शब्दांच्या जन्मकथा : वाचन

वयम्    मंजिरी हसबनीस    2020-10-15 04:04:27   

१५ ऑक्टोबर हा  डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाचन, लेखन या विषयावरची ही गोष्ट! ‘वयम्’ मासिकाच्या ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा मजकूर-

वाचणे हा शब्दच मुळात गमतीशीर आहे नाही.. पुस्तकं वाचणे, ग्रंथ वाचणे, वर्तमानपत्र वाचणे, लेख वाचणे, कविता वाचणे असा सगळया वाचन-संस्कृतीशी त्याचा संबंध आहेच, शिवाय मारापासून वाचणे, पावसापासून वाचणे, कुणाच्यातरी ओरड्यापासून वाचणे, अर्थात स्वसंरक्षण करणे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. थोडक्यात हा शब्द असा द्व्यर्थी म्हणजे दोन अगदी भिन्न अर्थ असलेला आहे. अशा शब्दांचीही मजा लुटताना एक वेगळाच आनंद मिळतो ! ‘सूर्य उगवला झाडीत, वाघ मेला लाथा झाडीत, म्हातारी होती रस्ता झाडीत, सैनिक निघाला गोळ्या  झाडीत’ या चारही ठिकाणी 'झाडीत’ शब्दाचे अगदी भिन्न भिन्न चार अर्थ आहेत. अशाच शब्दांचा यथोचित वापर करून अतिशय सुंदर असे मथळे वृत्तपत्रांमध्ये दिलेले असतात. उदाहरणार्थ, 'लक्ष्यावर असू दे लक्ष’. किंवा 'वाचाल तर वाचाल’. यातील 'वाचाल तर वाचाल’ हे मात्र अक्षरश: खरं आहे. हो ना? अहो, यासंबंधी अगदी सुंदर आणि मनोरंजक अशी गोष्टही आहे. ती ऐकायला तुम्हांला खूपच आवडेल. एक आटपाट नगर होतं. त्या नगरीचा राजा होता बलाढ्य चित्रसेन. या चित्रसेनाला सात राजकन्या होत्या. राजाच्या अतिशय लाडक्या. त्या दिवसभर आनंदात बागडत, खेळत, मिष्टान्न खात, सजतधजत आणि रात्री झोपी जात. दिवसभर चैन करणं हाच त्यांचा उद्योग होता. मात्र सातवी राजकन्या त्यांच्यात थोडी वेगळी होती. ती खेळत असे. पण त्याचबरोबर अभ्यासही करी. दिवसभर खेळली तरी रात्री धूळपाटी गिरविल्याशिवाय तिला झोप येत नसे. ती अक्षरं भराभर शिकली, गाणं म्हणायला शिकली, नृत्य शिकली, चित्रं काढायला शिकली. चित्रसेनाला फार वाटे की, इतर सहा राजकन्यांनीही हे सगळं शिकावं. त्याने नवे नवे गुरू बोलावले, तज्ज्ञ शिक्षक बोलावले. पण व्यर्थ! या राजकन्या काही शिकल्या नाहीत. एकदा या चित्रसेनावर मोठंच संकट आलं. विक्राळेश्वर नावाच्या राक्षसाने त्यांच्यावर आक्रमण केलं आणि त्याच्या सातही राजकन्या त्याने पळवून नेल्या. मध्ये बराच काळ लोटला. चित्रसेन राजकन्यांना शोधत होता. त्यांच्यासाठी झुरत होता. देवाची करुणा भाकत होता. मग एकदा कलानिधी हा देवदूत त्यांच्या मदतीला आला. कलानिधीच्या दैवी शक्तीमुळे चित्रसेनाने विक्राळेश्वराला हरवलं आणि तो राजकन्यांचा शोध घेऊ लागला. दूरवरून त्याला सात बंदिस्त किल्ले दिसले. तिथे त्याच्या सुकुमार कन्या कैदेत होत्या. तो कलानिधीसह पहिल्या किल्लयात प्रवेशला. सर्वत्र धुळीचं साम्राज्य. पुस्तकांवर, वस्तूंवर, वाद्यांवर धूळच धूळ, काळोख. आत त्याची राजकन्या मंचकावर पडली होती. मृतवत, निर्जीव अवस्थेत. तिला घरघर लागली होती. धावतच