हायवे- एक सेल्फी आरपार/ चित्रस्मृती


जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक  आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षांच्या विरोधात जातं असं लक्षात येतं.

हायवे- एक सेल्फी आरपार

  हायवे- एक सेल्फी आरपार, या चित्रपटाच्या पोस्टरवरली ही प्रतिमा तशी वास्तववादी नाही. एका व्यक्तीरेखेचा चेहरा, मात्र त्याच्या डोळ्यांची जागा रीअरव्ह्यू मिररने अडवलेली. या आरशात प्रतिबिंबित होते ती दुसरीच व्यक्ती. सुरिअलिस्ट चित्रकार रेने माग्रितच्या एखाद्या चित्राची आठवण करुन देण्याजोगी ही प्रतिमा. आता प्रत्यक्षात पहायला गेलं, तर वास्तववादी रचनेत रिअरव्ह्यू मिरर असा लागणार नाही, पण वास्तव मांडणीपेक्षाही या पोस्टरमालिकेला रस आहे, तो या दोन व्यक्तिरेखांमधलं अमूर्त नातं दाखवण्यात. ही मालिका या चित्रपटातल्या अनेक पात्रांच्या जोड्या जुळवते, त्यांचा संबंध अधोरेखित करते, सोप्याचा अट्टाहास न धरता आणि स्टार्सच्या चेहऱ्यावर चित्रपट खपवण्याच्या जमान्यात, अपूर्ण चेहऱ्यांचा अर्थपूर्ण वापर करते.https://www.youtube.com/watch?v=z75IAOVaPac जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक  आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षांच्या विरोधात जातं असं लक्षात येतं. आपल्या नेहमीच्या चित्रपटात पोचण्याचं ठिकाण , हे प्रवासापेक्षा नेहमीच अधिक महत्वाचं असतं. मधले टप्पे भराभर घेत प्रेक्षकाला एकदा घाईने त्याच्या आवडत्या सुखांताकडे पोचवणं, हे बहुतेक चित्रपटांना आवश्यक वाटतं. हायवे मधे तसं होत नाही. प्रवास हे जीवन, आयुष्य, असं धरलं, तर ट्रॅफिक जॅम, हे सहज सापडणारं दुसरं प्रतीक. त्या प्रवासाला खीळ घालणाऱ्या कोणत्याही गोष्टीला अनुसरुन वापरता येण्यासारखं. मग ती गोष्ट कोणत्याही प्रकारची असेल, व्यक्तीगत जीवनातली निराशा, प्रेमभंग, व्यावसायिक अपयश, वैचारिक पेच, डिप्रेशन, अनेक गोष्टी. पण ही निराशा हे आतल्याआत कुढत रहाणं, हे सारं संपणार कसं? हे क्वचितच कोणी सांगतं. बांध फुटून प्रवाह पुन्हा सुरु होणार कसा ? हा प्रश्न हायवेसाठी महत्वाचा आहे. लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी या प्रश्नाभोवतीच हा सिनेमा रचतात. हायवे हा पारंपारिक रोड मुव्हीला वेगळ्या वळणावर नेऊन सोडणारा सिनेमा आहे. त्यातल्या पात्रांचा प्रवास तर चालू आहे मात्र प्रत्यक्षात यातला प्रत्येक जण आपल्याच अस्तित्वाने आखून दिलेल्या पिंजऱ्यात अडकलेला आहे . त्यांचं पुढे जाणं हे नावापुरतं आहे कारण जोपर्यंत आपल्या बरोबर वागवत असलेल्या पिंजऱ्यातून त्यांची सुटका होत नाही, तोवर ते जैसे थेच रहाणार. सरतेशेवटी चित्रपटात महत्व आहे ते माणसाना. दोन माणसातलं अंतर वरवर कितीही असलं, तरी  प्रत्यक्षात ते मानण्यावर असतं, हेच हायवे सांगतो. पोस्टरवरल्या रिअरव्ह्यू मिररमधले चेहरे पहाताना रिअरव्ह्यू मिरर्सवरचा नेहमीचा संदेश आठवणं, हे त्यातला आशय डीकोड करायला पुरेसं आहे. 'ऑब्जेक्ट्स इन द रिअरव्ह्यू मिरर आर क्लोजर दॅन दे अपिअर', याची जाणीव आपल्याला सतत करुन दिली जाते. कदाचित आपल्या आजूबाजूचे लोकही आपल्याला वाटतात त्याहून जवळचे असू शकतील, हाच हायवेचा अर्थ मानता येईल. - गणेश मतकरी *****************************************************************
चित्रस्मृती 
.... आणि 'शहेनशहा ' पोलीस बंदोबस्तात रिलीज 
       फिल्म तारे-तारका राजकारणात जाणे, निवडणूकीत विजयी होणे वा पडणे हे आता इतके आणि असे मुरलयं/रुळलयं की, चित्रपट कलाकारांनी राजकारणात यावे की न यावे हा विषय चघळायची काही गरज नाही. पण जेव्हा खासदार होणे अडचणीचे ठरले आणि महत्वाच्या चित्रपटाचे प्रदर्शनच वांध्यात आले तेव्हा....
   अमिताभ बच्चन १९८४ साली इलाहाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करुन विजयी झाला ही झाली या गोष्टीची एक बाजू.
       'दुसरी बाजू ' म्हणजे मध्यंतरनंतर पटकथेत अचानक काही धक्कादायक घडण्यासारखे आहे. लोकसभा सभागृहात अमिताभ कायमच गप्प राहिल्याने 'मौनी खासदार ' म्हणून त्याची हेटाळणी झाली. पण बोफोर्स तोफा घोटाळा प्रकरणी त्याचे नाव आले आणि त्याच्यावर विरोधी पक्ष आणि मिडियाने अशी काही जोरदार टीका केली की, तो व्हीलन म्हणून ओळखला जाऊ लागला. या टीकेने वेगाने चक्रिवादळाचे रुप धारण केले आणि सगळा रोख 'शहेनशहा 'च्या आगमनाकडे वळला.
       मला आजही स्पष्ट आठवतयं, जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमधील स्वीमिंग पूलावर 'शहेनशहा 'च्या गाण्याच्या ध्वनिफिती प्रकाशन अगदी वेळेवर आलेला अमिताभला निघायची घाई आहे हे त्याच्या देहबोलीतूनही जाणवले. अशातच त्याने निघताना त्याने टीनू आनंदला स्वीमिंग पूलात ढकलले. तोपर्यंत त्याचा मिडियावरचा बहिष्कार कायम होता आणि त्याचा बीग बी म्हणून उल्लेख सुरु झाला नव्हता.
     अमिताभ आणि शहेनशहा अशा दोन्हीवर एकत्र हल्ला वाढला आणि 'शहेनशहा 'च्या           ( १९८८) प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशातच अमिताभची पाहुणा कलाकार म्हणून भूमिका असलेला राकेशकुमार दिग्दर्शित 'कौन जीता कौन हारा ' रिलीज झाला आणि त्याच्या अमिताभवाल्या पोस्टरला काळे फासले गेले. पुढच्याच आठवड्यात 'शहेनशहा ' रिलीजचे ठरले. या चित्रपटात अमिताभची नायिका मीनाक्षी शेषाद्री होती. आम्हा समिक्षकांसाठीच्या ड्रीमलॅण्ड थिएटरमधील शोला प्रचंड पोलीस बंदोबस्त होता आणि आमची पूर्ण तपासणी करून आत सोडल्याचे आठवतयं.
    चित्रपटाचे मेन थिएटर मराठा मंदिरला तर पोलीस छावणीचे स्वरूप आले. तेथेच मॅटीनी शोला 'आग ही आग ' सुरु होता. 'शहेनशहा ' विरोधात पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी ( भाजपच्या युवा शाखा इत्यादीनी) निदर्शने केली आणि वातावरण निवळले.
     मला एक प्रश्न कायमच पडतो, एकाद्या कलाकाराच्या इतर क्षेत्रातील गोष्टींवर त्याच्या कलाकृतीची मोजदाद करणे, विरोध वगैरे करणे कितपत योग्य आहे? तीस वर्षांनंतरही हीच अवस्था कायम का रहावी?
   .......                  दिलीप ठाकूर
 

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.