आयुष्य तेच आहे...

संपादकीय    संपादकीय    2020-06-03 10:30:15   

करोनापूर्व आणि करोनापश्चात अशी काळाची विभागणी सध्या केली जात आहे. करोनापश्चात आपल्यात काय काय बदल होतील, यावर अर्थतज्ज्ञांपासून तर मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत प्रत्येक जण आपापली मते मांडत आहेत. आपले आर्थिक व्यवहार आपल्या हाती नसतात, बाजारातली परिस्थिती ते नियंत्रित करत असते त्यामुळे तेजी-मंदीचा फटका-फायदा आपल्या पदरी पडतोच पडतो. घडलेल्या घटनांचे आपल्या मनावर उमटणारे पडसाद हा मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे तेही अनेकदा राईचा पहाड नाही तर किमान टेकडी तरी करुन सांगतच असतात, ती जगरहाटी आहे. परंतु आपण सगळ्यांनी आपापल्या मनाशी विचार केला, नाक धरून, विचारांच्या खोल पाण्यात, तळाशी जाऊन तपासणी केली आणि मग स्वतःलाच विचारलं, की प्रामाणिकपणे सांग, गेल्या तीन महिन्यांच्या काळात, तुझ्यात काय बदल झाला आहे? तर काय उत्तर मिळेल? एखाद्या सार्वत्रिक अनुभवातून व्यक्तिगत पातळीवर बदल होणे एवढे सहज नसते. कधीच नव्हतेही. गेले तीन महिने आपण घरात बसून होतो, बातम्या वाचत होतो, टीव्ही पाहात होतो, गरज पडेल तेंव्हा भाजी-किराणा-औषधे आणायला बाहेर पडत होतो. एवढ्या मर्यादित संकटाने माणूस बदलत नसतो. आपणच काय, जगात कुठेही हेच सत्य आहे. वाटल्यास विचारुन पाहा स्वतःलाच! आपल्या कार्यालयातला एखादा सहकारी, आपल्या इमारतीमधील एखादा सहनिवासी, आपल्या मित्रांच्या टोळक्यातील एखादा कुजकट बोलणारा मित्र, नातेवाईकांमधला एखादी ‘नावडती व्यक्ती’ अशी काही माणसे असतातच प्रत्येकाच्या आयुष्यात, ज्यांच्याबद्दलचा उघड अथवा छुपा राग आपण बाळगून असतो. वेळप्रसंगी आपल्या वागण्या-बोलण्यातून तो कडवटपणा नकळत पाझरतही असतो. अशा एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग आपण विसरुन जाण्याचं ‘करोना काळात’ ठरवलं आहे का? जगण्यातलं वैय्यर्थ जाणवून त्यांना माफ करण्याचा विचार मनात आला आहे का गेल्या तीन महिन्यात? दिवसभर ‘टाइमपास’ करुन रात्री अंथरूणावर पडल्यावर आपण अंतर्मुख वगैरे झालो आहोत का कधी या तीन महिन्यांत? या प्रश्नांचे सरसकट ‘नाही’ असे उतर कदाचित देता येणार नाही, परंतु ‘हो’ असे उत्तर देणारांचे प्रमाण ०.०१ टक्का असण्याची शक्यताच अधिक असल्याने, या प्रश्नाला ‘नाही’ हेच उत्तर प्रातिनिधिक ठरेल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातले ‘आपण’ आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातले ‘आपण’ वेगळे आहोत का? तर हो, आहोत! मग काय बदल झाला आहे आपल्यात? आपण आता झूम काय आहे ते शिकून घेतले आहे. आपल्याला आता व्हाट्सप व्हिडीओ कॉलवर एकाच वेळेस किती व्यक्ती जॉईन होऊ शकतात हे कळले आहे. आपले जवळचे नातेवाईक एखादी थीम देतात, मग त्या थीमवर सगळी कुटुंबे व्हीडीओ पाठवतात, त्याचे एकत्रीकरण करुन, एडिट करुन त्याचा व्हीडीओ केला जातो आणि तो सगळीकडे पाठवला जातो, आणि त्यात बरा वेळ जातो हे लक्षात आले आहे. कुणाचा तरी वाढदिवस, कुणाच्या लग्नाचा वाढदिवस, किंवा कधी नुसताच टाइमपास करण्यासाठी देशातील पाच-दहा शहरात, किंवा जगातील दोन-चार देशात असलेले नातेवाईकांना कनेक्ट होता येतं, ही त्यातली मजा समजली आहे. त्यातून आपापले प्रेम आणि ओघाने आपापली घरेही एकमेकाना ‘दाखवता’ येतात, हे मनात ठसले आहे. हे सगळे गेल्या काही वर्षांपासून सुरु होते, पण ते एवढे अंगवळणी नव्हते पडले, ते या निमित्ताने झाले आहे. लग्ने, बारसे, अंत्यदर्शन अशा ‘प्रसंगांचे’ फेसबुक लाईव्ह, भाषणे, मार्गदर्शन, वर्कशॉप ऑनलाईन करण्यातली सोय यालाही आपण सरावलो आहोत. आपण आता चार जणांच्या मध्ये मोबाइल ठेवून त्यावर लुडो खेळू शकतो. सोंगटी हलवण्याचे श्रमही आपल्याला घ्यावे लागत नाहीत. ज्यांनी कधीही किचनमध्ये पाऊल ठेवले नाही, असे पुरुषही इतर नवऱ्यांनी टाकलेल्या पोस्ट पाहून, व्हीडीओ पाहून, किमान व्हीडीओपुरते का होईना, लाटणे-पळ्या हाती धरू लागले आहेत. रेसीपी आणि पदार्थांचे फोटो/व्हीडिओ यांनी तर व्हाट्सअपचा सर्व्हर ओसंडून वाहू लागला असेल. याला आपण बदल म्हणायचे का? हरकत नाही. पण हे बदल उद्या परिस्थिती सामान्य झाली, तुमचा वेळ नेहमीच्या कामकाजासाठी जाऊ लागला की विरघळून जातील. माणूस आतून बदलला तरच त्याला बदल म्हणता येतं आणि असे बदल सहजासहजी घडत नसतात. त्यासाठी प्रचंड अशी भावनिक, मानसिक, शारिरीक, भौगोलिक उलथापालथ घडावी लागते. त्या उलथापलथीचा कालखंडही मोठा असतो आणि परिणामही व्यापक असतात. जसे दुसऱ्या महायुद्धाचे झाले, हिरोशिमावरील बॉम्बफेकीचे झाले, भारत-पाक फाळणीचे झाले. ज्यांना ज्यांना या घटनांची झळ बसली ते ‘पहिले उरले’ नाहीत. करोनाची आपत्ती ही तसे पाहिले तर पहिलीच अशी आपत्ती असेल जी देश, धर्म, जात, भाषा, वर्ण, संस्कृती अशा सर्व सीमा ओलांडून जगाला व्यापून गेली. परंतु तीची तीव्रता, काळ, परिणाम आणि चटके आपल्यात ‘कायम स्वरुपी’ बदल घडविण्याएवढी नव्हती. माणूस फार चिवट प्राणी आहे, तो असा सहजासहजी हार जात नाही आणि गुडघे टेकत नाही. प्रेम, मैत्र, शत्रुत्व, आवडी-निवडी, सवयी, समज-गैरसमज, काळज्या, चिंता हे सगळे आपल्या व्यक्तिमत्वाला, स्वभावाला लगडून राहिलेले असते ते असे चटकन विलग होत नाही. त्याचे विलगीकरण झाले तर त्याला खरा बदल म्हणता येईल. पण तो होण्याएवढा ‘करोना’चा उत्पात नव्हता. ज्यांच्या घरी करोनामुळे काही विपरित घडले असेल, त्यांच्या कुटुंबांपुरता, इष्टमित्रांपुरताच त्याचा उत्पात असेल. असे काही व्यापक बदल आपल्यात करोनामुळे होऊ शकले नाही, हा काही आपला दोष नव्हे, तो मनुष्यमात्रांचा स्वभावधर्मच आहे. खरे तर ज्यांना खाण्यापिण्याची चिंता नव्हती, चार महिने पार पडू शकेल एवढी तजविज होती आणि काही टक्के कापून का होईना वेतन मिळत होते, त्या सर्व मंडळींना नेहमीच्या आयुष्यातून एक मोठ्ठा ब्रेक या निमित्ताने मिळाला. या ब्रेकचा आनंद घेण्यात काही दिवस गेले, मग ‘आता याचा कंटाळा आला’ असे म्हणेस्तोवर लॉकडाऊन संपण्याची शक्यता दृष्टीपथात आली. उदाहरणार्थ आपल्या पुनश्चचेच बघा. लोक आता थोडे निवांत आहेत, त्यांच्याकडे वेळ आहे, शिवाय डिजिटल मिडियाशी त्यांची जवळीक झाली आहे, तर मे महिन्यात पुनश्चचे नवे वर्गणीदार नेहमीच्या किमान दुप्पट तरी होतील असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही, सामान्य स्थितीत जेवढे होतात, तेवढेच मे मध्येही झाले. याचा अर्थ असा की ज्यांना साहित्य, इतिहास, सामाजिक बदल, गतकाळाचा धागा वर्तमानाशी कसा जोडला जातो याचा पडताळा, अशा विषयांत रस आहे, त्यांची संख्या ‘करोना’च्या तथाकथित जागतिक संकटानंतरही तेवढीच आहे. त्यामुळेच असा थोडा वेगळा विचार करणारांची, तुमची-आमची जी मर्यादित संख्या आहे, तेवढी तरी आपण जपली पाहिजे, दमादमाने वाढवली पाहिजे. अन्यथा, गझलकार संगीता जोशी यांनी त्यांच्या एका रचनेत म्हटल्याप्रमाणे ‘आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे’ ही आपली नेहमीचीच व्यथा असते, ती आताही मागील पानावरुन पुढे सुरु राहणार आहे. तेव्हा वाचत राहू भेटत राहू, व्यक्त होत राहू.

संपादकीय

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    अजून कोरोनाकाळ संपलेला नाही. आणखी बदल होऊ शकतील. बहुतेक फार मोठे नसतीलही.

  2. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    मस्त

  3. nvaishali1

      5 वर्षांपूर्वी

    वेगळा विचार ,एक सत्य

  4. Sanjaypalkar

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम आणि अंतर्मुख करणारा आहे,बदल ही खरोखरीच अंतर्मनाचा प्रक्रिया आहे

  5. Pradnya26

      5 वर्षांपूर्वी

    फारच अभ्यासपूर्ण...अत्यंत प्रामाणिकपणे मांडलेले विचार आणि observation अचूक आहे..

  6. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खूपच छान लिहिले आहे

  7. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    छानच लिहिले

  8. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    फारच छान पद्धतीने संपादक व्यक्त झाले आहेत. कोरोनामुळे मिळालेल्या अवकाशाचा प्रत्येकाने आपापल्या मानसिकतेप्रमाणे लाभच घेतलेला आहे. ज्यांच्या वर नोकरी गमावण्याची वेळ आली त्यांना बदलणे भागच पडले. पुनश्च हरि ओम म्हणून नवीन सुरुवात करताना अडखळणे स्वाभाविक आहे.

  9. shubhadabodas

      5 वर्षांपूर्वी

    जसे कोरोनावर औषध नाही तसे स्वभावालाही नाही,त्यामुळे माणूस पटकन बदलणे कठिणच आहे. पण १४/१५ वयाच्या मुलांवर काय होईल .

  10. dabhay

      5 वर्षांपूर्वी

    छान पण माझ्या मनात एक प्रश्न आला की krona काळात थोडेच व्यापार चालू होते आता या पुढे लोक ठराविक व्यापार च्या मागे लागणार तर नाही ना? माझ्या काही परिचित व्यक्तींनी किराणा मालाचे दुकान ,तर काहींनी फक्त कांदे बटाटे चा व्यापार सुरू केले आहेत। पूर्वी टुर अँड ट्रॅव्हल्स मध्ये होते।

  11. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    छान आहे धन्यवाद

  12. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान.

  13. pmadhav

      5 वर्षांपूर्वी

    मला वाटतं की निवडकांची मनमानी आणि सर्वसामान्यांचा सार्वत्रिक बधिरपणा स्पष्ट करणारा, तो नागडेपणाने समोर आणणारा हा काळ होता... भावी काळात पाळीव प्राण्यांसारखे पाळीव माणसं निर्माण होण्याची ही सुरवात असेल का ?

  14. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    छान विश्लेषण

  15. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    मनुष्य स्वभावाचे उत्तम निरीक्षण .

  16. nsanjay

      5 वर्षांपूर्वी

    छान..!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen