आज मी एका यशस्वी शेतकऱ्याबद्दल सांगणार आहे. “यशस्वी म्हणजे मोठ्या जमिनीचा मालक असणार!” ...नाही हो फक्त चार एकरात केलेल्या शेतीबद्दल सांगतोय. “चार एकर? म्हणजे नक्कीच नवे तंत्रज्ञान, ग्रीन हाउस वगैरे बद्दल सांगणार असाल” ...नाही हो, अगदी पारंपारिक शेती करणारा आहे. “मग निदान उत्पादन तरी ‘एक्झॉटिक व्हेजिटेबल’ किंवा ‘विलायती महाग फुलांची शेती’ करत असणार!” साधारणपणे यशस्वी शेतकरी म्हटले रे म्हटले की लोकांची अपेक्षा असते की वर उल्लेखलेले काहीतरी ‘स्पेशल’ असणार. हो स्पेशल तर आहेच पण ते उत्पादन काही विशेष नेत्रदीपक वगैरे नाही. म्हटले तर साधारण १५ रुपये किलोने विकलेल्या खरबूजाची शेती करणारा तरुण आहे. पण साध्या साध्या उत्पादनातही कसे चांगले पैसे मिळू शकतात, आणि चांगले म्हणजे तर लक्षावधी पैसे मिळू शकतात त्याचे उत्तम उदहरण आहे. “कोण आहे हा शेतकरी? काय केले तरी काय त्याने नेमके? ...सांगतो! शेतकऱ्याचे नाव खेताजी सोलंकी, वय ४१, गाव ‘चंदाजी गोलिया’, जिल्हा बनासकाठा, गुजरात. हे गाव तसं छोटं, जेमतेम १००० लोकवस्तीचे. खेताजी यांना लहानपासून नव्यानव्या गोष्टी शिकायची हौस. अभ्यासात चांगली प्रगती असूनही त्यांना घरच्या गरिबीमुळे शाळा सोडावी लागली. त्यांचे वडील त्यांच्या शेतात बटाटे, बाजरी, भुईमूग अशी पारंपारिक पिके काढत. त्या पिकात त्यांचे घर खाऊन पिउन मजेत होते. पण ह्या पिकांना प्रत्येक वेळी चांगले भाव मिळत नसत. त्यामुळे एखाद्या वर्षी पैसे अपुरे मिळून नुकसानही व्हायचे. नव्या गोष्टी शिकण्याची हौस असणाऱ्या खेताजीने आपल्या शेतातील उत्पन्न खुल्या बाजारात विकण्याचे प्रयत्न केले. शेतीमाल निर्यात करायचा प्रयत्न केला, निर्यात परवाना काढला.
ह्या सगळ्या धडपडीत शेतीसंबंधीत अनेक लोकांशी त्याची ओळख झाली, मैत्री झाली. अशाच एका कार्यक्रमात खेताजी ‘इफ्को’ नावाच्या सहकारी खत कारखान्याचे एक वरिष्ठ अधिकारी के सी पटेल यांना भेटले. पटेल सरांनी त्यांना सांगितले की एकच पीक सतत पैसे देईल असे होत नाही. चक्रीय पद्धतीने भावांचे चढ उतार सुरु असतात. चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी पीक पद्धतीत प्रयोग करावे लागतात. त्याच चर्चेत त्यांनी खरबूज हे तुलनेने कमी अवधीत होणारे व चांगले पैसे देणारे पीक असू शकते असा सल्ला दिला. मग खेताजीने सर्व अभ्यास करून, ठिबक सिंचन, सौर पंप, सबसिडी वगैरे सर्व माहिती मिळवून आपले चार एकराचे क्षेत्र लागवडीसाठी तयार केले. आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये खरबुजाचे बियाणे पेरले. खरबूज घेण्याचा प्रयोग त्या गावात पहिल्यांदाच होत होता त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. आधी जमिनीच्या छोट्या तुकड्यात करून बघ वगैरे सांगितले. पण खेताजीचा निश्चय अढळ होता. जर ते निर्यात करायचे असेल तर ते छोट्या प्रमाणात घेऊन उपयोगी ठरणार नाही हे त्यांना पक्के माहीत होते. त्यांनी धाडस करून व नंतर खूप मेहनत करून पूर्ण चार एकरांवर खरबूज घेतले. दहा आठवड्यात म्हणजे ७० दिवसात १४० टन खरबूज इतके बम्पर पीक आले. कश्मीर येथील एका फळाच्या व्यापाऱ्याने ते सगळे एकरकमी विकत घेतले. ह्या व्यवहारात त्यांना नगद मिळाले रुपये २१ लाख. सगळा खर्च वजा जाता खेताजीला फायदा मिळाला रुपये १९ लाख वा अधिक! आज बनासकाठा जिल्ह्यात खेताजीची खरबूज शेती हा चर्चेचा विषय झाला आहे. हे पीक घेताना खेताजीने योजलेले उपाय व घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. एक तर सतत स्वत: नव्या नव्या गोष्टी शिकायचा ध्यास घेणे. त्यामुळे पारंपारिक शेती व्यतिरिक्तचा हा मार्ग त्यांना सापडला. सौरपंप, ठिबक सिंचन वगैरे आधुनिक गोष्टींचा त्यांनी अवलंब केला व त्यासाठी असणाऱ्या सरकारी योजनांची, सबसिडी वगैरे गोष्टींची त्यांनी पुरेपूर मदत घेतली. आणखी एक गोष्ट म्हणजे टाईमिंग. त्यांनी अभ्यास करून हा निर्णय घेतला की साधारण हवेचे तापमान ४० अंश सेल्सियस होते त्या सुमारास आपले पीक तयार पाहिजे. म्हणजे त्याला उत्तम भाव येतो. त्या टाईमिंग मुळे त्यांना त्या मोसमातील सर्वात चांगला भाव मिळाला. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारात स्वस्त बियाणे उपलब्ध असूनही त्यांनी उत्तम प्रतीचे बियाणे खरेदी केले. ज्याचाही चांगला परिणाम चांगले फळ मिळण्यात झाला. पारंपारिक खते व कीटकनाशके यांचा उपयोग त्यांनी केला त्यासाठी भरपूर प्रयोग केले. उदा: शेण, गोमुत्र, नीम अशा सहज मिळणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा त्यांनी पुरेपूर वापर केला ज्यामुळे फळाची गुणवत्ता सुधारली. आणि शेवटचे पण महत्वाचे, त्यांनी मार्केटिंग साठी इन्टरनेट, सरकारी कृषी विभागाची हेल्पलाईन अशा गोष्टींचा उपयोग करून घेतला. खेताजीचे हे उदाहरण म्हणजे कमी जमिनीत पण नीट अभ्यास करून केलेली शेती कशी फलदायी ठरते ह्याचा आदर्श आहे. लेखक-हिरण्य सूर्यवंशी; साभार- MH +Ve
एक यशस्वी लक्षाधीश शेतकरी
निवडक सोशल मिडीया
हिरण्य सूर्यवंशी
2021-05-28 11:00:02

प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

कला-साधना 'राजमान्य' होते
अज्ञात | 3 दिवसांपूर्वी
काव्याचा निष्ठावंत अभ्यासक म्हणून डे प्रसिद्ध आहेत.
गांधीजी आणि पितृत्व
प्रभाकर दिवाण | 6 दिवसांपूर्वी
गांधीजींचा लहान मुलगा खाण्याचा विलक्षण हट्ट घेऊन बसायचा.
माझ्या अभिनेत्री कन्यका
शोभना समर्थ | 2 आठवड्या पूर्वी
नूतनच्या या यशावर तनुजाचें यश पडताळून पाहणं आज तरी इष्ट ठरणार नाहीं
रहस्यनिरीक्षण
महादेव मल्हार जोशी | 2 आठवड्या पूर्वी
तुम्हांला ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला आहे काय ?
Shrinivas Watve
4 वर्षांपूर्वीवेगळा विचार करणारे कृषिवल भारताच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहेत..
gadiyarabhay
7 वर्षांपूर्वीअतिशय तल्लख बुद्धी व स्वतः विचार करण्याची क्षमता ह्याच्या जोरावर यश खेचून आणणाऱ्या खेताजीच कौतुक
Vasant
7 वर्षांपूर्वीशेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळू शकते
bhushanpathak
7 वर्षांपूर्वीमी हि माहिती कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, पण आज अधिक सखोल माहिती मिळाली। शेती विषयक उत्तम प्रयोग पुण्याच्या ऍग्रोवन या सकाळ पेपर मध्ये येतात। त्याप्रमाणे काहीतरी नवीन वाचायला मिलल्यास उत्तम, शिवाय प्रगशील तरुणांना प्रोत्साहन मिळेल। चांगला विषय & उत्तम लेख
maheshbapat63
7 वर्षांपूर्वीवाचून खूब मजा वाटली प्रेरक लेख
varshagokhale
7 वर्षांपूर्वीवाचून छान वाटलं! नाही तर हल्ली शेतकरी तेच ते बोलताना ऐकू येते, कर्ज माफ करा! आत्महत्त्या करतो ! पाणी, खत बियाणे चांगले व मोफत दया, दर हाच द्या! नाहीतर बंद घडवतो!
anapatil
7 वर्षांपूर्वीAtishay preranadayi
rekhaparalkar
7 वर्षांपूर्वीप्रेरणादायी?