यवतमाळ साहित्य संमेलन आणि आधुनिक तंत्रस्नेही साहित्याची उपेक्षा

संपादकीय    किरण भिडे    2019-01-15 17:26:33   

पुनश्च सुरु केलं आणि मी खरा या साहित्याच्या प्रांतात आलो. तोवर आज तुम्ही सारे जसे बाहेरून या सगळ्या प्रकारची गंमत बघता तसाच मीही पाहायचो. पुनश्च सुरु केल्यावर विविध प्रकाशने, मासिके, लेखक या सगळ्यांची माहिती व्हायला लागली. मुळात मी दोन-तीन व्यवसाय करून इकडे आलेलो असल्याने मला हे सगळे आंतरिक ताणेबाणे समजून घेताना मजा येत होती. या सगळ्यांचा मिळूनही आर्थिक व्यवहार काही खूप मोठा नाही, पण हा साहित्य व्यवहार फार गुंतागुंतीचा आहे एवढे मात्र निश्चित झाले. आता हेच क्षेत्र आपण आपले करियरचे नवीन क्षेत्र म्हणून निवडल्यानंतर यात अधिक खोल जाणे, मुळातून काही गोष्टींचा अर्थ समजून घेणे क्रमप्राप्त होते. साहित्य संमेलन हा या क्षेत्राचा तसा मानबिंदू असल्यामुळे आता यापुढे साहित्य संमेलनाला उपस्थित राहणे माझ्या व्यवसायात 'अपडेट' राहण्याच्या दृष्टीने आवश्यक होते. म्हणूनच यावेळी जेव्हा एका छोट्या वादानंतर यवतमाळ हे साहित्य संमेलनाचे ठिकाण म्हणून ठरले तेव्हा 'चला, या निमित्ताने यवतमाळ ला जाता येईल' असाच विचार पहिल्या प्रथम मनात आला. तसंही शहरी मानसिकतेत मुंबई, पुण्यापलीकडे लोक पाहत नाहीत हा आरोप अनेक दिवसांचा आहे. म्हटलं या निमित्ताने हा अनेको वर्ष 'अनुशेष' राहिलेला भाग बघून येऊ. याशिवाय मग आपल्या या नवीन व्यवसायाबद्दल यवतमाळ करांना माहिती देणे, इतर व्यवसाय बंधूंना भेटणे, नेट्वर्किंग करणे हे हेतू होतेच. त्यामुळे मग नुसते साहित्यप्रेमी पर्यटक म्हणून न जाता थेट ग्रंथ प्रदर्शनात stall लावूया असंच ठरवलं. सुधन्वा ने रुकार दिल्यामुळे stall मध्ये बसायला दोन जणांची टीम पूर्ण झाली. बाकी काय ठेवणार stall मध्ये? आपल्याकडे काय आहे दाखवण्यासारखं? इथे खरी गोम होती. डिजिटल नियतकालिक असल्यामुळे जे काही होतं ते मोबाईल किंवा computer मध्ये. त्यामुळे stall चे नाव दर्शवणारा फ्लेक्स, लोकांना हातात देण्यासाठी म्हणून pamplets याउप्पर त्या stall मध्ये काय ठेवायचं आम्हाला सुचेना. त्यानुसार तयारी करून stall चे संमेलन आयोजकांकडे बुकिंग केले. नियमानुसार stall च्या शुल्कात एका माणसाची जेवण आणि राहण्याची सोय होती. आम्ही दोघे होतो म्हणून त्यांना तशी दुसऱ्या माणसाची सोय काही होऊ शकते का असं विचारलं तर ते थोडे गोंधळले. 'कोण आहे दुसरा माणूस?' 'माझा सहकारी आहे. त्याचीदेखील राहायची सोय करायची आहे.' 'का बरं? म्हणजे वेगळी सोय कशाला? तुमचा सहकारी तर stall मधेच झोपेल ना?' 'stall मध्ये? का बरं तो stall मध्ये झोपेल?' मी गांगरलो. 'अहो पुस्तकांबरोबर नको का कोणी? म्हणजे सिक्युरिटी म्हणून...' ओके...असं होतं तर. माझ्या लक्षात आलं. मी त्यांना म्हणालो की आमच्याकडे 'राखावं' असं काहीच नाहीये त्यामुळे माझ्या मित्राची सोय माझ्याबरोबरच करा. डिजिटल गोष्टीबद्दलचं आयोजकांचे असं आकलन तिथपासून लक्षात यायला लागलं. यवतमाळ ला पोचून आयोजकांना भेटून stall ताब्यात घेतल्यानंतर पहिली गोष्ट काय केली असेल तर ती राहायची सोय काय आहे ते तपासून बघणे. तिथपासून ते काल संमेलन संपवून निघेपर्यंत काय काय गोष्टी आमच्या लक्षात आल्या त्या खाली एकेक देतो. मान्य आहे सूर थोडा तक्रारीचा लागलाय. चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नाहीत का? असं वाटेल कोणाला. पण दीड वर्षाच्या पणतवंडाने ( आम्ही, पुनश्च ) 92 वर्षाच्या पणजीकडे तक्रार करायची नाहीतर काय वादचर्चा करायची? आशा आहे संबंधित हा सूर समजून घेतील. १. stall धारकांसाठी राहायची म्हणून जी सोय केली होती ती अतिशय सामान्य होती. एका मंगल कार्यालयात ओळीने गाद्या टाकून ठेवल्या होत्या. यावरून stall धारक या संज्ञेची त्यांची व्याख्या