मराठी शाळांमधील प्रयोगशीलता


प्रयोगशीलतेच्या संदर्भात वरील चार प्रकारच्या शाळा पाहिल्यावर काही ठोस मुद्दे लक्षात येतात. पहिल्या प्रकारच्या शाळांमध्ये शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी स्पष्टता आणि एकवाक्यता आहे. त्यामुळे अभ्यासघटक शिकवताना किंवा एखादा उपक्रम राबवताना त्यातून मुलांवर कोणते मूल्य रुजवायचे आहे, याची सखोल जाणीव आहे. इथे कृतिशील शिक्षणावर, अनुभवाधारित शिक्षणावर भर आहे, मात्र त्यासाठी शैक्षणिक साधनांचे फार स्तोम माजवले जात नाही. इतर तीन प्रकारच्या शाळांमध्ये मात्र शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात फारशी स्पष्टता नाही. त्यामुळे बऱ्याचदा अभ्यासघटक शिकवण्यावर भर राहतो, उपक्रमासाठी उपक्रम करण्यावर भर राहतो. त्यासाठी भरपूर साधनांचा वापर होऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचतोही. अशा प्रकारच्या शिक्षणातून रोजगारक्षम मनुष्यबळ घडवणे हे शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. मात्र केवळ रोजगारक्षम मनुष्यबळावर  कोणताही देश  सामर्थ्यवान होऊ शकणार नाही, त्यासाठी आवश्यक असतो मूल्यांचा संस्कार. असे मूल्याधारित प्रयोग मोठ्या प्रमाणात घडून येण्यासाठी ह्या चारही प्रकारच्या शाळांमध्ये समन्वय घडून येण्याची नितांत आवश्यक आहे. तसं झालं तर गावोगावी आणि गल्लोगल्ली पहिल्या प्रकारच्याच प्रयोगशील मराठी शाळा सर्वत्र दिसू लागतील.

-------------------------------------------------------------------------------------------

 

कोणत्याही देशाचे भवितव्य तिथल्या शाळांमध्ये घडत असते असे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले आहे आणि त्याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. आपल्या पुण्याइतके क्षेत्रफळ असणारा फिनलंड देश, पण तिथली शिक्षणव्यवस्था जगभरात सर्वोत्तम समजली जाते. फिनलंडने त्यांची अर्थव्यवस्था बळकट केली ती गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्थेच्या बळावरच! अशा प्रकारचे उदाहरण केवळ फिनलंडचेच नाही; तर युरोपियन देश आणि जपानसारख्या देशाबाबतही असेच म्हणता येईल. या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था पाहता येईल. महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये ग्रामीण भागांतील जिल्हापरिषदांच्या शाळा, शहरांतील महानगरपालिकेच्या शाळा, ग्रामीण आणि शहरी भागांतील अनुदानित खासगी शाळा व विनाअनुदानित शाळा अशा शाळांचा समावेश होतो. तसेच शासनाची मान्यता नसलेल्या काही मराठी शाळाही आहेत आणि त्यांचा मान्यतेसाठी लढा चालू आहे.

आज महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विविध नावीन्यपूर्ण  प्रयोग होत आहेत. सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शाळेतील शमशुद्दीन अतार यांनी गणिती संकल्पना समजून सांगण्यासाठी सातशेच्या घरात जीआयएफ इमेजस तयार केल्या आहेत. सध्याची पिढी ही जन्मतः डिजिटल माध्यमात वाढलेली आहे. या माध्यमातील नवनवीन गोष्टींचे त्यांना अप्रुप असते. काही सेकंद हालचाल करणाऱ्या जीआयएफ इमेजचा सध्या ट्रेंड आहे. एरवी मुलं आणि आपणही या इमेजस करमणुकीसाठी पाहतो. अत्तार सरांनी मात्र त्याचा शिक्षणात उपयोग करून घेतला. अत्तार सर त्यांच्या शाळेतील मुलांना तर या जीआयएफ पाठवतातच, पण त्यांच्या संपर्कातील अनेक शिक्षकांना या जीआयएफ पाठवून इतरही मुलांचे गणित सोपे करतात. त्यांच्या गणितातील प्रयोगाची इत्थंभूत माहिती देणारे Sopeganit.in या नावाचे संकेतस्थळही आहे. शिवाय त्यांच्या शाळेत SOLE (सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निग एन्व्हायरन्मेंट) हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाच्या अंतर्गत स्कायपच्या साहाय्याने जगभरातील दोनशेच्या वर शिक्षकांनी या शाळेला ऑनलाइन माध्यमातून शिकवले आहे.

