fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम – (भाग १)

१४ – १५  डिसेंबर २०१९ रोजी परळ – मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र आणि आर.एम. भट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेत शिक्षकांसाठी ‘माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय देण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील निवडक निबंध ‘मराठी प्रथम’वर प्रकाशित करण्यात येत आहेत. कल्याण येथील गणेश विद्यामंदिर या शाळेतील शिक्षक गुणेश कौसल्या जगन्नाथ यांचा या निबंधमालेतील हा पहिला निबंध –

————————————————————————————–

कोणत्याही शाळेत महत्त्वाचे असते ते मुलांचे शिकणे. मुले शिकली तर सहजच शाळा खऱ्या अर्थाने शिक्षणाची आनंद केंद्रे होतील. नियमित अभ्यासक्रमाखेरीज आयुष्य जगायला लागणारी अनेक जीवनकौशल्ये सहज रुजविण्याचे साधन म्हणजे उपक्रम होय. उपक्रमामुळे छोट्या छोट्या उद्देशांची पूर्तता करत मुलांच्या मनात अभ्यासाची, चौकसतेची गोडी लावणे सोपे जाते. शिक्षकांनाही नवनवीन अनुभूती मिळते. साहजिकच शिकणे ही प्रक्रिया जबरदस्तीची न ठरता आनंददायी होते.

माझी मराठी शाळा गणेश विद्यामंदिर ही कल्याण पूर्व विभागातील एक नामांकित शाळा आहे आणि शिक्षक म्हणून मला नेहमीच माझ्या शाळेचा अभिमान वाटत राहिला आहे. शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर शाळेची  गुणवत्ता वाढविण्यासाठी चालत असलेली इतर ज्येष्ठ शिक्षकांची मनापासूनची धडपड पाहून मन सुखावूनच गेले होते. गेल्या २२ वर्षात अनेक उपक्रम राबविता आले. प्राथमिक विभागात असल्याकारणाने सदैव लहान मुलांची निरागसता वाट्याला आली. उपक्रमांच्या यशस्वीतेची पावती नेहमीच मुलांच्या उत्साही सहभागातून मिळत राहिली. विद्यार्थी विकासाचे वेगवेगळे उपक्रम सुरू झाले. शाळेव्यतिरिक्त वेळही शाळेतच जाऊ लागला. शाळेचा नावलौकीक वाढवणाऱ्या या कामात संस्थाचालक, पालक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांचे भरभरून सहकार्य मिळत गेले. विकासाच्या विविधांगी उपक्रमांनी शाळा नावाचे झाड चांगलेच बहरले. शालेय जीवनात विद्यार्थी म्हणून जे जे मला हवे असे वाटायचे, ते ते सर्व आता शाळेतल्या विद्यार्थ्यांना मित्र म्हणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न  करत आहे.

वाचाल तर वाचाल – वाचनालयाची सुरुवात

शाळेतले वाचनालय शिक्षकांपुरते मर्यादित होते. वाचन चांगले असल्याने वाचनाचे महत्त्व माहीत होते. शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय नाही, ही सल कुठेतरी टोचत असे. वर्तमानपत्रांत वेगवेगळ्या विषयांवर येणाऱ्या लेखमालेतले लेख कापून त्यांच्या कात्रणवह्या तयार केल्या. त्या वह्या रिकाम्या तासाला देऊन मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली. घरची काही पुस्तके, वाढदिवस किंवा अन्य निमित्ताने मुलांकडूनच गोळा केलेली काही पुस्तके यातून एका उन्हाळी सुट्टीत एका पत्र्याच्या छोट्या ट्रंकेत ‘आपले वाचनालय’ सुरू केले! पुढे पुस्तके वाढत गेली. माझा उत्साह आणि मुलांमध्ये निर्माण झालेली वाचनाची आवड बघून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केले, ज्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला, होतो आहे.

लिहूया तर खरं…!

जे छान ऐकू शकतात, ते छान वाचू शकतात आणि ते छान लिहू शकतात. अशा संकल्पनेतून मुलांना लिहिते करायचे प्रयत्न केले. मुलांना काही गोष्टी ऐकवल्या, वाचून दाखवल्या. पुढे छोटे छोटे प्रसंग, अनुभव कागदावर मांडता यावेत यासाठी प्रयत्न सुरू झाले. मुलांनी लिहिलेले लेख, निबंध, कविता यांना व्यक्त होण्यास मंच मिळावा, म्हणून हस्तलिखित सुरू केले. शिवाय काही नियतकालिकांत प्रसिद्धी मिळावी यासाठी धडपड केली. लेखन प्रसिद्ध होऊ लागल्यावर मुलांचा आत्मविश्वास वाढत गेला. लेखनावर चर्चा होऊ लागल्या.

 

पत्रातला संवाद

लिहायला जमू लागल्यावर मुलांसाठी दिवाळीच्या सुट्टीत पत्रलेखनाचा उपक्रम सुरू केला. वर्गातच पोस्टकार्ड देऊन पत्रे लिहून घेतली. सुरुवातीला स्वतःच्याच घरी पत्र पाठवायचे म्हणून शाळेशेजारील पोस्टपेटीजवळ मुलांना घेऊन जायचो. पेटीत पत्र टाकायला आणि नंतर घरी आलेलं ते पत्र शाळेत आणायला मुलांना मजा यायची. पत्राचा प्रवास पुस्तकातून बाहेर येऊन प्रत्यक्ष अनुभवणे हे मुलांसाठी अनौपचारिक शिक्षण होते.

सुरुवातीला आई-वडिलांना, मग मित्र-मैत्रिणींना पत्र लिहिणारी मुले सुटीत मला पत्रं लिहू लागली.  पुढे पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या लेखकांना पत्रं गेली. नागरिकशास्त्र शिक्षणाचा भाग म्हणून राज्य, देश पातळीवरच्या मंत्र्यांना पत्रं लिहिली. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनाही पत्रं पाठवली. आता कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या आमच्या एका विद्यार्थिनीने तिला आलेले राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांचे पत्र जपून ठेवलेय. वेगवेगळ्या लेखकांचे प्रतिसाद पाहून मुलांचा हुरूप वाढला. पुढचे पाऊल म्हणून देशोदेशींच्या दूतावासांना पत्रं लिहिली. तिकडची संस्कृती, भूगोल, प्रदेशाची माहिती विचारली. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. देशोदेशींच्या आलेल्या प्रतिसादांनी मुले आनंदून गेली. काही देशांनी त्यांचे नकाशे तर काही देशांनी चक्क चलनही पाठवले. आमच्या देशात कधी आलात तर भेटायला नक्की या, असा संदेश बघून मुले खुश होत.

पत्रलेखनातून मुलांचा लिहिण्याचा आत्मविश्वास वाढला, भाषा समृद्ध होत गेली. शिवाय कमी शब्दांत आपले म्हणणे मांडणे, अभिव्यक्त होणे, हे मुलांना खूप उपयोगी पडले. तसेच दूतावासांना लिहिताना इंग्रजी भाषेत लेखन कौशल्याचीही ओळख झाली. मोबाईलच्या जमान्यात आजही ही मुले छान पत्र लिहितात, व्यक्त होतात. जे प्रत्यक्षात बोलता येत नाही ते पत्रसंवादातून मुले व्यक्त होतात. यंत्रावर टाइप केलेल्या फॉन्टपेक्षा  हाताने लिहिलेल्या पत्रांनी मुलांच्या जाणिवांचा संवाद आजही घडतो.

माझे कुटुंब, माझा इतिहास

सातवीतील विद्यार्थ्यांना गेली वीसेक वर्षे इतिहास – नागरिकशास्त्र विषय शिकवतोय. हे विषय नीटसे समजावेत यासाठी प्रकल्प पद्धत सुरू करायचे ठरवले. यातूनच ‘माझा इतिहास’ नावाचा प्रकल्प पुढे आला. मुलांना स्वतःच्या आयुष्यातील बालपणापासून ते सातवीपर्यंतच्या आठवणीतील घटनांचा एक प्रवास मांडायचा असतो. घर ते शाळा, परिसर, समाजव्यवस्था यात झालेले बदल टिपायचे नि मांडायचे असतात. यासाठी मोठ्यांची मदत घ्यायची मुभा असते. ‘गाव ते शहर’ असा कुटुंबाच्या स्थलांतराचा प्रवास एरवी अनेक मुलांना समजलाच नसता. यानिमित्ताने तो अख्खा प्रवास उलगडत जातो. स्थित्यंतरे नेमकी कशी घडली हे लक्षात येते. प्रकल्पासाठी जुनी घरे, आधीच्या पिढीतील नातेवाईक, दळणवळणाची साधने, वस्तू अशा छायाचित्रांचा वापर केलेला असल्यामुळे मांडणीतील आकर्षकता वाढते. स्वतःच्या घराण्याबद्दल लिहिताना मुले खऱ्या अर्थाने इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांची अनुभूती घेत असतात. स्वतःचा इतिहास शोधताना त्यांना कळलेल्या नवीन बाबींमुळे मुले हरखून जातात. मनात इतिहास विषयाची आवड निर्माण होते.

अनुभवांच्या कक्षा रुंदावणारी मनमुराद भटकंती

प्रवास करताना नजर मोकळी होते, विस्तारते. शिवाय माणसे जोडली की जग आपसूक जोडले जाते, या जाणिवेतून मुलांना घेऊन भटकंती सुरू झाली. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर मुलांनी छोटेमोठे काम करून काही कमाई करायची आणि घरच्यांकडून काही पैसे घेऊन भटकंतीला निघायचे. प्रवासाची रूपरेषा आधी ठरवली जाते. आवश्यक आणि कमीत कमी सामान घेऊन जास्तीत जास्त प्रवास करणे, निसर्ग अनुभवणे, पर्यावरणाचा अभ्यास करणे, गड किल्ल्यांची भटकंती करणे, तिथला इतिहास समजून घेणे, संदर्भ शोधणे अशा कितीतरी गोष्टी या भटकंतीने साध्य होतात. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकणे. नेतृत्व गुणांचा विकास, टीमवर्क म्हणून  सहजीवनाचा संस्कार आपसूक होत गेला.

या बिनभिंतीच्या शाळेत हुंदडताना, फिरताना काही नियमांचे पालन करावे लागे. प्रवासाला निघाल्यानंतर ते परत येईपर्यंत घरच्यांना फोन न करणे, घरच्यांना रोज पत्र लिहून प्रवास कळविणे, न चुकता रोजची रोज दैनंदिनी लिहिणे, ज्या व्यक्तींच्या भेटी झाल्या त्यांना पत्र लिहिणे… अशा अनेक नियमांची सोबत घेऊन केलेला प्रवास आजही अनेक मुलांच्या अनमोल आठवणींचा ठेवा बनला आहे. कोल्हापुरातल्या उद्योगपतीच्या अलिशान महालात मुक्काम ठोकून तिथला पाहुणचार घेतला तसेच पालघरच्या आदिवासी बांधवांच्या चंद्रमौळी झोपडीत वास्तव्य करून त्यांच्या ताटात जेवताना तिथल्या भाजी-भाकरीची लज्जत चाखली. फणसाड अभयारण्याची भटकंती, सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या निवासस्थानी मुक्काम, कोल्हापूरच्या आंबा घाटातील देवराई आणि तिथली काजव्यांसोबतची रात्र, रायगड ते पन्हाळा यांसारख्या गडांवरचे रात्रीचे मुक्काम, डहाणू – तलासरी भागातील आदिवासी बांधवांची जीवनशैली अनुभवण्यासाठी त्यांच्याच घरी मुक्काम, मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यापासून ते दूध प्रकल्पांच्या भेटी, पद्मश्री विजेते शास्त्रज्ञ शिवराम भोज्ये ते साहित्यिक सुधीर मोघें यांसारख्या व्यक्तींसोबतच्या गप्पा… असे बरेच काही. मुलांचे आणि अर्थात माझेही जीवन अनुभवसंपन्न करून गेलेले हे क्षण आयुष्याला सामोरे जाताना महत्त्वाचे आहेत. पाठ्यपुस्तकांत, चार भिंतीच्या शिक्षणात कुठेच नाहीत, अशा अनेकानेक गोष्टी भटकंतीदरम्यान मुलांना शिकता आल्या.

प्रश्न विचारायला शिकवणाऱ्या मुलाखती 

शालेय जीवनापासून मुलांना आयुष्यात कोणीतरी, काहीतरी बनण्याची इच्छा असते. पण कसे व्हायचे, त्यासाठी काय करायला हवे हे मात्र मुलांना उमगत नाही. यासाठी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना बोलावून गप्पा मारण्याचा उपक्रम मुलांना भलता आवडला. ‘गप्पांमधून शिकू काही…’ असे या उपक्रमाचे नाव. सैनिक, पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टर, पोस्टमन… अशा कितीतरी लोकांसोबत मारलेल्या गप्पा मुलांना समृद्ध करत राहिल्या. परिसरातील अशा व्यक्तींशी औपचारिक, अनौपचारिक संवाद साधणे, मुलाखत तंत्राचा वापर करणे, माहिती मिळवणे अशा अनेक उद्दिष्टांचा वापर व्हावा, अशी यामागची भूमिका होती. केवळ पाठाखालच्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सरावलेल्या मुलांना यामुळे प्रश्न पडू लागले.

चला कविता गाऊया!

मराठीच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या कविता मुलांच्या लक्षात राहाव्यात म्हणून माझा मित्र अंकुर आहेर आणि शाळेतील विद्यार्थी यांनी मिळून अनेक कवितांना सुंदर चाली लावल्या. त्यातून ‘चला कविता गाऊया’ या ध्वनिफितीची निर्मिती केली. कवितांना लावलेल्या चाली, दिलेले संगीत यात विद्यार्थ्यांचाच सहभाग होता. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. प्रसंगी पदरमोड करून नवनवीन संकल्पना राबविणे हे नेहमीचेच झाले आहे.

खेळातही अग्रेसर

शाळेला क्रीडांगण नसले तरी शैक्षणिक गुणवत्तेत पुढे असणारे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातही पुढे असावेत, या हेतूने लक्ष केंद्रित केले. मुलांचे क्रीडा कौशल्य हेरून त्याला वाव मिळावा म्हणून सराव चालू केले. शक्यतो इनडोअर गेम्सला जास्त पसंतीक्रम दिला. तलवारबाजी, रोप स्कीपिंग यांसारखे खेळ निवडले. मैदानी खेळात खो-खो, कबड्डी, आट्यापाट्या, कार्फबॉल, रस्सीखेच यांसारख्या अनेक खेळांत मुलांनी जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीयस्तरापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तलवारबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना सरावासाठी सुविधा पुरविणे यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलो. कल्याणमध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लेझीम स्पर्धेत सहभाग घेतला आणि पहिल्या वर्षीच जिंकून मुलांनी शाळेच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. लेझीम पथकासाठी प्रसिद्ध असलेल्या या मुलांनी नाशिक, मुंबईसह अनेक ठिकाणी जाऊन आपल्या क्रीडा कौशल्याचे सादरीकरण केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

आमच्या शाळेला शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे. शिष्यवृत्ती वर्गाची जबाबदारी शाळेने सोपवली तेव्हा प्रथमच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत मुलांना स्पर्धा परीक्षा तयारीचे नवे दालन खुले करून दिले. संगणकावरील सरावामुळे मुलांना वेग आणि वेळ यांचे गणित चांगलेच जमू लागले. एकाच घटकाशी संबंधित असलेले अथवा अनेक घटकांवरील प्रश्न यांचा सराव मुलांना उपयुक्त ठरू लागला. विविध युक्त्या, गणिते सोडविण्याची तंत्रे, बुद्धिमत्ताविषयक सराव वेगळ्या तंत्राने मुलांना समजायला सोपा होऊ लागला. आधी गुणवत्तायादीत आलेल्या मुलांशी साधलेला संवाद, त्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती याचा चांगला फायदा मुलांना झाला. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश वाढू लागले.

एक वर्ग – एक शार्पनर

मुलांना सतत पेन्सिलला टोक काढण्याची हौस असते. त्यामुळे वर्गात कचरा होतो. मग या कचऱ्याला नियंत्रित करण्यासाठी ‘एक वर्ग – एक शार्पनर’ असा उपक्रम सुरू केला. वर्गातील कचऱ्याच्या डब्याजवळ एकच शार्पनर ठेवला. या छोटय़ाशा उपक्रमातून स्वच्छता, पेन्सिलची निगा, शिस्त अशा किती तरी गोष्टी साधल्या गेल्या. शिवाय शाळेतील सफाई करणारे दादा खूश झाले ते वेगळेच!

 विद्यार्थी-शिक्षक नात्याचे नवे क्षितीज 

आपण समाजाचे देणे लागतो, या धारणेतून काही माजी विद्यार्थी एकत्र आले आणि ‘क्षितीज’ नावाचे संघटन उभे राहिले. पर्यावरणावर काम करावे असा विचार करून ‘निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती’ या प्रकल्पाची सुरुवात झाली. सुरुवातीला खत निर्मितीविषयी नीट माहिती नसलेली मुले अनुभवातून शिकत गेली. गणपतीच्या काळात निर्माल्यामुळे होणारे जलस्रोतांचे नुकसान आणि पर्यावरण प्रदूषण यावर उपाय म्हणून गणेश भक्तांकडून निर्माल्य पाण्यात जाण्याआधी गोळा केले जाऊ लागले. त्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत निर्मिती केली जाते. कल्याण पूर्व परिसरातील शाळांत जाऊन ‘क्षितीज’ने जनजागृती केली. तरुणांना समाजभान नाही, अशी टीका होत असताना लहान लहान कामांतून क्षितीज संघटनेला मिळत असलेली ओळख महत्त्वाची आहे. शिक्षकांच्या हाताखाली शिकून पुढे गेलेले विद्यार्थी अपवादानेच शिक्षकांच्या संपर्कात असतात आणि तो अपवाद आम्ही ठरलो.

गरीब मुलांना शिक्षणात टिकवून ठेवणारी ‘दुवा’

सुमारे पंधरा वर्षापूर्वीची एक घटना आहे. कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे एका मुलीचे शालेय शिक्षण थांबत होते. शाळेने आर्थिक सहकार्य करत तिला शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित होणाऱ्या मुलामुलींना आर्थिक सहकार्यासाठी ‘दुवा फाउंडेशन’ हे अनौपचारिक संघटन उभे राहिले.  यात सुरुवातीपासून आर्थिक योगदान आहे. माजी विद्यार्थ्यांचेही ‘दुवा’साठी योगदान आहे. माजी विद्यार्थी आपल्या कमाईतून दुसऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणे पूर्ण करताहेत! एका बॅचकडून दुसऱ्या बॅचकडे हा अर्थ सहकार्याचा ठेवा निरंतर पुढे पुढे जात आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा दिवा दुवाने तेवत ठेवलाय. यात दुवा विद्यार्थ्यांना थेट पैसे न देता त्यांची शाळा, कॉलेजची फी, पाठ्यपुस्तके, गरज असेल तर क्लासेसची फी भरते. हीच मुले पुढे जाऊन नोकरीला लागल्यावर दुसऱ्या मुलांचा खर्च करतात. दुवाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या मुलांना सहकार्य केले जाते. शिक्षणाच्याही वेगळ्या वाटा धुंडाळण्याचे काम ‘दुवा’ करत आहे.

वर्तमान कट्टा’ नव्हे कुटुंब 

समाज माध्यमांचा वापर योग्य प्रकारे करण्याचे भान युवा वर्गात असावे म्हणून २०१४ मध्ये ‘वर्तमान कट्टा’ नावाचा माजी विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला. या गटात १९९७ ते २०१७ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय अधिकारी ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश असलेल्या या गटामुळे नवीन विचार, मतप्रवाह कळतात. आपापल्या क्षेत्राचे अनुभव शेअर होत असतानाच कवितांची मैफिल रंगते. मान्यवर व्यक्तींना, लेखक मंडळींना गप्पांसाठी या व्हर्च्युल कट्ट्यावर आणले जाते. कोणत्याही समस्येचे उत्तर शोधण्याचे फंडे इथे सापडतात. शेतकरी विद्यार्थ्यांकडून शेतीविषयक, तर आयटी कंपन्यांतल्या विद्यार्थ्यांकडून कट्ट्यावर नोकरीविषयक माहिती कळते. नैसर्गिक आपत्ती असो वा मानवनिर्मित संकटे, सर्व घटनांचे खरे अपडेट मिळत राहतात. त्यामुळे बऱ्याचदा एकमेकांसाठी उभारलेली ही सपोर्ट सिस्टम उपयोगी पडते. कोणालाही तातडीने लागणारे रक्त असो वा दंगलीत सापडलेले जीव वाचवणे असो विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सदस्य हाकेला उभे असतात. आजच्या अस्थिर मनोवृत्तीच्या जगात ‘वर्तमान कट्टा’  माणुसकीचे मैत्र घेऊन एक कुटुंब बनलंय.

वर्गात, शाळेत केलेले अनेक उपक्रम, प्रयोग अनेकांना उपयुक्त ठरताहेत. वर्गातल्या किंवा घरच्या अभ्यासाला ‘अभ्यास’(गृहपाठ) न म्हणता ‘मजा’ संबोधणे. शाबासकी म्हणून मुलांच्या तळहातावर द्यावयाच्या स्टॅम्पचे तर महाराष्ट्रभर अनेकजण अनुकरण करताहेत. मुलांच्या मनातील एकात्मतेची भावना वाढावी म्हणून विविध रंगांचा वापर करून हाताच्या पंज्यापासून केलेल्या झाडांची चित्रे आजही अनेक शाळांच्या भिंतीवर दिसतात. चार भिंतीच्या आतील साचेबंद शिक्षणापेक्षा बंधमुक्त, मोकळ्या वातावरणातले शिक्षण मुलांचे भावविश्व आणि आयुष्य घडवायला उपयुक्त पडते, असे मी मानतो. आयुष्यात कोणीतरी मोठे होण्याआधी किंवा पैसे कमावणारे ‘मशीन’ होण्याआधी, विद्यार्थ्यांनी माणूस बनावे, म्हणून आमच्या वर्गातील प्रार्थनेचे बोलही तसेच आहेत.

“माणसाने माणसाशी माणसासम वागणे…! ”

–  गुणेश कौसल्या जगन्नाथ

(लेखक कल्याण येथील गणेश विद्यामंदिर या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 11 Comments

 1. Respected Mam, sorry for bit late due to present critical period. Read the article wrote by one School teacher on the subject “Mazi Shala ani maze navinya purna Upakram.” I personally salute the teacher for such concern and dedication towards students and educational system. His versatile efforts to develop students intelligence, unity, leadership, through various projects e.g. * Library (unique).. display of news papers cuttings with vital information, * Letter writing,…Including posting through post boxes and finally receipt of the same at own residence, proud feeling of getting responses from great personalities, * to write experience of own journey from native place till school,* Study tours…It develops alertness, discipline leadership, unity in students, * Interviewing elite alumnus get their experiences of reaching the level they are at present and to get motivation * support to needy students to complete their education with aids by alumnus * teaching importance of nature, environment through Kshitij foundation * gathering with alumnus and getting interacted with them at place called “Vartman Katta” and update knowledge in distinguished filleds, * apart from these vital issues he has worked on poems in text books with innovative ideas, sports encouragement, cleanliness in school by simple initiative like “one pencil ..One sharpener
  All these activities are sign of new horizon in educational field. He has tried to break Orthodox routine system of teaching and worked hard on the eco-friendly system by building parental relation with students.
  I heartily support and bless his efforts to teach students how to adopt techniques for their livelihood along with regular learning. This basic principle will definitely take the school and students to the sky- high success.
  Wish him and concerned. Students best luck in all their future endeavors.

 2. शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान या वाक्यलादुजोरा देत,सर तुम्ही बाहयजग आणि वर्तमान स्थिती असे शिक्षण तुम्ही मूलांना दिले. असे शिक्षण घेतलेले विध्यार्थी त्यांच्या आयुष्यात कितिही मोठे संकट आले तरी महाराजाच्या बुलंद गडकोटानच्या भिंती सारखे उभे राहतात.
  मला आमच्या सर्व सरांची आठवण आली.
  धन्यवाद सर……
  नमस्कार

 3. Khoopach Chan upkram rabavata sir tumhi…
  Mazya muli hi tumachya shalechya maji vidyarthini aahet….khoop changale shikshan ya shaletun milate..

 4. कौतुकास्पद कामगिरी! वाचता वाचता आम्हालाही नवीन कल्पना सुचतात.

  1. धन्यवाद!
   असं काही सुचणं आणि ते करून पाहावं वाटणं यातच आमचं यश आहे असं आम्हाला वाटतं. आपण शिक्षक किंवा पालक असाल तर असे लेख मराठी प्रथमवर marathipratham@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

 5. उत्कृष्ट उपक्रम! सुंदर मांडणी.अनुकरणीय कृती.

 6. खूपच प्रेरणादायी कार्य सर , नक्कीच आपल्या सारख्या मराठी शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नातून एक आदर्श पिढी घडण्यास मदत झाली आहे….
  धन्यवाद bahuvidh.com

 7. khupach chaan .mipan 1997 pasun karte ahe students sathi kalyan west la. sirana bhetayla avdel

 8. कौतुकास्पद कामगिरी सर? प्राथमिक वर्गात अध्यापन करताना स्वतःलाही भरपूर शिकता येते. बालपण अनुभवता येते.अभिनंदन

 9. वाह सर, आमच्या सारख्या नवीन शिक्षकांना खूपच प्रेरणा मिळते आहे. आम्ही नक्कीच चालवू हा पुढे वारसा.

 10. आपले अनुभव आम्हास समृद्ध करणारे आहेत,शिक्षणा चा आशा उपक्रमातून प्रवास झाल्यास अनेक समस्यांची उत्तरे जिथल्या तिथे मिळतील.
  धन्यवाद सर …
  धन्यवाद bahuvidh.com

Leave a Reply

Close Menu