लोकसत्तातील लेख

संपादकीय    किरण भिडे    2017-09-21 17:13:03   

घटस्थापनेच्या दिवशी #पुनश्च चे वाचकार्पण करीत असताना विशेष आनंद होत आहे. घटाची स्थापना करून देवीचा उत्सव सुरु करतात. #पुनश्च ची स्थापना करून साहित्याचा, वाचनानंदाचा हा सोहोळा सुरु करताना आनंदाबरोबरच जबाबदारीची जाणीव आहे. आणि एक हुरहूरही. मराठी नियतकालिकांच्या गेल्या १८५ वर्षांच्या इतिहासातून निवडक कालसुसंगत साहित्य निवडून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ही जबाबदारी आपण पार पाडू शकू ना? ही ती हुरहूर. #पुनश्च ची योजना समजावून सांगण्यापूर्वी हा प्रयत्न  करण्याच्या मागची आमची भूमिका, कोणाकोणाचं या कार्यात कसंकसं सहकार्य लाभले याबद्दल आधी थोडसं. मध्ये एक दिवस रत्नागिरीला गेलो होतो. १९९५-९६ साली पूर्ण एक वर्ष फिनोलेक्स कंपनीत नोकरीला होतो. एवढे दिवस तिथे राहूनही लोकमान्यांचे स्मारक, पतितपावन मंदिर, किल्ला या गोष्टी बघायच्या राहूनच गेल्या होत्या. तो योग त्यादिवशी आला. सहकुटुंब रत्नागिरी दर्शनाचा कार्यक्रम आखला. मी राहायचो ती फिनोलेक्स कंपनीची कॉलनीदेखील या प्रेक्षणीय स्थळात घुसडून दिली. कारण खरंतर माझा इंटरेस्ट तिथेच जाण्यात होता. बाकी तीन गोष्टींशी माझ्या काही आठवणी जोडलेल्या नव्हत्या. कॉलनीशी होत्या ना? :-) नोस्टाल्जियात किती ताकद असते ना; एखाद्या टाईम मशीन सारखी ती आपल्याला गतकाळात फिरवून आणते. पण ही जुनी स्मारकं जर चांगल्या पद्धतीने राखली असतील तर त्यांच्यातही तेव्हढीच किंबहुना त्याहून अधिक ताकद असते याची मला लोकमान्यांचे स्मारक बघितल्यावर कल्पना आली. ते वाड्यासारखं दिसणारं घर, आत सर्वत्र लावलेले फोटो, लोकमान्यांनी लिहिलेले लेख वगैरे गोष्टी त्याच टाईम मशीन चं काम करीत होत्या. फिरत फिरत मी केसरी तल्या लोकमान्यांनी लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखापाशी आलो. उभ्या उभ्याच तो लेख वाचला. आणि मी लोकमान्यांच्या प्रतिभेने अवाक् झालो. मी समजा आज एखादं वृत्तपत्र काढलं तर असाच ( किंवा अगदी थोडे बदल करून हाच ) लेख लिहीन. काही काही लेखन किती कालातीत असतं ना? रत्नागिरीहून आल्यावर मला नादच लागला असे लेख शोधून काढून वाचण्याचा. १८३२ साली मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र 'दर्पण' सुरु झालं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरंतर ते पूर्ण मराठीत नसायचं म्हणजे काही लेख इंग्रजीत असायचे. पूर्ण मराठीतलं पहिलं वृत्तपत्र होतं 'मुंबई अखबार' ( १८४० साली ). १८४१ साली भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' सुरु केला, ज्यात लोकहीतवादींची शतपत्रे प्रथम प्रकाशित झाली होती. तिथपासून आपल्याकडे नियतकालिकांची एक उज्ज्वल परंपराच सुरु झाली. (मराठी माणसाची प्रकट होण्याची उर्मी किती जबरदस्त आहे याचा अंदाज येण्यासाठी फक्त विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे उदाहरण घेतले तरी पुरे. उण्यापुऱ्या ३२ वर्षाच्या आयुष्यात ( वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर शालापत्रक आणि विचारलहरी ही मासिकं चालवत ) स्वतःचे निबंधमाला मासिक काढले, केसरी, मराठा ही वृत्तपत्रे काढली आणि डेक्कन एज्युकेशन ( न्यू इंग्लिश स्कूल ) ही संस्थादेखील टिळक, आगरकरांबरोबर काढली). निबंधमाला, शतपत्रे, आगरकरांचा सुधारक यातील लेख वाचायला मिळाले. या सगळ्या लेखांचे संग्रहच पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले आहेत त्यामुळे ते मिळणं सोपं होतं. पण खरी मदत झाली बदलापूरच्या श्याम जोशी यांच्या 'ग्रंथसखा' वाचनालयाची. तिथे गेलो आणि हिरे माणकांनी भरलेली एखादी गुहाच आपल्याला मिळावी असा आनंद झाला. म्हणाल ते जुनं पुस्तक, नियतकालिक तिथे उपलब्ध आहे. १९०९ साली का.