fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

मराठी शाळा आणि पैसेवाल्यांच्या पळवाटा

मुलांना इंग्रजी शाळेत घालून घरात मराठी जपणाऱ्या मराठी कलाकारांना मला प्रश्न विचारायचाय, तुमचा मराठी सिनेमा घरातल्या टीव्हीवर जपला जाऊ शकतो ना, मग चित्रपटगृहांमध्ये मराठी सिनेमाला स्थान मिळावं, त्यातही प्राइम टाइम मिळावा यासाठी तुम्ही का भांडत असता? मराठी सिनेमाचे संस्कार मुलांवर घरात करा आणि चित्रपटगृहात नेऊन इंग्लिश सिनेमा दाखवा ना! कोणताही कलाकार ‘माझ्या’ सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून भांडत असेल तरी ठीक. पण हे कलाकार सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून ‘मराठी सिनेमा’ या शब्दाचा पुरेपूर वापर करून घेतात. असाच प्रश्न पत्रकारांनाही, माझं मराठी वर्तमानपत्र मी घरात वाचेन, यावर ते समाधानी असतात का? आपल्या वर्तमानपत्राचा किंवा वृत्तवाहिनीचा बाहेरही प्रसार व्हावा असंच त्यांना वाटत असतं ना! मराठी लेखकांनी आपल्या कादंबऱ्या मुलांना घरात वाचून दाखवाव्यात. त्या प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा अट्टाहास कशासाठी? आमची मराठी शाळा कशी कात टाकते आहे ही गोष्ट अगदी उत्साहाने लोकांना पटवून देणारे मराठी शाळेतले शिक्षक पालकाच्या भूमिकेत शिरल्यावर मात्र या लेखात दिलेल्या एकूण एक पळवाटा अवलंबतात. मराठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक आपल्या मुलांना इंग्रजी भाषा घरात शिकवू शकतात ना? मग त्यासाठी इंग्रजी माध्यमात जाण्याची काय गरज? महाविद्यालयांमध्ये मराठी टिकून राहावी असे म्हणणाऱ्या प्राध्यापकांची मुलं तरी मराठी शाळेत जातात का?” 

मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या आणि मुलांना शाळेत घालायची वेळ आली की इंग्रजी माध्यमाची निवड करणाऱ्या समाजातील प्रस्थापित वर्गाची या निर्णयाच्या तकलादू कारणांची यादीच  पत्रकार नमिता धुरी या लेखातून मांडतायत – 

———————————————————————–

मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. मराठी शाळांच्या आग्रहाला प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र मराठी माणसाला भरपूर पळवाटा सापडतात. जे पालक मराठी शाळांबद्दल भरभरून तक्रारी करत असतात तेच पालक इंग्रजी शाळेसाठी घर विकावं लागलं तरी त्याविरोधात ‘ब्र’सुद्धा काढत नाहीत.

पहिली पळवाट – आमच्या घराजवळ एकही चांगली मराठी शाळा नाही.

हे कारण देणाऱ्या पालकांनी मराठी शाळेसाठी साधं ‘गुगल सर्च’सुद्धा केलेलं नसतं. आणि नसेलच घराजवळ मराठी शाळा, तर मराठी शाळेजवळ घर घ्या ना. इंग्रजी माध्यमाचा खर्च ज्यांना परवडतो त्यांना हे नक्कीच शक्य आहे. नाहीतरी,  इंटरनॅशनल स्कूलचा फीसहीत इतर खर्च करणं आणि गृहकर्जाचे हप्ते फेडणं यातला फरक दिवसेंदिवस कमीच होत चालला आहे. मुंबई हे इतकं मोठं शहर आहे की, इथे दर काही मीटरवर शाळा असूच शकत नाही. शाळा घराजवळ असणं केव्हाही चांगलंच. पण शाळा लांब आहे म्हणून कोणी शिकायचं थांबतं का? प्रत्येक शाळा ही कोणाला तरी जवळ वाटते, कोणाला तरी लांब. इंग्रजी शाळेत स्कूलबसने जावं लागत असेल तर ते चालतंच ना. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस दादर रेल्वेस्थानकावर जाऊन उभं राहावं. कितीतरी मुलं दादरच्या इंग्रजी शाळांमध्ये शिकण्यासाठी ट्रेनचा प्रवास करून येताना दिसतात. ती मुलं अजिबात थकलेली वगैरे दिसत नाहीत. कारण लांबचा प्रवास करावा लागला तरी ‘आम्ही तुला चांगल्याच शाळेत घातलं आहे’, हे पालकांनी मुलांच्या मनावर बिंबवलेलं असतं.

आज बऱ्याच मराठी शाळा बंद पडत असताना, शाळा घराजवळच पाहिजे हा हट्ट कितपत योग्य, तोही फक्त मराठीच शाळांबाबत? कनिष्ठ वर्गातून आलेल्या पालकांनी हा विचार केला तर ठीक. कारण त्यांना मुलांना शाळेत सोडायला किंवा आणायला जाण्यासाठी वेळ नसतो. पैसे देऊन माणूस ठेवता येत नाही किंवा व्हॅन लावता येत नाही. शिवाय घरी आल्यावर मुलांनाही काहीतरी कामधंदा करून पैसे कमवावे लागतात. ही सगळी दगदग सोसण्याची मुलांची शारीरिक ताकद नसते. कारण तितकासा पौष्टिक आहारही मिळत नसतो. पण मध्यमवर्गीय आणि त्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची स्थिती याच्या अगदी उलट असते. लांबच्या मराठी शाळेत जाण्यासाठी पालक वाहनाची सोय करू शकतात. घरी आल्यावर आराम करायला मुलांकडे भरपूर वेळ असतो (अर्थात क्लास लावला नसेल तर). घरातच सकारात्मक वातावरण निर्माण करून मुलांची मानसिक ताकद वाढवता येते आणि पौष्टिक आहारातून शारीरिक ताकद वाढवता येते. मग मराठी शाळेसाठी थोडं लांब जावं लागत असेल तर बिघडलं कुठे?

दुसरी पळवाट – आम्ही आमच्या मुलांना घरी मराठी भाषा शिकवतो.

…..यापेक्षा भंपक वाक्य दुसरं नाही. घरात आपल्याला आपल्या धर्माचे संस्कारही मिळत असतात. पण घरातून बाहेर पडल्यावर गल्लोगल्ली आपल्या धर्माची प्रार्थनस्थळं आपल्याला हवीच असतात ना? घरात गणपती आहे म्हणून बाहेरचं गणेश मंदिर बंद व्हावं असं आपल्याला वाटतं का? आपल्या मातृभाषेला घरात कोंडून ठेवण्यापेक्षा तिला आपला उंबरठा ओलांडून बाहेर जाऊ द्या ना!

मुलांना इंग्रजी शाळेत घालून घरात मराठी जपणाऱ्या मराठी कलाकारांना मला प्रश्न विचारायचाय, तुमचा मराठी सिनेमा घरातल्या टीव्हीवर जपला जाऊ शकतो ना, मग चित्रपटगृहांमध्ये मराठी सिनेमाला स्थान मिळावं, त्यातही प्राइम टाइम मिळावा यासाठी तुम्ही का भांडत असता? मराठी सिनेमाचे संस्कार मुलांवर घरात करा आणि चित्रपटगृहात नेऊन इंग्लिश सिनेमा दाखवा ना! कोणताही कलाकार ‘माझ्या’ सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून भांडत असेल तरी ठीक. पण हे कलाकार सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून ‘मराठी सिनेमा’ या शब्दाचा पुरेपूर वापर करून घेतात. असाच प्रश्न पत्रकारांनाही, माझं मराठी वर्तमानपत्र मी घरात वाचेन, यावर ते समाधानी असतात का? आपल्या वर्तमानपत्राचा किंवा वृत्तवाहिनीचा बाहेरही प्रसार व्हावा असंच त्यांना वाटत असतं ना! मराठी लेखकांनी आपल्या कादंबऱ्या मुलांना घरात वाचून दाखवाव्यात. त्या प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा अट्टाहास कशासाठी? आमची मराठी शाळा कशी कात टाकते आहे ही गोष्ट अगदी उत्साहाने लोकांना पटवून देणारे मराठी शाळेतले शिक्षक पालकाच्या भूमिकेत शिरल्यावर मात्र या लेखात दिलेल्या एकूण एक पळवाटा अवलंबतात. मराठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक आपल्या मुलांना इंग्रजी भाषा घरात शिकवू शकतात ना? मग त्यासाठी इंग्रजी माध्यमात जाण्याची काय गरज? महाविद्यालयांमध्ये मराठी टिकून राहावी असे म्हणणाऱ्या प्राध्यापकांची मुलं तरी मराठी शाळेत जातात का?

