कधीच शाळेत न गेलेली समृद्धी

समृद्धीने आता वयाच्या एकोणिसाव्या वर्षात  प्रवेश केलेला आहे. या तिच्या संपूर्ण वाटचालीत ती  कधीच कोणत्याही शाळेची पायरी चढलेली नाही. असे असूनही ती मराठी, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमधून संवाद साधते, वाचते, लिहिते. या व्यतिरिक्त इतर भाषा आत्मसात करण्याचेही तिचे  सतत प्रयत्न  चालूच  असतात. कधीच कोणत्याही शाळेत न गेलेली समृद्धी  विविध छंद जोपासते. तिची तीन पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. शाळेची पायरीही न चढता  तिला हे कसे शक्य झाले असावे? या लेखातून पौर्णिमा केरकर याचीच गोष्ट सांगतायत –

—————————————————————————————–

मी आणि माझे पती राजेंद्र, आम्ही दोघेही शिक्षकी पेशात वावरणारे. हजारो विद्यार्थी आमच्या हाताखालून गेले. आपली मुलं मेडिकल आणि इंजिनीअरिंगलाच गेली पाहिजेत असे अनेकांना वाटते, पण आम्हाला असे कधी वाटले नाही. गणिताचा  तास चालू असताना मुलांनी चित्र काढलं, खिडकीतून निसर्गाचे विविध विभ्रम नजरेने टिपले, एखाद्याने मनापासून आवडीचे गाणे गुणगुणले, तर हा खूप मोठा प्रमादच आहे, अशीच सर्वसाधारण सगळ्यांची मानसिकता असते. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे, त्यासाठी मुलांनी अर्थ समजून न घेताच प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ करायची, बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित प्रश्नांपुरत्याच नोट्स, त्यांचेच पाठांतर, अन् या साऱ्यावरून हुषारीची तुलना. शंभर टक्के निकाल लावणे म्हणजे त्या संस्थेची, शाळेची प्रतिष्ठा. आम्ही दोघे पती – पत्नी याच समाजव्यवस्थेचे घटक असल्याने या सगळ्यांमुळे मन सातत्याने अस्वस्थ असायचे. आम्ही जग  बदलू शकत नाही, परंतु आपल्या मुलीला तर हे विशाल जग तिच्याच नजरेने टिपण्याचे सामर्थ्य देऊ शकतो, या विचाराने तिला शाळेच्या चौकटीत बंदिस्त न करता मोकळेपणाने या निसर्गाच्या सानिध्यात बागडू द्यायचे ठरवले. निसर्ग, समाज, प्रदेश, देश, माणसं, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, अशा वैविध्यपूर्ण  अंगाने तिचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे; तसेच वाचन, लेखन, संगीत, कला यांचा तिने आस्वाद घ्यावा; निर्णय क्षमता, आत्मविश्वास, संस्कार तिने अंगी बाणवावेत, या दृष्टीने निसर्गाच्या बिनभिंतीच्या शाळेतून तिला विकसित करण्याचा आमचा प्रयत्न होता. तिच्या न कळत्या वयात आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला, आता हा निर्णय तिचाही झाला आहे.

लहान वयात, सर्वसामान्य मुले सर्जक असतात, त्यांचे निरीक्षण सखोल असते, त्यांना सभोवतालाशी संवाद साधावासा वाटतो. त्यांच्या बालबुद्धीला असंख्य प्रश्न पडतात, त्यांचे निरसन व्हावे म्हणून ती मोठ्यांशी बोलतात, पण बऱ्याच पालकांना त्यांचे प्रश्न मूर्खांसारखे वाटतात. त्यांना सभोवताल उमजून घेण्याची ज्ञानतृष्णा लागलेली असते आणि आम्ही पालक मात्र “वेळ नाही, फालतू प्रश्न विचारू नकोस, तुझी बड बड बंद कर” म्हणून त्यांना गप्प बसवतो. आता तर काय थेट हातात मोबाइल देऊन त्यांना गुंतवलं जातं. समृद्धीच्या बाबतीत अशी चूक तिच्या घडण्याच्या, वाढण्याच्या वयात आम्ही  केली नाही. माडात तिला ‘मोर’ दिसायचा. कुकरची शिट्टी वाजली की ‘कुकर हसायचा’, तिला निर्जीव वस्तूसुद्धा सजीव भासायच्या. ती सतत त्यांच्याशी संवाद साधायची. फुले, पाने, कुत्रा, मांजर, वारा, कृमी-कीटक, मुंग्या, फुलपाखरे, दगड, नदी, ओहोळ, डोंगर हे सगळेच तिचे सोबती. आपल्याच तंद्रीत त्यांना मध्यवर्ती ठेवून गोष्टी, गाणी तयार करायची. मी ते टिपून घ्यायची. तिची बडबड निरर्थक म्हणून कधी दुर्लक्ष  केले नाही. तिच्यासाठी बडबडगीतांच्या, अभिजात साहित्याच्या – नाटके, लोककला, कविता – यांची ओळख करून देणाऱ्या सीडीज् आणल्या. अक्षरांशी ती बोलू लागली. ‘शब्द नाचत नाचत मला आपल्याकडे बोलावतात’ असे ती म्हणू लागली. रामायण, महाभारत, कुराण, बायबल, ज्ञानेश्वरी, असे बरेचसे ग्रंथ  उपलब्ध करून दिले. दृक्श्राव्य माध्यमातून सकारात्मक परिणाम तिच्यावर झाला. तिच्या शारीरिक वाढीला भावनिक बळ पुरविण्याचा आमचा प्रयत्न होता. तिला  प्रश्न पडायचे, आम्ही खरीखुरी उत्तरे द्यायचो. तिला गोष्टी  ऐकायची आवड निर्माण झाली. “मी तुला   एक गोष्ट सांगणार, त्यापूर्वी तुला एक गोष्ट वाचावी लागणार, ती वाचून तू मला सांगायची.” आमच्यातल्या या ठरावामुळे तिची वाचनाची आवड पक्की झाली. वडिलांनी विविध भाषांची पुस्तके आणून दिली. तिने कोणत्या भाषेत वाचायचे, लिहायचे याची सक्ती  केली नाही. तिला ज्या भाषेतून अभिव्यक्त व्हावेसे वाटते ती भाषा तिने वापरावी, पण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध भाषा जाणून घेणे ही काळाची गरज आहे हे महत्त्व तिला पटवून दिले.

