अरुण खोपकर यांची मुलाखत /चित्रस्मृती


चित्रपट दिग्दर्शक, अभ्यासक श्री.अरुण खोपकर यांनी लिहिलेल्या चित्रव्यूह आणि चलतचित्रव्यूह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांची प्रा. अभिजीत देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत... 

प्रश्न: “चित्रव्यूह” आणि “चलतचित्रव्यूह” ही जुळी पुस्तकं अनेक अर्थांनी महत्वाची आहेत.तो एकीकडे तुमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या व्यक्ती आणि घटनांचा दस्तऐवज आहे,तर दुसरीकडे काळाचा मोठा पट त्यातून उलगडतो,अनेक कलाप्रवाहांच्या गेल्या चार-पाच दशकांतल्या बदलत्या रुपाचं ते आरेखनही आहे.या पुस्तकांच्या निर्मितीप्रक्रियेविषयी काय सांगाल ?

खोपकर : आपण लेखक व्हावं किंवा नियमित लिहीत रहावं असं मला कधी वाटलं नव्हतं.गुरुदत्तवरचं पुस्तक काहीसं अपघातानंच लिहीलं गेलं.गुरुदत्तचे सिनेमे पाहिल्यावर मला त्यात काही सूत्रं जाणवली होती,त्यांची टिपणंही काढली होती.असं टिपण म्हणून लिहायला सुरुवात केल्यावर मला जे जाणवलं होतं ते पुरेसं व्यक्त होईपर्यंत मी लिहीत राहिलो.त्याचं पुढे “गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका “ हे छोटं पुस्तक झालं.त्यानंतर झालेलं लेखन हे वेळोवेळी चर्चासत्र किंवा चित्रपट महोत्सवांतून वाचलेले पेपर्स किंवा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून केलेलं लेखन या स्वरुपाचं होतं.त्यानंतर “रुपवाणी “ मासिकासाठी मी “चौकटीच्या आतबाहेर “ ही चित्रपट आस्वादाविषयी लेखमाला लिहीली.त्याच काळात लोकवाङमयगृहात बऱ्याचदा जाणं व्हायचं.तेव्हा मित्रांशी गप्पा व्हायच्या.त्यातून जयप्रकाश सावंत म्हणाला की,तुमच्याकडे इतकं सांगण्यासारखं आहे,ते लिहीलंत तर लोकांना वाचायला  नक्की आवडेल.तेव्हा मग “आपले वाङमयवृत्त “ या मासिकासाठी “आजोबांची बंडी “ सारखे काही लेख लिहीले.पण अर्थात त्यालाही मासिकाची शब्दमर्यादा होतीच.हे लिहीतांना मला लोकांचा प्रतिसाद तर चांगला मिळालाच,पण महत्वाचं म्हणजे मला ते लिहीतांना आनंद मिळतोय आणि मनापासून लिहावसं वाटतंय हे जाणवलं,आपल्याकडे अजून बरंच सांगण्यासारखं आहे हेसु्दधा हळूहळू लक्षात येत गेलं.

असाच एकदा परेश मोकाशी माझ्याकडे आला होता.त्याच्याशी बोलताना मी काही किस्से सांगितले.ते ऐकून तो म्हणाला,की आमच्या पिढीला यातलं काहीच माहित नाही,तेव्हा तुम्ही हे लिहायलाच हवं.त्यावेळी आपण मासिकाच्या शब्दमर्यादेत लिहीण्यापेक्षा मोकळेपणानं लिहावं असं वाटलं आणि मी तसं लिहायला सुरुवात केली.दुसरं असं की,कोणताही स्व जेव्हा घडत असतो,तेव्हा त्या घडणीमागे अनेक हात असतात,त्यांचे संस्कार असतात.हे सगळे संस्कार आणि परंपरा या बऱ्याचदा त्या माणसापेक्षा महत्वाच्या असतात.तर माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या अशा व्यक्तींविषयी,अनुभवांविषयी मी लिहायला सुरुवात केली.

या दोन पुस्तकांपैकी पहिल्यातलं लेखन मी चित्रपट दिग्दर्शक व्हायचा ठाम निर्णय घेतला तोपर्यंतचं आहे.दुसऱ्यातले निबंध मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आलेले अनुभव,माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम करणारे तिथले गुरु याविषयीचे आहेत.

मी वर म्हटल्याप्रमाणे ही दोन्ही पुस्तकं माझ्या अनुभवांवर आधारित असली,तरी त्यात “मी” केंद्रस्थानी नाही.मी परिघावरुन हे सगळं न्याहाळणाऱ्या निरीक्षकाच्या भूमिकेत आहे.हा निरीक्षक विविध अनुभव आणि कलाप्रकार टिपून घेतो आहे.