‘मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्याचा आमचा निर्णय कसा चुकीचा नाही आणि आमचं मराठीवर कसं प्रेम आहे’, हे पटवून देण्यासाठी पालक मुलांना घरी मराठी शिकवतात. त्यांचं मराठीवर खरंच प्रेम असेल तर त्यांनी मराठीचं शालेय शिक्षणातील प्रथम भाषेचं स्थान नाकारलं नसतं.

मुलं जेव्हा मराठी शाळेत शिकतात तेव्हा मराठी ही त्यांची प्रथम भाषा असते. इंग्रजी माध्यमात शिकतात तेव्हा ती द्वितीय किंवा तृतीय होते. ही दोन्ही स्थानं परक्या भाषेची आहेत. म्हणजे पालक आपल्या भाषेला परक्या भाषेचं आणि परक्या भाषेला आपल्या भाषेचं स्थान बहाल करतात. कोणत्याही गोष्टीचा प्रचार, प्रसार, संवर्धन व्हायचं असेल तर ती शिक्षणक्षेत्रात टिकली पाहिजे. उदा. हिंदी आणि इंग्रजी. या भाषा शिक्षणक्षेत्रात टिकून आहेत म्हणून त्यांचा प्रसार झाला आहे. इंग्रजी माध्यमातल्या मराठीमुळे मराठी भाषा शिक्षणक्षेत्रात कदाचित टिकून राहीलही, पण फक्त परकी भाषा म्हणून. मग मराठीच्या राजभाषा असण्याला अर्थच काय?

ज्यांची शाळा इंग्रजी असते आणि घरात पालकांनी हट्टाने, अभिमानाने मराठी भाषा शिकवलेली असते त्यांची सर्वात मोठी अडचण ही असते की, त्यांच्याकडे मराठी भाषेतील शब्दसंपत्ती असते. पण ती कुठे, कधी आणि कशी वापरावी याचं योग्य ज्ञान नसतं. अशी मुलं आपल्या बोलण्यात किंवा लिखाणात अनावश्यक ठिकाणी, शोभणार नाही अशा पद्धतीने मोठमोठे मराठी शब्द वापरून स्वतःचं मराठीप्रेम सिद्ध करायचा प्रयत्न करतात.

तिसरी पळवाट – मराठमोळी इंग्रजी शाळा

मराठी माध्यमवादी भूमिका पटणारे, पण ती कृतीत उतरवता न येणारे पालक आमची इंग्रजी माध्यमाची शाळाच कशी मराठमोळी आहे हे पटवून देण्याच्या प्रयत्नात असतात. फक्त मराठी सण साजरे करून मराठी भाषा टिकेल का? इतकंच प्रेम असेल मराठीविषयी तर तिचं प्रथम भाषेचं स्थान तुम्ही का नाकारता? त्यापेक्षा मुलांना मराठी शाळेत घाला आणि मराठी संस्कृतीसोबतच इतर संस्कृतींची ओळख करून द्या.

चौथी पळवाट – स्पर्धा वाढलीय

“पूर्वी कुठे होतं इंग्रजी माध्यमाचं फॅड? पण तरीही आपण आयुष्यात यशस्वी झालोच ना?”, असा प्रश्न विचारल्यावर पालकांचं उत्तर असतं, ‘काळ बदललाय, स्पर्धा वाढलीय’. मुळात स्पर्धा वाढवली कोणी? पैसेवाल्या पालकांनी इतर शिक्षण मंडळांच्या शाळांना महत्त्वच दिलं नसतं, तर भरभरून गुण मिळवणारी पिढीच निर्माण झाली नसती. अकरावी प्रवेशातील चढाओढ अतिप्रमाणात वाढलीच नसती.

‘ज्ञानरचनावाद’ हा शब्दच जेव्हा एसएससी बोर्डाच्या शाळांना माहीत नव्हता त्या काळात एसएससी बोर्डात, त्यातही ‘संपूर्ण’ मराठी माध्यमात शिकलेली मुलं आजच्या तथाकथित ‘स्पर्धा वाढलीय’ नावाच्या काळात स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत. ‘संपूर्ण’ मराठी माध्यमाचं समर्थन करण्यासाठी यापेक्षा चांगलं कारण असूच शकत नाही. (सेमी इंग्रजीचं समर्थन करणाऱ्यांनीही हा मुद्दा लक्षात घ्यावा.)

पाचवी पळवाट – मराठी शाळांमधल्या शिक्षकांची मानसिकता चांगली नसते.

हा आरोप काही अंशी खरा आहे, काही अंशी खोटा. मानसिकता व्यक्तिनुरूप बदलत असते. इंग्रजी माध्यमातले शिक्षक मुखवटे घालून वावरत असतात. जोपर्यंत तुम्ही इंग्रजी माध्यमात पैसा पेरताय तोपर्यंत टीचर तुमच्या मुलांना गोंजारून-गोंजारून शिकवेल. मग टीचर ख्रिसमसला सांताक्लॉज काय बनून येईल, पहिल्या दिवशी टाळ्या देऊन मुलांचं स्वागत काय करेल, मुलांसोबत डान्स काय करेल…..सगळं होईल. पण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची खरी मानसिकता तुम्हाला त्या दिवशी कळेल ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या हातात पैसा ठेवणं बंद कराल. इंग्रजी शाळेच्या पालकांनी एक प्रयोग करून पाहावा. एखाद्या महिन्यात आम्ही फीच भरणार नाही असं शाळेला बेधडकपणे सांगून टाकावं. कालपर्यंत ‘ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह’ देणारी हीच शाळा यावेळी तुमच्या मुलांना शाळेच्या आवारात पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही.

राहिला प्रश्न मराठी शाळेतील शिक्षकांच्या मानसिकतेचा; तर हा प्रश्न पालक-शिक्षक संवादाने, प्रसंगी पालकांच्या एकजुटीने सुटू शकतो. एखाद्या मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती आपल्या शाळेची पालक आहे म्हटल्यावर शाळा काहीशी दबकूनच असते. याचा फायदा पालकांनी चांगला बदल घडवण्यासाठी करून घ्यावा.

सहावी पळवाट – अलिप्तता

काही पालक तर मराठी शाळांचा विषय निघाला की गप्पच बसतात. त्यांना वाद घालायचा नसतो. असे पालक ‘हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे’ असं म्हणून चर्चा संपवू पाहतात. शिवाय ‘इतर मुलांना इंग्रजी शाळा परवडत नसतील तर त्याच्याशी आमचा काय संबंध ?’ अशीही भावना असते. पैसेवाल्यांची हीच अलिप्तता मराठी शाळांच्या मुळावर उठलीय.

सातवी पळवाट – मराठी शाळांमध्ये चांगल्या सुविधा मिळत नाहीत

सोयी-सुविधांसाठी पैसा खर्च करावा लागतो. तो मराठी शाळांकडे नाही. कारण मराठी शाळा आर्थिक फायद्यासाठी सुरू झालेल्या नाहीत. त्या कमीत कमी खर्चात शिक्षण देतात. अशावेळी पालकांची जबाबदारी आहे की, त्यांनी स्वखुशीने मराठी शाळेवर पैसा खर्च करावा.

एक काळ होता जेव्हा मराठी कलाकार, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी यांची मुलं मराठी शाळेत शिकत होती. त्यावेळीसुद्धा मराठी शाळांमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा नव्हत्या. पण एकाही पांढरपेशा पालकाने पालकसभेत उभं राहून प्रश्न विचारला नसेल की, का आमच्या मराठी शाळेला सुरक्षा रक्षक नाही? का आमच्या शाळेत परदेशी भाषा शिकवली जात नाही? का आमच्या मुलांना इंग्रजी बोलता येत नाही? पैसेवाल्या पालकांना ‘त्या’वेळी आपल्या जबाबदारीची जाणीव झाली नाही आणि आज त्यांचीच मुलं पुढच्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी शाळांना नालायक ठरवत आहेत. पैसेवाल्या पालकांनी त्या काळी आपल्या गरजांची जाणीव मराठी शाळांना करून दिली असती, तर आज मराठी शाळांची स्थिती वेगळी असती. बरं, यावर ‘आमच्या गरजा इंग्रजी शाळांना कळल्या’, असाही युक्तिवाद केला जाईल. पण हे खरं नाही. इंग्रजी शाळांनी पालकांच्या गरजा ओळखल्या नाहीत, तर पालकांसाठी गरजा निर्माण केल्या. नाहीतर, कलरफुल बेन्चेसवर बसणं आणि क्यूट-क्यूट युनिफॉर्म्स घालणं ही भारतातल्या कोणत्या पाल्याची प्राथमिक गरज होती?

इंग्रजी शाळा या बदलत्या काळात आलेल्या असल्याने त्यांच्याकडे सुरुवातीपासूनच सर्व सुविधा आहेत. पण मराठी शाळांना नव्याने सर्व आणावं लागणार आहे. ही प्रक्रिया कठीण आहे, पण अशक्य नाही. दरवर्षी आपण इंग्रजी शाळेवर किती खर्च करणार आहोत याचा हिशोब पालकांनी करावा आणि तेवढा पैसा मराठी शाळेच्या नावाने बाजूला काढावा. आपल्या मुलांना मराठी शाळेत घालावं. त्यातून बरेच पैसे वाचतील. ते पैसे आपल्याच पाल्याच्या मराठी शाळेत अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करावेत. आणखी काही पालकांना यासाठी तयार करता आलं तर चांगलंच.

आठवी पळवाट – इंग्रजी शाळेतून ‘एक्स्पोझर’ मिळतं.

इंग्रजी शाळांमध्ये मिळणारे कला, खेळ आणि विज्ञान-तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण एका छताखाली मिळत असले तरीही एका फीमध्ये मिळत नाही. वर्षभराचे लाखो रुपये शुल्क भरूनही फुटबॉलसाठी वेगळी फी, कराटेसाठी वेगळी फी, स्कूलबसचे पैसे वेगळे, सहलीचे वेगळे, वरून कृतिशील आणि आनंदी शिक्षणाच्या नावाखाली विविध प्रकल्पांसाठी लूट चालते ती वेगळीच. याचाच अर्थ फीमध्ये फक्त पुस्तकी शिक्षण मिळतं. इतर संधी मिळवण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागतो. त्यापेक्षा मराठी शाळेत मुलांना घालून इतर प्रशिक्षणांसाठी बाहेर कुठेही पाठवता येतं. पालकांचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर मुलं स्वतःच्या संधी स्वतःच शोधतात. यातूनही वाचलेल्या पैशांतून गरजू मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेता येईल.

नववी पळवाट – इंग्रजी शाळांमधलं शिक्षण advance आहे.

केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शिक्षणाला advance ठरवणाऱ्या पालकांपैकी किती पालकांनी आपलं मूल त्या शाळेत जाण्यापूर्वी सर्व शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाची तुलना करून पाहिलेली असते? जास्तीत जास्त पालक ऐकीव माहितीवरच विश्वास ठेवतात. बरं, advance म्हणजे काय? असं विचारलं की, ‘आपल्याला जे सातवीला असतं ना ते त्यांना पाचवीलाच असतं’, असं उत्तर मिळतं. कोणाच्यातरी आधी काहीतरी शिकणं यातच हे पालक समाधानी असतात. आपल्या पाल्याची खरी गरज काय हे त्यांना माहितीच नसतं. पैसेवाल्या पालकांना खरंच advance शिक्षण हवं असेल तर ते शिक्षण आपल्या मराठी शाळेत यावं यासाठी त्यांनी प्रयत्न का नाही केले? अभ्यासक्रम पालक बदलू शकत नाहीत. पण आजचा काळ असा नाही की सरकारने जे छापून दिलंय त्यालाच चिकटून बसा. पुस्तकाच्या बाहेरचं ज्ञान तुम्ही विविध उपक्रमांतून मुलांपर्यंत पोहोचवू शकता.

एखाद्या कलाकाराने मराठी शाळेत जाऊन कलेविषयी मार्गदर्शन करावं. पत्रकार, लेखक, नाटककार यांनी लेखन आणि वाचनविषयक मार्गदर्शन करावं. खेळाडूने खेळ शिकवावा. वास्तुविशारद, अभियंते यांनी शाळेतील भौतिक सुविधांकडे लक्ष द्यावं. प्रत्येक पालक महिन्यातून किमान एक सुट्टी आपल्या शाळेसाठी खर्च करत असेल तर मराठी शाळेचा कालानुरूप विकास शक्य आहे. शाळेच्या विकासासाठी आवश्यक आहे बाहेरच्या जगाचं ज्ञान. ते कनिष्ठवर्गीयांकडे नाही. ते आहे उच्चभ्रू, उच्च शिक्षितांकडे. पण हा वर्ग आपलं ज्ञान आणि पैसा घेऊन इंग्रजी माध्यमाच्या मागे धावतो आहे.

दहावी पळवाट – इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या आणि भाषांच्या विद्यार्थ्यांसोबत एकत्र शिकतात.

इथे पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, तुमची मुलं कितीही विविधतेने नटलेल्या वर्गात बसत असतील तरी ती एकाच आर्थिक स्तरांतल्या मुलांसोबत वावरत असतात. एकत्र आल्यावर हिंदीतच बोलतात. वेगवेगळ्या भाषा बोलायला शिकत नाहीत. याउलट मराठी माध्यमातील मुलं सर्व आर्थिक स्तरांतल्या विद्यार्थ्यांसोबत वावरत असतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक जाणिवा अधिक जागृत असतात. शिवाय पुढे उच्च शिक्षण घेताना विविध जाती-धर्म-भाषांच्या मुलांसोबत सहज मिसळू शकतात.

अकरावी पळवाट – मराठी शाळांमधलं वातावरण चांगलं नसतं, मुलं बिघडतात.

प्रत्येक गोष्टीला चांगली-वाईट बाजू असतेच. पण आपल्याकडे इंग्रजी माध्यमाचं चांगलंच बघायचं आणि मराठी माध्यमाचं वाईटच बघायचं अशी पद्धत आहे. ‘शिवी’ या गोष्टीचं सध्याच्या काळात फारसं अप्रूप उरलेलं नाही. लहान मुलांनी शिव्या घालू नयेत हे मान्य, पण एखाद्याने घातलीच शिवी तर लगेच तो किती वाईट संस्कारांतून आलेला आहे यावर चर्चा सुरू होते. ही चर्चा करणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या पालकांची मुलं शिव्या घालत नाहीत का? फरक इतकाच असतो की, मराठीतली शिवी ‘भ’पासून सुरू होते आणि इंग्रजीतली ‘फ’पासून. मराठी शाळांमधली मुलं मारामाऱ्या करताना किंवा काही अश्लील बोलताना दिसली की, ‘मराठी शाळांचा दर्जा घसरला, मराठी शाळांचे संस्कार वाईट, वातावरण वाईट’ असा शेरा मारून पालक मोकळे होतात. मग खूप निर्धाराने पाल्याला मराठी माध्यमात घातलेल्या काही पालकांचाही विश्वास डळमळतो. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलीचा विनयभंग झाला, मुलाचा खून झाला, फीसाठी मुलांना उन्हात उभं केलं किंवा अगदी हाडं तुटेपर्यंत विद्यार्थ्याला मारहाण झाली तरीही पालकांचा इंग्रजी शाळांवरचा विश्वास डळमळत नाही. हे गुन्हे त्या एका विशिष्ट शाळेपुरते मर्यादित ठेवून ‘आमच्या इंग्रजी शाळेत मात्र असं कधी घडत नाही’, असं म्हणायला पालक मोकळे असतात.

बारावी पळवाट – पर्सनल अटेन्शन

मराठी शाळांमध्ये वर्गात ६०-७० मुलं असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही. याउलट आंतरराष्ट्रीय आणि केंद्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये वर्गात फक्त १५-२० मुलंच असल्याने ‘पर्सनल अटेन्शन’ दिलं जातं, असं पालकांचं म्हणणं. हे खरंच खरं असेल तर घरगुती शिकवण्यांच्या बाहेरही ‘ऑल बोर्ड्स’ अशा पाट्या का लागलेल्या असतात? ‘नीट’ परीक्षा सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असतानाही सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ‘नीट’साठी क्लास का लावावा लागतो? यावर उत्तर असतं की, पालक नोकरी करत असल्याने मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ नाही. ज्या मुलाला घरात एकुलता एक असून पर्सनल अटेन्शन मिळत नाही त्या मुलाला इंटरनॅशनल स्कूलच्या वर्गात पंधरा-वीस मुलांमध्ये ‘पर्सनल अटेन्शन’ कसं मिळतं? इंग्रजी शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा चांगला असेल, तर क्लासची गरज का भासते?

