करोनाचे दिवस, करोनाच्या रात्री

संपादकीय    संपादकीय    2020-04-05 11:35:47   

करोनाचे दिवस, करोनाच्या रात्री

असे वाटते जणू पृथ्वीच्याच तोंडावर भला मोठा मास्क लावून तिच्या कानांभोवती इलॅस्टिकचा फास आवळलेला आहे विधात्याने. वाट्टेल ते किंवा तोंडाला येईल ते बरळणारी माणसे आपापल्या गोलांत उभी राहून आपला नंबर येण्याची वाट पाहात असताना दिसत आहेत. नंबर आल्यावरही ‘पाव किलो फ्लॉवर आणि दहा रूपयांचा मसाला’ किंवा ‘शाबुदाना अर्धा किलो, पातळ पोहे एक किलो’ असे तुटक सांगून स्थितप्रज्ञपणे भाजी किंवा वाणसामान हाती येण्याची वाट पाहात उभी असताना दिसत आहेत माणसे. भाव करत नाहीत आणि भाव दिसूही देत नाहीत चेहऱ्यावरचे. ‘प्रत्येकाचे एक वर्तुळ असते’ याचा एक नवाच अर्थ करोनाने आपल्याला दिला आहे. आपलं वर्तुळ वाढवावं असंही कोणाला वाटत नाही. भाजी घेतली, सामान घेतलं की पावलं घराकडे वळत आहेत.

भांडणं तर जगातूनच संपलेलीच आहेत जणू. भांडण्यातली सगळी मजाच करोनानं घालवून टाकलेली आहे. एखाद्याशी भांडताना, त्याची उणी-दुणी काढताना, त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार करताना आपण जे काही बोलतो आहोत, त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो आहे, हे पाहिल्याशिवाय पुढं भांडायला मजाच येत नाही. पण चेहरे दिसतात कुठं? कधी कधी नाही का, टीव्हीवरचं दृश्य जातं आणि फक्त आवाज ऐकू येतो, तसं माणसांचं झालं आहे. सगळ्यांचेच चेहरे बिघडलेल्या टीव्हीच्या पडद्यासारखे आणि मास्कमधून येणारे गाळीव आवाजही पडदा फाटलेल्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजासारखे. काय डोंबल भांडणार कोण कुणाशी? बरं, भांडायचं तर तेही दुरुन म्हणजे तीन-चार फुटांवरुन भांडायचं. त्यात काय मजा? जवळ जाऊन भांडायचं तर त्या व्यक्तीच्या तोंडात, हातावर, चेहऱ्यावर, कपड्यांवर कुठेतरी एखादा करोना व्हायरस दडून बसलेला असेल आणि त्यानं संधी साधून तिथून थेट आपल्या अंगावर उडी घेतली तर काय करणार?

कधी कधी तर भीती वाटते, आपण या पुढे कधी एकमेकांचे पूर्ण चेहरे पाहणार आहोत की नाही? पुण्यातल्या तरुणींना जणू करोनाचे भविष्य कळले होते आणि फार पूर्वीच त्यांनी घरातून बाहेर पडताना तोंडाला फडकी गुंडाळण्याचा सराव सुरु केला होता. केवळ नाक आणि डोळे दाखवित त्या मुली जणू सतत जगाला ‘पैचान कौन’ असे विचारत आहेत असा भास होत असे. तशातही प्रियकर आपापल्या प्रेयशांना ओळखंत, आई-बाप आपापल्या मुलींना ओळखंत. माणूस चटकन सरावतो, नवे ते आत्मसात करुन घेतो. तसा आता आपल्या सर्वांनाच हवा गाळून घेऊन शुध्द श्वास घेण्याचा सराव होतो आहे. याचा फायदा लक्षात येऊन उद्या आपण हेच कंटिन्यू केलं तर कदाचित मास्क हे आपलं फॅशन स्टेटमेंटही होऊ शकतं. भविष्यात कदाचित केवळ मास्कच्या वेगळ्या शोरूम्सही निघतील, त्यात स्वस्तातल्या मास्कपासून तर इंपोर्टेड (पण चीन मधले नव्हेत) मास्कपर्यंत महागडे मास्कही असतील. म्हणजे एखाद्याच्या कपड्यांवरुन त्याची आर्थिक स्थिती जोखण्याऐवजी आपण मास्कवरुनही ती जोखू शकू. एक प्रकारे सोशल डिस्टसिंगचाच नवा प्रकार आपण तेंव्हाही पाळत राहू. तसेही सोशल डिस्टन्सिंग काही आपल्याला नवे नाही, त्यावरच तर आपलं राजकारण चालू आहे. ऐन करोनाच्या काळातही सोशल मिडियावर त्याची आवर्तनं सुरु आहेतच.