दुसरं असं,की हे निबंध साहित्य,चित्रपट,नृत्य,चित्र,स्थापत्य अशा विविध कलाक्षेत्रातल्या कलावंताच्या व्यक्तिमत्वाविषयी,त्यांच्या कलेविषयी,त्यांच्या स्वभावाविषयी काही सांगत असले तरी ते त्यापलीकडे जाऊन त्या त्या कलेची मूलतत्त्वं काय आहेत याचा शोध घेतात.आणि अशा वैश्विक तत्त्वांचा शोध घेताना उत्कट अशा वैयक्तिक अनुभवांना नजरेआड होऊ देत नाहीत.

या दोन पुस्तकांचं स्वरुप समीक्षालेखनाचं नाही,चरित्रात्मक नाही,किंवा आत्मचरित्रात्मकही नाही.मराठीपुरता तरी हा एक नवा वाङमयप्रकार आहे,असं म्हणायला हरकत नाही.जागतिक साहित्याच्या संदर्भात आयझेन्स्टाईन,बोदलेअर,कोलरिज यांनी अशाप्रकारचे निबंध लिहीले आहेत.अर्थात,ही नावं मी संदर्भासाठी घेतोय,गुणात्मक तुलनेसाठी नाही.कारण लेखक म्हणून माझ्यावर या आणि इतर अनेक लेखक कलावंतांचं ऋण आहे.

प्र. हे लिहीतांना कोणती वैचारिक भूमिका समोर होती?तुमच्या चित्रपट दिग्दर्शक असण्याचा त्या भूमिकेशी काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध होता का ?

खोपकर : चित्रपट ही एक समावेशक कला आहे.तिच्यात अनेक कलांना मुक्त वाट मिळत असते.म्हणून चित्रपट दिग्दर्शक असणं,म्हणजे केवळ सेल्युलॉई़वर  काम करणं नाही. तर ती एक अनुभव घेण्याची पद्धत आहे.

तुला एक साधा अनुभव सांगतो.एकदा जंगलात पहाटे शूटिंगसाठी गेलो होतो.पक्ष्यांच्या किलबिलाटाचे विविध आवाज येत होते.मला हळूहळू ते आवाज एखाद्या ऑर्केस्ट्रासारखेच वाटायला लागले.म्हणजे आधी एख पक्षी ओरडायचा मग दुसरा त्यात आपला आवाज मिसळायचा,मग तिसरा त्याला साद घालायचा.हे सूक्ष्म ऐकणं दिग्दर्शक असल्यामुळे शक्य झालं किंवा ढगाळ आकाशाकडे पाहिल्यावर त्यात राखी रंगाच्या किती छटा दिसतात,ते नजरेला जाणवणं ही पाहण्यातली सूक्ष्मताही त्याचाच भाग.त्यासाठी डोळ्यांना,कानांना जो रियाझ पाहिजे,तो दिग्दर्शक असल्यामुळे होत गेला.ही सूक्ष्मपणे ऐकण्याची,सूक्ष्मपणे पाहण्याची आणि परस्परसंबंध जोडण्याची जी प्रक्रिया आहे ती एखादी कलाकृती तुमच्यासमोर असली तर तिच्या संदर्भात होते.त्यामुळे तात्विक निष्कर्ष नीट समजून घेणं कलेच्या संदर्भात केलं,की त्या निष्कर्षांना मुळं मिळतात,अधिष्ठान मिळतं.

महाराष्ट्रात मध्यमवर्गीय जाणीवांच्या प्राचुर्यामुळे एकूणच कलेविषयीचं जागतिक भान इथे कधी नीट रुजलंच नाही.बंगालमध्ये हे भान सुरुवातीपासूनच होतं,कलाविचाराला समृद्ध परंपरा होती.तसं महाराष्ट्रात झालं नाही.महाराष्ट्रातल्या मोठ्या विचारवंतांनी जेव्हा संगीताबद्दल लिहीलं,तेव्हा फक्त भारतीय संगीताबद्दलच लिहीलं.आता नृत्याचं उदाहरण घेतलं,तर आपल्याकडे खास आपलं असं अभिजात नृत्य नाही.महाराष्ट्रातले भोसले तंजावरला गेले,तिथे नृत्य वाढलं.पण महाराष्ट्राला ते आपलं वाटलं नाही.चित्र आणि शिल्पकलेबद्दलही असंच म्हणता येईल.महाराष्ट्रात कलांविषयी जो विचार विचार झाला तो प्रामुख्यानं साहित्याच्याच अंगानं झाला.मर्ढेकरांचं उदाहरण यासंदर्भात बोलकं आहे.

एखाद्या विषयावर विचार करताना तुमची उदाहरणं जितकी विपुल आणि चांगल्या अर्थानं परस्परविरोधी असतील,तेवढी त्या विचाराला खोली लाभते.सैद्धांतिक विचार करावा,पण तो सेंद्रीय अनुभवापासून दूर गेलेला नसावा.आयझेन्स्टाईन याला “ग्रुंडप्रोब्लेम” अशी संज्ञा देतो.म्हणजे कलानुभवाच्या मूलभत समस्या.त्यानं चॅप्लिनवर लिहीलेल्या लेखात तो विनोदाच्या स्वरुपाचा विचार करतो,किंवा त्याच्या ग्रिफिथवरच्या लेखात “Pars Pro Toto “ किंवा अंशातून व्यक्त होणाऱ्या समग्रतेविषयी विचार करतो.या उदाहरणांमुळे त्याच्या मुख्य चिंतनविषयाला एक आधार मिळतो.यामुळे ज्यांचा वरवर एकमेकांशी काही संबंध नाही असं वाटणाऱ्या अनुभवांचे परस्परसंबंध लक्षात यायला लागतात.त्यामुळे या दोन पुस्तकांतले लेख लिहीताना ही भूमिका मी समोर ठेवली होती.म्हणून ऋत्विक घटक यांच्यावर लिहीताना मला महाकाव्याचं स्वरुप आणि त्यातही रामायणाचा विचार करावासा वाटला किंवा महाकाव्याला जोडूनच थिओ आंगेलोपूलोस हा ग्रीक चित्रपट दिग्दर्शक आणि ऋत्विक घटक यांच्यातले समान दुवेही लक्षात आले.याच भूमिकेतून हे लेख एकामागोमाग एक असे लिहीले गेले.त्या सगळ्यांमागे सूत्र आहे.पण ते लेखकाच्या मनात आहे आणि वाचकानं शोधायचं आहे.ते त्याला सापडलं तर त्या सूत्राला वेगळा अर्थ लाभतो.म्हणूनच आपल्याकडे जे प्राचीन सूत्रबद्ध लेखन आहे,त्यावर अनेक भाष्य झालेली आहेत.कारण प्रत्येक भाष्यकाराला त्यात वेगळं सूत्र दिसत असतं सूत्रांचा अन्वय प्रत्येक वाचकाचा वेगळा असतो किंवा असू शकतो.त्यातूनच त्या सूत्राला नवं आयुष्य मिळतं.म्हणूनच मी मला दिसणाऱ्या किंवा गवसलेल्या सूत्रांचं तत्वज्ञान मांडण्याऐवजी वैयक्तिक उत्कट अनुभव केद्रस्थानी ठेवले.या अनुभवांतून काही गोष्टी लख्ख जाणवतात.वीज चमकल्याप्रमाणे भोवतालचा परिसर स्वच्छ दिसायला लागतो.ही पुस्तकं लिहीण्यामागची भूमिका.

प्रश्न : ही दोन्ही पुस्तकं वाचतांना हे जाणवतं की त्या लेखनामागची जीवनदृष्टी ही एका व्युत्पन्न कलावंताची आहे.या जीवनदृष्टीविषयी तुम्ही स्वत: काय सांगाल?

खोपकर : तू जीवनदृष्टी म्हणतोस त्यात एक असं अभिप्रेत आहे,की एक विशिष्ट अशी दृष्टी आहे आणि त्यातून मी बघतोय.माझ्या मते तसं होत नाही.समजा मी एखाद्या कलावंतावर चित्रपट करतोय,तर त्याविषयीच्या माझ्या नेमक्या संवेदना मलाही माहित असतील असं नाही. चित्रपटनिर्मितीच्या संघर्षातून  त्या उमलत जातात.त्यातून मला हे कळायला लागतं,की अरे,या कलेकडे आपण अशाप्रकारे पहात होतो.म्हणजे मी एक “दृष्टी” घेऊन तिथे जातोय असं नसतं.त्या अनुभवातून मला काहीतरी मिळतं.मग पुढे समजा मी नृत्यविषयक फिल्म केली तर या आधीच्या अनुभवाची शिदोरी माझ्याकडे असते.पण त्यामुळे तुमच्या दृष्टीला मर्यादा येण्याचा धोकाही असतो.

नृत्याच्या अनुभवाचं जे ‘’नृत्यपण “ असतं ते चित्रकलेचा अनुभव त्यावर लादला तर नष्ट होतं.म्हणूनच आपल्याकडच्या तात्विक चर्चेत येणारा एक अपुरेपणा मला नेहमी जाणवतो.सौंदर्यविचार करायचा असेल तर तो कवितेबद्दलच का ? इतर कलांमध्येही सौंदर्य आहेच की.किंवा वाङमयीन महात्मता ही इतकी वेगळी आहे का ?

आता काळात उलगडणाऱ्या कलांचं उदाहरण घेतलं,आणि त्यात साहित्यही येतं हे लक्षात घेतलं पाहिजे,तर सबंध महाभारत काही तुम्ही एका क्षणात वाचू शकत नाही,म्हणूनच या कलांमधलं निवेदन कळण्याइतकी सूक्ष्मदृष्टी रसिकाकडे असावी लागते.ध्वनीच्या संदर्भात जर कान तयार नसेल,तर संगीतातलं कथन कसं कळणार?सुनीत या काव्यप्रकाराचे काही नियम आहेत.एखादा प्रतिभावंत कवी जेव्हा उत्कृष्ट सुनीत लिहीतो,तेव्हा तो हे नियम पाळतही असतो आणि तोडतही असतो.हे एकाच वेळी काहीतरी बांधलं जाणं आणि काहीतरी विखुरलं जाणं कळण्यासाठी काय बांधलं जातंय याची माहिती पाहिजे.

त्यामुळे तू हा जो जीवनदृष्टीचा प्रकार म्हणतोयस तो मला तत्वतः मान्य नाही.कारण तसं झालं तर ती दृष्टी बंदिस्त होते.माझा एखाद्या कलाकृतीबद्दलचा दहा वर्षांपूर्वीचा अनुभव आजच्या अनुभवापेक्षा अगदी वेगळा असू शकतो.म्हणूनच जेव्हा लोक कलेच्या संदर्भात वस्तुनिष्ठ विधानं करतात,तेव्हा मला धास्ती वाटते.तर “तुम्ही म्हणाल ते खरं ‘’ असं म्हणणं हे दुसरं टोक.कारण “सगळं काही पाहणाऱ्याच्या डोळ्यांत “असं काही नसतं.

मी लिहितो तेव्हा आपली ही विधानं शाश्वत आहेत असं मला वाटत नाही किंवा ती संपूर्णपणे अशाश्वत आहेत,असंही वाटत नाही.कारण या दोन्ही गोष्टी त्या कलाकृतीच्या पुढच्या प्रवासावर अवलंबून आहेत.त्यामुळे काळ आणि आस्वाद या दोन अक्षांचा एखाद्या कलाकृतीच्या अभिजात बनण्याशी महत्वाचा संबंध असतो.

मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असताना आयझेन्स्टाईनचा “बॅटलशिप पोटेमकिन” न पाहिलेला सिनेमाचा एकही विद्यार्थी नव्हता.याउलट २०१५ साली हा सिनेमा पाहिलेले किती तरुण फिल्ममेकर्स असतील ? म्हणजे क्लासिकची संकल्पना कशी डोळ्यांदेखत बदलत जाते बघ.किंवा “डेज ऑफ मॅथ्यू” नावाची एक पोलीश फिल्म आहे.मी जेव्हा तीसेक वर्षांपूर्वी ती पहिल्यांदा पाहिली तेव्हा मला ती एवढी आवडली,की मी ती एकाच दिवसांत तिकिट काढून चारवेळा पाहिली.त्या फिल्मनं माझ्यावर खोलवर परिणाम केला.पण आज इंटरनेटच्या युगातही ती दुर्मिळ असल्यामुळे मी एखाद्याला या फिल्मचं उदाहरण द्यायला लागलो,तर त्यानं ती पाहिलेलं असणं कठीण आहे.

आपल्याकडे जेव्हा समीक्षात्मक लेखन केलं जातं,तेव्हा असा विचार होत नाही.त्यामुळे ते लेखन फार एकांगी होतं.माझा भाषा शिकण्याचा जो सोस आहे,त्यामागे हाच विचार आहे.तुम्ही जेव्हा एखादी भाषांतरित कादंबरी वाचता,तेव्हा तुमचा वाचनानुभव मूळ कादंबरीपासून दूर जातो.या दूर जाण्याचा संबंध केवळ भाषांतरच्या गुणवत्तेपुरता नसतो.मूळ भाषेतलं पुस्तक त्याच्या आधीच्या अनेक पुस्तकांशी जोडलेलं असतं.भाषांतरात ही नाळच तोडली जाते.त्यामुळे त्याचे संबध मागे कुठपर्यंत जातात किंवा त्याच्या कुंडलीत काय काय आहे,हे तुमच्या लक्षात येत नाही.सतारीला खाली ज्या तारा असतात त्या वरच्या तारांच्या नादाला अनुनाद निर्माण करतात.भाषांतरात या अनुनाद निर्माण करणाऱ्या किंवा सहकंप देणाऱ्या तारा गप्प राहतात.तो सहकंप निर्माण करणं हे भाषांतरकारासाठी मोठं आव्हान असतं.

म्हणूनच जीवनदृष्टी या संकल्पनेत एक काठिण्य अभिप्रेत आहे.माझ्या भूमिकेत ते नाही.ती प्रवाही आहे.

प्रश्न : तुमच्या सिनेमाप्रमाणेच लेखनातही सगळंच सांगून न टाकता सूचित करणं किंवा ध्वनित करणं याला फार महत्व आहे.त्याविषयी तुम्हाला स्वतःला काय वाटतं ?

खोपकरः ब्रेसाँ “उन फाम दूस “ हा सिनेमा करत असताना कुमार शहानी त्याला सहाय्यक होता.एका प्रसंगात त्यांना हॅट न घातलेला माणूस मागून जायला हवा होता.कुमारनी तसा एका माणूस ब्रेसाँच्या समोर उभा केला.ब्रेसाँनं क्षणभर त्याच्यावर नजर टाकली आणि नापंसतीनं मान हलवली.कुमारनं कारण विचारलं.त्यावर ब्रेसाँ म्हणाला,”मला फक्त हॅट न घातलेला माणूस नको,हॅट “शिवायचा”(without a hat) माणूस पाहिजे.हा तसा नाही.”म्हणजे त्याचं without hat असणं त्यांना सूचित करायचं होतं.

त्यामुळे  प्रत्यक्ष दिसत नसलेल्या गोष्टी सूचित करणं हे कोणत्याही कलेसमोरचं प्रमुख आव्हान असतं.सिनेमासमोर ते अधिकच गंभीर स्वरुपात असतं.कारण सिनेमा समोर असलेल्या गोष्टी थेट दाखवणारं माध्यम आहे.चित्रकार एखादी फांदी आणून हवी ती गोष्ट झाकू शकतो किंवा कादंबरीकार एखाद्या गोष्टीचं वर्णन राखून ठेऊ शकतो.पण सिनेमा दिग्दर्शकाच्या डोक्यावर “असतेपण” हे सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखं बसलेलं असतं.इतकं की नसतेपण सुचवायला त्याला फार झगडावं लागतं.माझ्या लेखनात आणि सिनेमात हे सूचित करणं कसं केलंय,ते रसिकानं ओळखावं.

प्रश्नः या पुस्तकांच्या भाषेबद्दल मला विचारायचंय.आजकाल एवढं चविष्ट मराठी वाचायला मिळत नाही.तुमच्या या भाषेवर कोणते संस्कार आहेत?तिच्या मुळांशी काय आहे ?

खोपकर : माझ्या भाषेवर कळत नकळत झालेले संस्कार हे लिखित शब्दापेक्षा उच्चारित शब्दाचे आहेत.माझ्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या बोलणं ऐकणं हा फार महत्वाचा अनुभव होता.मला ज्या बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत त्या लोकांशी झालेल्या संवादातूनच.

प्रुफं तपासताना मला ती वाचण्यापेक्षा ती मोठ्यानं वाचणं,ऐकणं महत्वाचं वाटतं.डोळ्याची मराठी आणि कानाची मराठी असा फरक जर आपण केला,तर छपाई आल्यापासून डोळ्याच्या मराठीचं प्रमाण वाढत चाललंय.हल्ली तर लोक असं मराठी लिहीतात,की कोणी अडखळल्याशिवाय मोठ्यानं वाचूच शकणार नाही.कारण ती वाक्यं शब्दांच्या काट्याकुट्यांनी आणि दगडांनी भरलेली असतात.म्हणजे तुम्ही केवळ हलकं फुलकं असंच लिहीलं पाहिजे असं मला म्हणायचं नाही,लेखनात तात्विक चर्चा करायला माझी काहीच हकरत नाही.पण विचाराला शब्दरुप देताना नादरुपाला असलेलं महत्व दुर्लक्षित करु नये.

ही नादरुपाची जाणीव ऐकण्याच्या अनुभवांतून वाढत असते.म्हणजे जर तुम्हाला खयाल चांगला “ऐकता” यायला लागला,तर तुम्हाला महाप्राणाची किंमत कळायला लागते किंवा व्यंजनाची किंमत कळायला लागते.आता “अकडी खटकती रैंदी “ हा टप्पा घेतला,तर त्यात “डी” लांबवल्यानंतर “ख’’ येण्याआधी मध्ये जो विराम आहे तो जाणवला,तर पुढे तुम्ही लिहीताना जेव्हा व्यंजनं वापरता तेव्हा हा ऐकण्याचा अनुभव त्याच्या पार्श्वभूमीला असेल.मग कधीकधी आपण एखाद्या योग्य शब्दासाठी दहा-पंधरा दिवसही अडून राहतो.कारण इतर कोणताही शब्द लिहीला तर त्यातून चुकीचे,बेसूर आवाज यायला लागतात.

या पुस्तकाचं डिझाईन करताना मी आणि विकास गायतोंडे एकत्र बसून पानावरचा मजकूर कुठे संपवायचा,परिच्छेद कुठे करायचा असा हिशेब केला.त्यामुळे ती पुस्तकं जर तू मोठ्यानं वाचलीस,तर या मांडणीचा तुला आधार मिळेल.फिल्म एडिट करताना तुम्ही शांतता कुठे वापरायची,ध्वनी कुठे आणि कसा वापरायचा हे ठरवत असता.पुस्तक लिहीतानाही जर असा विचार केला तर त्याचा नक्कीच उपयोग होतो.तसाच नादाचा अनुभव भाषा समृद्ध करत असतो.

मराठीत मुक्तछंद आल्यावर मोकाट सुटलेल्या वळूसारखे लोक लिहीत सुटले.मोठ्या कवीला शब्दाच्या नादरुपाचं तल्लख भान असतं.नारायण सुर्व्यांचं उदाहरण घे.काय तालिया होता तो.त्यांच्या वाचनाची पद्धत संगीतच्या अगदी जवळ जाणारी होती.दुसरीकडे अरुण कोलटकर गद्याच्या नादानं वाचायचा,पण त्यात नाद होताच.या दोघांमध्ये ध्वनीची प्रखर जाणीव आहे.असे संस्कार जर भाषेवर झालेले असले,तर ते लेखनात यायला लागतात.

मी जेव्हा नवी भाषा शिकतो,तेव्हा माझ्या भाषेतल्या काही गोष्टी नव्यानं कळतात.रवीन्द्रनाथ म्हणायचे,की मी जेव्हा जग फिरुन आलो,तेव्हा मला माझ्या अंगणातल्या दवबिंदूचं सौंदर्य कळलं.मी ना.ग.जोशी,माधव ज्यूलियन असे लेखक कवी अत्यंत प्रेमानं वाचले.मराठी छंदांचं रुप कळण्यासाठी ते महत्वाचं ठरलं.तुम्ही जेव्हा दहा प्रकारची शार्दूलविक्रीडीतं,मंदाक्रांता,वसंततिलका वाचता तेव्हा तुम्हाला भाषेतल्या खाचाखोचा,गंमतीजमती कळायला लागतात.तुमच्या भाषेचा सुंदर कशिदा तुम्हाला कळायला लागतो.भाषेचा स्पर्श छंदातून होत असतो

प्रश्नः तुमच्या लेखनात बऱ्याचदा नव्यानं घडवलेले शब्द येतात.यामागे विचार असतो की अपघात ?

खोपकरः कधी विचार तर कधी अपघात.प्रत्येक वेळी विचार करुनच शब्द सुचत नाहीत.त्यासाठी काळ जावा लागतो.वाट पहावी लागते.तरच अपघातनं शब्द सुचतो.पण त्या अपघातामागे रियाझ असावा लागतो.पण तुम्ही किती अभ्यास केला की असा अपघात किंवा सुद्घात होईल ते सांगता येत नाही.

प्रश्नःया दोन्ही पुस्तकांमध्ये आणि तुमच्या एकूणच लेखनात सूक्ष्म विनोद अतिशय महत्वाचा आहे.तो बऱ्याचदा मुखर नसतो,पण वाचकाच्या ओठांवर स्मित निर्माण करुन त्याला विचार करायला लावतो.या विनोदाचं तुमच्या विचारप्रक्रियेतलं स्थान काय आहे ?

खोपकर: माझ्या प्रत्येक मित्राची स्वतंत्र अशी विनोदबुद्धी होती.मग तो सतीश आळेकर असो,अरुण कोलटकर असो,म.वा.धोंड किंवा अशोक केळकर असोत.अनेक आवडत्या लेखकांच्या लेखनातही हा विनोद आहे.हा विनोद सहज आहे.ते लेखनातल्या चैतन्याचं महत्वाचं अंग आहे.कोणतीही गोष्ट मांडत असताना ती आपल्याच डोक्यावर कोसळली तर काय होईल,किंवा दुसरा एखादा जर असं काही मांडत असेल तर,”तू हे सगळं लिहीतो आहेस,पण हे बघ तुझ्या डोचक्यावर पडणार आहे”. असं लक्षात येणं,हे डोचक्यावर पडणं महत्वाचं आहे.महाराष्ट्रात विनोदाला दीर्घ परंपरा आहे.थेट चक्रधर-तुकारामापासून राजवाड्यांपर्यंत ती दाखवता येते.चांगल्या मराठीत आणि बंगालीत हा फरक आहे.बंगालीत एक भावविवशता आहे.मराठीत ही विनोदाची खास परंपर म्हणूनच महत्वाची आहे.हा विनोद नसेल तर लेखन चैतन्यहीन होईल.

प्रश्नःया दोन्ही पुस्तकांची पहिली आवृत्ती संपत आलीय.तर या पुस्तकांच्या निमित्तानं मराठी वाचकाच्या अभिरुचीविषयी काय सांगता येईल ?

खोपकरः माझं गुरुदत्तवरचं पुस्तक निघून दोनतीन वर्षं झाली,त्या सुमाराला मी निपाणीला माझ्या प्रभाकर गुमास्ते नावाच्या शिक्षकांना भेटायला गेलो होतो.ते नव्हते तेव्हा.पण कॉलेजमधल्या लोकांना माझं नाव कळल्यावर खूप आनंद झाला.अनेकजण मला भेटायला आले.कॉलेजचा लायब्ररियन आला.त्यानं त्या पुस्तकातलं एक प्रकरणच पाठ म्हणून दाखवलं.आता त्यापूर्वी निपाणीला माझा वाचक आहे,असं जर कुणी सांगितलं असतं तर माझा पटकन विश्वास बसला नसता.किंवा ते पुस्तक वर्षभरात बावन्नपेक्षा जास्त लोकांनी घेतलंय,म्हणजे आठवड्याला एक वाचक झाला,हे सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं.

सुर्व्यांनी एकदा असाच एक अनुभव सांगितला होता.त्यांचं सामान एका हमालानं गाडीत चढवून दिलं.त्यानं सुर्व्यांच्या कविता वाचलेल्या होत्या.

तुम्ही तुम्हाला जे सांगायचंय ते कोणत्याही पूर्वग्रहशिवाय मोकळेपणानं मांडलंत तर त्यात एक प्रवाहीपण येतं.तुमच्या मनातल्या पूर्वग्रहामुळे अभिव्यक्तीलाच एक बांध पडतो.तो नसेल तर पुस्तक स्वतःचा वाचक स्वतःच शोधतं.मराठीत सध्याच्या वाचनसंस्कृतीबद्दल काही आनंदानं उडी मारावी अशी परिस्थिती नाही,पण डोकं आपटून घ्यावं अशीही नाही.

आता या दोन पुस्तकांचा तर प्रकाशन समारंभही झाला नव्हता.मी ओळखीच्या लोकांना काही पुस्तकं घेण्याचा आग्रह वगैरेही केला नव्हता.माझा साहित्याशी कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक संबंध येत नाही.त्यामुळे पुस्तकाच्या व्यावहारिक गणितांची मला फारशी कल्पना नाही.

पण पुस्तक चांगलं असेल तर मराठी वाचक ते स्वीकारतो हेही खरं.अरुण कोलटरच्या कवितांचं पुस्तक खपलं,सुर्व्यांचे संग्रहसुद्धा विकले गेलेच,किंवा कोसला लोकांनी स्वीकारली की नाही ?इतकी वर्षं ती कादंबरी वाचली जातेय.एक काळ असा होता की कोसला प्रकाशकानंही वाचलेली नव्हती.त्यामुळे ‘’कालोहि अयं निरवधीर्विपुलाश्च पृथ्वी “ हे मान्य करावं लागतंच. सतत लोकाभिरुचीला दोष देणंही बरोबर नाही.पुस्तकाच्या स्वीकारण्याला काळ जावा लागतो.जिथे तुकारामाचे अभंगही लोकांनी लगेच स्वीकारले नाहीत तिथे तुमचं आमचं काय!lतुम्ही वाचकाबद्दल एक किमान आदर ठेवून लिहीणं महत्वाचं.मग पुढे त्या लेखनाचं काय होईल,ते कुणीच सांगू किंवा ठरवू शकत नाही.कुणीतरी म्हटलंय तसं,तुम्ही आखलेल्या योजनांच्या अधेमधे जे घडतं ते आयुष्य.

**********************************************************

चित्रस्मृती

चंदन थिएटर जेव्हा बॅरोमीटर होते.....

सिनेमाच्या जगाच्या आठवणी कितीही प्रकारच्या आणि कशाही असू शकतात....
अगदी एकाद्या सिनेमा थिएटरबद्दलही, जुहूच्या चंदन थिएटरबद्दलही अगदी काही खास आठवणी सांगता येतील. त्यातील 'आतील रचना बदलून एकाऐवजी दोन छोट्या हाॅलची रचना करण्या'साठी सध्या ते बंद आहे. अगदी शेजारीच पीव्हीआर हे चक्क पाच स्क्रीनचे मल्टीप्लेक्स असल्याने आणि आजचा उच्चभ्रू व नवश्रीमंत वर्ग तेथे अगदी सकाळी नऊ ते रात्री अकराचा खेळ पाहण्यासाठी पसंती देत असल्याने चंदनची गर्दी वेगाने ओसरली. Avengers चे तर चक्क चोवीस तास राऊंड शो झाले.


पण दोन दशकांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी चंदन थिएटर चक्क बॅरोमीटर होते,
तत्पूर्वीच्या काळात म्हणजे सत्तर ऐंशीच्या दशकात दक्षिण मुंबईतील अनेक थिएटर्समधील फर्स्ट  डे फर्स्ट शो बॅरोमीटर मानला जाई. तेथील नवीन चित्रपटाच्या मेन थिएटरमधील पहिल्या दिवसाचा पब्लिक रिपोर्ट खूपच विश्वसनीय मानला जाई. हे बघा, सिनेमाच्या जगाचे आपले काही अलिखित नियम वा समज असतात. पूर्वी तर ते फारच होते. त्याला तुम्ही श्रध्दा/अंधश्रद्धा असे काहीही म्हणा. राज कपूरच्या 'मेरा नाम जोकर 'च्या मेन थिएटर नाॅव्हेल्टी ( ग्रॅन्ट रोडचे) मधील अशाच पहिल्या दिवशीच्या पहिल्या खेळास पब्लिकने हुर्यो उडवली आणि पिक्चर फ्लाॅप है, दो इंटरव्हल बोअर करता है ( पहिल्या आठवड्यात मेरा नाम जोकर दोन मध्यंतरचा होता, आठवड्यानंतर तो कापून एका मध्यंतरचा करण्यात आला). त्या काळात चित्रपट व्यवसायाची मक्का म्हणून नाझला प्रतिष्ठा होती. नवीन चित्रपटाचा हिट की फ्लाॅप हा रिपोर्ट तेथे सर्वप्रथम फुटे.....
कालांतराने चित्रपट व्यवसाय जुहू ते ओशिवरा परिसरात रुजला आणि त्यात होते, चंदन थिएटर! आता येथे पहिल्या दिवशी प्रेक्षक नवीन चित्रपटाला कुठे कंटाळतयं, कुठे रिस्पॉन्स देतेय हे अजमावून घेतले जाऊ लागले. खुद्द त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक येथे प्रेक्षकांमध्ये बसू लागले. त्याच्या बातम्या होऊ लागल्या. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर एक प्रेमकथा ' ( २००१) पाह्यला हेमा मालिनी आपल्या दोन्ही मुलींसह आली आणि इशाने सनी देओलच्या जोरदार संवाद आणि अॅक्शनला भारी दाद दिली हे खूपच रंगवून प्रसिद्ध झाले. या काळात येथे हाऊस फुल्ल गर्दी असे.
चंदनची ही खासियत काही वर्षे राहिली....
हे चंदन थिएटर राज कपूरचा युथफूल चित्रपट 'बाॅबी '( १९७३) च्या रिलीजने सुरु झाले, त्या काळात या परिसरात प्रचंड शांतता असे. जुहू विलेपार्ले स्कीमच्या एका बाजूला ते असल्याने तेथे शुकशुकाट असे. अलिकडे शेजारच्या माॅलमुळे वर्दळ वाढलीय इतकेच...

दिलीप ठाकूर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.