शालेय शिक्षण – टाळेबंदीतील आणि नंतरचे

कोविड- १९ ने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलाय. नैसर्गिक आपत्तीपेक्षाही दूरगामी परिणाम या आजारामुळे होणार आहेत. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च २०२० रोजी प्रथम तीन आठवड्यांसाठी टाळेबंदी जाहीर केली आणि त्याची मुदत वेळोवेळी वाढवत नेली. त्यामुळे वार्षिक निकाल न लागताच शाळा एकाएकी बंद झाल्या. त्या परत कधी सुरू होतील, हे आज कोणीही सांगू शकत नाही. राज्यातल्या विविध भागांमध्ये कोविड-१९ जसजसा नियंत्रणात येत जाईल, तसतशी टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवली जाईल, अशी शक्यता दिसते. त्यात शारीरिक अंतराचा विचार केला तर इतर आस्थापनांच्या तुलनेत सिनेमा, नाट्यगृहे, शाळा व महाविद्यालये सर्वात शेवटी सुरू होतील. मुंबई, पुणे व इतर काही क्षेत्रांमध्ये आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्यामुळे तिथली टाळेबंदी बऱ्याच उशिराने उठेल. तसेच, टाळेबंदी उठल्यानंतर नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे आजाराचा फैलाव पुन्हा वाढून सरकारला काही भागात पुन्हा टाळेबंदी सुरू करावी लागू शकते. तसेच काही महिन्यांत आजार नियंत्रणात आला तरी पुढील दोन वर्षात तो अधूनमधून डोके वर काढत राहील, असे मत जाणकार मांडत आहेत. कोविड १९च्या संदर्भात नियोजन करताना या सर्व शक्यता लक्षात घ्याव्या लागतील.

या आजारावर मात करणे, जीवितहानी टाळणे आणि अन्नधान्याचा पुरवठा करून उपासमारी टाळणे महत्त्वाचे आणि प्राधान्याचे आहे, हे निश्चित. परंतु या आजाराचे विविध क्षेत्रांवर होणारे संभाव्य परिणाम ओळखून वेळीच त्यावर उपाययोजना करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यासाठी निश्चित असे हेतू ठरवून टाळेबंदीच्या कालावधीसाठी तातडीचा आणि त्यानंतरच्या काळासाठी दीर्घ मुदतीचा आराखडा तयार करायला हवा. तो शिस्तबद्ध पद्धतीने कार्यान्वित करणे आवश्यक आहे, हे वेगळे सांगायला नको. शालेय शिक्षण हा तसाच एक महत्त्वाचा विषय आहे. टाळेबंदीबाबत खूप अनिश्चितता असल्यामुळे या बाबतीत आराखड्याचे दोन-तीन विकल्प तयार ठेवावे लागतील.

ही समस्या सुरू झाल्याबरोबर राज्य शासनाने तातडीने महत्त्वाचे असे अनेक निर्णय घेतले. SCERT (Maharashtra State Council of Educational Research and Training) ने दिक्षा अ‍ॅप आधीच आणले आहे. आता CIET (Central Institute of Educational Technology) आणि SCERT या दोन्ही संस्थांनी मिळून या परिस्थितीला प्रतिसाद दिला. त्यांनी शालेय वर्ष २०२०-२१ साठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका (Alternative Academic Calendar) लगेच उपलब्ध करून दिले. तिची मुलांना चांगली मदत होऊ शकते. त्यात मुलांना शिकायला उपयुक्त ठरतील अशा यु ट्युब व दिक्षा अ‍ॅपवरील चित्रफितींचे दुवे (लिंक्स) दिल्या आहेत. तसेच शिक्षकांसाठी दृश्य कला, शिक्षणात (ऑनलाईन) साधने आणि अ‍ॅप्सचा वापर अशा विषयांसंबंधी ऑनलाईन लाईव्ह इंटरअ‍ॅक्टिव्ह सत्रे सुरू केली. त्याबद्दल या सर्वांना धन्यवाद द्यायला हवेत. त्याचप्रमाणे अनेक शाळांनीसुद्धा वर्गावर्गांचे व्हॉट्स-अ‍ॅप गट करून आपापल्या परिने विद्यार्थी आणि पालकांसोबत काम करायला सुरुवात केली. सजगपणे त्यांनी दिलेल्या प्रतिसादासाठी त्यांनाही धन्यवाद द्यायला हवेत.

या पार्श्वभूमीवर पुढील चार मुद्द्यांचा विचार करू.

