अर्थसंकल्पातले आपल्याला तसे काय कळत असते? प्राप्तीकरात सूट मिळते का आणि मिळत असेल तर ती किती मिळते, यापेक्षा आपला आणि अर्थसंकल्पाचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. परंतु तरीही आपल्याला उत्सुकता असते. सरकारकडे प्रत्येक रूपया ‘आला कसा आणि गेला कसा’ हे वाचता वाचता आपल्याला आपल्या बँकेत आलेला रूपया कधी आणि कसा गेला या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही. परंतु तरीही आपण अर्थमंत्र्यांचं सगळं भाषण टीव्हीवर ऐकतो, वृत्तपत्रे वाचतो, सोशल मीडियावर कोणी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहतो आणि व्यक्तही होतो. याचं कारण म्हणजे अर्थकारण आणि हिशोब हा आपल्या जगण्याचा आणि व्यवहाराचा एक अपरिहार्य भाग आहे. सरकारी आकडेवारी कळत नसली तरी व्यवहाराच्या वजाबाक्या, भावनांचे गुणाकार-भागाकार आपल्याला कळत असतात. आपण आपल्या वागण्यातून अनेकांचे हिशोब चुकते करत असतो. नातेसंबंधांच्या व्यवहारात आपण अपूर्णांक ठरलेलो आहोत याची जाणिवही आपल्याला सतत होत असते. अर्थसंकल्पातले हजारो कोटींचे आकडे, जीडीपी, वित्तीय तूट यातून काहीही अर्थबोध होत नसला तरी आपण जगण्याचा लसावी, मसावी रोजच काढत असतो आणि त्यातून स्वतःचे एक वेगळे अर्थशास्त्र जगत असतो. अर्थ नसला तरी संकल्प असतातच. कधी पूर्ण झालेले, कधी अपूर्ण राहिलेले तर कधी न परवडणारे. हा ‘व्यवहार’ आपल्या एकूण सामाजिक, कौटुंबिक व्यवहारातच कसा रूजलेला असतो पहा. सुरुवात देवा-इश्वरापासून करु. नरहरी सोनार काय म्हणतात? ‘देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार.’ म्हणजे तू मला हे देशील तर मी तुला ते देतो. तू मला अमूक-तमूक दे, मी तुला ११ नारळ वाहतो, अभिषेक करतो, दर्शनाला येतो किंवा असलेच काही तरी ‘कबुल’ करतो. देवाच्या दारी गेल्याच्या क्षणापासून हे हिशेब सुरु होतात. हार-फुले विकणारे म्हणतात, आमच्याकडून हार-फुले, प्रसाद विकत घेणार असाल तर तुमच्या चपला-जोडे इथे ठेवा आणि निर्धास्त होऊन दर्शनाला जा. काही खरेदी करणार नसाल तर चपलांची चिंता वाहात अर्धवट मनाने, अपुऱ्या भक्तीने दर्शनाचा लाभ घ्या. बघा, दर्शनाचाही आपण ‘लाभ’ घेत असतो. झाला ना व्यवहार सिद्ध? खेबुडकरांनी गाणं लिहिताना आपल्या मनाचा हा चोरकप्पा नेमका पकडला आहे. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा..’ म्हणजे आपली भक्ती ही श्रद्धेच्या बँकेत ठेवलेली एफडी असते. देहाच्या तिजोरीत ती ठेवली की कधी तरी ती मॅच्युअर होईल आणि लाभ देईल याची आपल्याला खात्री असते. तिलाच आपण श्रद्धा म्हणतो आणि हे जे वाट पाहणे असते, त्याला आपण सबुरी म्हणतो. ती मॅच्युअर कोण करणार? अर्थात भगवंत! हा भगवंत कोणाला चुकला आहे? असे हिशोब कधी चुकतात, कधी बरोबर येतात. याचं उत्तम उदाहरण महाभारतात आहे. ‘मी हवा की माझं सैन्य हवं आहे?’ भगवान श्रीकृष्णानं विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात कौरव-पांडवांमधील युद्धाचं भवितव्य निश्चित झालं होतं. साहित्याची निर्मिती हाच खरा आनंद असं आपण भले म्हणतो, परंतु केवळ निर्मिती होत राहिली आणि त्यातून अर्थप्राप्ती झाली नाही तर तो आनंद लेखकाला उपभोगता येईल का? ‘नवरंग’ या चित्रपटाचा नायक साहित्यिक असतो,त्यातलं कविवर्य प्रदीप यांचं एक गाणं आहे. साहित्यिकांच्या मैफलीतली ती कविता आहे- कविराजा अब कविता