त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहायला हवी. माझ्यासारखा ( पक्षी: मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, सुखवस्तू ) कोणी व्यक्ती तिथे येऊ शकतो हे त्यांनी गृहीतच धरले नव्हते. लघुशंकेला जाण्याची सोय हा तर समस्त प्रदर्शनातला 'कळीचा' मुद्दा आहे. वर्षानुवर्ष या इतक्या महत्वाच्या गोष्टीकडे क्षुल्लक म्हणून दुर्लक्ष व्हावं? stall धारकांकडून घेतलेल्या ६१०० रुपयांमध्ये याहून चांगली अपेक्षा करू शकत नाही हे मान्य. पण मग हेच सगळं अर्थकारण आपण एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो का? २. आम्ही जेव्हा stall घेतला होता तेव्हा वाचकांनी तिथे गर्दी करावी आणि आंम्हाला भरपूर व्यवसाय मिळावा अशी आमची अपेक्षा अजिबात नव्हती. पण कमीतकमी आपली नोंद घेतली जावी एवढी माफक अपेक्षा नक्की होती. ती अजिबात पूर्ण झाली नाही. डिजिटल नियतकालिक म्हणजे काय हेच तिथे कोणाला समजत नव्हतं. मुळात आधी तिथे येणाऱ्या वाचकाला नियतकालिक हीच संकल्पना नवीन होती, त्यांच्या फार ऐकिवात नव्हती. यावरून नियतकालिकांनी त्यांच्या प्रसारासाठी कधी साहित्य संमेलनात भाग घेतला होता का? असा प्रश्न आम्हाला पडला. नियतकालिकांचा फार प्रसार झालेला नसणे हा cause की effect? मुळात साहित्यविश्वामध्ये नियतकालिकांना काही स्थान आहे का? विचार करून थोडे भंजाळून जायला झाले. आलेला प्रत्येक जण, अपवाद वगळता, वेबसाईट म्हटल्यावर e-बुक्स का? असं विचारत होता. म्हणजे त्यातल्यात्यात डिजिटल रुपात पुस्तकं असतात हे लोकांपर्यंत पोचलं आहे. पण डिजिटल लेख म्हणजे काय त्याची टोटलच त्यांना लागत नव्हती. जिथे लेख म्हणजे काय हेच समजणे कठीण तिथे डिजिटल लेख तर महाकठीण. ३. आमच्यासमोर एक stall होता, त्याचे नावच 'नादखुळा' असे होते. सध्याच्या सुमारांच्या सद्दीस योग्य असे नाव. तिथे त्या stall धारकाने निरनिराळ्या नोटांचे आणि पेनांचे कलेक्शन प्रदर्शन मांडून ठेवले होते. लोक अक्षरक्षः लाईन लावून ते प्रदर्शन बघत होते. मुळात अशा साहित्य विषयाबाहेरील प्रदर्शनाचा stall तिथे ठेवून आयोजकांनी काय साधले? पण गर्दी जमवण्यासाठी मात्र त्याचा हुकमी उपयोग होत होता. इतका की abp माझा आणि tv 9 चे वार्ताहर पण त्याचं stall ला गेले, एवढेच नव्हे तर सर्वश्री विनोद तावडे यांनाही त्या stall लाच जायचा मोह झाला. आमच्या तंत्र आधारित, पुढच्या काळाची चाहूल वगैरे असणाऱ्या stall कडे मात्र यातील कोणाचेही लक्ष गेले नाही. संमेलनात परिसंवादात भाग घेण्यासाठी म्हणून आलेल्या निरनिराळ्या वक्त्यांकडून पण या अशा तंत्राधारित नवकल्पनेची दखल घेण्याची अपेक्षा होती जी पूर्ण फोल ठरली. कोणीही वक्ता ( आम्हीतरी बघितला नाही ) प्रदर्शनात काय काय आहे? त्यात नवीन काय आहे? या उत्सुकतेने इकडे फिरकलासुद्धा नाही. मला खरंतर अरुणाताईंकडून अपेक्षा होती. निदान 'नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा' अशा विषयाच्या परिसंवादात भाग घेणारे वक्ते तरी आपल्या stall वर येतील अशी आशा होती. तीही फोल ठरली. 'साहित्यिकांचे आपल्याच विश्वात रमणे' म्हणायचे ते यालाच का? भिलार च्या लेखक- प्रकाशक संमेलनात जे घडले होते तेच इथेही पुन्हा पाहायला मिळाले. परिसंवादाचे विषय, त्यातील वक्ते या सगळ्यांच्या तोंडी विषय आहे डिजिटल क्रांतीचा, ती नक्की काय आहे? त्याचा आपल्या व्यवहारावर काय परिणाम होणार आहे? याबद्दल सगळेच भीतीयुक्त उत्सुक आहेत. पण या क्षेत्रात काय चाललंय याचं प्रतिबिंब आपल्या अशा संमेलनातून कधी दिसणार? ********** Google Key Words -  Yavatmal Sahitya Sammelan,  92nd Marathi Sahitya Sammela,  Sahitya Sammelan,  Techno friendly literature, Marathi digital literature, Book fair,  Marathi Book Fair,  Literary Conference,  Marathi Conference.  

संपादकीय , अनुभव कथन , साहित्य जगत , पुनश्च उपक्रम

प्रतिक्रिया

  1. akashvthele

      6 वर्षांपूर्वी

    Try digital marketing for Bahuvidh especially on Facebook. Also before going to such events, make a campaign of it and advertise on FB and other social media. Also visit events, annual gatherings by various colleges and promote the digital magazine there and also have your stalls there. In my college, WCE, Sangli, have शब्दांगन - Book exhibition type of event in Feb-March. You may also try there.

  2. सुधन्वा कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    संपादक कंपूने आपल्या सूचनांची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, पुढच्या वेळी वडापावादी स्कीम्सचा निश्चित विचार केला जाईल... :)

  3. शुभदा चौकर

      6 वर्षांपूर्वी

    यवतमाळ संमेलनाचे तुमचे अनुभव वाचले, खेद वाटला, मात्र आश्चर्य नाही वाटले. राहण्याची सोय अशीच असते अनेक ठिकाणी. सासवडला मी एका कार्यक्रमातील सहभागासाठी निमंत्रित म्हणून गेले होते, तेव्हा माझ्या वाट्याला आलेले हॉटेल भयंकर अस्वच्छ होते. आयत्यावेळी नवी सोय होणे शक्य नव्हते. शेवटी त्याच मालकांना तंबी देऊन ठेवली की मी संध्याकाळी परतेपर्यंत खोली व स्वचातागृह साफ करून ठेवा. अर्थात तरी यथातथा स्वच्छता केली त्यांनी.

  4. rakshedevendra

      6 वर्षांपूर्वी

    नादखुळा या शब्दावर किरण भिडे यांनी घेतलेला आक्षेप योग्य नाही असे कसे म्हणावे. नादखुळा या शब्दाचा अर्थ नेमका नि नेमका पक्का आहे, नाद करू नकोस हा शब्दप्रयोग देखील असाच नेमका म्हणजे माझ्या नादी लागू नगस असा नि इतकाच होतो. आता त्या सुमार stall बद्दल निदान साहित्य संमेलनात असा आक्षेप घेणे योग्य कसे नाही हे पण सांगावे. साहित्य म्हणजे सामान आणि सामानाचा कोल्हापुरी अर्थ पण स्पष्ट करावा नि तोच इथे या सारस्वतांच्या संमेलनामध्ये अपेक्षित धरावा का? किरण भिडे यवतमाळ येथे साहित्य संमेलना गेल्याचे कळले पण ते या संमेलनात stall धारक होतील याची काही कल्पना नव्हती. या लेखाद्वारे या online नियतकालिकासाठी ते करीत असलेले कष्ट देखील भावले नि आदर दुणावला हे खरे. पण ते ज्या धारणेद्वारे हा भलता उद्योग करायला गेले ते धाडसाचे (आर्थिकदृष्ट्या) खचितच होते. किरण साहेब अहो इथे डिजिटल क्रांती म्हणजे झेरॉक्स मशीनची सुधारित तांत्रिक सोय एव्हढीच सार्वजनिक आणि सामुदायिक जाणिव या व्यतिरिक्त आणि याहून अधिक ते दुसरे काही नाही. त्यामुळे संजनाताई सुचवितात त्याप्रमाणे जरा लोकांची भाषा म्हणजे लोकानुनय आत्मसात करायला शिका, असे केल्याने समस्त महाराष्ट्र कसा गुडी गुडी छान छान असेल, प्रवाहाविरुध्द पोहोण्याचे वंगाळ काम करायला मग कोण बरे पुढे येईल. कोण ते साळगावकर, त्यांनी कसे आम्हाला दिनदर्शिका घेण्याची वंगाळ सवय लावली हो, त्यानंतर (त्यापूर्वी) कलासक्त असलेला अवघा महाराष्ट्र कसा कलेपासून दूर दूर गेला, कसा असे काय विचारता. अहो ते कालनिर्णय आल्यानंतर ते चोकोनी चौकोनी ठोकळे कुठे नि त्या दिवसभर डोळ्यासमोर असणाऱ्या क्यालेंडर वरील ललना कुठे. आमच्या रंगीत संगीत भिंती कश्या रंगहीन केल्या नि ते ही पैसे खर्च करायला लावून विकत घेतलेले ते क्यालेंडर . आता हे किरण भिडे आणि कंपू (ग्यांग की हो) फुकट मिळणारे whatsapp कट्टा youtube चव्हाटा नि थोबाडपुस्तिके (फेसबुक हो) वरील फुकटचंबू विद्यापीठ कुठे नि हे विकत घ्यायचे हे online अंक कुठे. मुफ्त का चंदन - घीस मेरे नंदन ० असे आमच्या पचनी कसे पडावे हे विकतचे सोयर. औंदाच्या संमेलनात जरा मुंबईवरून जरा प्रेक्षणिय असे साहित्य आणा नि एका फुकटच्या लागिन (login) वर दोन वडापाव फ्री नि दोन लागिन वर तर पावा संगटी म्हस्का मारके दोन पेशल कटींग बी ठेवा, मंग बंघा कंची काळजी हा अंक प्रसिद्ध होणार नाय ते. तसे ते तुम्ही दहा पंधरा रुपये असेच गेला बाजार वाया घालविले असल्या कारणी पुढल्या खेपेला कै कै करता येईल ते बी बैजवार ठरवू यात असा ठराव येथे मांडण्यात येत आहे.

  5. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमची सूचना एकदम मान्य. आक्षेपही. स्वतःच्या परिघाबाहेर जायचं आहे म्हणूनच मुंबई, पुणे सोडून यवतमाळ ला गेलो होतो. त्यातून पोचण्याची इच्छा दिसते आहे, बरोबर ना? पण तुम्ही म्हणता तसा approach चुकत असेल. लेख वाचून प्रतिसाद टाकलात तसं साईट पाहून पण काही सुचवा ना... असा वेगळा विचार करणारे भेटणं हा मग या भेटीमागचा/ लेखामागचा हेतू साध्य होईल. मनापासून लिहित आहे. आशा आहे या भावना तुमच्यापर्यंत पोचतील. उत्तराच्या अपेक्षेत...

  6. संजना

      6 वर्षांपूर्वी

    आपल्या तक्रारींचा आदर ठेवून काही मुद्दे नोंदवते: 'नादखुळा' हा कोल्हापुरी शब्द आहे. आनंदोद्गार, खेळकरपणे आश्चर्य व्यक्त करणारा हा शब्दप्रयोग आहे. 'सध्याच्या सुमारांच्या सद्दीस योग्य असे नाव', हे आपण केलेले वर्णन या शब्दाचा उपमर्द करणारे आहे. असो. पुणेकेंद्री भाषाप्रभावामुळे हे होते, असे दिसते. डिजीटल नियतकालिकांविषयी माहिती नसण्याचा आपण केलेला उल्लेखही याच धर्तीचा आहे. लोकांची भाषा आत्मसात केल्यास कदाचित प्रतिसाद मिळेल. पाहा. अनेकांचे सकारात्मक अनुभव आहेत. तपासा. वाटल्याच शिका. अन्यथा "नादखुळा" म्हणायला लोक मोकळेच आहेत की.

  7. arya

      6 वर्षांपूर्वी

    भिडे साहेब, नवं तंत्र वा नवा विचार प्रारंभी अशा उपेक्षेचा धनी होतो खरा.पण माझ्यासारख्या तंत्रनिरक्षरालाही आपण या प्रकारच्या वाचनाची गोडी लावली, प्रेमळ मार्गदर्शन करत असता, न चिडता,न कातावता... फलित चांगलंच निघेल.खात्री असू द्या...

  8. chandrashekhar

      6 वर्षांपूर्वी

    यवतमाळ येथिल साहित्य संमेलनाचा आपलया stall बद्दल आलेल्या अनूभव आपण परखड पणे मांडलात हे बरे झाले. एकुणच मराठी साहित्य व साहित्यिक हे नविन तंत्रज्ञानाच्या युगात कोसो दूर आहेत काही सन्माननीय अपवाद वगळता. एकुणच वास्तवाची जाण नसणारी मंडळी बहुसंख्य दिसतात. आपण आलेल्या अनूभव मुळे नाऊमेद होण्याचे कारण नाही. पुणे मुंबई किंवा दुसरया कोणत्याही तंत्रज्ञानाच्या पुढारलेल्या शहरात आपणास नककीच खुप सकारात्मक प्रतिसाद मिळाला असता. कदाचित अन्य भागात हा बदल हळूहळू पण निश्चितपणे होईल. भारताच्या पश्चिम भागा पेक्षा पुर्व भाग नेहमीच मागे होता व आहे. कृपया साहित्य संमेलनात साहित्यिक दृष्टिकोनातून काय काय वैशिष्ट्य पुर्ण जाणविले त्या वर लिहावे. चंद्रशेखर यादव कोल्हापूर. हल्ली मु. बंगलोर.

  9. Niranjan Tinaikar

      6 वर्षांपूर्वी

    With reference to your lekh on Yavatmal sahitya sammelan and your experiences, I wish to convey you............. Bhidesaheb, please do not worry. Hundred Percent people will come to you. Keep your interest in this business alive. Just put few more days. It is said that one must have patience to wait for atleast 1000 days to get settled in to business. You have done fantastic job by providing old antique pieces of writings of stalwarts. No one has done this before. I have conveyed about Bahuvidh to my large many friends and all they liked very much. They are becomming your members shortly............. Thanks a lot.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen