मुलांमध्ये भाषेची समज घडवताना…

“मुलं वाचत नाहीत, मुलांचा मराठी विषय कच्चा आहे, मुलांना चार वाक्ये धड शुद्ध मराठीतून लिहिता-वाचता येत नाहीत अशा अनेक तक्रारी आपल्याला ऐकू येत असतात. पण माझ्या अनुभवातील चित्र नेमके याच्या उलट आहे. पुस्तकांवर तुटून पडणारी, चांगली  भाषिक समज असलेली, आपले विचार मुद्देसुदपणे लिहून-बोलून मांडू शकणारी आणि उत्तम कल्पनाशक्ती असलेली मुलं माझ्या अवतीभवती आहेत. असे चित्र सर्वत्र निर्माण होणे अगदीच शक्य आहे, अर्थात त्यासाठी हेतुपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. माझ्या सुदैवाने भाषा शिक्षणात काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांचे विचार समक्ष अथवा वाचनातून माझ्यापर्यंत पोहोचले. Active Teachers Forum  सारख्या शिक्षणासाठी तळमळीनं काम करणाऱ्या गटाने माझ्यातील प्रयोगशीलतेला नेहमी प्रेरणा दिली आहे. वर्षाताई सहस्त्रबुद्धे यांची मी विशेष ऋणी आहे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाषा शिक्षक म्हणून मला अधिक समुद्ध होता आले आहे.” गुळवंच – सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या मनिषा उगले आपल्या शाळेतील वाचन उपक्रमांविषयी सांगतायत – 

——————————————————————————————–

एखादी भाषा शिकवणं म्हणजे केवळ त्या भाषेचं त्या इयत्तेसाठी ठरवून दिलेलं पाठ्यपुस्तक शिकवणं नसतं, यावर आपल्या सर्वांचचं एकमत होईल. भाषा ही बहुपदरी संरचना असून तिचे वेगवेगळे पैलू लक्षात घेत ती शक्य तितक्या सहजपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान शिक्षकापुढे असते. आपले विचार, कल्पना, अनुभव आणि भावभावना योग्य शब्दांत मांडता येणं, समजून आणि गतीने मूकवाचन करता येणं आणि माहिती मिळवण्यासाठी महितीस्रोतांचा वापर करता येणं ही भाषा शिक्षणाची काही सर्वसाधारण उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी शिक्षकाला विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन प्रयत्न करावे लागतात.

ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथी या वर्गात भाषेसाठी काम करताना आम्ही काही छोट्या-मोठ्या गोष्टी करून बघितल्या. त्यातून आम्हाला काही चांगले परिणाम दिसून आले. मुलांची भाषिक समज घडवण्याच्या दृष्टीने आलेल्या अनुभवांचा काही सारांश येथे मांडत आहे.

मातृभाषेचे प्राथमिक शिक्षणातील महत्त्व

मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे त्यांची मातृभाषाच असलं पाहिजे याबद्दल जगभरातील अनेक शिक्षणतज्ज्ञ आग्रही आहेत. ज्या भाषेत मूल विचार करतं, ज्या भाषेतील अर्थपूर्ण शब्दांचा सर्वाधिक साठा त्याच्याजवळ आहे, अशा भाषेतून मुलाला व्यक्त होणं सोपं जातं. तसंच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी सुद्धा त्याला मातृभाषेची चांगली मदत होते.

ज्या मुलांची मातृभाषा मराठी आहे अशा मुलांच्यासोबत त्याच माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून मी काम करत आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या या मुलांसोबत काम करताना आम्हाला अतिशय उत्तम परिणाम दिसले आहेत. सहा ते दहा वयोगटातील मुलं आपल्याला लहान वाटतात, पण आपण कल्पना देखील केलेली नसेल इतक्या समंजसपणे ही मुलं विचार करतात. त्यांच्या कल्पनाशक्तीची आपल्याला पुरेशी कल्पना नसते. भाषाशिक्षकाला मुलांची भाषिक समज कितपत आहे हे जाणून घेण्यासाठी बराच वाव असतो. चौथ्या वर्गातील एक मुलगा माझ्याशी बोलताना असं म्हणाला की, “मी सर्वांशी प्रेमाने वागतो, आजवर मी कधी कोणाला दुखवालेलं पण नाही, तरीसुधा माझ्याशी काही मुलं इतकी वाईट वागतात? ” किती नीटपणे मांडल्या या मुलाने आपल्या भावना! किती संवेदनशीलपणे विचार करतात ही मुलं! मातृभाषेतून इतक्या थेटपणे मूल आपले विचार मांडू शकते. प्रत्येक मूल आपापल्या पद्धतीने विचार करत असते. आजूबाजूच्या घटना, अनुभव यांबद्दल त्याला आपली मतं मांडायची असतात. मातृभाषा मुलाला व्यक्त होण्यासाठी कम्फर्ट देत असते. (अर्थात मुलाला मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी निर्भय वातावरण उपलब्ध असणं ही पूर्वअट आहे.) पण शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यात जर आपण मातृभाषेतर माध्यमाच्या पर्याय निवडलेला असेल, तर मुलाला आपलं म्हणणं मांडताना अडचण येऊ शकते. मूल कदाचित उत्तम पाठांतर करून ती भाषा गतीने लिहू, बोलत शकत असेल, म्हणून त्याला आशयावर किंवा भाषेवर प्रभुत्व मिळवता आलं, असं म्हणता येणार नाही. म्हणूनच प्राथमिक शिक्षणात मातृभाषेला पर्याय नाही.

एकदा वाचनप्रेरणा दिन रविवारी आला म्हणून आदल्या दिवशी शनिवारी दिवसभर शाळेत वाचणप्रेरणा दिनाचा कार्यक्रम घेतला होता. नेमके त्याच दिवशी आमच्या शाळेत एक वरिष्ठ शासकीय अधिकारी आले. तेव्हा तिसरीच्या वर्गातील सायली नम्रपणे तरीही तितक्याच धीटपणे त्यांना म्हणाली, “आम्ही वर्षभर भरपूर पुस्तकं वाचतो ना. आज आमची अर्ध्या दिवसाची शाळा असूनही आम्हाला दिवसभर शाळेत बसवून ठेवलंय? आता सोमवारी आम्हाला आर्धा दिवस शाळा पाहिजे” अर्थात तिच्या म्हणण्याप्रमाणे सोमवारी अर्धी सुट्टी काही मिळाली नाही, पण त्या अधिकाऱ्यांना सायलीच्या धीटपणाचं खूप कौतुक वाटलं होतं.

वर्गात कोणताही विषय शिकवत असताना मुलांना जास्तीत जास्त बोलतं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येक अध्ययन घटकाचं एक समान सूत्र मुलांच्या अनुभवांशी, भावभावनांशी जोडलेलं असतं. मुलाला बोलतं केलं की त्याचं मनच जणू शिक्षकाला वाचण्यासाठी उपलब्ध होतं. मूल कशा पद्धतीने विचार करतं, त्याची भाषिक समज कितपत आहे, यांचा अंदाज शिक्षकाला काढता येतो.

ग्रामीण मुलांकडे बोलीभाषेतील शब्दांचा प्रचंड खजिना असतो. असे शब्द आम्ही मराठीच्या तासाला जमवले आहेत. त्यांना अनेकदा प्रमाणभाषेत प्रतिशब्द देखील सापडत नाहीत. बोलीभाषेतील शब्द भाषेचं सौंदर्य वाढवतात, हे नकळत मुलांच्या मनावर बिंबवता येतं. गुरांना खाऊ घालण्याची चंदी, बैलांच्या गळ्यातलं शिवळ, धान्य साठवण्याचं खळं, विहिरीचा सांगळा काढणं, शेत वल्हवणं, शेकोटीत जाळण्यासाठी लागणारं कस्तान, मीठ म्हणजे गॉड, असे अनेक शब्द मुलांना माहिती असतात. आपल्याला माहीत असलेले काही शब्द आपल्या शिक्षकांना देखील माहीत नाहीत, याचीही मुलांना गंमत वाटते. यातून भाषेचे सामर्थ्य मुलांच्या लक्षात आणून देता येते.

पिढ्यानपिढ्या आपण जी छोटी छोटी बालगीतं म्हणत आलो आहोत, ती काळाच्या ओघात नष्ट होतील की काय अशी भीती वाटते. (यातील बरीच गाणी मुलांना खेळताना सहज सुचलेली असावीत, ती लिखित स्वरूपात सहसा सापडत नाहीत) यासाठी प्रकल्प म्हणून आम्ही मुलांचे काही गट तयार केले. गटातील सर्वांना माहिती असलेली घरी, परिसरात लहान-मोठ्यांकडून अशी गाणी जमवायला सांगितली. एका आठवड्याच्या कालावधीत आम्हाला बरीच गाणी मिळाली. या गाण्यांचा ‛कट्टीकट्टी बालबटट्टी’ नावाचा पीडीएफ संग्रह आम्ही केलेला आहे. गावकुसातील गाणी, पारंपरिक गीतं आम्ही शाळेत गाऊन घेतो. त्यांचाही संग्रह आम्हाला करायचा आहे. बोलीभाषेतील शब्द, गाणी, म्हणी, उखाणे आणि वाक्प्रचार यांमुळे शाळेत बोलताना ग्रामीण बोलीतील शब्द डोकावले तरी मुलांना संकोच वाटत नाही. मुलांच्या बोलीभाषेचा अनादर न करता हळूहळू त्यांना प्रमाणभाषेकडे नेता येते.

गप्पागोष्टींचं महत्त्व

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

 1. ajitbmunj

  पहिल्या उताऱ्यातील काही ओळी शेवटच्या उताऱ्यात पुन्हा आल्यात का??

  1. साधना गोरे

   शेवटचा उतारा इंट्रो म्हणून सुरुवातीला वेगळ्या शाईत घेतला आहे. आपले सभासद नसलेल्यांनाही तो वाचता येतो.

 2. jgajanan

  छान लेख आवडला

 3. gbmanjrekar@gmail.com

  लेख चांगला. उपक्रम चांगले पण महाविद्यालयात आलेल्या मुलांनाही वाचता येत नाही …त्यांना वाचनाची आवड कशी लावावी ?

 4. Anonymous

  खूप छान उपक्रम !मुलांना बोलतं करणं .शब्द व बालगीतांचा संग्रहवाढवण. चर्चेतून आत्मविश्वास वाढणं धीट पणे स्वतःच म्हणंण मांडता येणं.यासाठी शिक्षकांचे प्रयत्न व भिषीक कौषल्य विकासातील विविध प्रयोग आमल आणणे.अत्यंत अनुकरणीय आहे.

Leave a Reply