पहिले ते मराठीकारण – धन्यवाद आदित्य ठाकरे!

शिवसेनेला कार्यकर्ते पुरवणारा समाज मराठी आहे, पण पैसे पुरवणारे मात्र वेगळ्या समाजातले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये न शिकल्याने मराठी माध्यमांचा मराठी भाषेशी आणि मराठी भाषेचा मराठी माणसांशी काय संबंध आहे याची आदित्य ठाकरे या तरुण राजकारण्याला कल्पना असण्याचे कारण नाही. बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात उद्धवची आणि आदित्यची काळजी घ्या, असे शिवसैनिकांना आर्जवाने सांगितले, त्यांनीही ते मनावर घेऊन शिवसेना कोसळू दिली नाही. एवढेच नव्हे तर आदित्याच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला तरुण संसदीय राजकारणात उतरला यापेक्षा अधिक मराठी समाजाने शिवसेनेसाठी काय करायला पाहिजे? मराठी समाजाने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घेतली, पण हे दोघे मराठी समाजाची काळजी घेतायत का हा प्रश्न कोण विचारणार?

———————————————————————————————————————————————————————————-

२५ जुलै १९५९ या दिवशी दैनिक ‘मराठा’च्या अंकात आचार्य प्र. के. अत्रे यांनी तरुणांना आवाहन करताना ‘शिवसेना उभारा’ असे म्हटले होते.  जानेवारी १९६३ मध्ये दैनिक ‘मराठा’मधून अत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेना या संघटनेबद्दल विचार मांडले होते. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी. या दोघांच्यासह वा. रा. कोठारी , ग. त्र्यं. माडखोलकर अशा स्वतंत्र प्रज्ञेच्या पत्रकारांनी संयुक्त महाराष्ट्राचा झेंडा खांद्यावर घेतला त्यामुळे नेहरूंची अनिच्छा आणि यशवंतरावांचे काठावर राहणे या दोन्हीवर मात करून बेळगाव, बिदर, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव, भालकी यांचा समावेश नसलेला अपुरा का होईना महाराष्ट्र आपल्या हाती आला. हा लढा चालू असताना मराठी तरुणांच्या पोटाचा प्रश्न अनेकांना दिसत होता, पण संयुक्त महाराष्ट्र समिती मोडल्यामुळे हे नवं राजकारण उभं राहू शकलं नाही. त्या पोकळीतून शहरी मध्यमवर्गीय मराठी तरुणांच्या असंतोषाला वाव देणारी शिवसेना निर्माण झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या एका मुलाखतीत ‘शिवसेना’ हे नाव प्रबोधनकारांनी सुचवले आणि आपण वापरायला घेतले असे सांगितले आहे. अत्रे आणि प्रबोधनकार दोघेही प्रतिभावान, त्यामुळे अत्र्यांना जे नाव सुचले असेल ते प्रबोधनकारांना सुचले नसेल असे म्हणण्याचे कारण नाही. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिल्लीपतींना हिकमतीने अंगावर घेणारा अत्र्यांसारखा माणूस शिवसेनेच्या कोणत्याही इतिहासात नसणे स्वाभाविक आहे याचे कारण बाळासाहेबांच्या लेखी अत्रे म्हणजे केवळ ‘वरळीचे डुक्कर’ होते. अत्रे हे संघटक नव्हते, पण त्यांची मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दलची निष्ठा वादातीत होती. या उलट बाळासाहेब वक्ते तर होतेच आणि संघटकही होते. अत्र्यांच्या कल्पनेतील शिवसेना उभी राहिली असती तर ती बाळासाहेबांच्या कल्पनेतल्या शिवसेनेपेक्षा वेगळी असती. पण  मराठी समाजाचे ते भागध्येय होते असे म्हणता येईल. ज्या एका विशिष्ट मर्यादेत शहरी कनिष्ठवर्गीय मराठी माणसांच्या कारकुनी नोकर्‍यांचा प्रश्न बाळासाहेबांनी हाताळला, तिथपासून सुरू झालेला शिवसेनेचा प्रवास आता ‘केम छो वरली?’ या आदित्य ठाकरेच्या जाहिरातीपर्यंत येऊन पोहोचला आहे. साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सुफळ संपूर्ण झाली आहे.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना १९८०च्या सुरुवातीपर्यंत ‘मराठी मना तुझ्यासाठी उभी शिवसेना’ असे किमान म्हणत होती; पण तेव्हाही शिवसेनेला मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीच्या प्रश्नांचा गाभा कळला होता असे नाही. १९८५ पासून आजतागायत ‘मराठी मना हिंदुजना तुझ्यासाठी उभी शिवसेना’ असे म्हणत शिवसैनिकांना राममंदिराच्या विटा उचलण्यात किंवा दंगलींच्या माध्यमातून त्यांची ताकद प्रस्थापित करण्यात शिवसेनेने धन्यता मानली आहे. मधल्या काळात उद्धव ठाकरे यांनी ‘मी मुंबईकर’ या नावाची मोहीम चालवली. त्यांचे आणि राज ठाकरे यांचे बिनसण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक मुंबईकर, मग त्याची भाषिक – धार्मिक पार्श्वभूमी काहीही असो, ही कल्पना या मोहिमेमागे होती. पण प्रत्येक मुंबईकर म्हणवणार्‍याला मराठी यायला हवी की नाही याबद्दल या मोहिमेत स्पष्टता नव्हती. राज ठाकरे यांना मानणार्‍या भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे भरती परीक्षेला आलेल्या तरुणांना मारहाण केली तेव्हापासून मराठी का हिंदू? ही फट तेव्हापासून शिवसेनेच्या विचारात कायमच राहिली आहे. उत्तर भारतीयांना सोबत घेऊन छटपूजेचे कार्यक्रम करायचे, त्यांना बरे वाटावे म्हणून ‘दोपहर का सामना’ असे वर्तमानपत्र काढायचे, तरीही ‘आम्ही महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू आहोत’ असे गाजर मराठी समाजाला दाखवायचे याचा ‘केम छो वरली’ हा दुसरा अंक आहे.

