आबाला स्मरणशक्तीचं वरदान लाभलेलं होतं. त्याच्या तल्लख आणि दणकट स्मरणशक्तीचं मला कायम अप्रूप वाटायचं. घरच्या गरिबीमुळे आईवडिलांनी त्याला शाळेत घातलं नव्हतं. संपूर्ण निरक्षर असला तरीही त्याला शेकडो कविता पाठ होत्या. तो एकपाठीच होता. एकदा ऐकलेलं काहीही त्याच्या कायम लक्षात राहायचं. भजनं, गौळणी, पोवाडे, भलरीगीतं, म्हणी, सिनेमा-तमाशातली गाणी, धनगरी सुंबराण गीतं यांचा भलामोठा खजिना त्याच्याकडे होता. या मुबलक खजिन्यामुळे अंताक्षरीमध्ये तो कधीच हरायचा नाही. तो एकटा विरुद्ध समोर पाच जण असले तरीही तोच जिंकायचा. उन्हाळाच्या सुट्टीत आम्ही मामाच्या गावी जायचो. तेव्हा मीही आबाबरोबर गुरं वळायला जायचो. आबा मामांकडे राखुळीचं काम करायचा. तसं ते अतिशय कटकटीचं काम होतं. चुकून जरी एखादी शेळी किंवा मेंढी कुणाच्या पिकात शिरली तर तो शेतकरी शिव्या देत यायचा. ‘तुझं लक्ष कुठं असतंय' म्हणून आबाला थेट रट्टे द्यायचा. काही काही जण तर इतके खडूस असायचे की ते जनावरं कोंडवाड्यात घालायचे. ती कोंडवाड्यातून सोडवून आणणं हे मोठं तापदायक आणि खर्चाचं काम असायचं. त्यामुळे जनावरांकडे सतत लक्ष द्यायला लागायचं. मी शाळेत शिकतोय याचं आबाला गाडीभर कौतुक असायचं. “हा छोटा पाहुणा कोणाय?" असं त्याला कुणीही विचारलं की, ‘'हा माझा धाकटा भाव हाये, पुण्याला अस्तोय. साळंत जातास्तोय, लई हुश्शार हाये, एकदा बी नापास झाला नाय, उलटा न्येह्मी पयला लंबर येतोया त्याचा. आता साळंला सुट्ट्या लागल्यात म्हणूनशानं इकडं आलाय," असं आबा अतिशय अभिमानाने सांगायचा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .