१६ वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव


१६ व्या आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सवाचा डॉ.संतोष पाठारे यांनी घेतलेला आढावा.

 

१६ वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव

  -डॉ. संतोष पाठारे जगभरात राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे होत असताना, आर्थिक व्यवस्था कोसळून पडत असताना आणि कलेच्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत असताना, या सगळ्याचं पारदर्शी प्रतिबिंब जिथे पडेल अशी प्रांजळ अपेक्षा ठेवावी असा भारत सरकार आयोजित १६वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव नुकताच मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या सुसज्ज वास्ततू पार पडला. गेल्या दोन वर्षांत गाजत असलेला आनंद पटवर्धन यांचा विवेक, शिल्पा बल्लाळ यांचा ‘लकीर के इस तरफ’ यासारख्या महत्त्वाच्या माहितीपटांचा सहभाग महोत्सवात न झाल्याची खंत मनात बाळगून महोत्सवाला हजेरी लावली. सरकारी धोरणांचा उदो उदो करणा-या काही सुमार माहितीपटांचा अपवाद वगळता महोत्सवात दाखवले गेलेले माहितीपट आणि लघुपट यांनी एका अपरिचित विश्वाची सफर घडवून आणली आणि नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांच्या प्रतिभेची साक्षही घडवली. वास्तव हे कल्पते पेक्षा भयंकर असतं हे खरं तर घासून गुळगुळीत झालेलं वाक्य, परंतु मिफमध्ये उत्तरपूर्व राज्यातील तसंच आयर्लंड देशातील माहितीपट पाहताना त्याचा प्रत्यय वारंवार येत होता. आपण एका सुरक्षित शहरात आहोत आणि सुखवस्तू आयुष्य जगत आहोत याचा गिल्ट देणारे गाझा (दिग्द.गॅरी केन, अ‍ॅण्ड्रयू मॅककॉनेल), अ‍ॅटलांटिक (दिग्द. रिस्टर्ड ओ डॉमनेल), द गेशमा इज बॉर्न (मालती राव) हे माहितीपट पाहताना भडभडून येतं राहिलं. मोती बाग या निर्मल चन्दर दंड्रीयालनिर्मित माहितीपटातून उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील विद्यादत्त शर्मा या ८३ वर्षाच्या शेतक-याची गौरव गाथा पाहायला मिळाली. आपल्या शेतात तब्बल २३ किलोच्या मुळ्याचं विक्रमी उत्पन्न घेणारा हा कवीमनाचा शेतकरी! त्यांच्या निष्ठेविषयी सांगता सांगता दिग्दर्शकाने खेड्यातील शेतीकडे पाठ फिरवून शहरात गेलेल्या लोकांमुळे उजाड झालेल्या शेतांची व्यथादेखील नेमकेपणाने मांडली. निलेश कुंजीर यांचा ‘शेवंती’ (मराठी), जयशंकर यांचा लच्छावा (कन्नड), गणेश शेलारचा गढूळ (मराठी) डॉ. सुयश शिंदेचा मयत (मराठी) या लघुपटांतून तरुण दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेचा अनुभव प्रेक्षकांना घेता आला. बॅन्नेको-हेल मी -हेन आय डाय या बार्बरा पाझ यांच्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटांचा सुवर्णशंख पुरस्कार जाहीर झाला. नागराज मंजुळेच्या ‘पावसाचा निबंध’ला रौप्य शंखाने सन्मानित करण्यात आलं. १४६ माहितीपट, १ लघुपट आणि ७० सतेजपटांचं प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आलं. फिक्शन फिल्ममध्ये रमणा-या रसिकांनी माहितीपटांकडे वळायला हवं. ही दुनिया अधिक भुलवणारी आहे!

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.