र.मित्र यांनी काढलेल्या पहिल्या दिवाळी अंकापासुनचे सगळ्या महाराष्ट्रात प्रकाशित होणारे दिवाळी अंक तिथे मला मिळाले. माणूस, सत्यकथा, ललित यांचे सर्व जुने अंक एकगठ्ठा होतेच पण लहानपणी वाचलेले आणि ( अजूनही ज्यांची नावं लक्षात आहेत आणि ज्यामुळे मराठी भाषेची गोडी लागली ) 'मुद्राराक्षसाचा विनोद' किंवा 'उपसंपादकाच्या डुलक्या' अशी बहारदार सदरे असलेले अमृत, विचित्रविश्वचेही सर्व अंक होते. अंतर्नाद, आजचा सुधारक, परिवर्तनाचा वाटसरू अशा वैचारिक स्वरूपाचे लेख ज्यात मुख्यत्वेकरून असतात असे अंक वाचताना खूप आनंद मिळत होता. एका बाजूला त्या लेखांच्या 'चिरतरुण' असण्याचं कौतुक वाटत होतं तर दुसऱ्या बाजूला 'याचाच एक अर्थ असा की परिस्थितीत काहीच बदल/सुधारणा नाही' हे कळून वैषम्य. पण हे तर सामाजिक विषयाच्या चिंतनासंदर्भातील लेखांबद्दल झालं. ललित साहित्यातले कितीतरी अन्य प्रकार जसे की अनुभवकथन, कला/साहित्य रसास्वाद, कथा, स्थलवर्णनात्मक लेख सापडले जे त्या त्या नियतकालिकाच्या वाचकांपलीकडे कितपत पोहोचले असतील शंकाच आहे. आणि हे लेखन वाचताना आपण 'जुनं' काहीतरी वाचतोय असं अजिबात वाटत नाही. वाटलं हे सगळं लोकांपर्यंत पोचायला हवं. कसं? पुन्हा छापील माध्यमातून गेलो तर मर्यादित वाचकांपर्यंतच ते पोचेल. जर डिजिटल माध्यमाची मदत घेतली तर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचणे शक्य आहे. शिवाय एकदा हे साहित्य डीजीटाईज झाले की कायमस्वरूपी उपलब्ध राहील. भविष्यातही कोणाला ते वाचायचे असल्यास सहज शक्य होईल. दुसरे कोणीतरी करेल अशी अपेक्षा करीत वाट पाहण्यापेक्षा आपणच हे काम करायचे ठरले.  मनात योजना तयार होत होती. जुन्या उपलब्ध ललित साहित्यातून असे कालसुसंगत लेख शोधून काढायचे. ते डिजिटल स्वरुपात आणायचे. आणि वेबपोर्टल व app च्या द्वारे वाचकांपर्यंत पोहोचवायचे. अशी ती योजना. आज भरपूर साहित्य (जर त्याला साहित्य म्हणायचं झालं तर..) online स्वरुपात विनाशुल्क वाचायला लोकांना उपलब्ध असताना आपण त्यात भर घालणे मला संयुक्तिक वाटले नाही. म्हणूनच अत्यल्प का होईना वर्गणी भरू इच्छिणाऱ्या वाचकांनाच यात सामील करून घ्यायचे वगैरे गोष्टी ठरवल्या. योजनेबद्दल थोडी अधिक माहिती अशी... सध्या दर आठवड्यात बुधवारी एक आणि शनिवारी एक असे मिळून दोन लेख वर्गणी भरणाऱ्या वाचकांना पाठवायचे. अनुभवकथन, चिंतन, कविता/चित्रपट रसास्वाद, अर्थकारण/समाजकारण/राजकारण तसेच विज्ञान/तंत्रज्ञान, शिक्षण, पालकत्व, तत्कालीन घटनांवरचे लेख अशा विविध विषयांवरचे लेख त्यात असतील. वाचक लेख एकतर वेबसाईटवर किंवा मोबाईल app वर वाचू शकेल. त्यावर प्रतिक्रिया देऊ शकेल. वाचताना अडलेल्या शब्दांचे अर्थ तिथेच मिळण्याची सोय असेल. आलेल्या सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी वाचण्याची सोय मिळेल. शिवाय आपल्याला आवडलेला लेख इतरांनी वाचावा असं वाटल्यास सोशल मिडियावर फोरवर्ड करू शकेल. आज जरी लेखाच्या लेखकाला आपण ठराविक पैसे देणार असलो ( जे खरेतर त्या लेखाच्या मूल्यापुढे खूप कमी असतात ) तरी उद्या लेखाच्या वाचनप्रीयतेशी लेखकाचे मानधन जोडण्याचा आपला इरादा आहे. तंत्रज्ञानामुळे ही जोडणी शक्य होईल. वर्षभरात असे १०४ लेख आपल्याला वाचायला मिळतील तेही फक्त १०० रुपयात. म्हणजे लेखाची किंमत १ रुपयाहुनही कमी ठेवली आहे. कुठचाही वाचक त्यामुळे 'परवडत नाही' हे कारण देऊ शकणार नाही.:-) हे सध्या सुरुवातीला म्हणजे phase १ मध्ये. नंतर phase २ मध्ये अंतर्नाद मध्ये आलेला 'बंद करा ही समाजसेवेची दुकानदारी' या शरद जोशींच्या दीर्घ लेखासारखे लेख, वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद जसा 'साहित्यिक आणि लोकशाही शासन संस्था' ( १९७७ 'राजस' दिवाळी अंक ), मुलाखती/कथाकथन/अभिवाचनाच्या ऑडीओ क्लिप्स असे वेगवेगळे साहित्य प्रकार a-la-cart स्वरुपात उपलब्ध करून ठेवता येतील. ज्यांना हवाय ते तो प्रकार download करून घेऊ शकतील. तसंच एखाद्याला 'अनुभवकथन' सारख्या एखाद्या विशिष्ट लेखन प्रकाराचे सभासदत्व हवे असल्यास तसेही करता येईल. एखाद्याला जुन्या अंकातला लेख उपलब्ध करून हवं असेल तर 'demand a लेख' सारखा प्रकार करता येईल. करता येण्यासारख्या गोष्टी खूप आहेत फक्त घेणाऱ्याची इच्छा आणि देणाऱ्याची क्षमता या दोन्ही गोष्टींचा मिलाफ घडून यायला हवा. हे वेबपोर्टल आणि app बनवण्यासाठी विनय सामंत यांची खूप मदत झाली. कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्याच्यावर बरीच चर्चा त्यांच्याबरोबर झाली. लोकसत्ताचे गिरीश कुबेर, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि मटाचे श्रीकांत बोजेवार यांनीही माझा उत्साह वाढवला. अंतर्नादचे भानू काळे, कालनिर्णयचे जयराज साळगावकर, साधना साप्ताहिकाचे विनोद शिरसाठ आणि ललितचे अशोक कोठावळे यांनी त्यांचं साहित्य उपलब्ध करून दिलंच पण उपयुक्त सूचनाही केल्या. त्यांचाही मी आभारी आहे. मराठीतले हे सदाबहार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे याआधीही प्रयत्न झालेत, #पुनश्च हे मराठीतले पहिलेच सशुल्क सभासदत्व असणारे डिजिटल नियतकालिक आहे. नव्या युगाच्या नव्या माध्यमांतून वाचकांपर्यंत पोहोचायचा हा प्रयत्न तुम्हा सर्व वाचकांच्या साथीने यशस्वी होईल यात शंकाच नाही. Google Key Words - Punashch, Kiran Bhide, Granthasakha Library, Bhanu Kale , Marathi Digital Periodical, Digital  Periodical, Sadhana, Vinod Shirshath, Lalit, Ashok Kothawale, Shrikant Bojewar, पुनश्च सशुल्क सभासद

लोकसत्ता , अनुभव कथन , पुनश्च उपक्रम

प्रतिक्रिया

 1. tulja

    2 वर्षांपूर्वी

  खूप छान.

 2. modakad

    4 वर्षांपूर्वी

  Apatim upakram ahe !!! Anek shubhechha !!!!

 3. kiran bhide

    4 वर्षांपूर्वी

  अहो त्यांचा उल्लेख न करणं म्हणजे मोठा कृतघ्नपणा ठरेल. खुपच छान काम आहे त्यांचं

 4. ANJALI

    4 वर्षांपूर्वी

  ग्रंथसखाचा उल्लेख वाचून आनंद वाटला. ही माझ्या काकाची श्याम जोशी यांची वाचन संस्कृतीची चळचळच आहे ?

 5. kiran bhide

    4 वर्षांपूर्वी

  app उद्या download करता येईल. subscribe करायचे असेल तर punashcha.com वर जाऊन करू शकता.

 6. ravindraf

    4 वर्षांपूर्वी

  App Play store var disat nahi....Kahi veglya navane ahe ka?वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.