Warning: Use of undefined constant LINKEDIN_CLIENT_ID - assumed 'LINKEDIN_CLIENT_ID' (this will throw an Error in a future version of PHP) in /home/bahuvidh/public_html/post_details.php on line 93

Warning: Use of undefined constant LINKEDIN_CALLBACK_URL - assumed 'LINKEDIN_CALLBACK_URL' (this will throw an Error in a future version of PHP) in /home/bahuvidh/public_html/post_details.php on line 93
व्हिजन २०२०... - संपादकीय - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी

व्हिजन २०२०...

संपादकीय    संपादकीय    2020-12-30 14:36:27   

डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला की सर्वत्र नव्या वर्षाचे वेध लागायला सुरुवात होते. खरंतर नवीन वर्ष म्हणजे काय ? नव्या वर्षात सूर्य काही नव्याने उगवत नसतो किंवा मावळतही नसतो. त्याही पुढे जाऊन म्हणायचे तर, उगवण्या-मावळण्याच्या संज्ञा आपण उगाचच सूर्याला चिकटवून दिल्या आहेत. सूर्य तर त्याच्या स्थानी स्थिर आहे आणि आपण अव्याहतपणे त्याच्याभोवती फिरत असतो. त्यामुळे पृथ्वी उगवली अथवा मावळली हे सूर्यावरील लोकांनी म्हटले पाहिजे. पण ज्या सूर्यकृपेने पृथ्वीवर मानवी जीवन आहे त्याच सूर्याच्या गुणधर्मामुळे प्रत्यक्ष सूर्यावर जीवन असण्याची शक्यता नाही. मग तिथे असे म्हणणार तरी कोण ? 

 थोडक्यात कालगणनेस सोयीचे व्हावे म्हणून आपण नवीन दिवसाची सुरुवात सूर्योदयाने झाली असे म्हणत असतो. आता जे दिवसाचे तेच वर्षाचे. सध्याची जगन्मान्य कालगणना सुरू होण्याआधी म्हणजे, ख्रिस्ताच्या पूर्वीदेखील वर्ष होतेच की. फक्त आपण त्याला ३६५ दिवसांच्या समूहाने ओळखत नव्हतो. आणि तरीही जगाचा व्यवहार आजच्याप्रमाणे सुरळीत चालू होताच. मात्र मानवाच्या गत पिढ्यांचे कर्तृत्व मोजण्यासाठी कालगणना अतिशय महत्वाची ठरली. काळाच्या प्रचंड प्रवाहात मैलाचा दगड म्हणून वर्षपूर्तीचा टप्पा उपयोगी ठरू लागला. त्यामुळेच बदलत्या ऋतूमानानुसार जसे विविध उत्सव माणूस साजरे करतो तसेच वर्षपूर्ती किंवा नववर्षारंभ हाही एक उत्सव म्हणून उदयास आला असावा. 

 गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०१९च्या शेवटच्या दिवशी आपण हा उत्सव कसा साजरा करत होतो ? प्रत्येकाच्या आठवणी निराळ्या असतील. मात्र त्यातली नववर्षाच्या स्वागताची भावना नक्की सामायिक होती. २०२० म्हटल्यावर देशासमोर डॉक्टर अब्दुल कलामांचे व्हिजन : २०२० आठवत होते. भारत जागतिक महासत्ता होण्याचे जे भव्य स्वप्न त्यांनी पाहिले त्याची पूर्तता या एका वर्षात सोडा, एका दशकात देखील होण्याचे कोणतेही लक्षण त्यावेळी समोर दिसत नव्हते. मात्र एक राष्ट्र म्हणून किमान चार पाऊले पुढच्या दिशेने प्रवास केला का, याचे मंथन आपण करत होतो. आणि आगामी २०२० या वर्षात त्या अनुषंगाने काय काय भर पडू शकेल याचा आढावा सामाजिक स्तरावर घेतला जात होता.  

पण आज जेव्हा आपण या वर्षाच्या शेवटास येऊन ठेपलो आहोत त्यावेळी काय स्थिती आहे ? मानवी जगताचे चलनवलन थांबवून टाकणारे अभूतपूर्व कोरोना-संकट येईल आणि या ग्रहालाच जणू मुखपट्टी बांधली जाईल याची आपल्याला किंचित जरी कल्पना असती तरी आपण २०२० च्या स्वागताला धजावलो नसतो, असं आज वाटतंय.  गेल्या दहा महिन्यांत जगात, भारतात आणि महाराष्ट्रात काय घडलं त्याचे आपण सगळेच डोळस साक्षीदार आहोत. त्यामुळे त्याची स्वतंत्र उजळणी करण्याची आवश्यकता नाही.    

आणि तसाही एखाद्या घटनेचा आढावा ती संपल्यावर घेतला जातो. आज दहा महिन्यांनी देखील कोरोना संकटाच्या कुठल्या टप्प्यावर आपण उभे आहोत, याचे भाकीत करण्यास मोठमोठे आरोग्यतज्ज्ञ  धजावत नसताना आपण काही गृहीत धरणे चूक ठरेल. मार्च महिन्यात जेव्हा लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हा महिना-दोन महिन्यांत हे प्रकरण संपेल असा एकंदर अंदाज होता. मे महिना संपताना गणेशोत्सवापर्यंत तरी नक्की संकटमुक्त होवू अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पुढे ऑगस्ट-सप्टेंबर महीन्यात कोरोनाने भारतात एवढा हाहाकार उडवला की दिवाळीसुद्धा कोरोनाच्या भीतीत घालवण्याची  मानसिक तयारी आपण केली. आणि आज डिसेंबरमध्ये भारतात सर्वत्र रुग्णसंख्या झपाट्याने  कमी होतं चालली असतानाच इंग्लंडमधून येऊ घातलेल्या कोव्हीड विषाणूच्या नव्या प्रारूपाच्या भीतीने अनेकांची झोप उडाली आहे.     

त्यामुळे आता २०२० हे वर्ष म्हटल्यावर व्हिजन २०२० किंवा डॉक्टर कलाम न आठवता, एक विसरून जावे असे दुःस्वप्न डोळ्यासमोर येते. येऊ घातलेले २०२१ देखील जागतिक स्तरावरील नव्या संकटाचे सावट घेऊनच जन्माला येत आहे. त्यामुळे सरकारने नववर्षारंभ उत्सवांवर कडक निर्बंध घातले आहेतच, मात्र २०२१चे वैयक्तिक स्तरावर देखील स्वागत करावे की नाही याची साशंकता बहुसंख्य लोकांच्या मनात आहे.  

पण शेवटी माणूस हा स्वभावतः आशावादी  आहे. त्यामुळे सरत्या वर्षाबरोबर कोरोना संकटही सरतच जाईल अशी आशा वजा तीव्र इच्छा सर्वत्र आहे. कोरोनाने जागतिक संदर्भ आणि गणिते अनेक बाबतीत बदलून टाकली आहेत. वर्क फ्रॉम होम सारखी नवी संज्ञा अतिशय उपयुक्त वाटू लागली आहे. त्याच अनुषंगाने या कोरोनोत्तर काळात कुठले नवीन तंत्रज्ञान, कुठले नवीन शोध, कुठल्या नवीन संधी, कुठल्या नवीन सुविधा उपलब्ध झालेल्या असतील याची उत्सुकता लोकांच्या मनात आहेत. कोरोना संदर्भात अमेरिका किंवा युरोपच्या विपरीत सध्या भारतात जे दिलासादायक चित्र दिसतेय ते जर कायम राहिले तर येणारे नवीन वर्ष हे आपल्यासाठी नक्कीच सकारात्मक असेल.   

अब्दुल कलामांच्या व्हिजन २०२० मध्ये शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, माहिती -तंत्रज्ञान आणि आण्विक विकास या सहा क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश होता. कोरोनोत्तर काळात उद्योगांच्या स्वरूपात झालेले बदल आणि निर्माण होऊ घातलेल्या संधी हे वरील क्षेत्रांसाठी कसे फायदेशीर ठरू शकतील याकडे सरकार आणि खाजगी उद्योगांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कोरोना संकटाला ब्लेसिंग इन डीस्गाईझ ठरवण्याची हीच वेळ आणि संधी असू शकेल. देशातील सरकार, प्रशासन, अर्थतज्ञ आणि समाजधुरिण यांच्या एकत्रित प्रयत्नांनी ते शक्य होवू शकेल. अर्थात हा भलताच आदर्शवादी विचार आहे. असे घडण्याचा इतिहास आपल्या देशाला नाही. आणि आज राजकीय व आर्थिक स्तरांवर टोकाचे ध्रुवीकरण झालेली परिस्थिती पाहता या विचाराला मूर्खांच्या नंदनवनात बागडण्याची उपमा मिळण्याचीच शक्यता अधिक आहे. 

पण वर म्हटल्याप्रमाणे सामान्य माणूस आशेवर जगत असतो. उद्यादेखील कालचाच सूर्य उगवतो हे त्याला मनोमन माहीत असते. पण तरी नवीन वर्षात काहीतरी अधिक चांगले घडण्याची आशा मनाशी बाळगून तो त्याचे स्वागत करत असतो. म्हणूनच मग जगाच्या इतिहासात २०२० हे जरी कायमस्वरूपी दुःस्वप्न असले, तरी येणारे वर्ष नव्या संधीची चाहूल म्हणून गणले जावे अशी हुरहूर मनाशी बांधून सामान्य माणूस उत्सुकतेने २०२१  कडे बघत असेल, यात शंका नाही.      

आपल्या सर्वांच्या मनात जे आहे तसेच घडो या सकारात्मक प्रार्थनेसह, बहुविध टीमकडून सर्व सभासद व वाचकांना येत्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपली पुढील भेट आता नवीन वर्षातच होईल.


संपादकीय

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.