शिवसेनेला कार्यकर्ते पुरवणारा समाज मराठी आहे, पण पैसे पुरवणारे मात्र वेगळ्या समाजातले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये न शिकल्याने मराठी माध्यमांचा मराठी भाषेशी आणि मराठी भाषेचा मराठी माणसांशी काय संबंध आहे याची आदित्य ठाकरे या तरुण राजकारण्याला कल्पना असण्याचे कारण नाही. बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात उद्धवची आणि आदित्यची काळजी घ्या, असे शिवसैनिकांना आर्जवाने सांगितले, त्यांनीही ते मनावर घेऊन शिवसेना कोसळू दिली नाही. एवढेच नव्हे तर आदित्याच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला तरुण संसदीय राजकारणात उतरला यापेक्षा अधिक मराठी समाजाने शिवसेनेसाठी काय करायला पाहिजे? मराठी समाजाने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घेतली, पण हे दोघे मराठी समाजाची काळजी घेतायत का हा प्रश्न कोण विचारणार?

आज आदित्यची उमेदवारी ज्या वरळी मतदारसंघातून आहे तो सगळा मध्यमवर्गीय मराठी समाजाच्या गिरणीकामगारांच्या वस्तीचा भाग आहे. पण कारस्थान केल्याप्रमाणे गिरण्या बंद पाडल्या गेल्या. मिलच्या जागी मॉल उभे राहिले. प्रचंड महागडी घरे आणि त्यामध्ये वस्तीला आलेला भांडवलाची भाषा कळणारा समूह एकीकडे आणि राहायला जागा पुरत नाही आणि मुंबईत घर घ्यायला पैसा पुरत नाही म्हणून डहाणूपासून खोपोली, पनवेलपर्यंत फेकला गेलेला मराठी माणूस दुसरीकडे या परिस्थितीत शिवसेना काय करते आहे आणि काही करू इच्छिते आहे का ?

राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढल्यामुळे शिवसेनेकडून दुरावलेला तरुण वर्ग पुन्हा शिवसेनेच्या पंखाखाली यावा म्हणून आदित्य ठाकरे हा चेहरा ठरवून पुढे आणला गेला. सत्ता असेल, हातात मुबलक पैसा असेल आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली अविच्छिन्न पण अजिबात विचार करायला सवड न देणारी निष्ठा असेल तर आदित्य ठाकरेच काय कोणाचेही लॉंचिंग होणे सहज शक्य आहे. पण आदित्यचे राजकारण मराठी माणसाचे राजकारण आहे का? ते मराठी भाषेचे नाही याची मला जवळपास खात्री आहे कारण आदित्य ठाकरे यांचा वरदहस्त असलेल्या शिक्षणसमितीतल्या स्वीकृत नगरसेवकांच्या पुढाकाराने महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये इंग्रजी ही प्रथम भाषा होणे, मुंबई पब्लिक स्कूल नावाचा खेळखंडोबा सुरू होणे आणि सगळ्यात कहर म्हणजे महापालिकेच्या एसएससी बोर्डाच्या शाळा बंद करून त्या जागी सीबीएससी आणि आयसीएससी शाळा सुरू करणे असे अनेक लघु आणि कुटीर उद्योग मराठीवादी म्हणवल्या जाणार्‍या शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या अखत्यारीत घडत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला भूतपूर्व मराठीवादी पक्ष का म्हणून नये यासाठी या पक्षाने काहीतरी पटणारे उत्तर दिले पाहिजे. समाजमाध्यमांवरील शिवसेनेच्या भक्तांना असे वाटू शकेल की, शिवसेनेनेच मराठी भाषेचा, मराठी माणसाचा ठेका घेतला आहे का? इतर पक्षांना का प्रश्न विचारले जात नाहीत? कोणाला प्रश्न विचारायचे हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसवाल्यांना सतत अशी भीती वाटते की, मराठीसाठी आग्रह धरला तर अमराठी विशेषतः उत्तर भारतीय आपल्यापासून दूर जातील. त्यामुळे दोन दगडांवर पाय ठेवणारा काँग्रेस पक्ष कधी शिवसेना तर कधी मनसे यांच्या तैनाती फौजा वापरून मराठी आणि अमराठी या दोन्ही मुद्द्यांची भेळ करण्याचा प्रयत्न करतो असा आक्षेप घेतला जातो आणि तो आक्षेप खराही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रत्यक्षात महाराष्ट्रापुरता पक्ष असला तरी शरद पवारांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेमुळे आताआतापर्यंत हा पक्ष तथाकथित सर्वसमावेशक भाषा बोलत होता. हिंदी-हिंदू-हिंदुस्तान या मानसिकतेतल्या भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना राष्ट्रीय पातळीवर पाशवी बहुमत मिळाल्यामुळे शांततेच्या काळातले मराठीपण सोडून सत्तेच्या काळातले हिंदुत्व जोपासण्यात त्यांची ताकद खर्ची पडू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा खूप आशा निर्माण करणारा, पण प्रत्यक्षात मराठी समाजाचे वैफल्य वाढवणारा पक्ष ठरला आहे. नुसती आश्वासक ब्ल्यूप्रिंट लिहून चालत नाही तर ती लोकांपर्यंत नेण्यासाठी रक्तही आटवावे लागते. ते न झाल्याने या पक्षाचे परिघीकरण झाले आहे. राहिले समाजवादी, डावे आणि दलितांचे पक्ष, शिवसेनेने मराठीचा मुद्दा अंगिकारल्यानंतर मराठीचा मुद्दा जणू काही बाटल्याप्रमाणे डाव्या आणि समाजवाद्यांनी त्याकडे बघायला नकार दिला आहे. तर दलितांच्या चळवळीत ‘ही भाषा तर ब्राहमणांची! आमची नव्हेच’ या द्विमितीतून बाहेर पडता येईनासे झाले आहे. अशा परिस्थितीत दुर्दैवाने मराठीजनांच्या आणि इतरांच्या मनात शिवसेना म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे शिवसेना असे आत्मघातकी चित्र निर्माण झाले आहे.

अशा वातावरणात कुटुंबाच्या पार्श्वभूमीच्या आधारे आदित्य ठाकरेंसारखा तरुण मुलगा राजकारणात उतरतो त्यावेळी त्याने आपल्या मूळ कार्यक्रमपत्रिकेशी अधिक प्रामाणिक राहावे अशी अपेक्षा असते. एखाद्या भाषेमध्ये जाहिरात केल्याने फरक पडत नाही त्यामागच्या मानसिकतेने फरक पडतो. आज मुंबई शहरात भांडवल कोणाच्या हातात आहे? इथल्या इमारतींमधली गुंतवणूक कोणाची आहे? झोपडपट्टी पुनर्विकास योजना, इमारत पुनर्विकास योजना यांसारख्या योजनांचा खरा लाभार्थी कोण आहे? राजकीय पक्षांना निवडणुकांच्या आगेमागे प्रचंड देणग्या कोण देतो? महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत टेबलांमागे बसून काम करणारा कारकून ते सनदी अधिकारी हे बहुतांश मराठी असले तरी ते कोणाचे हितसंबंध जपतात? मराठी माणसांना गणपती, शिवजयंती, नवरात्र , पाडवा , साईबाबांच्या पालख्या अशा धार्मिक व्यवहारात गुंतवून ठेवून आणि त्यासाठी त्यांना पैसे पुरवून त्यांची आर्थिक नाकेबंदी कोण करते? या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे दिल्याशिवाय मराठी माणसांचा रुतलेला रथ पुढे हलणार नाही. आदित्य ठाकरेंच्या जाहिरात टीमने ज्या मोठ्या होर्डिंगवर गुजराती आणि तेलगूतल्या जाहिराती लावल्या, त्या होर्डिंग कोणाच्या मालकीची आहे? ते लावण्याचे कंत्राट महापालिकेने कधी, कसे आणि कोणत्या अटींवर दिले आहे? या प्रश्नांची उत्तरे नीट शोधली की आदित्य आणि टीमचे भाषिक स्थलांतर आपल्याला नीट कळू शकेल.

व्हॅलेन्टाइन डेला अर्चिसची दुकाने फोडणे, तरुण मुलामुलींना बदडणे इथपासून या विषयावर काहीच न बोलणे इथवर शिवसेनेचा राजकीय प्रवास आदित्यसोबत झाला आहे. हा बदल स्वागतार्ह आहे, पण  मराठी माणूस आणि मराठी भाषा हा आपला कणा आहे असे सार्वजनिक व्यवहारात सांगणार्‍या पक्षाने मराठी माणसांचे घर, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि मराठी भाषेचा व्यवहारातून कडेलोट होताना पाहायचे हे फारसे भूषणावह आहे असे म्हणता येणार नाही. पण राजकीय अभ्यासक – कार्यकर्त्यांच्या अरण्यरुदनाला प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात किती मोल आहे हे मला माहीत आहे म्हणून आदित्य ठाकरे हा तरुण नव्या मराठी माणसांचा चेहरा आहे, पण तरी तो असा का वागतो असे प्रश्न विचारून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा मराठी माणसांचे आणि मराठी भाषेचे खरे राजकारण म्हणजे मराठीकारण  कोणते आहे आणि ते शिवसेना आणि आदित्य ठाकरे करत आहेत का? असा अधिक रास्त प्रश्न आपण विचारायला पाहिजे. तो विचारला की एका जाहिरातीभोवती घुटमळून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमला फुकटात हवी असलेली नकारात्मक प्रसिद्धी मिळवून देण्याचे पातक आपल्याकडून घडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवूया की, मराठी माणूस आणि मराठी भाषा हे शिवसेनेने आपल्या राजकारणाचे साधन म्हणून वापरले असले तरी मराठी भाषा आणि मराठी माणूस आणि त्यांची प्रगती व जतन, संवर्धन हेच साध्य आहे. आज शिवसेना हे त्याचे वाहन असेल उद्या असेलच असे नाही. काळ बदलतो तशी वाहने बदलतात. नव्या वाहनांचा शोध चालू ठेवूया. बोगदा संपून कधी ना कधी का होईना उजेड दिसायला लागतोच. मराठी समाजाला हा उजेड दिसायला राज्याच्या स्थापनेनंतर सहा दशकांचा वेळ लागला असला तरी एवढ्या काळातल्या वैफल्य, असंतुष्टता आणि परभवांमधून जे काही शहाणपण आपण सगळ्यांनी कमावले आहे त्यातून नवे मराठीकारण उभे राहणार आहे. गाडी वेगाने धावत असली की सभोवतालची घरे, झाडे मागे पडत जातात. मराठी समाजाच्या सामूहिक आयुष्यातही मराठीशी प्रतारणा करणार्‍यांचे मुक्काम असेच मागे पडत जाणार आहेत. आपण आपली नजर किती तीव्रतेने पुढच्या काळावर रोखली आहे हा खरा प्रश्न आहे. तेंडुलकरांनी अत्र्यांवर लिहिलेल्या लेखाचे शीर्षक ‘ हे सर्व कोठून येते’ असे आहे. हाच प्रश्न मराठीच्या बाबतीत विचारला तर ‘हे सर्व कोठे जाते’ असे शीर्षक द्यायला पाहिजे. जसजसे मराठीचे प्रस्थापित आवाज आपल्याला अधिकाधिक निराश करतील तसतसे आपले सामूहिक शहाणपण उजळून निघेल आणि उशिरा का होईना मराठीयांचे गोमटे होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्या मुक्कामावर जाण्याच्या मार्गात मदत केल्याबद्दल आदित्य ठाकरे आणि त्यांच्या जाहिरात टीमचे आपण आभारच मानले पाहिजेत. कारण त्यांनी ठरवून किंवा अनावधानाने मराठी मांडवाबाहेर फेकून दिली नसती तर थंडगार पडलेल्या निखर्‍यांमधला आपला स्वाभिमान पेटता व्हायला पुन्हा वाट बघावी लागली असती, तेव्हा धन्यवाद आदित्य ठाकरे!

 • डॉ. दीपक पवार

( लेखक मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.)

 • व्यंगचित्र सौजन्य – सतीश आचार्य

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 13 Comments

 1. Anonymous

  मराठीयांचे गोमटे होण्याचा मार्ग मोकळा होईल.

  वरची आशा ही मुंबईसाठी तरी भ्रामक आहे. आणि महाराष्ट्राचे लोकसंख्येच्या स्तरावरील अमराठीकरण असेच चालु राहीले तर येत्या काही दशकात पुणे, नाशिक, नागपूर इ. आर्थिक, सामाजिक शक्तीकेंद्रे सुद्धा मुंबईप्रमाणेच होतील. भारतीय संघराज्याच्या परिप्रेक्षात फक्त लोकसंख्याच भविष्य निर्धारित करणार आहे. प्रत्येकाला त्याची मातृभाषा प्रिय असते त्यामुळे मुंबईतील अर्थकारण, राजकारण, समाजकारण आता भविष्यात फक्त मराठी विरुद्ध अमराठी असेच राहणार आणि कदाचित महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरातील सुद्धा.
  आदित्य ठाकरेंना मराठी विषयक किती ममत्व आहे हा प्रश्न येथे महत्त्वाचा नाही. राजकारणात जिंकणे व सत्ता संपादन करणे यालाच अंततोगत्वा महत्त्व आहे. स्व. बाळासाहेबांना निवडणुक लढवायची नव्हती त्यामुळे त्यांच्यापुढे हे प्रश्न नव्हते. आदित्य ठाकरेंचे ध्येय मुख्यमंत्री होणे हे आहे मग ३० टक्के अमराठी मते त्यांच्यासाठी ७० टक्के मतांएवढीच महत्त्वाची आहेत. तमिळनाडुसारख्या राज्यातसुद्धा कट्टर तमिळ छवि असुनही करुणानिधींना पराभव स्विकारावा लागला मग आदित्य ठाकरेंची काय कथा. मराठी बाणा सोडुन हिंदुत्व स्विकाररेल्या शिवसेनेची ही फरफट आता थांबणार नाही कारण मराठी भाषिकांनी सुद्धा हिंदुत्व स्विकारले आहे.
  महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारण किंबहुना सर्व भाषिक राज्यातील राजकारण आता हिंदुत्व विरुद्ध भाषिकत्व असेच राहणार त्यामुळे या दोनही गोष्टींची जो नेता सावधपणे सांगड घालेल तो जिंकेल. त्यामुळे भाषा जपायची असेल भाषिक कट्टरपणा फार महत्त्वाचा कारण भाषा संपली की अस्मिता/ओळख संपली.
  पहिले ते मराठीकारण करायचे असेल तर मुंबई व महाराष्ट्रातील अमराठी टक्का कमी करणे व मराठी भाषाधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
  झपाट्याने वाढणारी अमराठी लोकसंख्या हे स्थलांतर नव्हे तर सांस्कृतिक टोळधाड आहे. ती थांबविली नाही तर मराठी भाषाच नामशेष ( भेसळ भाषा ही नामशेष मानावी ) होईल कारण प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते.

 2. अरुण दत्तू बांदेकर

  काय बोलणार?काय लिहिणार आणि कसली प्रतिक्रिया देणार?इथे विचारतोय कोण कुणाला?
  —-अरुण दत्तू बांदेकर अ

 3. अरुण दत्तू बांदेकर

  एक होता वाघ,ढाण्या वाघ महाराष्ट्राचा
  वाघाचा नंतर झाला वाघोबा,बछडेही झाले थंडोबा
  हळुहळु वाघ थकला,शेळी बनून पाला खात बसला
  पाला खाताना,म्याँव म्याँव सतत करू लागला
  वाघाला कळून चुकले,ताकद आता संपली
  मांजर होऊन आता,बसावे कुणाच्या ताटाखाली
  ढाण्या वाघ तो महाराष्ट्राचा,आज दीनवाणा बापुडा
  ‘आरे’तील त्या वृक्षांसंगे,झेलतोय घाव कोयत्यांचा
  । –अरुण दत्तू बांदेकर

Leave a Reply