fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

भवन्स महाविद्यालयातील लाल परी अर्थात मराठी भाषा पंधरवडा

१ जानेवारी ते १५ जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रात मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुंबईतील भवन्स महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यक्रमांचा हा सविस्तर वृत्तांत – 

——————————————————————————————

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कालखंडात विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना व स्पर्धांना विद्यार्थ्यांसोबत शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले होते. पंधरवड्याची सुरुवात ‘संविधान समजून घेताना’ या कार्यक्रमाने करण्यात आली होती. यासाठी कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्याहून राजवैभव आणि अरविंद निगळे या तज्ज्ञ व्यक्तींना बोलवण्यात आले होते. अगदी साध्या व सोप्या भाषेत भारुडाच्या साहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. संविधानाची पूजा करू नका, त्याचा अर्थ स्वतः समजून घ्या व इतरांनाही समजावून सांगा असे आव्हान त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले.

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये ती खोलवर रुजविण्यासाठी ‘बातमी वाचन’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. पत्रकारांचा पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी बातमी वाचन सादर केले. या स्पर्धेच्या परीक्षकाची भूमिका डॉ. शैला माने यांनी पार पाडली. लिखाणाचे कौशल्य जागवण्यासाठी तसेच ते अबाधित राखण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील निबंध स्पर्धा घेण्यात आली. भय इथले संपत नाही, माझा मराठाची बोलू कौतुके, मला काही सांगायचं आहे यांपैकी एका विषयावर घरून निबंध लिहून आणण्याची मुभा विध्यार्थ्यांना देण्यात आली होती. गमतीजमतीतून भाषेचा विकास करण्यासाठी मराठी म्हणींची शब्दकोडी स्पर्धा देखील घेण्यात आली होती. या स्पर्धेला सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला होता.

या वर्षी एक नवी स्पर्धा ठेवण्यात आली होती ती म्हणजे हिंदी गाणं मराठीत अनुवाद करणे अर्थातच ‘गीतानुवाद’. अनुवादाची कला विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी या दृष्टीने केलेला हा प्रयत्न होता. विद्यार्थ्यांनी स्वतः हिंदीतली गाणी मराठीत अनुवादित करून सादर केली. इतिहास विभागाचे साहाय्यक प्राध्यापक रोनाल्ड जॉर्ज यांनी या स्पर्धेच्या  परीक्षकाची कामगिरी बजावली. ‘आम्ही असे घडलो’ या कार्यक्रमाला अभिनेत्री पूजा अजिंक्य, पत्रकार तृप्ती बासुतकर व शिक्षिका अंबिका पुजारी या माजी विद्यार्थिनींना बोलावण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांना बोलावणे ही भवन्स महाविद्यालयाची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. मराठी विषय घेऊन त्यांनी आपापल्या क्षेत्रात कशी प्रगती केली याचे अनुभवकथन या कार्यक्रमात केले गेले. या दरम्यान स्वप्ना अजिंक्य यांनी स्वतः काम केलेल्या  मालिकांमधल्या आठवणी जाग्या केल्या. तृप्ती वासुतकर यांनी त्यांना दूरदर्शनवर आलेले अनेक किस्से सांगितले तर अंबिका पुजारी यांनी विद्यार्थ्यांना मराठी शिकवताना काय काय घडामोडी घडतात त्या आवर्जून सांगितल्या.

महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून ज्ञात व्हावी यासाठी  सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने गणेशवंदना, कोळीगीत, पोवाडा, बहुरंगी नमन, लावणी, जोगवा, कीर्तन तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या निवडक कवितांचा अभिनव नाट्याविष्कार ‘घरोटं’ या शीर्षकाने करण्यात आला. या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे एका उत्तर भारतीय विद्यार्थ्याने – अतुल गुप्ता याने सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा.

या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाला ‘महाराष्ट्राची लालपरी’ असे नाव देण्यात आले होते. महाराष्ट्राच्या भटकंतीचे पूर्वापार चालत आलेले वाहन म्हणजे एसटी महामंडळाची लाल गाडी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फिरवून आणणारी ही लालपरी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारे प्रवासी, अशी संकल्पना घेऊन हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन विद्यार्थ्यांनीच केले होते. तर ‘घरोटं’ या नाटकाचं लेखन व दिग्दर्शन गौरव म्हालदार या विद्यार्थ्याने केले होते. सादरीकरण खूप रंगतदार झाले. संपूर्ण सभागृह विद्यार्थ्यांनी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तुडुंब भरले होते. या पंधरवड्यातील शेवटचा कार्यक्रम ‘माझा सायकल प्रवास आणि लेखन प्रवास’ हा होता. यासाठी पत्रकार व लेखक प्रशांत ननावरे यांना बोलवण्यात आले होते. त्यांनी आपल्या सायकलविषयी तसेच सायकलने केलेल्या विविध ठिकाणच्या प्रवासाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्याचप्रमाणे लेखन कला त्यांच्यात कशी अवगत झाली हे सांगायला देखील ते विसरले नाही. सायकलवरून अनेक फूड स्टॉलवर जाऊन तिथल्या पदार्थांविषयी लेखन करण्यात त्यांना रुची आहे असे त्यांनी म्हटले.

या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ प्रशांत ननावरे व मराठी विभागाच्या सर्व शिक्षकांच्या समवेत याच दिवशी पार पडला. हा संपूर्ण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सर्वांच्या साहाय्याने साजरा करण्यात आला त्यामुळे भाषेच्या गमतीजमतीतून, आठवणी व अनुभवांतून, कोड्यांच्या चौकटीतून व संस्कृतीच्या जागरणातून भारावून टाकणारा असा एक वेगळाच आनंद देऊन गेला.

– भगवान येडगे

विद्यार्थी, भवन्स महाविद्यालय, मुंबई

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

 1. कार्यक्रमाचे वर्णन खूप छान !

 2. स्फुर्ती, प्रेरणा देणारा कार्यक्रम .
  खरोखरच मनापासुन कौतुक वाटल.
  नव्या पिढीला शिकणारा घडवणारा कार्यक्रम.
  खूपच छान!

  s.k.somaiya vinay mandir jr. collage.
  भारती

 3. मस्त

 4. खूप भारी!अनुकरणिय!

 5. छान

Leave a Reply

Close Menu