स्वातंत्र्यदिनाचा नवा संदेश

संपादकीय    संपादकीय    2020-08-15 12:00:47   

यावेळेसचा स्वातंत्र्यदिन अनेक अर्थांनी अभूतपूर्व असा आहे. केवळ भारतच नव्हे तर अवघे जग आज करोनाविरूद्ध एक प्रकारे स्वातंत्र्याचा लढाच लढत आहेत. या लढाईने माणसाचे जगणे आरपार बदलून टाकले आहे आणि आपल्या आयुष्याचा, जीवनशैलीचा पुनर्विचार करावयासही आपल्याला भाग पाडले आहे. जगातील सर्वाधिक सुसज्ज आणि श्रीमंत आरोग्य व्यवस्थाही किती हतबल होऊ शकते याचा धडा तर करोनाकाळाने दिला आहेच, सृष्टीच्या कौतुकाआड दडलेल्या भयावह रहस्यांची झलकही जगाला दाखवली आहे. जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये या ना त्या प्रकारे प्रलयाची संकल्पना अस्तित्वात आहे. प्रलयाची कल्पना मनुष्यजातीच्या मनात जन्माला आली ती बहुधा अशा प्रकारच्या हतबल करणाऱ्या संकटांमुळेच. मानवजात पृथ्वीतलावरून नष्ट होण्याची भीती हेच या संकल्पनांचे मूळ आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने कदाचित करोडो वर्षे सुरू असलेल्या एका प्रक्रियेचा तो क्षुल्लकसा अंश असू शकेल, परंतु मानवजातीसाठी मात्र अथक परिश्रम, प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या प्रगत समाजाच्या इतिहासाची ती इतिश्री असेल. त्यामुळेच आजचा स्वातंत्र्यदिन एका अर्थाने जगात सर्वत्र सध्या सुरु असलेला स्वातंत्र्यलढाच अधोरेखित करतो. करोनावर विजय मिळवण्यासाठी रशियाची लस कामी येते, अमेरिकेची येते की देशी प्रयत्न यशस्वी ठरतात याला मर्यादित महत्व आहे, यश कोणालाही मिळाले तरी त्यातून अखिल मानवजातीचे आयुष्यमान वाढणार आहे आणि आजघडीला तेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अवघी अवनी करोनामुक्त होऊन ‘पुनश्च’ आयुष्य प्रवाही व्हावे आणि  जीवनाची ‘बहुविध’ता त्याला प्राप्त व्हावी अशाच शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्यदिनी दिल्या पाहिजेत.

करोनाच्या संकटावर मात करुन जग पुन्हा ‘होते तसे’ व्हावे यासाठीचे प्रयत्न आता बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहेत, परंतु तरीही जग आता ‘होते तसे’ राहणार नाही याची खूणगाठ आपल्याला बांधावी लागणार आहे. आपले सारे आग्रह, निग्रह, हट्ट आणि हेके आपण जर करोनाच्या भीतीपायी गुंडाळून ठेवू शकतो तर मग सामाजिक सौहार्दासाठी तेच करायची वेळ आल्यावर एकमेकांना दंडांच्या बेटकुळ्या दाखविण्याची स्पर्धा का सुरु होते, याचा विचार आपल्याला आता करावा लागणार आहे. आज स्वातंत्र्याचा दिवस साजरा करताना, या स्वातंत्र्यातही किती प्रकारचे पारतंत्र्य आपल्याला जखडून ठेवू शकते याचा अनुभव आपण गेले पाच महिने घेत आहोत,याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर दोन तासांचा प्रवास करुन त्याच्या अंत्यदर्शनाला जाणेही शक्य होत नाही तेंव्हा मनाची स्थिती काय होते. मित्र-आप्त रूग्णालयात असताना त्याची विचारपूस करण्यासाठी जाण्याचे स्वातंत्र्यही परिस्थितीमुळे हिरावले जाते, तेंव्हा कसे वाटते. खिशात पैसा असतानाही दुकानांची बंद दारे आणि निर्मनुष्य रस्ते आपल्यात कशी परवशतेची भावना निर्माण करते या सर्व गोष्टी आपल्याला स्वातंत्र्याची किंमत आणि स्वातंत्र्याचा अर्थ नव्याने सांगताना दिसत आहेत.

जगरहाटी सुरु राहते, जगरहाटी सुरु राहणारही आहे, परंतु अवघ्या जगाला एखादा क्षुल्लकसा व्हायरस जेंव्हा वेठीला धरतो, जेरीस आणतो तेंव्हा आपण थोडे अंतर्मुख होऊन जगण्याचा विचार करणार आहोत की नाही?

एखाद्या देशासाठी, समाजासाठी स्वातंत्र्य ही आत्मसन्मानाची बाब असते. आपल्या देशाचा, समाजाचा, लोकांचा विकास कसा करावा, आपल्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. परंतु इंटरनेटच्या काळात एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावरील मालकीला आता मर्यादित अर्थ आणि महत्व उरले आहे आणि भविष्यात ते अधिकाधिक निरर्थक होत जाणार आहे. अमेरिकेतील एखादा ग्राहक पिझ्झाची मागणी नोंदवतो, तेंव्हा ती नोंदवून घेणारी व्यक्ती भारतात असते आणि ती मागणी प्रत्यक्ष पूर्ण करणारी यंत्रणा अमेरिकेत असते याचे आपल्याला आता नवल वाटत नाही. या आणि अशा अनेक तांत्रिक गोष्टी पूर्ण करण्यासाठीचे मनुष्यबळ यापुढे प्रत्यक्ष आपल्या देशात आणण्याऐवजी त्या त्या देशातच ‘राहू देऊन’ का वापरु नये असा विचार गेल्या पाच महिन्यांत बळावतो आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात अमेरिकेच्या सोयीसाठी भारतात घरीच राहून रात्रभर ‘ऑफिसात’ राहणारांची संख्या वाढू शकते.

सर्वच देशांचे हितसंबंध आज एकमेकांत गुंतलेले आहेत. जगाच्या एका टोकाला कुठेतरी जन्माला आलेला करोनाचा व्हायरस अवघ्या काही महिन्यांत मानवी शरीरांसोबतच प्रवास करत जगाच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात पोचतो यावरुनच आपल्याला दळणवळण, वावर आणि संबंध कसे खोलवर पसरलेले आहे याची कल्पना येते. दोन देशांमधील युद्धे आता आर्थिक आघाड्यांवर लढली जाणार आहेत आणि इंटरनेट हे त्याचे प्रमुख हत्यार असेल. केवळ आर्थिकच नव्हे तर वैचारिक, सांस्कृतिक लढेही आता इंटरनेटच्याच माध्यमातून लढले जात आहेत. करोडो रूपये खर्च करुन तयार करण्यात आलेली एखादी अमेरिकन वेबसिरिज आणि काही लाखांत तयार करावी लागलेली मराठी वेबसिरिज यांच्यातील स्पर्धा ही ‘समान पातळीवरील नाही’अशी तक्रार योग्य असली तरी ती करता येणार नाही, कारण ज्या ग्राहकाच्या हाती मोबाइल असेल त्याला तुमची आर्थिक कुवत काय आहे याच्याशी काही कर्तव्य नसेल. अशा परिस्थितीत आत्मनिर्भर वगैरे शब्दांना केवळ भावनिक अर्थ राहणार आहे, व्यावहारिक नव्हे.

या स्थितीत आपण स्वातंत्र्यानंतरच्या पाउणशे वर्षांच्या प्रवासाचा नेहमीप्रमाणे आढावा घेण्याला काही अर्थ आहे का? तर तो निश्चितच आहे, परंतु तसे करताना देश, समाज, धर्म, अस्मिता यांच्या तलवारी उपसून आता प्रगती होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. इतिहासांत कोणी काय चुका केल्या याची सतत उजळणी करुन चालणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. कारण आपले स्वतंत्र अस्तित्व असले तरीही आता त्याची नाळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवघ्या जगाशी जोडली गेलेली आहे. ‘अवघा रंग एक झाला’ ही केवळ भक्तीची भावना नसून ती सामाजिक गरज आहे हे आपण मनापासून स्वीकारले पाहिजे. स्वातंत्र्याच्या संकुचित अर्थाला तिलांजली देत आपण या संकल्पनेचा जेवढा विस्तार करु ते तेवढे अधिक अर्थपूर्ण होत जाणार आहे. व्यवहाराने जग एक होत असताना आपण भावनांनी एकमेकांशी घट्ट बांधून राहणे हाच देश, समाज, स्वातंत्र्य याचा नवा अर्थ आहे.

सर्व लोकव्यवहार नव्याने सुरळीत होतील तेंव्हा अनेकांना नवी दृष्टी, नवे भान आलेले असेल. पुढील चार-पाच वर्षात अपेक्षित असलेली डिजिटल क्रांती अचानक आलेल्या संकटामुळे गेल्या चार महिन्यांतच आली आहे. अमेरिकेत असलेल्या आपल्या नातवाला आजोबाही म्हणतात, अरे जरा ‘झूम’ वर ये ना. मग याच क्रांतीचा हात धरून आपणही उत्तम साहित्याला ‘झूम’ करुन डिजिटल करु पाहतो आहोत, तेंव्हा बहुविधवरील लेख वाचताना कागदाच्या सवयीची होणारी अडचण, मानसिकता आता संपायला हरकत नाही. आपल्यासाठी आजच्या स्वातंत्र्यदिनाचा हा डिजिटल संदेश आहे, असे म्हणूया हवे तर!

संपादकीय

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.