करोनानं आपल्याला ग्राहक संस्कृतीच्या विळख्यातूनही मुक्त केलं आहे. आर्थिक उदारीकरणानंतर जगात ‘विक्रेता आणि ग्राहक’ हे दोनच वर्ग उरले होते. सतरंजी पाहू हात पाय पसरण्याऐवजी आपली सतरंजी मोठी करावी, असं गुंतवणूक तज्ज्ञ आपल्याला सांगत होते. मध्यमवर्गाला क्रेडिटकार्डचं व्यसन लावण्याचे प्रयोगही सुरु होते. परंतु गेल्या महिनाभरात पुन्हा एकदा आपल्या लक्षात येऊ लागलं आहे की आपल्या हातापायांना फार मोठ्या सतरंजीची गरजच नाही. हॉटेलात न जाता, नाटक-सिनेमा न पाहता, गाडीचा उपयोग न करता, पिझ्झा बर्गर न खाताही आपण जगू शकतो. गेली कित्येक शतके मराठी भाषा सांगत आली आहे, ‘संधी मिळताच हात धुवून घ्या’ पण आपण ऐकलं नाही, आता संधीचा विचारही न करता, हात धुवून घेतले जात आहेत आणि सतरंज्याचे आकार आटोक्यात ठेवले जात आहेत.

करोनाचा काळ गेल्यानंतरचं जग हे आरपार बदललेलं जग असेल असं म्हणतात, त्याचा प्रत्ययही आताच येऊ लागला आहे. करोनाच्या व्हायरसनं आपली सगळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक सिस्टिम करप्ट करुन टाकली आहे आणि आपल्याला एक नवी दृष्टी दिली आहे. विचार करा, कालपर्यंत आपण सुधीर फडके आणि आशा भोसलेच्या त्या गाण्यानं कसे मोहरुन जायचो?

धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडीता तार झंकारली

आता या एकांतातला धुंदपणा नशा उतरावी तसा पार उतरुन गेला आहे. बाप, आई आणि मुले आपापल्या खोल्यांमध्ये एकांतात कंटाळून गेलेली असतात. ती एकत्र असली तरी एकमेकांशी बोलण्यात त्यांना रस राहिलेला नसतो. कोणत्याही वयातले नवरा-बायको असोत, त्यांना अतिरेकी एकांत मिळाला की प्रीत वगैरे आकारायचं बंद होतं आणि मग कितीही छेडली तरी तार बिर काही झंकारली जात नाही. एकांत हा बासुंदीसारखा किंवा कोणत्याही गोड पदार्थांसारखा असतो. तो कल्पनेत असतो तोवर खुणावत असतो, प्रत्यक्षात त्याची गोडी थोडक्यातच असते. तो मर्यादेबाहेर मिळाला की त्याचे काटे बोचू लागतात. तरुण जोडपी, एकटी असतील तर ती सुरुवातीला शहारुन गेली असतील, दीर्घ एकांती सहवासाच्या कल्पनेनं थरारुन गेली असतील. परंतु आता त्यांना कळलं असेल, खिडकीच्या गजांना धरून, बाहेरच्या निरभ्र आकाशाकडे पाहात, उदास चेहऱ्यानं, ‘अकेले है, चले आओ, जहां हो’ असं म्हणण्यात जी गंमत आहे, ती मनात आलं की मिठीत घेण्यात नाही.

लेखकाला, कवीला, त्याच्या खिडकीतून दिसणारा आकाशाचा एखादा तुकडा किंवा रात्री दिसणारी चंद्रकोर किंवा एखादं हिरवं कंच वगैरे झाड यांचा फारच पुळका असतो. त्याचं केवढं स्तोम तो माजवत असतो. पण आता तोच तोच तुकडा किंवा तेच तेच झाड पाहून कंटाळून गेले असतील लेखक. ‘कॉपी पेस्ट’ केल्यासारखा तोच तोच दिवस आणि तीच तीच दिनचर्या जेंव्हा आपल्या वाट्याला येते तेंव्हा ‘दिवस खायला उठतो आणि रात्र प्यायला उठते.’ खरं तर पिण्याचीसुद्धा गंमतच आहे बघा. घरी ऐवज आहे, फ्रीजमध्ये बर्फ आहे, वाण्याकडे चणे—दाणे मिळतात परंतु तरीही अनेकांना ग्लास हाती धरण्याची इच्छा होत नाही. ‘नशा शराबमे होता, तो नाचती बोतल’ हे किती खरं आहे! नशा असते ती यार दोस्तांच्या कंपनीत, कंपनी चांगली असेल तर ती बाटलीत सिंगल माल्ट आहे की साधी आहे याने काही फरक पडत नाही. करोनाने दिलेलं हे ज्ञान आहे.‘चहा ठेवते मी’, ‘आंघोळी उरकून घ्या’, ‘झाला का स्वैपाक?’, ‘आज कितीने वाढला आकडा?’, ‘बापरे, इटलीत तर भयकंरच स्थिती आहे’, ‘रामायणाची वेळ झाली’, ‘चला, पत्ते खेळू या’, ‘पुनश्चवरचा आजचा लेख वाचलास का?’ ‘अरे, जरा जूनी गाणी लाव ना’ ....आपल्या सध्याच्या रोजच्या जगण्याची पटकथा अशा काही मोजक्या संवादांमधून सांगता येईल. या जगण्याला जेंव्हा छेद दिला जातो आणि कुणी तरी आपल्याला ‘थाळ्या वाजवा’ ‘टाळ्या वाजवा’ ‘अंधार करा’ ‘दिवे लावा’ असं सांगतो तेंव्हा ते कितीही निरुपयोगी असलं तरी आपण ते करतो, त्यावर हिरिरीने वाद घालतो, कारण रिकाम्या डोक्यांना अचानक काही तरी काम मिळतं...

तर असं, करोनानं सध्या सगळं जग वेठील धरलेलं आहे. यातून आपण बाहेर पडणार आहोतच. नाकावर रुमाल न धरता शिंकणे, कुठेही सर्रकन नाक मोकळे करणे, स्वच्छ जमिनीवर थुंकीची नक्षी काढणे, दुकानातील गर्दीत शिरता क्षणी जणू आपणच एकटे घाईत आहोत अशा अविर्भावात सामानाची मागणी करणे, लोकलमध्ये, बसमध्ये कुणी तरी बसायला जागा दिल्यावर त्याला थँक यू वगैरे म्हणण्याच्या भानगडीत न पडणे...सगळ्या भारतीय सवयी आपण सध्या भीतीच्या पेटीत बंद करुन ठेवलेल्या आहेत. भीती गेली की ती पेटी उघडेल. मग पुन्हा एकांत धुंद वाटेल, पुन्हा तार झंकारेल. तोवर वाचत राहू पुनश्चवरील लेख...तुमच्या आताच्या सक्तीच्या एकांताला तोच तो पणा येऊ नये यासाठीची आमची ती धडपड आहे.

संपादकीय

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.