(एक) नियोजन करताना शासकीय संस्था आणि शाळांना जाणवणाऱ्या मर्यादा (constraints)

 • सर्वात मोठी अडचण म्हणजे या बाबतीतली अनिश्चितता. टाळेबंदी कधी आणि कशी उठणार? शाळा कधी सुरू होणार? २०२०-२१ वर्षात अध्यापनासाठी किती दिवस मिळतील? ते सलग मिळतील का? एकदा उठवलेली टाळेबंदी पुन्हा आणावी लागली तर? राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीनुसार शाळा वेगवेगळ्या वेळी सुरू झाल्या तर शाळांना कमी-जास्त वेळ मिळेल. शाळा अचानक बंद झाल्यामुळे मध्ये मोठा कालावधी जाणार आहे. ते अंतर कसे भरून काढणार? नियोजित अभ्यासक्रम आक्रसणार का? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत.
 • शाळा सुरू झाल्यावर आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून शारीरिक अंतराचे नियम व संकेत पाळावे लागणार आहेत. तसेच बैठक व्यवस्था, मधली सुट्टी, साहित्याची हाताळणी अशा अनेक बाबतीत बदल करावे लागणार आहेत. एकूणच शाळा व्यवस्थापनाची घडी पूर्णपणे नव्याने बसवावी लागणार आहे. तसेच काही मुले शाळा सुरू झाल्यावरही या आजाराचा संसर्ग होऊन घरी राहू शकतात. त्यांना पुन्हा वर्गासोबत आणण्याचेही काम करावे लागेल.
 • महत्त्वाचे हे की कोविड-१९ आणि टाळेबंदीमुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मुले, शिक्षक आणि पालकही दडपणाखाली असणार आहेत. शाळा सुरू झाली तरी हा परिणाम दीर्घकाळ टिकून राहणार आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शारीरिक आरोग्याबरोबर त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी जागरूक राहून विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी शिक्षक आणि पालकांचे प्रशिक्षण आतापासून करावे लागेल, जेणेकरून ते मुलांचे समुपदेशन करू शकतील.
 • टाळेबंदीच्या आणि नंतरच्या काळात पालक आणि विद्यार्थ्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी सर्व पालकांकडे स्मार्ट फोन्स, संगणक नाहीत. ज्यांच्याकडे आहेत, त्यांना नेटवर्कच्या समस्याही आहेत. तसेच पालक घरात असेपर्यंत मुलांना फोन उपलब्ध असतील, पालक कामावर जाऊ लागले की परिस्थिती कशी हाताळणार? मुलांच्या मानसिक व शारीरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी किती वेळ चकचकीत पडद्यासमोर राहणे योग्य ठरेल? साधन म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने मोबाईल फोनच्या स्वतःच्या मर्यादाही आहेत.
 • शालेय पातळीवर ऑनलाईन शिक्षण आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, या दोहोंत फरक करावा लागेल. तंत्रज्ञानाच्या वापराच्या काही मर्यादा असल्या तरी त्याचा परिणामकारक वापर करता येऊ शकतो आणि तो करायला हवा. परंतु ऑनलाईन शिक्षण देणे शालेय पातळीवर शक्य नाही. यावर सविस्तर विवेचन खालील मुद्दा क्रमांक दोन (१) आणि (२) मध्ये केले आहे.
 • स्थलांतरितांचे प्रश्न आहेत. जी कुटुंबे कोविड-१९ मुळे राज्यातल्या राज्यात किंवा दुसऱ्या राज्यात (त्यांच्या मूळ ठिकाणी) स्थलांतरित झाली आहेत, ती परत येणार का? कधी येणार? याबाबतीत अनिश्चितता आहे. विशेषतः मुली शाळाबाह्य होण्याची दाट शक्यता राहते. अशी सर्व मुलं परत यावीत म्हणून आतापासून काय करता येईल? परत आल्यावरसुद्धा त्यांच्या शिक्षणात मोठा खंड पडणार आहे. ती कमतरता कशी भरून काढणार? त्यांना वर्गाबरोबर कसे आणायचे? पूरक कामासाठी जादा वेळ आणि गरज भासल्यास जादा मनुष्यबळ कसे मिळवायचे?
 • विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे प्रश्न असणार आहेत. ते समजून घेऊन त्याचे स्वतंत्र नियोजन करावे लागेल.

(दोन) शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर आणि ऑनलाईन शिक्षण

१. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर

 • गेली काही वर्षे मोबाईल फोन, संगणक, इंटरनेट,  विविध अ‍ॅप्स, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, प्रोजेक्टर, छोट्याछोट्या व्हिडिओ क्लिप्स, कॉन्फरन्स कॉल्स इत्यादी मार्गांनी वर्गात काम करायला शिक्षकांनी सुरुवात केली आहे, आणि ते बऱ्यापैकी करत आहेत. आपापसात संवाद साधताना आणि वर्गात अध्यापन करताना तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. परंतु अशा तंत्रांचा वापर केल्यावर मुलांची समज वाढणे, त्यांना आकलन होणे, संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे ठरते. त्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कौशल्ये आत्मसात करणे आणि वर्गातल्या कामात त्यांना ती सहजपणे आणि प्रभावीपणे वापरता येणे महत्त्वाचे ठरते.
 • हे करत असताना वर्गात मुले समोर असतात. तिथे चर्चा, प्रश्नोत्तरे, फळ्याचा वापर, इतर शैक्षणिक साधनांचा वापर तसेच मुलांचे एकमेकांबरोबर शिकणे (peer learning) घडत असते. अशा वेळी वर्गात प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे, मुलांना शिकवलेले समजते आहे का ते काही कसोट्या / साधने वापरून बघणे शक्य असते.
 • परंतु टाळेबंदीच्या काळात मुले घरी असताना वरील गोष्टी शक्य होणार नसल्यामुळे मोबाईलने वर्गातल्याप्रमाणे शिक्षण सुरू ठेवणे शक्य होणार नाही.
 • याशिवाय आणखी एक व्यावहारिक बाब लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे, सर्व पालकांकडे स्मार्ट फोन्स, संगणक नाहीत. ज्यांच्याकडे आहेत, ते पालक घरात असेपर्यंत मुलांना फोन उपलब्ध असतील. पालक कामावर जाऊ लागले की परिस्थिती कशी हाताळणार? सर्व मुलांना एकाच वेळी संपर्कात ठेवण्याच्या दृष्टीनेसुद्धा ही अडचण जाणवणार आहे. तसेच, मानसिक व शारीरिक सुरक्षिततेच्या दृष्टिने त्यांनी किती वेळ चकचकीत पडद्यासमोर राहणे योग्य ठरेल? साधन म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने मोबाईल फोनच्या या मर्यादाही लक्षात घ्याव्या लागतील.
 • मात्र खाली मुद्दा क्रमांक तीन (१) मध्ये नमूद केलेले हेतू निश्चित केले तर टाळेबंदीच्या काळात मोबाईलद्वारे काही काम होऊ शकेल. त्याचा फायदा पुढील शिक्षणासाठी निश्चित होईल.

२. ऑनलाईन शिक्षण

 • सध्या ऑनलाईन शिक्षणाची मोठी चर्चा सुरू आहे. इतर देशांचे दाखले दिले जात आहेत. शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांच्या मनातही गैरसमज आहेत. त्यामुळे सर्वात आधी, ‘शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर’ आणि ‘ऑनलाईन शिक्षण’, यात फरक करायला हवा. शालेय पातळीवर तंत्रज्ञानाचा वापर वर्गातील अध्ययन-अध्यापनाला पूरक ठरतो, पर्याय ठरू शकणार नाही, हे वास्तव मान्य करायला हवे. त्यामुळे टाळेबंदीच्या आणि नंतरच्या काळासाठी ‘ऑनलाईन शिक्षण’ असे म्हणण्याऐवजी ‘शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर’ असा संबोध वापरायला हवा. तसे केल्याने बरीच स्पष्टता येईल.
 • एकवेळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा विचार करता येईल. महाविद्यालयातले विद्यार्थी वयाने मोठे असतात. त्यांना स्वतःहून जे शिकायचे आहे, ते अनेक मार्गांनी शिकू शकतात. जाणवणाऱ्या अडचणींचे निराकरण करायचे मार्ग ते स्वतः शोधू शकतात, परंतु शालेय पातळीवर मुलांना थेट मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज असल्यामुळे ते शक्य होणार नाही.
 • या घडीला ऑनलाईन शिक्षणासाठी कोणाचीही तयारी झालेली नाही. बहुसंख्य शिक्षकांची ऑनलाईन शिक्षणाबाबत पुरेशी समज तयार झालेली नाही. प्रशिक्षणेही झालेली नाहीत. त्या परिस्थितीत नजीकच्या काळात मोठे बदल होण्याची शक्यता नाही, हे वास्तव आहे.
 • ऑनलाईन शिक्षण म्हणजे नेमके काय? उपलब्ध स्रोत शोधायचे आणि त्या स्रोतांमधून आपल्याला हवे ते ज्ञान मिळवायचे? ते स्वयंअध्ययन झाले. याची सवय नसल्यामुळे ते शक्य दिसत नाही. किंवा एखाद्या तज्ज्ञाने किंवा शिक्षकाने एका ठिकाणी बसून दूरवरच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना शिकवणे? ते कोण करणार? त्यासाठी किती वेळ देणार? तो वेळ कसा काढणार? विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे घडणार? याबाबत स्पष्टता यायला हवी.
 • प्राथमिक वयातील मुलाने एकट्याने व्हिडिओ बघून संकल्पना आत्मसात करता येण्याची शक्यता नाही. माध्यमिकमध्येही ते कठीण आहे. या वयातील मुले एकमेकांशी गप्पा करून, एकमेकांना पाहून, शिक्षकाशी संवाद साधून शिकत असतात. त्यामुळे एकट्याने व्हिडिओ पाहून, ऐकून एखादी क्लिष्ट संकल्पना समजून घेणे या वयातील मुलांसाठी जड जाईल.
 • एरव्ही पालकांची भूमिका मुलाच्या शिकण्यात अतिशय महत्त्वाची ठरते. पण ऑनलाईन शिक्षणात पालकांची भूमिका आणि सहभाग आणखी महत्त्वाचा ठरेल. पालक सजग आणि सुशिक्षित असले, ते मुलाच्या शिकण्यात होम स्कूलिंगप्रमाणे सहभागी झाले, त्यांना तितका वेळ असेल, तर काही प्रमाणात शिक्षण घडू शकेल. अन्यथा मोठ्या अडचणी येऊ शकतात.
 • पालकांकडे, शिक्षकांकडे आणि अनेक शाळांकडे स्मार्टफोन्स, संगणक, इंटरनेट जोडणी, अखंडित वीजपुरवठा इत्यादी साधने व सुविधासुद्धा उपलब्ध नाहीत, ही एक मोठी व्यावहारिक अडचण ठरते.
 • शालेय पातळीवर मुलांची समज वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जरूर करायला हवा. परंतु ऑनलाईन शिक्षण आजच्या घडीला शक्य नाही, हे वास्तव मान्य करायला हवे.

(तीन) प्रयत्नांची दिशा

अशा परिस्थितीत नेमकेपणाने निर्णय घेणे अवघड असले तरी प्रयत्नांची दिशा निश्चित करणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी टाळेबंदीच्या आणि त्यानंतरच्या काळासाठी स्वतंत्रपणे नियोजन करताना पुढील बाबी विचारात घेता येतील.

१. टाळेबंदीच्या कालावधीत पुढील हेतू ठरवून नियोजन करता येईल.

 • मुलांशी आणि पालकांशी जोडून ठेवणे.
 • त्यांना विश्वास देणे.
 • मुलांना शिकण्याशी जोडून ठेवणे.
 • २०१९-२० वर्षातील काही घटकांची उजळणी करणे.
 • २०२०-२१ मधील पुढच्या वर्गातील त्या घटकांचा विस्तार करणे.
 • काही नवीन घटकांचा परिचय करून देणे.
 • हे सर्व करण्यासाठी मुलांना सुयोग्य activities देणे.
 • सध्याच्या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहून शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकणे आणि कौशल्ये प्राप्त करणे.
 • तंत्रज्ञानाची जोड दिल्यास मुलांचे आकलन आणि समज तयार व्हायला मदत होते का, ते कसे घडते, यासंबंधी प्रयोग करून बघणे.
 • परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षण नजीकच्या काळात शक्य नसल्यामुळे तो हेतू बाळगू नये.
 • शाळा सुरू होईपर्यंत मोठा खंड पडणार आहे. म्हणून शाळा सुरू झाल्यावर गरजेनुसार चार ते सहा आठवडे आधी झालेल्या अभ्यासाची पद्धतशीर सलग उजळणी घेणे गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी उजळणीचा आराखडा आणि सरावपत्रिका आत्ता तयार करून ठेवणे.
 • टाळेबंदीच्या काळात SCERT शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण करू शकेल.

२. टाळेबंदी  संपल्यानंतरच्या काळासाठी पुढीलप्रमाणे दिशा ठरवता येईल.

 • शालेय वर्ष २०२०-२१चा अनिश्चित असा मोठा कालावधी सुट्टीत जाणार आहे. त्यामुळे या वर्षाकडे स्वतंत्रपणे न पाहता २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांचा एकत्रित विचार करणे सयुक्तिक ठरेल. कदाचित परिस्थितीनुसार २०२२-२३ वर्षही विचारात घ्यावे लागेल.
 • या काळातल्या मोठ्या सुट्ट्या कमी करून दर वर्षाचे अध्यापनाचे नियोजित २०० दिवस भरून काढण्याचा प्रयत्न करावा.
 • त्यापैकी उपलब्ध होणाऱ्या एकूण दिवसांचा विचार करून दोन वर्षांचा अभ्यासक्रम या उर्वरित कालावधीत विभागून द्यावा.
 • कदाचित तीन वर्षांसाठी ते करावे लागेल. त्यानुसार कोणते पाठ / घटक / संकल्पना कोणत्या वर्षात घ्यायच्या, ते ठरवून घ्यावे लागेल.
 • टाळेबंदीमुळे मोठा खंड पडणार आहे. विद्यार्थी प्रदीर्घ काळ अध्ययनापासून दूर राहणार आहेत. त्यामुळे २०१९-२० वर्षातील अभ्यासाची उजळणी करून घेण्यासाठी सुरुवातीचे चार किंवा गरजेनुसार सहा आठवडे राखून ठेवावेत. या काळात सरावपत्रिका इत्यादी मार्गांनी सुनिश्चित पद्धतीने काम करावे. गणित प्रकल्पाप्रमाणे
 • तसेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे सूत्र मध्यवर्ती धरून या दोन-तीन वर्षांसाठी मूल्यमापनाबात निर्णय घ्यावेत.
 • वेगवेगळ्या विभागांत टाळेबंदी वेगवेगळ्या वेळी संपणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन विभागवार निर्णयही घ्यावे लागतील.
 • कसेही असले तरी दोन किंवा तीन वर्षांनंतर राज्यातील सर्व शाळा एकाच स्तरावर असतील, असे बघावे लागेल.
 • पाठ्यपुस्तकांबाबत योग्य ते निर्णय घ्यावे लागतील.
 • राज्यातील वेगवेगळ्या विभागातल्या शाळा वेगवेगळ्या वेळी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सुरू झाल्यावरही काही काळासाठी त्या पुन्हा बंद पडू शकतात. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांच्या संदर्भात एकच एक निर्णय घेणे सयुक्तिक ठरणार नाही. म्हणून शाळांना काही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागेल.
 • इयत्ता नववी व दहावीचा स्वतंत्र विचार करून नियोजन आराखड्यात त्याला विशेष स्थान द्यावे.
 • महत्त्वाचे हे की, टाळेबंदी उठवल्यानंतर मुलांच्या शारीरिक आरोग्याबरोबर त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. शिक्षकांचे समुपदेशन आताच करावे लागेल.

३. SCERT ने वरील आणि इतर संबंधित बाबी लक्षात घेऊन उपाययोजनेचे दोन-तीन विकल्प तयार करावेत. त्याबाबत शाळांना आगाऊ माहिती द्यावी. तसेच माहिती पुस्तिका, ऑनलाईन पद्धत इत्यादी मार्गांनी मार्गदर्शन करावे.

४. राज्य शासनाने या योजनेच्या गरजा लक्षात घेऊन SCERT च्या सूचनांनुसार योग्य ते आदेश काढावेत आणि शासकीय संस्था व शाळांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.

 (चार) शिक्षणाचा मूळ हेतू

कोविड-१९ च्या महामारीमुळे माणसाचे पुढील जीवन कसे असेल, समाजजीवनात कोणकोणते मोठे बदल होतील, त्यांना सामोरे कसे जायचे अशा अनेक मुद्द्यांवर जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्या चर्चांमध्ये ‘बदलत्या काळातील शिक्षणाचा हेतू’ हा एक विषय पुढे आला आहे.

असे एक मत मांडले जाऊ लागले आहे की, जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला असल्यामुळे आर्थिक विवंचना सोडवण्याला प्राधान्य राहील. त्यामुळे कौशल्याधारित शिक्षण द्यायला हवे. रोजगार मिळेल किंवा स्वयंरोजगार निर्माण करता येईल, असे कौशल्ये देणारे शिक्षण हवे.