येऊन कलानिधीने तिचे प्राण वाचविले. तिला कैदेतून मुक्त केलं. तीच गत पुढच्या पाच ठिकाणीही झाली. शेवटच्या किल्लयापाशी कलानिधी, चित्रसेन आणि इतर सहा वाचलेल्या राजकन्या आल्या. आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आत सर्वत्र तेलाचे दिवे जळत होते. सर्वत्र पुस्तकं नीट रचून, मांडून ठेवली होती. त्या काळोखाच्या साम्राज्यालाही जिवंतपणाची झालर होती आणि होती साथ एका आर्त पण सुरेल स्वराची. आत कोठडीतील मंचकावर सातवी राजकन्या आर्त स्वरात ईश्वराला आळवत होती. वातावरण करुणामय पण भारलेलं होतं. ती छेडत असलेल्या तारांनी ऐकणारा भान विसरत होता. चित्रसेनाने लेकीला साद घातली. राजकन्या वळली, ती अप्रतिम, देखण्या भक्तीचं अद्भुत तेज धारण केलेली. कमालीची सुंदर भासत होती. जणू तिला खात्री होती की, हा क्षण येणारच आहे तिच्या आयुष्यात. कलानिधीने पुढे होऊन तिचे हात धरले. अर्थात तीच त्याची भावी वधू होणार होती. चित्रसेन धन्य झाला आणि इतर राजकन्यांना त्यांची चूक उमगली. कारण या राजकन्येने त्यांना सांगितलं; या काळात दिवसा झरोक्यातून येणाऱ्या सूर्यप्रकाशात आणि रात्री तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात ती सतत वाचत असायची. ती वाद्य वाजवत रहायची. गाणी आळवत रहायची. या वाचण्याने तिला वाचवलं. तिला फुलत ठेवलं. तिला विझू दिलं नाही. तेव्हा कळलं ना मुलांनो, वाचाल तर वाचाल. अहो, पण लिहाल, तर वाचाल. आणि हे लिहिणं कुणी सुरू केलं? प्राचीन सुमेरिया आणि इजिप्तमध्ये लेखनकलेचा प्रथम आविष्कार झाला. इजिप्त देशात ते दगडांवर कोरीत. सुमेरियात ते मातीच्या विटांवर लिपी कोरीत. त्यांची लिपी ही चित्रलिपी होती. पृथ्वीवरील पहिले लिखाण पाच हजार वर्षांपूर्वीचे आहे. यावर ते देवांच्या प्रार्थना व इतर मजकूर लिहीत असत. इजिप्तमध्ये दगडांवर कोरलेल्या वंशावळी, याच काळाच्या आसपासच्या. दगडांवरील असे लिखाण इजिप्तच्या पिरॅमिड्समध्येही सापडलं आहे. साधारण या सुमारास लोक कागदासारख्या माध्यमाचा लिहिण्याकरिता वापर करू लागले. ग्रीक लोकांनी यालाच पॅपिरस असं नाव दिलं. त्यावरून इंग्रजीतील पेपर हा शब्द तयार झाला. नाईल नदीत जी लव्हाळी वाढत असायची, तिच्या गराच्या पट्ट्यापासून हे पॅपिरस ते तयार करीत. मग त्यांच्या भेंडोळ्या  मातीच्या रांजणात भरून ठेवत. या पॅपिरसवर लिहिता यावं, म्हणून त्यांनी आपली चित्रलिपी अधिक सुटसुटीत बनवली. पहिला कागद तयार केला तो मात्र चिनी लोकांनी. ही कला अरब त्यांच्याकडून शिकले आणि त्यांनी युरोपात तिचा प्रसार केला. त्याअगोदर युरोपात चामड्यावर लिहीत असत. आपल्या पूर्वजांना लेखनकला अवगत होती. पण तिचा सर्रास वापर ते करत नव्हते. तेव्हा मौखिक परंपरेनेच वेद-शास्त्रं शिकवली जात. पण मणिभाजनम् शाईची दौत आणि उपलब्ध लाकडी फûयांवरील, ताम्रपटांवरील शिलालेखांवरील भूर्जपत्र आणि ताडपत्रांवरील लिखाण; आपल्याला अवगत असलेल्या लेखनकलेची साक्ष पटवतात. फार पूर्वी जेव्हा विटांवर लिखाण होत होतं, तेव्हा ग्रंथालयांना 'लिहिलेल्या विटांचं घर’ आणि ग्रंथपालाला 'लिहिलेल्या विटांचा अधिपती’ असं म्हटलं जायचं. सुमेरियात अशी विटांवर लिहिलेल्या पुस्तकांची ग्रंथालयं होती. तर इजिप्तमध्ये पॅपिरसवर लिहिलेल्या पुस्तकांची ग्रंथालयं होती. पॅपरिसांचे घर, विचारांचे औषध, मानसिक दवाखाना अशी अर्थपूर्ण नावं त्यांनी या ग्रंथालयांना दिलेली दिसतात. छापण्याच्या कलेनंतर मात्र या क्षेत्रात अफाट क्रांती घडून आली आणि वाचनकलेचा अफाट प्रसार सर्वत्र झाला. प्राचीन भारतातील जगद्विख्यात ग्रंथालय म्हणजे नालंदा विद्यापीठाचं. तिथे ग्रंथालयाच्या तीन इमारती होत्या. रत्नसागर, रत्नरंजक आणि रत्नोदधि. त्यांपैकी रत्नोदधि ही इमारत नऊ मजल्यांची होती. देशोदेशींचे विद्वान इथे अभ्यासाकरता येत असत. महाभारताच्या लेखनाबद्दल एक कथा प्रचलित आहे. ही कथा लिहिण्यासाठी लेखनिकही अत्यंत हुशार हवा, म्हणून महर्षि व्यासांनी गणपतीबाप्पांनाच लेखनिक केले. तो 'हो’ म्हणाला. पण त्याने एक अट घातली की, तुम्ही सांगता सांगता खूप वेळ थांबलात, तर मी लेखन बंद करीन. यावर व्यास विचार करून म्हणाले, ''ठीक आहे, पण तू खूप हुशार आहेस, तेव्हा मी विचारीन, त्याचा अर्थ तू नीट सांगितला पाहिजेस. तो अर्थ सांगून होईस्तोवर मी थांबेन. गणपतीबाप्पा याला तयार झाले. मग व्यास दमले की, मधेमधे किचकट कूट श्लोक सांगत असत. त्याचा अर्थ समजून सांगायला बाप्पांना थोडा वेळ लागे आणि मग आवश्यक ती थोडी विश्रांती व्यासांना मिळत असे. असे दोघेही तोडीस तोड होते. वाचन हा एक संस्कार आहे. वाचन हा एक छंद आहे. वाचन ही एक सवय आहे. वाचन ही एक संस्कृती आहे. वाचन हे काही वेळेस व्यसनही होतं. अर्थात तेव्हा मात्र चांगल्या गोष्टींचं आचरणही मर्यादेत राहून विवेकाने करायला लागतं, हे लक्षात ठेवावं लागतं. पण वाचनाने अनेक कौशल्यं प्राप्त होतात, यात संशय नाही. वाचनाने शब्दसंपत्ती वाढते. विचार परिपक्व आणि प्रगल्भ होतात. वाचनाने विषयांवरची पकड वाढते. बोलणं अधिक व्यापक आणि प्रभावी बनतं. दडपण दूर सारण्याचं वाचन हे उत्तम साधन आहे. वाचन हा नैराश्यावरचा रामबाण उपाय आहे. संवेदनशील मनाचे अनेक झरोके वाचनाने उघडतात आणि आपलं मन व पूर्ण व्यक्तिमत्त्व उजळून टाकतात. या वाचनसंस्कृतीला कुणाची नजर लागली आहे, न कळे! पण तरुण पिढी उत्तम वाचसंस्कारापासून दुरावत चालली आहे. आता वाचनसंस्कारांना वाचवायची वेळ आली आहे का... अगदी असंच काही नाही. सातत्य, डोळस प्रयत्न आणि निष्ठा याने वाचनाचे संस्कार पुन्हा मनामनांत दृढ करायला फारसा वेळ लागणार नाही. चला तर मग, गांधी-जयंती आणि शारदेच्या नवरात्रोत्सवाने मंगल झालेल्या या महिन्यात, आपण वाचनसंस्कृती जोपासण्याचा उत्तम संकल्प करू या.

-मंजिरी हसबनीस

hasabnis1@gmail.com

(पूर्वप्रसिद्धी- ऑक्टोबर २०१५ )


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.