तेरावी पळवाट – इंग्रजी शाळांचे निकाल

काही पालक इंग्रजी शाळांच्या उंचावलेल्या निकालाचं कौतुक करत त्यांच्या मागे धावतात. तोंडात सोन्या-चांदीचे चमचे घेऊन जन्माला आलेल्या १५-२० मुलांची निवड करायची, त्यांना भरभरून गुण देत उत्तीर्ण करायचं आणि शंभर टक्के निकालाचे फलक शाळेबाहेर लावायचे. अशा शाळांचं कौतुक पालकांना का वाटतं? ज्या शाळेची कमाल ५० मुलंही शालांत परीक्षेला बसत नाहीत त्यांचा निकाल १०० टक्के लागणारच ना. सर्व सुखे पायाशी लोळण घेणाऱ्या घरातली मुलं हुशारच असतात. त्यांच्या उपजत हुशारीवर आंतरराष्ट्रीय शाळा मिरवत असतात. शैक्षणिक वातावरणच नसणाऱ्या घरातल्या मुलांना घडवण्याचं बळ आहे का आंतरराष्ट्रीय शाळांच्या शिक्षकांमध्ये?

चौदावी पळवाट – पालकांची बदली

‘इंटरनॅशनल स्कूलचा फायदा काय?’ असा प्रश्न विचारल्यावर पालक त्या शाळांचं जागतिक महत्त्व समजावू लागतात. ‘आमची कुठेही बदली झाली तरी मुलांची शाळा बदलताना त्रास होणार नाही’, असं पालकांचं म्हणणं असतं. पण इंटरनॅशनल शाळांमध्ये शिकणाऱ्या किती मुलांच्या पालकांची खरंच बदली होत असते? मराठी प्रसिद्धीमाध्यमांसाठी काम करणारे पत्रकार, मराठी साहित्यिक, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असणारी नोकरदार मंडळी, मराठी कलाकार, इत्यादींची बदली होऊन होऊन कुठे होणार? महाराष्ट्रातच ना? मग इंटरनॅशनलचा हट्ट कशासाठी? माहिती-तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींची वेगवेगळ्या भाषिक प्रदेशात बदली होत असते, हे मान्य. पण अशावेळी मुलांना नातेवाईकांकडे किंवा वसतिगृहात ठेवणे, दोनपैकी एका पालकाने महाराष्ट्रात राहणे किंवा महाराष्ट्रात असेपर्यंत मराठीत शिकवून पुढील शिक्षण इंग्रजीत घेणे या पर्यायांचा विचारच पालक करत नाहीत.

पंधरावी पळवाट – प्रत्येकजण समाजसेवक बनू शकत नाही.

मुळात मराठी शाळांची स्थिती बदलण्यासाठी पालकांनी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेण्याची अजिबात गरज नाही. स्वतःच्या मुलांना मराठी शाळेत घातलं की, या गोष्टी आपोआप घडत जातील. स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून मराठी शाळेसाठी काम करणारे उपकारकर्त्याच्या भावनेने काम करत असतात. गरिबांची शाळा म्हणून ते मराठी शाळेवर दया दाखवत असतात. त्यापेक्षा आपल्या मुलांना मराठी शाळेत घातल्यास पालक कर्तव्यभावनेने काम करू लागतील. आपल्या मुलांना योग्य सोयी-सुविधा मिळत नाहीत हे कळल्यावर ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटतील. तेव्हा, ‘वेळ नाही’ हे कारण द्यावंसं वाटणार नाही.

(मराठी शाळा नेमक्या इथेचे चुकतात…! हा पुढील लेख मराठी शाळांचे संस्थाचालक, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि मराठी माध्यमवादी यांच्यासाठी येत्या सोमवारी प्रकाशिक करण्यात येईल.)

– नमिता धुरी

namitadhuri96@gmail.com, ९८१९७४२०९५.

(लेखिका पत्रकार आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. मुद्देसूद आणि सडेतोड लेख।

  2. वास्तववादी, छान लेख

  3. खूप छान लेख आहे खरोखर हीच परिस्थिती आहे

  4. खुप छान लेख..

Leave a Reply

Close Menu