किती गोष्टी बदलतात. आत्ता तर ही सुरुवात आहे.पुढे किती काय काय होईल.आपण हे सगळं कसं फेस करणार? म्हणजे असं बघ आतापर्यंत आपण एकमेकांसाठी होतो म्हणजे आहोत. आता आपल्या विश्वात कितीतरी माणसं येतील. किती गुंतागुंत होईल. म्हणजे त्याची मजाही आहेच तशी पण...”
“मी त्या दिवशी तुझ्या घरी आलो तेव्हा मलाही असंच काहीसं वाटलं. आरती, अथर्वशीर्ष म्हणताना एखादा शब्द जरी चुकला तरी लोक मला जज करणार याची मला कल्पना होती. त्यादिवशी घरात गणपती बसला तेव्हा आजचा दिवस छान जाऊ दे इतकीच प्रार्थना मी त्याच्याकडे केली होती.”
“मुलींना जज करण्यासाठी किती छोट्या गोष्टी पुरतात हे तुला माहितीये ना? पहिल्यांदा सासरी पंगतीत वाढताना आर्या ताईला मीठ आणि लिंबू बरोबर वाढता आलं नाही म्हणून तिची सासू अजूनही तिला ऐकवते. मलाही उद्या सगळ्या बायका असंच पाहतील. त्यात दोन माणसं प्रेमात असले की ते सोडून सगळ्यांना लगेच कळतं. कितीही आव आणला तरी ते लपत नाही.”
शार्दूलने तिचा हात आपल्या हातात घेतला.
“शांत हो. खरंच शांत हो. आपण पहिल्यांदा सारसबागेत भेटलो तेव्हा आपल्याला माहिती होतं का की आज आपण असं काहीतरी बोलू? तरी मधले दिवस किती छान गेले. थोडे बेफिकीर होते तरी सगळ्या परिस्थितीत आपण एकमेकांना सांभाळून घेतलं, कचाकचा भांडलो, पुन्हा एकत्र आलो. भरपूर मजाही केली. आता आज गौरी येताहेत. उद्या तू घराची लक्ष्मी म्हणून येशील. हे अगदी Symbolic आहे तरी आहेच ना तसं.उद्या आपल्या नात्याचा पुढचा टप्पा सुरू होईल.ही तरी किती छान गोष्ट आहे.”
शार्दूलच्या मिठीत त्या दिवशी तिला पुन्हा एकदा 'विश्वाचं रहस्य उलगडलं.' संध्याकाळी रांगोळीच्या साच्यातून लक्ष्मीची पडणारी पावलं शार्दूल पहिल्यांदाच इतकी न्याहाळून पाहात होता.
(क्रमश:)
**********
लेखक - रोहन नामजोशी
भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ४
निवडक सोशल मिडीया
रोहन नामजोशी
2021-09-10 10:00:02
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीएखाद्या ओल्या संध्याकाळी बकुळीची फुलं वेचतोय असं वाटलं...मस्त...