वर्तमानपत्र, स्वयंपाक, घर, विविध वस्तू – पदार्थ यांची तिला ओळख करून दिली. असे तिचे बरेचशे शिक्षण अक्षरओळख होण्यापूर्वी झाले होते. त्यासाठी निरीक्षणाला अनुभवाची जोड  दिली, वातावरण तयार केले. आमचे घर नेहमीच वाचन – लेखनात मग्न असलेले. त्याचा परिणाम तिच्या सर्वांगाने विकसित होण्यावर झाला. तिच्या प्रत्येक चांगल्या सर्जनात्मक कृतीला आम्ही प्रोत्साहन दिले. मीही खूप काही  तिच्याकडून  शिकले. दीड वर्षाची असताना  तिने सहज मला विचारले, “आई माणसे मरतात म्हणजे कुठे जातात?” मी तिला पठडीतले उत्तर दिले की, “मृत माणसे देवाघरी जातात” ती पट्कन उत्तरली, “चूक! मेलेली माणसे मातीत जातात!” मी म्हटले, “तुला कसे कळले?” यावर ती म्हणाली, “मी बघितलं आहे माणसांना मातीत पुरताना.” आमच्या घराला लागून  मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे. वरच्या गॅलरीत उभी राहून मृतदेहाला मूठमाती देताना तिने पाहिले होते. तिची भुताखेतांची भीती नाहीशी व्हावी म्हणून तिला मध्यरात्री बारानंतर तिच्या बाबांनी या स्मशानभूमीत फिरवूनही आणले.आता तर भुताचा शोध ती स्वतः घेते. असेच एकदा तिने मला देव आणि संत यांच्यामधील फरक विचारला. उत्तर देताना तिने स्वतः स्पष्टीकरण दिले की, देवापेक्षा संत श्रेष्ठ कारण संत दुष्टामधील दुष्ट प्रवृत्ती मारून टाकून त्याला चांगला माणूस बनवितात; तर देव दुष्टाला सरळ मारूनच टाकतो. ती असं खूप काहीबाही सांगत असायची. आकाशात रंगांचे विभ्रम दिसले की उड्या मारत म्हणायची, “आई – आई, मला एक मोठा ब्रश आणून दे. मी उंच उडी मारीन आणि आकाशातील सर्व रंग माझ्या ब्रशवर घेऊन खूप चित्रे काढीन.” ती  सांगायची, ‘मला फुलांची फुलण्याची कृती बघायची आहे, माणूस कसकसा वाढतो हे मला रात्र रात्र जागून अनुभवायचे आहे.’ अनुभवलेल्या प्रत्येक वस्तूत, निसर्गात, माणसात तिला काव्य दिसायचे, अजूनही तोच तिचा स्वभाव आहे. घरामागे असलेल्या कुळागराची सळसळ अन् नदीचा खळखळ नाद तिच्या नसानसात भिनला आहे. तो तिच्या बोलण्यात, लिखाणात, वागण्यातूनही प्रतिबिंबित होतो. तिला आम्ही कधीच हाताला धरून, सक्ती करून वाचायला बसविले नाही. घरात सर्वत्र असलेल्या पुस्तकांनीच तिला ही ऊर्जा पुरविली. सीडीतील अक्षरे तिच्यासमोर नाचत, हसत खेळत यायची. ती सांगायची “आई बघ अक्षरे माझ्याशी बोलतात, मला खेळायला बोलावतात.” ती मग स्वतःचे नाव असेच कलापूर्ण लिहायची. अक्षरांना डोळे काढून ती जिवंत करायची. तिचे स्वतंत्र वाचनालयही  आहे.

आजची शिक्षणपद्धती परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे सोपे मार्ग शिकविते, मात्र जीवनातील चढउतारांना कसे सामोरे जायचे, जीवनातील निरामयता टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, हे मात्र सांगत  नाही. साने गुरुजी, विवेकानंद, रवींद्रनाथ पुस्तकात आहेत तेवढेच शिकायचे? त्यांचे कार्य, त्यांची ज्ञानपिपासू वृत्ती, त्यांची जीवनमूल्ये यांविषयीचे मूल्यांकन शाळेत होत नाही. क्रमिक अभ्यासक्रम नियोजित वेळेत संपवून मुलांना फक्त परीक्षेसाठी तयार केले जाते. शिक्षण म्हणजे संस्कार, शिक्षण म्हणजे अनुभवसंपन्नता, शिक्षण म्हणजे आत्मविश्वास; तसेच समाजभान जागवणारे शिक्षण, सहनशील बनविणारे शिक्षण, खऱ्याखुऱ्या शिक्षणातून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू ज्ञानसंपन्न वाटायला हवी. शिक्षणाने जर हृदयाचा विकास होत नसेल तर ते शिक्षण काय कामाचे? खऱ्या अर्थाने हृदयाचा म्हणजे भावनिक विकास होण्यासाठी, सभोवतालाकडे डोळसपणे पाहण्याचे सजग भान येण्यासाठी, जीवनाचा निरामय, नितळ, अभिजात आस्वाद घेऊन ती सर्वंकष घडावी म्हणून समृद्धीला शाळेत पाठवले नाही. ती जर शाळेत गेली असती तर वर्गात शिक्षक गणितं सोडवीत असताना ती चित्र काढू शकली नसती, की एखादी भावपूर्ण सुंदर कविता लिहू किंवा वाचूही शकली नसती. तिच्या मनात नसताना तिला अर्थशास्त्र ऐकून घ्यावे लागले असते, आणि निसर्गाची एखादी कविता वर्गात शिकवणे चालू असताना खिडकीबाहेरचा निसर्ग जर तिला पाहायची अनिवार ओढ लागली असती तर तेही तिला करायला मिळाले नसते. तिच्या बालबुद्धीला वेळोवेळी पडलेले प्रश्न जर तिने वर्गात विचारले असते तर ती “अतिशहाणी” ठरली असती. आम्हाला तिला जग दाखवायचे होते ते तिच्याच नजरेतून! त्यामुळे आम्ही सांगतो तेच खरे आणि तेवढेच लिहायचे, तसेच वागायचे, असे आम्ही तिच्या बाबतीत केले नाही.