तंत्रज्ञानाने शिक्षण सोपं अन् मनोरंजक करण्याचं दुसरं उदाहरण आहे सोलापूरमधील बार्शी येथील जिल्हा परिषद शाळेतील रणजित डिसले सरांचे. डिसले सरांची ख्याती शिक्षणातील क्यूआरकोड आणि व्हर्च्युअल ट्रिप या प्रयोगासाठी आहे. आपल्याला बँकेच्या खातेपुस्तकावरील तसेच वस्तुंच्या किमतीसाठी असलेला बारकोड माहीत असतो. पण डिसले सरांनी याच पद्धतीचा वापर आपल्या मुलांना शिकविण्यासाठी केला. ही पद्धत पालक आणि मुलांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की,  २०१५ पासून ‘बालभारती’ने त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्येही पूरक अभ्यासक्रमासाठी क्युआर कोड छापण्यास सुरुवात केली. या क्यूआरकोडमध्ये पाठ्यपुस्तकातील घटकासंबंधीचा मजकूर सांकेतिक रूपात साठवलेला असतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर पाठ्यपुस्तकातील कवितांचे, स्थळांचे व्हिडीओज्, मुलाखती अशा गोष्टी ह्या क्यूआरकोडमध्ये साठवता येतात. आपल्या मोबाईलमध्ये क्यूआरकोड स्कॅनर हे प डाऊनलाऊड केले की त्याच्या साहाय्याने पाठ्यपुस्तकातील कोड स्कॅन करून संबंधित गोष्टी मोबाइलवर ऐकता, पाहता येतात.  या तंत्रज्ञानामुळे पालक आणि विद्यार्थी घरीही मोबाइलच्या साहाय्याने पाठ्यपुस्तकातील घटक शिकू शकतात. इतकेच नव्हे तर एखादा घटक समजला नाही तर त्यावर तसा अभिप्रायही देऊ शकतात. डिसले सरांची आणखी एक प्रयोगशीलता म्हणजे व्हर्च्युअल ट्रिप. डिसलेसर सध्या व्हर्च्युअल ट्रिप ऑफ सायन्स सेंटरच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या मुलांसाठी त्रेपन्न प्रयोग दाखवतात. राज्यातील आणि देशातील एक हजार पाचशे शाळांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्याशिवाय जगभरातील ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी सोलापूरच्या चादरी आणि कापड या उद्योगाची सफर घडवणारी व्हर्च्युअल टूर ऑफ टेक्स्टाइल इंडस्ट्री आणि व्हर्च्युअल टूर ऑफ डायनॉसॉर पार्क हेही उपक्रम पाहिलेले आहेत.
राडगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक गजानन जाधव यांनी कातकरी मुलांना शाळा आपली वाटावी, मुलं शाळेत टिकावी म्हणून कातकरी शब्दकोश तयार केला आहे. कारण कातकरी मुलांना मराठी भाषा परदेशी भाषेइतकीच अगम्य असते. जाधवसर पहिलीच्या मुलांना अध्ययनाची गोडी लागावी यासाठी त्यांना मुळाक्षरांची ओळख, त्यांच्या परिसरातील प्राण्यांची-वस्तूंची त्यांच्या भाषेतील नावे योजून सांगितात. जसे, की क- केल्यातील (माकड), कोहळ (भोपळा); ख- खुबे (गोगलगाय); ग-गोड (गूळ). परिणामी मुलं वाचन-लेखन प्रक्रियेत चांगला प्रतिसाद देतात. आज जाधव सरांच्या या शब्दकोशाचा लाभ कातकरी पट्ट्यात शिकवणारे अनेक शिक्षक आणि मुलं घेत आहेत.

नकाशे आणि विविध स्थळांच्या माहितीने खच्चून भरलेला भूगोल हा विषय तसा रटाळ.आपल्या शाळेतील मुलांना आपल्याच लातुर जिल्ह्यातील तालुके, नद्या सांगता येत नाहीत, हे लक्षात आल्यावर किरण साकोळे यांनी मुलांना खेळाच्या माध्यमातून भूगोल शिकवण्यास सुरुवात केली. या खेळात काही मुलांना तालुक्याची तर काहींना नद्यांची नावे दिली जातात. मैदानात खेळल्या जाणाऱ्या या खेळात मुलांना उभे करून जिल्ह्याचा आकार तयार केला जातो. नद्यांची नावे असणारी मुले त्या त्या तालुक्यापाशी उभी असतात. अशा प्रकारे जिल्ह्यातील इतरही वैशिष्ट्ये शिकवली जातात. नांदेड जिल्ह्यातील कमळेवाडीच्या आश्रमशाळेतील शिवाजी आंबुलगेकर यांनीही ‘माझ्या गावचा भूगोल’ हा उपक्रम अभिनव राबवला आहे. नकाशा रेखाटन, स्थाननिश्चिती  भूगोलातील या अमूर्त संकल्पना मुलांना स्वतःच्याच गावाचा भूगोल लिहिल्यावर आत्मीयतेच्या वाटायला लागल्या. या उपक्रमाद्वारे मुलांनी १४ जिल्ह्यातल्या तब्बल १२८ गावांचा भूगोल लिहून काढला. 