के ना कान मरोड़ो धंधे की कुछ बात करो कुछ पैसा जोड़ो... शेर-शायरी कविराजा ना काम आएंगे कविता की पोथी को दीमक खा जाएंगे भाव चढ़ रहे, अनाज महंगा हो रहा है दिन दिन भूखे मरोगे रात कटेगी तारे गिन गिन इसलिए ये सब कहता हूं ये सब छोड़ो धंधे की कुछ बात करो कुछ पैसा जोड़ो... थोडक्यात काय तर, अर्थव्यवहार आणि व्यवहार कोणाला चुकला नाही. ‘सब घोडे बारा टक्के’ असं म्हणतानाही आपण टक्केवारी काढतोच. आपण सामान्य माणसे अनेकदा अशा बारा टक्क्यांचा हिशोब मनात ठेवून काय काय स्वप्ने रंगवित असतो. मर्ढेकरांनी ते कवितेत सांगितलं आहे- गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी; म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधिन माडी तर अशा माड्या बांधण्याचे संकल्प हा आपल्या खासगी, वैयक्तिक अर्थव्यवस्थेचा एक भाग असतो. असे संकल्प करताना,मोडताना आणि नाती जोडताना आपण जे हिशोब करतो ते रूढ गणितात न बसणारे असतात. कुणाची तरी आपण वाट पाहतो तेंव्हा तो वेळ आपण तासा, मिनिटांत मोजत हिशोब करत असतो. परंतु प्रत्येक वेळी तासा-मिनिटांची लांबी सारखी असते का? पाडगावकरांच्या या ओळी बघा- मग तिचा मंजुळ प्रश्नः "अय्या! तुम्ही आलात पण?" आणि आपलं गोड उत्तरः "नुकताच गं, तुझ्याआधी काही क्षण!" आता या व्यक्तीचे ‘काही क्षण’ म्हणजे दोन तासही असू शकतात की नाही? प्रेमात थोडा वेगळा विचारही होऊ शकतो आणि रोख व्यवहारही होऊ शकतो. चांदी की दिवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड दिया वगैरे आहेच, पण एक प्रियकर कसा हिशोबी आणि रोखठोक आहे बघा- उद्या उद्याचा नको वायदा हिशोब आपुला चोख हवा प्रीतीचा व्यवहार साजणी, नको उधारी, रोख हवा तर अशा प्रकारे, अर्थसंकल्प आणि व्यवहार प्रत्यक्ष- अप्त्यक्ष आपल्याशी जोडला गेलेला असतोच. पैशाकडे अनेकदा, दार्शनिक, अध्यात्मिक होऊनही पाहिलं जातं. परंतु ‘काहे पैसे पे इतना गुरुर करे है, यही पैसा तो अपनोंसे दूर करे है..’ हे तत्वज्ञान केवळ म्हणण्यापुरतं असतं. प्रत्यक्षात कोणी दूर होवो अथवा जवळ होवो, गाठीला पैसा हवा असतो. ‘गाठीला पैसा’ हा शब्द आपल्या भूतकाळातून आलेला आहे. ज्याकाळी प्रवासाची साधने नव्हती, माणसे एकेकटी भटकंती करत होती (आणि धोतरांमुळे खिसेही नव्हते) तेंव्हा धोतराच्या सोग्याच्या टोकाला बांधलेल्या गाठीत ठेवलेली रक्कम ही संकट काळी, अडचणीच्या प्रसंगी कामी येत असते. पुढे ही गाठ सूटली, खिसे आले. आता तर एटीएम आले तरी गाठीला पैसा हा शब्द आपण गाठीला बांधून ठेवलेला आहे. तर काय की गाठीला पैसा हवा असतोच. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी’ असं सांगणारे तुकोबा तर स्वतःच व्यापारी होते. धन जोडताना त्यांच्या अभंगातला ‘उत्तम वेव्हार’ आणि ‘उदास विचार’ घेता यावा हाच आपला प्रयत्न आहे. पुनश्च आणि बहुविधच्या इतर व्यासपीठांवरील साहित्याची निवड करतानाही आम्ही याच पद्धतीने विचार करत असतो. तुम्ही आमचे लेख नियमित वाचता आहातच, त्याविषयी आपण बोलत असतोच. परंतु हा मुक्त संवादही करत राहू, दर पंधरा दिवसांनी. ***
[email protected]
5 वर्षांपूर्वीAti sundar
Tanu
5 वर्षांपूर्वीआपण व्यवहाराशी कसे जोडले गेलो असतो हे या लेखात वाचायला मिळाले. छान.
SCK@2020
5 वर्षांपूर्वीछान आहे लेख
Lavakeshchaware
5 वर्षांपूर्वीउत्तम आहे लेख
patankarsushama
5 वर्षांपूर्वीछान