आमचे घर गावातील, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले. कळटी आणि वाळवंटी या दोन नद्यांच्या शेजारी, म्हादई अभयारण्याची जैविक समृद्धी जिथं भरभरून आहे, अशा गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील ‘केरी’ हा निसर्गसंपन्न गाव. बेळगावमार्गे चोरला घाटातून गोव्यात येताना घाटाच्या पायथ्याशी वसलेले हा गाव. निसर्गाची ओढ तर समृद्धीच्या नसानसात भिनलेली. घर पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना वाहिलेले. घरात माणसांची ये जा खूप. समृद्धीला शाळेत पाठवायचे नाही, तिला बिनभिंतीच्या शाळेत मुक्त विहार करू द्यायचा तर तिच्यासाठी वेळ काढणे गरजेचे होते. तो वेळ आम्ही तिला दिला अन् तिनेही त्या वेळेचा सदुपयोग केला.

अनुभवाच्या बिंनभिंतीच्या शाळेने समृद्धीला जगण्याकडे पाहण्याची दृष्टी दिली. त्यामुळे ती विस्तारलेली, विकसित होत गेली. ती रास्किन बॉण्ड, रॉबिन शर्मा, सुधा मूर्ती यांचे इंग्रजी, मराठी ग्रंथ वाचते; त्यावर लिहिते, चर्चा करते, काही पटत नसले तर बोलून दाखवते. “मृत्युंजय, गीतांजली तिने वाचले, व. पु. काळे तिला आवडतात. माधुरी पुरंदरेंची व्याकरणासहित सर्वच पुस्तके तिनी वाचलेली आहेत. पुण्याला आयोजित  केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय साहित्यिक मेळाव्यात तिला खास निमंत्रित करून तिच्याशी संवाद साधला होता. आंबेजोगाई, देवगड, टेडेक्स इ. ठिकाणी तिला खास निमंत्रित  केले होते. वाचनाने तिची दृष्टी विस्तारली. तिनं वाचनाचा कधी कंटाळा केला नाही, त्यातूनच तिला वैचारिक बैठक  लाभली.

समृद्धी शाळेत गेली नाही, पुढे समज आल्यावर तिला जावेसे वाटले नाही. वयाची दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तिचा ‘निर्झर’ हा काव्य संग्रह प्रकाशित झाला. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ, आतील चित्रे तिनेच काढली. तिच्या या साहित्यिक प्रवासातून पुढे ‘अप्रूप वसुंधरेचे’, ‘चित्रांची गोष्ट’ अशी पुस्तके तयार झाली. आज ती वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करीत आहे. त्याशिवाय ब्लॉग लिहिते, पुस्तकांसाठी मुखपृष्ठ काढते. अनेक छंद तिने जोपासले आहेत. जंगलभ्रमंती, पक्षिनिरीक्षण, फोटोग्राफी, चित्रकला, पथनाट्य सादरीकरण, ओरिगामी, मेंदी, रांगोळी, नृत्य, संगीत ऐकणे, हार्मोनियम, नदीवर पोहायला जाणे, सायकल भ्रमंती, विविध प्रकारचे पदार्थ करणे, मुलांसाठी कार्यक्रमाची आखणी करणे, त्यात त्यांच्यासाठी प्रश्नमंजूषा, चित्रकला, स्पर्धा आयोजित करणे, त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे अशा अनेक उपक्रमांत ती एकाचवेळी गुंतलेली असते. माणसांच्या, प्रदेशाच्या, देशाच्या समस्या ती जाणते, त्यावर विचार करते, लिहिते. प्रख्यात चित्रकार अलेक्सि, सुबोध केरकर, हर्षदा केरकर, अनिल अवचट (बाबा), कविता महाजन, संजय हरमलकर आदींनी समृद्धीच्या चित्रांना कौतुकाची थाप दिली आहे. ती शाळेतच गेली नाही हे जेव्हा अनिल अवचटांना – बाबांना कळले तेव्हा त्यांनी तिला पत्रच लिहून पाठवले. माधवी देसाई, डॉ. सोमनाथ कोमारपंत सर, सचिन परब, अॅड सतीश सोनक, यशोधरा काटकर, इंद्रजित भालेराव, मीरा तारळेकर, बालसाहित्यिक चंद्रकांत गवस, मोहन कुलकर्णी, दगडू लोमटे, आदींनी तिच्या लेखनाचे कौतुक केलेले आहे. ‘झी २४ तास’ने तिच्यावर लघुपट तयार केला. तिला साहित्यिक  पुरस्कार, सन्मान लाभले. तिने तिच्या समवयीन मुलामुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण केली. “ती शाळेत जात नाही, म्हणजे तिला समाज कळणार नाही, तिला मित्रमंडळी भेटणार नाहीत, ती सोशियल कशी होणार? उद्या मोठी झाल्यावर ती तुम्हाला दोष देणार नाही का?” या प्रश्नांची उत्तरे तिने तिच्या व्यासंगातूनच दिली. आज जी मुले शाळा-महाविद्यालयात जातात ती प्रकल्प, स्वाध्यायाच्या अडचणी घेऊन तिच्यापर्यंत येतात, बसतात, चर्चा करतात. त्यांना घेऊन ती फिरते. तिने जेव्हा मोठा सिसिलियन पकडला, ती बातमी वर्तमानपत्रात आली. देवगांडुळावर विशेष अभ्यास असणारे इंग्लंडमधील शास्त्रज्ञ डॉ. विलकिन्सन, तसेच बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे वरदगिरी तिला भेटायला खास घरी आले. वरदगिरी तिला भेटायला खास घरी आले. आज ती न घाबरता साप हाताळते. ती फक्त शाळा नावाच्या इमारतीत एकाच जागी बसून माहिती देणाऱ्यांच्या समूहात बसली नाही. ती शिकली चार भिंतीबाहेरच्या जगात! बिंनभिंतीच्या शाळेचे तिचे विश्व अमर्याद आहे, ते तिने अनुभवातून, निरीक्षणातून जाणले. नदी, डोंगर, समुद्र, जंगल, प्राणी, संपूर्ण देश हे सगळेच तिने प्रत्यक्षात अनुभवले. त्या त्या प्रदेशात नेऊन तिला देश प्रत्यक्ष दाखविला. नदीच्या प्रवाहात पाय सोडून ती तासनतास बसते, मुसळधार पडणाऱ्या, तसेच पहिल्या पावसात ती मनसोक्त भिजते, चोर्ला घाटातील धबधबे तिला वेड लावतात, हिरव्या लुसलुशीत गवतावरून ती अनवाणी मनमुक्त धावते, वाऱ्याची धुंदी तिची लय बनते.

तिला आम्ही घरीच शिकवले म्हणजे काय केले? तिला घरीच ठेवून आम्ही तिचा अभ्यास घेतला असे बऱ्याच जणांना वाटते. पालक म्हणून आम्ही तिला प्रेरणा दिली, शिक्षण म्हणजे संस्कार, शिक्षण म्हणजे संवेदनशील प्रामाणिक, नितळ, समाजभान बाळगणारी आत्मविश्वास – निर्णयक्षमता असलेली व्यक्ती होणे, ही विचारधारा तिला दिली. सक्ती केली नाही, की कसलीच अपेक्षा धरली नाही. विचारवंत, देशभक्त, समाजसेवक यांच्या जिद्दीच्या गोष्टी सांगितल्या. प्रतिकूल परिस्थितीत माणसे कशी जगतात हे दाखवले. तिला रात्रीच्या निबिड काळोखात जंगलाचा आवाज, तसेच मध्यरात्रीची स्मशानभूमीतील शांतता, त्या त्या ठिकाणी नेऊन अनुभवण्याची संधी दिली. तिला चित्रांची आवड आहे म्हटल्यावर सर्व तऱ्हेचे रंग, पेपर आणून दिले. मराठी, इंग्रजी, हिंदी, कोरियन या भाषांतील चित्रपट सीडींचे संकलन तिच्याजवळ आहे. ती स्वतःचे ज्ञान इतरांना वाटते. कृतीतून संस्कार केले. घरातील भांडी घासण्यापासून ते स्वयंपाक ते केर काढण्यापर्यंतची कामे शिकविली. वयात येताना, आल्यानंतर कोणती खबरदारी घ्यायची याची चर्चा केली. तिच्या चांगल्या कृतींना, कल्पना, विचारांना आम्ही नेहमीच प्रेरणा दिली, त्यासाठी हवे असलेले साहित्य पुरविले, चुका सांगितल्या. समृद्धीला तिच्या वयाच्या नवव्या वर्षी आजोबांनी तिच्या हाती ज्ञानेश्वरी सोपविली तर आजीने लॅपटॉप! हा एक प्रवास तिच्या विकसित होत गेलेल्या जीवनजाणिवांचा आहे. सहजपणे कोणताही अभिनिवेश न बाळगता जीवनाला सामोरे जाण्यासाठीचे बळ पावलांना लाभावे, विचारांना प्रगल्भता यावी, आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगणं कळावं यासाठीचा हा प्रवास होता. या प्रवासात तिनं विज्ञान – तंत्रज्ञानाची  सुंदर सांगड घातली. तिला जीवन कळावे, ते तिने भरभरून आपल्या आवडीनिवडींसकट आनंदाने जगावे, तिला वाटते तेव्हा तिने चित्र काढावे, तिने नाचावे, गाणे गावे, हसावे, छंद जोपासावेत आणि ते पूर्णत्वास न्यावेत. नुसतीच माहिती नको तिने ज्ञानसंपन्न व्हावे, समाजभान बाळगावे. स्वतःला, आणि सभोवतालाला जाणून घेण्याची तिची दृष्टी विकसित व्हावी हीच यामागची तळमळ आणि कळकळ होती. ते तिने  आत्मसात केले, याचेच आम्हाला मोठे समाधान आहे. ती चौकटीतील शाळेत गेली नाही, मात्र या अमर्याद जगालाच तिनं आपली शाळा मानली.

– पौर्णिमा राजेंद्र केरकर

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 17 Comments

 1. drkailas

  प्रथम….. समृद्धी ला मुक्तपणे पोषक वातावरण निर्माण केल्याबद्दल तिच्या आई बाबांचे अभिनंदन.
  हल्ली आखलेल्या शिक्षणाच्या चौकटीत बाल सर्जनशिलता कोमेजुन जातेय.समृध्दीला खुप खुप शुभेच्छा.आणि महाराष्ट्रातील तमाम पालकांनी यातुन बोध घ्यावा हिच अपेक्षा.
  कैलास इंगळे, औरंगाबाद.९४२१६५६९०७

 2. Anonymous

  Khup Chan ……
  shikaych aasel tar kuthun he gheta yet pan te ghenya sathi jady pahije ….. Ya lekhatun aamhala barach kahi shikayla milal

 3. स्वप्निल चोपडे

  व्वा जगण्याची खरीखुरी शाळा मुलांना अनुभवू दिली की मुलांचे जगणे समृद्ध होऊन जाते, त्यांना काय आवडते काय नाही याचे आकलन होते परिपुर्ण असे शैक्षणिक वातावरण घरीच तयार करून दिले की चार भिंतीच्या शाळेची गरज पडत नाही. समृद्धीच्या जीवनाचा प्रवास एकदम ग्रेटच आहे.

Leave a Reply