महाराष्ट्रातील मराठी शाळांतील या प्रयोगशीलतेचा विचार करताना प्रामुख्याने तीन – चार प्रकारच्या शाळा दिसतात. पहिला प्रकार म्हणजे आपल्या शाळांमध्ये सतत नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवता यावे म्हणून शासनाकडून जाणीवपूर्वक अनुदान न घेतलेल्या शाळा. यांमध्ये कोल्हापूर येथील लिलाताई पाटील यांची सृजन – आनंद (महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशील शाळा), फलटण येथील कमला निंबकर बालभवन, पुण्यातील अक्षरनंदन, लर्निंगहोम, नाशिक येथील आनंद निकेतन इ. शाळा येतात. ह्या सर्व शाळा शहरांमध्ये आहेत. दुसऱ्या प्रकारच्या प्रयोगशील शाळांमध्ये नाइलाजाने विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता घ्याव्या लागलेल्या नाशिक जिल्ह्यातील ज्ञानेश्वर जाधव यांची गुरुकुल, शिरूरमधील रवींद्र धनक यांची जीवन विद्या मंदिर इ. शाळांचा समावेश होतो. ह्या शाळा निमशहरी भागांतील आहेत. प्रयोगशील शाळांचा तिसरा प्रकार म्हणजे जिल्हापरिषदांच्या शाळा. आज गावोगावच्या शाळांच्या भिंती अन् परिसर ज्ञानरचनावादाचा अवलंब करून रंगीबेरंगी चित्रांनी सजलेल्या दिसतात. सातारा, मिरज, धुळे, कोकण येथे डिजिटल झालेल्या शाळाही कितीतरी गावांत आहेत. चौथा प्रकार आहे खाजगी अनुदानित शाळांचा. यांमध्ये रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल, दापोली येथील लोकमान्य टिळक शाळा, मुंबईतील अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, कुमुद विद्यामंदिर, अमरकोर विद्यालय अशा कमी – अधिक प्रयोगशीलता असणाऱ्या शाळांचा समावेश करता येईल. ह्या शाळा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणी आहेत. हे चार प्रकार फार ढोबळ आहेत अन्  प्रयोगशीलतेचा नेमका विचार करता यावा यादृष्टीने केलेले आहेत.

मेंढराप्रमाणे इंग्रजी माध्यमाचं अनुकरण करण्याने एकीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, आहे त्या शाळांची पटसंख्या घसरत आहे; तर दुसरीकडे वर उल्लेख केलेल्या ह्या शाळांना मुलांची कधीच कमतरता भासत नाही. ह्या शाळांच्या यशाचं गमक त्यांच्या प्रयोगशीलतेत आहे. जिल्हापरिषदांच्या शाळा वगळता ह्या शाळांत येणारी मुलं केवळ गरीब वर्गातील आहेत असंही नाही. उलट ज्यांच्या पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा सहज परवडू शकल्या असत्या अशीच मुलं ह्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ह्या शाळांमध्ये प्रयोगशीलता आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर ह्या शाळांमध्ये अक्षरओळख, अंकओळख करून देण्यापासून भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे सगळेच विषय नव्या पद्धतीने शिकवले जातात. सांगण्याची पद्धत तर नवी असतेच, पण विविध शैक्षणिक साहित्याद्वारे मुलांना विषय सहज कळेल असं वातावरण उपलब्ध करून दिलं जातं.

पहिल्या प्रकारच्या शाळांमधील प्रयोगशीलतेचा आधी विचार करू. ह्या शाळांच्या संस्थापकांना शाळा सुरू करतानाच आपल्याला ती रूढ शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळी चालवायची आहे, आपल्या शाळेतील मुलांमध्ये कोणती मूल्ये रुजवायची आहेत, याची स्पष्ट कल्पना होती आणि आहे. त्यामुळे शिक्षकनिवडीवर आणि त्यांच्या प्रशिक्षणावर ह्या  शाळा विशेष लक्ष देतात. ह्या शाळा विनाअनुदानित असल्याने येथील शिक्षक अल्प मानधनावर तर काही केवळ प्रवासभत्ता घेऊन काम करतात आणि अर्थात हे ते स्वेच्छेने आणि आनंदाने करतात. या शाळा एसएससी बोर्डाचाच अभ्यासक्रम राबवतात, मात्र नववीपर्यंत त्यात लवचीकता असते. काही पाठ वगळण्याचं, त्याऐवजी दुसरा पाठ घेण्याचं स्वातंत्र्य घेतलं जातं. जेव्हा ‘गोरी गोरी पान दादा मला एक वहिनी आण’ ही कविता मराठीच्या पुस्तकात होती, तेव्हा सृजन – आनंद शाळेने ही कविता वगळली होती. कारण या कवितेतून गोऱ्या रंगाचं श्रेष्ठत्व ठसवलं गेलं होतं.  अशाप्रकारे वर्णमूल्य आपल्या मुलांवर ठसवणं शाळेला योग्य वाटलं नाही. दहावीच्या वर्गापेक्षा ह्या शाळा पूर्वप्राथमिकच्या तीन वर्गांवर विशेष लक्ष देतात. (तरीही ह्या शाळांची मुलं गुणवत्ता यादीत येतात.) मूल पुढे कसे घडणार याचा पाया बालवयातच घालता येतो असं ह्या शाळा मानतात. ह्या बालवर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण दिलं जातं.

ह्या शाळांमध्ये भूगोल केवळ नकाशातूनच शिकवला जात नाही. विविध राज्यांची माहिती शिकवताना त्या राज्यातलं एखादं कुटुंब आजूबाजूच्या परिसरात राहत असेल तर त्या कुटुंबाला भेटून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची संस्कृती जाणून घ्यावी म्हणून मुलांना प्रोत्साहित केले जाते. या उपक्रमात पालकांनाही सहभागी करून घेतले जाते. माणसाच्या आदिम इतिहासाची ओळखही या शाळेत अशाच अनोख्या पद्धतीने करून दिली जाते. सर्वसाधारण शाळेत हा इतिहास शिकवताना आदिमानवाचं चित्र दाखवलं जात असेल किंवा त्याने केलेल्या हत्यारांची चित्रे दाखवून शिक्षक माहिती सांगत असतील. पण इथं मुलांना आदिमानवाच्या काळाचा मुलांना अनुभव येण्यासाठी त्या काळातील हत्यारे बनवायला सांगितली जातात. शिकार करण्यासाठी आदिमानव झाडा-वेलींचा वापर करत होता, याविषयीचे एका मुलाचे अनुभव वाचायला मिळाले. त्या मुलाने लिहिलं होतं की, ‘सुरुवातीला ताईंनी हे काम सांगितलं तेव्हा अजिबात आवडलं नव्हतं. पण मग शाळेत न्यायचं आहे म्हणून आजूबाजूच्या झाडांचा –वेलींचा शोध घ्यायला सुरुवात केली. झाडावर चढून त्याच्या फांद्या काढताना हातापायाला खरचटलं. वेल हाताने तुटेना तेव्हा चाकूने तोडायचा विचार मनात आला, पण मग लक्षात आलं की आदिमानवाकडे चाकू नसणार. मग दगडाने वेल तोडताना बोटाला लागून रक्त आलं, खूप दुखलं. आता लक्षात येत होतं की, आदिमानव किती ताकदवान अन् बुद्धिमान असला पाहिजे.’ तिसरीतल्या मुलाचं हे लेखन वाचताना आपल्यालाही आदिमानवाविषयी नव्यानेच काही आकलन झालंय असं वाटायला लागतं.

ह्या शाळा आपल्या मुलांना कोणत्याही स्पर्धा परीक्षांना बसवत नाहीत. स्पर्धा म्हटलं की त्यात हार – जीत आली, डावं – उजवं आलं अन् शिकण्याचा आनंद गमावणंही आलं, असं ह्या शाळा मानतात. शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवलं जात नाही म्हणून काही पालक मुलांना शाळेतून काढतातही. या संदर्भात सृजन – आनंद शाळेतील सुचिता पडळकर यांनी सांगितलेला एक किस्सा -  ‘एकदा शाळेत मुलांची धावण्याची स्पर्धा होती. शाळेतल्या एका मुलाचा हात फ्रॅक्चर झाल्यानं त्याला स्पर्धेत भाग घेणं जमणारं नव्हतं. पण मग स्पर्धेत हार – जीत असं काहीच नसल्यानं घरातल्यांच्या अन् शिक्षकांच्या संमतीनं त्या मुलानं स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. स्पर्धेला सुरुवात करताना एक गोल रिंग डोक्याकडून घालून पायातून बाहेर काढायची होती. फ्रॅक्चर  असलेल्या आडव्या हातामुळं त्या मुलाच्या डोक्यातून घातलेली रिंग मध्येच अडकली. तेव्हा स्पर्धेतील इतरही मुलं त्याच्या मदतीला धावून आली अन् त्याच्या हाताच्या अडसरातून ती रिंग काढायला साऱ्यांनी मदत केली. सगळ्या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला.’ थोडक्यात, जिंकण्यासाठी नाही तर इतरांच्या मदतीसाठी धावणारे नागरिक निर्माण करणं हे मूल्य मुलांच्या मनावर बिंबवण्यावर ह्या शाळांचा भर असतो. स्पर्धेबरोबरच इथल्या मुलांना घरचा अभ्यासही फार नसतो. त्यामुळे पालकांच्या तक्रारी येतात. शाळेत अशा पालकांचं समुपदेशनही  केलं जातं.

‘लर्निंग होम’ वगळता ह्या शाळांतील पटसंख्या २५ ते ३० आहे. लर्निगहोममध्ये एका वर्गात दहा विद्यार्थी आहेत. व्याख्यान पद्धतीशिवाय प्रकल्प पद्धती, मुलाखती, क्षेत्रभेटी इ. पद्धतींचा या शाळांमध्ये सातत्याने वापर केला जातो. उपक्रमांसाठी उपक्रम राबवणे हा हेतू नसतो. क्षेत्रभेटी, मुलाखती ह्या अभ्यासघटकांशी संबंधितच असतात. यांतील बऱ्याच शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनही अभ्यासघटकाशी संबंधित थीम घेऊन केले जाते. अशा वेगवेगळ्या पद्धतीनेच तो घटक शिकवला जातो, पुन्हा वर्गात पुस्तकातील रटाळ माहिती वाचून दाखवली जात नाही. त्यामुळे क्षेत्रभेटी, उपक्रम राबवण्यासंदर्भात  इतर शाळांतील शिक्षकांचा प्रश्न असतो की, ‘आम्ही हेच करत बसलो तर शिकवणार कधी?’ असे प्रश्न इथल्या शिक्षकांना पडत नाहीत. अर्थातच परीक्षेचे स्वरूपही घोकंपट्टीला फारसा वाव नसणारे  असते. कथेचा वेगळा शेवट करा किंवा पाहुणा ओळखा असा प्रश्न असेल तर त्यामध्ये गटात न बसणारा शब्द मुलाला ओळखायचा असतो. श्रावण, वैशाख, मे, आषाढ असा गट दिल्यावर विद्यार्थ्याने पाहुणा ओळखून त्याचे कारण लिहायचे असते. ते कारण तर्कदृष्टया योग्य असेल तर त्या विद्यार्थ्याला गुण दिले जातात. एकदा एका विद्यार्थ्याने ‘मे’असे उत्तर लिहून तो एकाक्षरी शब्द आहे असे कारण लिहिले होते. अशावेळी कारण बरोबर असल्याने त्या विद्यार्थ्याला पूर्ण गुण दिले जातात. शिक्षकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे उत्तर आले म्हणून त्या विद्यार्थ्यांची कल्पकता, सर्जनशीलता मारून टाकली जात नाही.

मुलांमध्ये असणाऱ्या विविध बुद्धिमत्तांचा विकास होण्याच्या दृष्टीने शाळेतील वर्षभरातील उपक्रमांचे नियोजन केलेले असते. यामध्ये विविध वस्तू तयार करणे, भाजीमंडईत जाणे, बाजारजत्रा भरवणे, स्वयंपाक – इलेक्ट्रिसिटी – सुतारकाम – बागकाम इ. उपक्रम घेतले जातात. बालवाडीतील लहान मुलांसाठीही रुमाल धुण्याचा, खाऊ बनवण्याचा उपक्रम राबवला जातो. मुलांची निसर्गाशी जवळीक व्हावी यासाठीही उपक्रम असतात. काही ठिकाणी एक रात्र शाळेत मुक्काम करण्याचा उपक्रम असतो. ज्यातून मुलांना शाळेच्या गच्चीतून दिसणारे चांदणे, रात्रीची शांतता, शांततेचाही आवाज इ. अनुभवयाला मिळतात. एका विद्यार्थ्याने झाडाशी केलेला संवाद वाचायला मिळाला. त्याने लिहिलं होतं –  ‘झाडा तुला उभं राहून कंटाळा येतो का? तुझी पानं तोडल्यावर तुला दुखतं का? लोकं तुझ्यावर लाइटींग करतात तेव्हा तुला शॉक बसतो का?’ लहान वयात असे संस्कार झाले की पर्यावरण वाचवा असं या मुलांना वेगळं सांगावं लागणार नाही.

पुढील शैक्षणिक वर्षांतील सर्व उपक्रम, क्षेत्रभेटी, अध्यापनपद्धती इ. सर्व नियोजन उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू व्हायच्या आधीच तयार केलेले असते. वर्गात शिकवायला जाण्याआधीही शिक्षकाचे टाचण (टिचिंग प्लान) तयार असते. अर्थात हे नियोजन केवळ उपचारासाठी नसते. शिक्षकाने वर्गात जाण्याआधी पूर्ण तयारीनिशी जाणं हा भाग तर त्यामागे आहेच, शिवाय आपण शिकवत असलेला घटक सर्व अंगांनी वर्गात कसा मांडता येईल, विद्यार्थ्यांना विषय सोपा कसा होईल, याचाही विचार त्यामागे असतो. अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य झाली की नाही अन् का झाली नाही हे तपासण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. सृजन आनंद शाळेत प्रत्येक शनिवारी शाळा सुटल्यावर शिक्षकांच्या ह्या टाचणवह्या पालकांना पाहता याव्यात म्हणून वर्गात ठेवलेल्या असतात. जेणेकरून पालकांना घरी त्याच्याशी संबंधित तयारी करून घेता येईल. उदाः दुधापासून दही बनते हे विज्ञानात शिकवले गेले तर पालक घरी त्याचं प्रात्यक्षिक दाखवू शकतात.

सध्याच्या बहुसंख्यांना निराश करणाऱ्या शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळी म्हणजे सर्वांना सामावून घेणाऱ्या अध्यापन पद्धतींचा या शाळांत वापर केला जातो. सर्व उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग हे ह्या शाळांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ग्रंथालयाचा वापर सर्व विद्यार्थी करतात की नाही याकडे शाळेचे विशेष लक्ष असते. कमला निंबकर शाळेत तर ग्रंथालयाचा वेगळा तासही असतो. ह्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अध्यापनाकडेही विशेष लक्ष दिले जाते. इंग्रजी वाचन आणि लेखन यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. आनंद निकेतनमध्ये सुसज्ज अशी खुली प्रयोगशाळा आहे. ‘विद्यार्थ्यांसमोर आपले प्रयोग फसले तर...?’ या मानसिकतेतून शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नवीन प्रयोग करायला धजावत नाहीत, ही अडचण ओळखून त्यांच्या शाळेतील तसेच शाळेबाहेरील कुठल्याही शिक्षकाला इथे येऊन सुचलेल्या कल्पना पडताळून पाहता याव्यात म्हणून ही खुली प्रयोगशाळा सुरू केली आहे. विविध साधनांनी सज्ज अशी ही प्रयोगशाळा आपल्याला पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे प्रात्यक्षिकासह दाखवते. उदा. वाहत्या पाण्यात निर्माण होणाऱ्या भोवऱ्यात माणूस अडकला की त्याचा मृत्यू का होतो? महाभारतातील भीष्म इच्छा मरण येईपर्यंत बाणांच्या शय्येवर कसा झोपू शकतो? यातील विज्ञान शिक्षक प्रात्यक्षिकासह समजावून सांगतात. असे प्रयोग पाहिलेला आणि विज्ञान शिकलेला विद्यार्थी अंधश्रद्धेच्या आहारी जाणं शक्यच नाही.
पहिल्या प्रकारातील शाळांतील प्रयोगशीलतेची उदाहरणे म्हणून बरेच उपक्रम सांगता येतील. ह्या शाळा वर्षानुवर्ष एकच उपक्रम राबवत नाहीत म्हणूनच तर त्यांना प्रयोगशील म्हटलं जातं. दरवर्षी काही नव्या उपक्रमांची भर पडत असते. या संदर्भात सुचिता पडळकर यांचे भाष्य अत्यंत उद्बोधक आहे. त्या म्हणतात, ‘दरवर्षी तोच तोच उपक्रम राबवताना आपल्यापुढील विद्यार्थी नवे असले तरी उपक्रम राबवणारे आपण तेच असतो. अन् असा नेहमीचा उपक्रम राबवताना आपल्याला शंभर टक्के यशाची खात्री असते तेव्हा त्यात मजा राहत नाही, आनंदही मिळत नाही. त्यामुळे आमच्या शाळेत एक उपक्रम एकदाच घेतला जातो.’ पडळकरबाईंचे हे भाष्य चिंतनीय आहे.
दुसऱ्या प्रकारच्या शाळांमध्ये नाइलाजाने विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता घ्याव्या लागलेल्या शाळा येतात. नाशिकची गुरुकुल आणि शिरूरची जीवन विद्या मंदिर इ. शाळा आहेत. शाळा सुरू होऊन पाच – सहा वर्षे झाल्यानंतर ह्या शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता घ्यावी लागली. ही मान्यता मिळवण्यासाठीही ह्या शाळांना दीर्घ लढा द्यावा लागला. ह्या शाळांच्या संस्थापकांना स्वतःच्या मुलांना शाळेत घालायची वेळ आली तेव्हा परिसरात चांगल्या मराठी शाळा नसल्याचं लक्षात आलं. म्हणून मग त्यांनी स्वतःच मराठी शाळा सुरू करायचं ठरवलं. ह्या शाळांतही पहिल्या प्रकारांतील शाळांप्रमाणे कमी – अधिक प्रयोगशीलता आहे. मात्र ह्या शाळा सुरू होऊन दहा – पंधरा वर्षेच झाली आहेत. त्यात सुरुवातीला शासनाच्या नियमांचा ससेमिरा, मान्यतेसाठी लढा ह्या सगळ्यातही या शाळांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. गुरुकुल शाळेत गेल्या तीन वर्षांपासून परदेशी पाहुणे इंटर्नशीप करण्यासाठी येतात. ह्या परदेशी व्यक्ती दीड महिना शाळेत वास्तव्य करतात. या अवधीत ते मुलांना त्यांना येत असलेली कौशल्ये तर शिकवतातच, महत्त्वाचं म्हणजे ह्या पाहुण्यांशी  इंग्रजीत संवाद साधायला लागल्याने मुलांचं इंग्रजी चांगलंच सुधारलं आहे. याचा परिणाम सांगायला एकच घटना पुरेशी ठरेल. गुरुकुल शाळेसमोरच असलेली एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती, ती बंद पडली. आधी केवळ प्राथमिकपर्यंत असणाऱ्या या शाळेने माध्यमिकचे वर्गही सुरू केले आहेत. यंदा तर शाळेला जागेअभावी प्रवेश थांबवावा लागला. जीवन विद्या मंदिरमध्येही विद्यार्थ्यांना इंग्रजीतून संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ही शाळा शिरूरसारख्या निमशहरी भागात असल्याने   शाळेत मैदानी खेळांवर विशेष भर असतो. तायक्वांदो, भारत स्काऊट गाईड पथक यासारख्या शाळाबाह्य उपक्रमांत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली आहे. मुलांच्या अंगभूत कौशल्यांची चौफेर वृद्धी व्हावी म्हणून पाबळ विज्ञान आश्रमाच्या मार्गदर्शनाने शेती, गृहविज्ञान, संगणक आणि मूलभूत तंत्रज्ञान याविषयी इयत्ता आठवीपासून मार्गदर्शन केले जाते.
