वडाच्या झाडापाशी कौमुदी


एखादं गाणं विविध गायकांनी कसं गायलं असतं याचं सादरीकरण आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. मात्र एक समान रचना विविध लेखकांनी कशी सादर केली असती याची अनुभूती आपल्याला क्वचित लाभते. त्यादृष्टीने हा खटाटोप. इथे एका वाक्यात एक घटना नमूद केलीय. या एकपंक्तीय घटनेची मांडणी विविध साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या नि कल्पनाविलासाच्या आधारे कशी केली असती याचे हे प्रकटन.  

"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." – हे ते वाक्य !

व्यंकटेश माडगूळकर –   ती वैशाखातली रणरणती दुपार होती. गावाबाहेरल्या माळावरच्या जुन्या वडाखाली उभ्या असलेल्या कौमुदीचे चित्त कशातच लागत होते. वारं पिऊन तर्राट झालेलं ते झाड कोष्ट्याच्या माळावरून पालथ्या घागरीसारखं दिसायचे. आजूबाजूला भरड मुरमाची जमीन अन डाव्या अंगाला असणाऱ्या पाझर तलावावरून येणारी गार हवा यामुळे त्या डेरेदार सावलीच्या झाडाखाली कुणीही आलं की त्याला पेंगुळल्यागत व्हायचे. आसपासच्या माळावर गुरं चरायला आणणारे गुराखी दुपारची भाकरी खायला तिथंच यायचे पण आज गावात जत्रा असल्याने कुणी तिथं येणार नाही याची खात्री असल्याने कौमुदी तिथं बिनघोर थांबली होती. दुपारची गरम हवा सरत आली तरी सुजित अजून आला नव्हता त्यामुळे तिला जरा चिंता वाटत होती. दावणीचा दोर ओढून रोजच्या सवयीने तिथं आलेली एक अवचिंदी जाफराबादी म्हैस अन तिच्या मागोमाग शेपूट हलवत आलेले मरतुकडे काळे कुत्रे वगळता भवताली कुणीच नव्हते. मधूनच आभाळात उडणारा भोरडयांचा थवा अन वाऱ्यावर डुलणारी गवताची पाती इतकीच काय ती हालचाल होत होती. दिस जाता जात नव्हता अन डोईवरची उजेडाची उतळी घेऊन सूर्यनारायण मावळतीकडे रवाना झाला. बाभळीच्या बांधावरून दिसणारा काळा ठिपका मोठा होत गेला, तिचं लक्ष तिकडंच होतं. तो सुजितच होता !

वसंत आबाजी डहाके –   चैत्र आणि वैशाखाच्या मध्यावरचे दिवस होते. सकाळी कोवळी वाटणारी ऊन्हं दुपारच्या प्रहरी रखरखीत झाली होती. दुपारी गाव आस्तेकदम सुस्त होत जायचा, आताही गावाच्या शीवेमधील सगळी शेतशिवारे धीम्या लयीत सुस्कारे टाकत होती. गुराख्यासोबत गेलेली गुरे सावलीच्या शोधात निघाली होती. भाकड गायी बांधावरल्या बाभळीच्या झिरझिऱ्या सावलीत रवंथ करत होत्या. चिंचपट्टीवरच्या झाडांमधली पक्षांची लगबग पुरती थांबली होती. गुंजपत्त्यांची नक्षी काढावी तसा चिंचेचा पाला मातीवर पडून होता. सगळ्या चराचरात एक अद्भुत शिथिलता दाटून आली होती. दूर पाझर तलावापाशी असणाऱ्या एकुरक्याच्या माळावर एक लालपिवळा ठिपका लांबूनही दिसत होता. ती कौमुदी होती. हिरव्यागार वडाखाली उभी असल्याने तिचं अस्तित्व तिथे अजूनच नजरेत भरत होतं. त्या निर्जन माळावरचं तिचं असं अवेळी थांबणं कोड्यात टाकणारं होतं. हिरव्यापिवळ्या टोकदार पानांच्या जथ्थ्यात तो वटवृक्ष लगडून गेला होता. एकमेकाच्या खांद्यावर हात गुंफलेल्या त्याच्या चॉकलेटी करडया फांद्या आणि त्यांना लटकणाऱ्या लुसलुशीत कोवळ्या डहाळया खुलून दिसत होत्या. हात लोंबते ठेवून उभ्या असलेल्या विरक्त योग्यासारखा तो घनदाट वटवृक्ष निश्चल उभा होता. त्याच्या सावलीत उभी असणारी कमलनयनी आरसपानी कौमुदी सुजीतच्या प्रतिक्षेत पुरती आरक्त झाली होती. तिच्या कमनीय देहाच्या गारुडात आसमंत रंगून गेला होता. झाडांवरची पाखरे तिला आपल्या डोळ्यात साठवत जागेवर थिजून गेली होती. ओठांच्या पाकळ्या मधुनच उघडत ती हलकेच सुस्कारे सोडत होती. दुपारपासून तिचे मन पुरते अधीर होऊन सुजीतची वाट बघत होते. तासकाटा जसा पुढे सरकत गेला तशी तिच्या श्वासाची धडधड वाढतच राहिली, तांबूस प्रकाशाची पखरण करत सूर्यगोल पश्चिमतटास गेला. त्याच क्षणी अंगी गोधुळ घेऊन फिरणारा पवनसखा सुजितची चाहूल घेऊन तिच्या कानात कुजबुजला तेंव्हा तिच्या सर्वांगावर रोमांच उठले. खूप वेळापासून रोखून धरलेले अश्रूंचे दोन थेंब तिच्या डोळ्यातून ओघळले, तिने ते हलकेच टिपून घेतले. आज बोललेच पाहिजे हा निश्चय पक्का करत ती त्याच्या दिशेने निघाली..

वि. स. खांडेकर-   तप्त सूर्यगोलाची चकाकती दिव्य किरणे आपल्या कोमल तनुवर आनंदाने झेलत कौमुदी विस्तीर्ण वटवृक्षाखाली न उभारता उन्हात उभी होती. जणू ती अग्निपरीक्षा देत होती. जीवनात सदैव सन्मार्गाच्या काटेरी वाटेवरून आपल्या मखमली पावलांनी विनासायास चालत जाणाऱ्या वैदेहीला जे चुकले नाही ते आपल्याला कसे चुकेल असा उदात्त हेतू मनी धरून ती उभी होती. ऊनसावल्यांचे नितळ कवडसे तिला न्याहाळताना खुदकन हसत होते. अखेर तिच्या जिद्दीपुढे रविकिरणे ओशाळून गेली. घटप्रभेच्या झिरमिळ्या प्रवाहाचे पाणी तांबूस झाले तेंव्हा तिच्या ध्यानी आले की उन्हे कललीत, आता भास्कर क्षितिजाच्या कुशीत विसावेल. या विचारासरशी तिच्या मनातली घालमेल वाढत गेली, तिने त्या विश्वनिहंत्याचा धावा सुरु केला आणि निमिषार्धात तिला दुरून येणाऱ्या सुजितची चाहूल लागली. त्याबरोबर तिच्या हृदयात आनंदाचे कारंजे थुईथुई नाचू लागले.......

जी. ए. कुलकर्णी -   उदास वटवृक्षाच्या लांबत चाललेल्या कभिन्न सावल्या हळूहळू मोठ्या होत होत्या. चिंतेच्या गर्द काजळडोहात आस्ते कदम रुतत चाललेल्या कौमुदीचा धीर सुटत चालला होता. निर्जन वनराईतून वाहत येणारा वारा रानभूल झाल्यागत तिच्याभोवती पिंगा घालत होता. पानांची सळसळ बेचैनीत भर घालत होती. वाऱ्यावर हळुवार डोलणाऱ्या करडया रंगाच्या पारंब्यात तिचे मनच दोलायमान होऊन गेले होते. अंगाला कंप सुटला होता, ओठ कोरडे पडत चालले होते. दुपारी भेटण्याचा शब्द देणारा सुजीत आपल्याला फसवत तर नसेल ना या विचाराने तिचे काळीज वेगाने धडधडत होते. दूर कुठे तरी 'टिट्टी विटीव टीव'चा आवाज करत टिटव्या ओरडत होत्या, त्या आवाजाने तिला अकारण घाबरल्यासारखे होत होते. हातातल्या पर्सला घट्ट आवळून उभ्या असलेल्या कौमुदीच्या डोळ्यातील बुब्बुळांचे लोलक तिच्या प्रतिक्षेमुळे फुटतील की काय असे वाटत होते आणि इतक्यात तिला दुरून येणारा सुजित दिसला. नि मग हायसे वाटले.

ग्रेस -   पेंगूळलेल्या पायांनी विमनस्क दुपार पुढे सरकत होती. जरठ साधूच्या चिंबटलेल्या शुष्क जटा जमिनीशी लगट करत असाव्यात तशा घुम्या वटवृक्षाच्या तटतटलेल्या पारंब्या मातीला स्पर्शत होत्या. खिन्न बिलोरी डोळ्यांत अल्वार आसमंत विरघळवत उभ्या असलेल्या कौमुदीच्या केसांत माळलेल्या गंधवेडया मोगऱ्याचा आवेश हलकेच तिच्या तलम केसांत उतरत होता. रानातला सैरभैर झालेला वारा तिच्यापाशी येताच थबकत होता. तिच्या अस्तित्वाचा पुरता आनंद घेऊन गवताच्या पात्यात सूर घेत होता. वळणावळणाच्या वाटेवरची कोवळी दगडफुले दुरूनच मान वेळावून कौमुदीकडे पाहून लाजेने चूर होत होती. गायीच्या डोळ्यातला पाझर घेऊन निळाईच्या रंगात बुडालेला ओसाड माळ तिच्याकडे टक्क पाहत होता. काळाचे काटे ओघळत गेले अन कलत्या सूर्याने कौमुदीकडे डोळे भरून पाहिले, त्याचा रक्तिमा नभात झिरपत गेला. त्याचवेळी लवलवत्या सुर्यबिंबापुढे सुजितची प्रतिमा अवतीर्ण झाली आणि कौमुदीच्या मनाला रंगउधाण आले....

व.पु. काळे -   प्रेमाच्या नात्याची उकल करताना कौमुदी स्वतःच त्यात गुंतत गेली होती, आपल्या आयुष्याचा गुंता आपणच केलाय याची जाणीव तिला कासावीस करून गेली. विश्वास आणि प्रेम ही एका गाडीची दोन चाके आहेत, एक जरी निखळून पडले तरी गाडी जागेवर थांबते याची तिला पुरती जाणीव होती. सुजीत चांगल्या विचारांचा सुसंस्कारीत तरुण आहे तो आपल्याला फसवणार नाही. शिवाय आपणही त्याला पारखून घेतलेले आहे. आपली निवड चुकणार नाही, हंसाने दाणे तृण अन कावळ्याने मोती निवडले असं आपल्या बाबतीत होणार नाही. सुजीतसोबत घालवलेले क्षण मर्मबंधाची ठेव म्हणून हृदयाच्या कप्प्यात जतन करूनही जगणं शक्य आहे पण विरहाच्या, विश्वासघाताच्या धक्क्यात स्वतःला सावरणं कठीण जाणार आहे याची तिला जाणीव होती. तिचं मन कसं फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखांसारखं नाजूक होतं अन स्फटिकासारखं नितळ होतं, तिच्या मनात जरी डोकावलं तरी लक्ष काजव्यांचे प्रकाशवृक्ष पाहणाऱ्याच्या अंतःकरणात प्रदीप्त होत ! सुजीतच्या प्रतिक्षेत हातातील गुलाबाच्या एकेक पाकळ्या हळुवार तोडता तोडता आता देठ आणि काटे उरले होते, रस्त्याकडे नजर लावून गुंग झालेल्या कौमुदीचे बोट गुलाबाच्या काट्यावर जायचा अवकाश की दुरून येणाऱ्या सुजितने तिला आवाज दिला, " कौमुदी ! मी आलोय !'...काटा रुतता रुतता राहिला !!

रत्नाकर मतकरी -   रोरावणाऱ्या वाऱ्याच्या रुद्रध्वनीत आपला आवाज मिसळत सुजितने दुरूनच कौमुदीला आवाज दिला आणि सुजितला पाहून कौमुदीच्या अंगावर सर्रकन काटाच आला. सूर्य माथ्यावर आल्यापासून कौमुदी त्या विशाल वडाच्या झाडाखाली उभी होती. त्यानंतर दोनेक तासात सुजित तिथं आला होता. आल्यापासून तो विक्षिप्त वागत होता, त्याच्या बोलण्यात विसंगती होती, देहबोलीत चैतन्य नव्हते. काही तरी हरवल्यागत विचित्र अवस्थेत तो तिच्याशी जेमतेम काही मिनिटं बोलून अचानक काहीतरी आठवल्यागत एकाएकी निघून गेला होता. आता समोर दिसणाऱ्या सुजितच्या अंगावरचे कपडे आणि काही वेळापूर्वी येऊन गेलेल्या सुजितचे कपडे वेगळे होते. आताचा सुजित असेल तर मघाशी भेटून गेलेला तो कोण असावा या भीतीने तिच्या मस्तकात जणू खिळेच ठोकले. एकाएकी त्या अजस्त्र वडाच्या झाडावरून शेकडो वटवाघळे पंख फडफडवत उडाली. जीर्ण मळकट पारंब्यांनी कडकड आवाज करत जणू तिच्या गळ्याला विळखाच घातला. अस्ताव्यस्त पसरलेल्या बुंध्याच्या ढोलीतून विचित्र चित्कार कानी आले आकाशात वीजा कडाडल्या आणि ती तत्काळ तिथून सुजितच्या दिशेने धावत गेली. त्याच्या बाहूत विसावताना भासातली भेसूरता ती विसरून गेली होती .....

मारुती चितमपल्ली -   निलगायींचा रवंथ करत जाणारा संथ कळप हलकेच मार्गस्थ होत जावा तशी दुपार संथपणे पुढे सरकत होती. घटप्रभेचे पाणी आटून नदीपात्रात करडे पिवळे मातकट डोह तयार झाले होते. दुपार टळण्याची वेळ होत आल्याने सांबरांचा एक कळप धूळ उडवत त्यातल्याच एका डोहापाशी दाखल झाला. सांबरांनी पाण्यात तोंड घालताच शांत पाण्याची तंद्री मोडली अन त्यात लक्ष तरंग उठले. असेच विचारतरंग घटप्रभेच्या काठापासून दूर असणाऱ्या डेरेदार वटवृक्षाखाली उभ्या कौमुदीच्या मनात उठले होते. तिच्या मस्तकातल्या बाराशिंग्याने धुमाकूळ घातला होता, अनेक शंका कुशंकांनी बेजार होऊन तो नुसताच धडक्या देत होता. मस्तवाल खूर मातीत घासून विचारांचा धुरळा उडवत होता. वडाच्या फांद्यांच्या बेचक्यात दोन चार घरटी होती, त्यातली नवजात पिले माना बाहेर काढून तिच्याकडे टकमका बघत होती. बुंध्यावरून ओघळत आलेल्या डिंकाला मुंगळे लागावेत तसे तिचे झाले होते. भुंग्याने फांदी टोकरत आत खोल घुसावे तशी भीती तिच्या मेंदूला पोखरत होती. सुजित आला की त्याच्या अंगावर वाघिणीसारखी झेपच घ्यायची असं मनोमन ठरवून ती उभी होती. मावळतीला तांबडफुटी व्हायला अन सुजीत यायला एकच गाठ पडली. मात्र तो दिसताच बगळ्याने मान वेळावून बसावे तशी ती लाजून मान वेळावून बघत राहिली.. मायमराठीला समृद्ध करण्यात अनेक सारस्वतांचे मोलाचे योगदान लाभले आहे. यातील प्रत्येकाची लेखनशैली भिन्न होती. यापैकीच काही दिग्गज साहित्यिकांच्या शैलीचे मला जे आकलन झाले त्यानुरूप लेखन करण्याचा हा छोटासा प्रयत्न. काही चुकले असल्यास रसिक वाचकांनी सांभाळून घ्यावे.

लेखक - समीर गायकवाड  

लेखकाच्या या ब्लॉगला जरूर भेट द्या - https://sameerbapu.blogspot.com/



प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    कल्पना आवडली.. मांडणी देखील उत्तम आहे.. प्रत्येक लेखकाची शैली छान उतरली आहे..

  2. Jayashree Gokhale

      4 वर्षांपूर्वी

    वा लेखकाने प्रत्येकाची खासियत नेमकेपणाने दाखविली आहे.आवडली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen