चित्रस्मृती


चित्रस्मृती 

ऋषि कपूर.... दिग्दर्शक 

स्टार सन्स, चाॅकलेटी हीरो, लव्हर बाॅय, डान्सर हीरो, नायक/सहनायक/चरित्र नायक/व्हीलन, काळ आणि वयानुसार बदललेला अभिनेता, काकाच्या ( अर्थात शशी कपूर) वाटचालीनुसार आपल्या करियरची आखणी करणार हरहुन्नरी स्टार, नायिकाप्रधान चित्रपटातही आपले अस्तित्व दाखवण्यात यशस्वी ठरलेला नायक ऋषि कपूरच्या अशा अनेक गुणांवर अपेक्षेप्रमाणे ( पण अनपेक्षितपणे... कारण अशी वेळ इतक्यात येईल असे वाटले नव्हते) फोकस पडला... याशिवाय त्याचा आणखीन एक महत्त्वाचा गुण 'दिग्दर्शक '. त्याच्या क्षमतेवर म्हणा,  स्टारडमवर म्हणा "'दिग्दर्शक " राज कपूर ते राजकुमार संतोषी आणि रवि टंडन ते रमेश सिप्पी अशा अनेकांनी विश्वास दाखवला म्हणूनच तो घडत गेला. त्याचा उगम होण्यापूर्वीच्या नासिर हुसेन, मनमोहन देसाई , राज खोसला अशाही दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्याने भूमिका साकारत आपली यशस्वी वाटचाल विस्तारली. त्या प्रमाणात त्याला अनेक दिग्दर्शकांची कधी साधारण काॅमन तर कधी पूर्णपणे भिन्न कार्यशैली अनुभवली, खुद्द पित्याचाच दिग्दर्शनात मेरा नाम जोकर ( १९७०), बाॅबी ( १९७३), प्रेम रोग ( १९८२) अशा तीन चित्रपटांचा अनुभव खूप शिकवणारा. 'हीना ' ( १९९१) चे दिग्दर्शनही राज कपूरच करीत होता, दोन गाण्यांच्या रेकाॅर्डिंगनंतर राज कपूरचे निधन झाल्याने रणधीर कपूरकडे दिग्दर्शन आले... उत्तम अभिनेता घडण्यात त्याच्या मॅनॅरिझम, स्टाईल, इमेज या गोष्टींपेक्षा मोठा वाटा दिग्दर्शकांचा असतो. ऋषि कपूरच्या प्रगती पुस्तकातील हा वाटा जाणून घेता आला तो 'आ अब लौट चले ' ( १९९९) च्या आर. के. स्टुडिओतील सेटवर 'दिग्दर्शक ऋषि कपूर'कडून. ( तत्पूर्वी धाकटा राजीव कपूरने 'प्रेमग्रंथ 'चे दिग्दर्शन केले. तेथेही हीरो ऋषि कपूर  व नायिका माधुरी दीक्षित) .....  तो काळ आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून चित्रपटाच्या सेटवर बोलवायचा होता. अनेक प्रकारचे लाईव्ह अनुभव त्यात येत. स्टार्स आणि दिग्दर्शकाशी भेट होई. ( तात्कालिक सिने मासिकात अशा सदराना भरभरून जागा मिळे.) यावेळी दिग्दर्शक  ऋषि कपूरच्या बोलण्यातील दोन गोष्टी आवर्जून सांगण्याजोग्या. एक म्हणजे, पप्पांनी 'बाॅबी 'ची निर्मिती मला हीरो म्हणून लाॅन्च करण्यासाठी केली नव्हती. तो तर नायिकाप्रधान चित्रपट आहे. अनेक नवीन चेहरे पाहून व नाकारुन  डिंपल कपाडियाची निवड करावी लागली. मी काय घरचाच होतो. त्यामुळे मेट्रो थिएटरमधील बाॅबीच्या प्रीमियरला शोकेसमधील चित्रपटाचे फोटो पाहण्याचेही कुतूहल होते.( सोबतचा फोटो पहा)पण सिनेमा सुपर हिट झाल्यावर मी खूपच हवेत होतो. कारण तेव्हा माझे वयच तसे होते. तर स्वतःच्या दिग्दर्शनाबाबत काय? अनेक शैलीच्या दिग्दर्शकांकडे भूमिका साकारलीय. त्यापैकी कोणाचा प्रभाव! कपूर स्टाईलमध्ये पटकन उत्तर आले, कोणी नाही. माझी स्वतःची शैली दिसेल असे म्हणतच तो अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राॅयला दृश्य समजवायला गेलादेखिल..... आम्हा मिडियाला तेव्हा मिनर्व्हा थिएटरमध्ये पब्लिकसोबतच हा दाखवण्यात आला , तेव्हा ऋषि कपूरच्या आत्मविश्वासाचा प्रत्यय आला. पण त्यानंतर ना त्याने पुन्हा दिग्दर्शन केले ना आर. के. फिल्मने त्यानंतर चित्रपट निर्मिती केली....

--  दिलीप ठाकूर


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.