उपजीविकेसाठी आणि उत्तम नागरिक बनण्यासाठी शिक्षण असते, हे सर्वमान्य आहे. त्यात विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्त्व विकास हा अभिप्रेत असतो. अर्थात आतापर्यंत दुसऱ्या हेतूसाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत, हे वास्तव आहे. जागतीकीकरणानंतर तर शिक्षणाचा बाजार मांडला जाऊन हा दुसरा हेतू पूर्णपणे बाजूला सारला गेला. सध्याच्या परिस्थितीत तोच दृष्टिकोन नवीन रूपात पुढे आला आहे, इतकेच. परंतु कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाचा मूळ हेतू दृष्टिआड करणे योग्य ठरणार नाही. कितीही म्हटले तरी कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती ही कायमची नसून काही वर्षांपूरती असणार आहे, हे प्रथम लक्षात ठेवायला हवे. अस्तित्वाच्या प्रश्नाला आत्ता प्राधान्य द्यावे लागेल आणि त्यावर मार्गही शोधावा लागेल, हे खरे आहे. परंतु त्यासाठी शिक्षणाची दिशा पार बदलणे चुकीचे ठरेल.

दुसरे असे की, शालेय शिक्षणात रोजगारासाठी उपयुक्त अशी कोणती कौशल्ये देणार? तशी कौशल्ये द्यायला दहावी-बारावी पासून सुरुवात करणे सयुक्तिक ठरते. तोपर्यंतच्या शालेय शिक्षणामुळे मुलांचा पाया तयार होत असतो. भाषिक आणि गणिती कौशल्ये मिळवणे, मूलभूत संकल्पना स्पष्ट होणे, निसर्गाबद्दलचे आणि मानवी विकासाबद्दलचे भान येणे, संवेदनशील मन तयार होणे, समाजात मिसळायला शिकणे आणि मुख्य म्हणजे, विचार करता येणे अशा अनेक गोष्टी शालेय जीवनात साध्य होणे अपेक्षित असते. विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर (आठवीपर्यंत) ते अपरिहार्य ठरते. सध्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत, हे कटू सत्य आहे. त्याचा परिणाम आपण समाजात बोकाळलेल्या उथळपणात पाहत आहोत. समजून काम कराणारी, आपल्या विषयाचे पुरेसे ज्ञान आणि कौशल्ये असणारी माणसे दुर्मीळ झाली आहेत, हे वास्तव आपण समजून घ्यायला हवे. अशा परिस्थितीत केवळ उपजीविकेच्या दृष्टीने कौशल्याधारित शालेय शिक्षणाचा हेतू बाळगला तर आधीच दुर्लक्षित राहिलेली ही उद्दिष्ट्ये पार बाद होतील, हे निश्चित. उलट, आलेल्या परिस्थितीचा संधी म्हणून विचार करावा आणि आतापर्यंत राहिलेल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करावा.

गिरीश सामंत, अध्यक्ष,

(लेखक गोरेगाव, मुंबई येथील ‘दि शिक्षण मंडळ’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

 1. pgovind

  यातल्या काही महत्वाच्या बाबींवर आज कर्नाटक सरकारचच शिक्षण विभाग विचाराधीन आहे.

  1. साधना गोरे

   गोविंद, करोनाच्या पार्श्वभूमीवरील सीमाभागातील घडामोडी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

 2. pmadhav

  शालेय शिक्षणाच्या सर्व अंगांचा विचार करुन सरांनी उत्तम मांडणी केली आहे…

  शिक्षण, आरोग्य या मुलभुत व्यवस्थांच्या व्यापारीकरणाचे तोटे या परीस्थितीत आपल्याला स्पष्टपणे समजायला हवेत… यापुढे ते टाळायला हवेत… सर्वांना उत्तम गुणवत्तेची शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी व्यापक आराखडा बनविण्याची गरज आहे…

  विचार कसा करावा? याचे शिक्षण शालेय स्तरापासुन खरंच खुप आवश्यक आहे… मानवाच्या विकासामधल्या सर्वात मुख्य घटकांचा समावेश अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे…

  माधव पंडित

 3. Anonymous

  चहु अंगांनी विचार करणारा अभ्यासपूर्ण लेख.जीवन मरणाचा प्रश्न,कौशल्या धिष्टीत शिक्षण, संकटाला संधी मानून फायदा घेणे सामाजिक स्तर सुधारणे.दूरदृष्टीने आयोजन,शारिरीक व मानसिक अवस्थेचा विचार,हे मुद्दे महत्वाचे आहेत.समजातील उथळवृत्तीकडे लक्ष वेधणे परिणामकारक वाटले.

Leave a Reply