गावोगावच्या जिल्हापरिषदांच्या शाळांमध्ये सध्या बरेच प्रयोग होत आहेत. गेल्या सात - आठ वर्षांपासून ज्ञानरचनावाद आणि विविध शैक्षणिक साधने यांच्याआधारे जिल्हापरिषदांच्या शाळांमध्ये अंकओळख, अक्षरओळख करून दिली जाऊ लागली. इतकेच नव्हे तर काही शिक्षकांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या. शाळेत प्रोजेक्टर, संगणक, स्क्रीन सगळे आले. तिथली मुलंही आता या नव्या साधनांना चांगली सरावलेली दिसतायत. समाजमाध्यमांमुळे इतर शिक्षकांपर्यंत हे प्रयोग पोहचून इतर शिक्षकांनाही असे प्रयोग करायला प्रेरणा मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हापरिषदांच्या अशा एकदोन शाळा नाहीत, तर ज्ञानरचनावादाचा अवलंब केलेल्या आणि डिजिटल झालेल्या अशा शेकडो शाळा दाखवता येतील. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील वाबळेवाडीच्या शाळेला तर आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. कराड येथील अर्जुन कोळी सरांच्या शाळेत, लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील शाळेत डॉक्टर, इंजिनियर, वकील यांची मुलंही आहेत. जिल्हापरिषदांच्या ह्या शाळांपुढे प्रवेशासाठी रांगा लागलेल्या असतात. बेळगाव – खानापूर ह्या सीमाभागातील जिल्हापरिषद शाळांमधील शिक्षकांनी मराठी अभ्यास केंद्र ह्या संस्थेच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांचे एका आठवड्याचे दोनदा (२०१५ आणि २०१७) दौरे केले. इथल्या शाळांमधील प्रयोग त्यांनी सीमाभागातही करायला सुरुवात केली. आज तिथे हे प्रयोग चांगले रुजले आहेत. तिथल्या कन्नड – इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी माध्यमांतील विद्यार्थ्यांचा पटही वाढला आहे.  जिल्हापरिषदांच्या ह्या शाळांतील हे चित्र बदललंय ते केवळ तेथील शिक्षकांमुळे. यात शासनाचा अजिबातच सहभाग नाही. काही ठिकाणी हे शिक्षक एकांड्या शिलेदाराप्रमाणे काम करतायत, तर काही ठिकाणी शाळेतील शिक्षकांनी एकदिलाने शाळेचा कायापालट केला आहे. यासाठी कधी शिक्षकांनी लोकसहभाग मिळवला  तर कधी पदरमोडही केली.
चौथा प्रकार आहे अनुदानित खाजगी प्रयोगशील शाळांचा. पहिल्या प्रकारात उल्लेख केलेले प्रयोगच इथे कमी – अधिक प्रमाणात राबवले जातात, मात्र त्यात सातत्य नसते.  या प्रकारांतील शाळांची संख्या सर्वांत जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील बहुतांश शाळा ४० -५० वर्षे जुन्या, काही तर स्वातंत्र्यपूर्व काळातीलही आहेत. यातील काही शाळांनी तर गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू केल्या आहेत. इथला शिक्षकवर्ग  आता सातवा वेतन आयोग घेत आहे, मात्र वेतन आणि बांधिलकी यांचं प्रमाण व्यस्त दिसतं. अल्प मानधनातही पहिल्या दोन प्रकारांतील शिक्षकांची बांधिलकी कितीतरी पटीने अधिक आहे. ह्या शाळेतील शिक्षकांनी मनात आणलं तर पहिल्या प्रकारातील प्रयोगशीलता राबवणं अगदीच शक्य आहे. तसं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपलं मूल मराठी शाळेतच घालावंसं वाटेल.
प्रयोगशीलतेच्या संदर्भात वरील चार प्रकारच्या शाळा पाहिल्यावर काही ठोस मुद्दे लक्षात येतात. पहिल्या प्रकारच्या शाळांमध्ये शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी स्पष्टता आणि एकवाक्यता आहे. त्यामुळे अभ्यासघटक शिकवताना किंवा एखादा उपक्रम राबवताना त्यातून मुलांवर कोणते मूल्य रुजवायचे आहे, याची सखोल जाणीव आहे. इथे कृतिशील शिक्षणावर, अनुभवाधारित शिक्षणावर भर आहे, मात्र त्यासाठी शैक्षणिक साधनांचे फार स्तोम माजवले जात नाही. इतर तीन प्रकारच्या शाळांमध्ये मात्र शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात फारशी स्पष्टता नाही. त्यामुळे बऱ्याचदा अभ्यासघटक शिकवण्यावर भर राहतो, उपक्रमासाठी उपक्रम करण्यावर भर राहतो. त्यासाठी भरपूर साधनांचा वापर होऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतोही. अशा प्रकारच्या शिक्षणातून रोजगारक्षम मनुष्यबळ घडवणे हे शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. मात्र केवळ रोजगारक्षम मनुष्यबळावर  कोणताही देश  सामर्थ्यवान होऊ शकणार नाही, त्यासाठी आवश्यक असतो मूल्यांचा संस्कार. असे मूल्याधारित प्रयोग मोठ्या प्रमाणात घडून येण्यासाठी ह्या चारही प्रकारच्या शाळांमध्ये समन्वय घडून येण्याची नितांत आवश्यक आहे. तसं झालं तर गावोगावी आणि गल्लोगल्ली पहिल्या प्रकारच्याच प्रयोगशील मराठी शाळा सर्वत्र दिसू लागतील.
- साधना गोरे
९९८७७७३८०२, [email protected]
(लेखिका मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत.)

 

 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्यसंस्कार

प्रतिक्रिया

  1. Charusheela Kiran Bhamare

      5 वर्षांपूर्वी

    मराठी शाळेतील उपक्रमशीलता आणि शिक्षकांंचे प्रयत्न यांना चांगले व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत आहात....आपलेही मनस्वी आभार

  2. Meenalogale

      5 वर्षांपूर्वी

    खूप महत्वपूर्ण लेख आहे.इतके विविध प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या शाळांची माहिती जास्त लोकांपर्यंत पोचायला हवी.

  3. Akshay gaikwad

      5 वर्षांपूर्वी

    mast madam . khup chan



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen