भाषाविचार- भाषेची वसाहत आणि वाताहत (भाग-१)


'आपल्या हयातीत आपल्या भाषा मरत नाहीत, तर पुढचा विचार आपण का करावा? आणि त्यासाठी आपण रक्त का आटवावं?' असा सोयीचा पण आत्मघातकी विचार करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेतच. अशा लोकांना स्वातंत्र्यलढ्याची उदाहरणं देऊन भागणारं नाही. कारण स्वातंत्र्याचा फायदा काय हे जसं अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही, तसंच एखादी भाषा जगण्याचा फायदा काय, हे ती भाषा जगवत-वाढवत राहिल्याशिवाय कळत नाही" 'भाषाविचार' सदरातून 'भाषेची वसाहत आणि वाताहत'बद्दल सांगतायत डॉ. दीपक पवार -

---------------------------------------------------------

जगभरात भाषेचा विचार करणाऱ्या लोकांमध्ये जे अनेक मतप्रवाह आहेत, ते भाषाविज्ञानाच्या विविध शाखांमध्ये विखुरले गेले आहेत. उपयोजित भाषाविज्ञान, सामाजिक भाषविज्ञान व ऐतिहासिक भाषाविज्ञान ही त्यातली प्रमुख दालनं आहेत. या विचारांमध्ये जगभर सातत्याने पडत असलेली भर लक्षात घेतली की, माणसाचं मन बावचळून जाईल अशी परिस्थिती आहे. ‘भाषा प्रवाही असतात, जगतात-मरतात, राहतात-जातात', अशी एक निष्काम कर्मयोगाची भावना एखादी विचारप्रणाली मांडते. तर 'भाषांचा, बोलींचा मृत्यू ही दखलपात्र गोष्ट आहे' असं मानणारा एक समृद्ध विचारप्रवाह आहे. आपल्या अवतीभोवती अनेक विचारप्रवाहांचे लोक वावरताना दिसतात. भाषांचं बदलणारं रूप, त्यांच्यातले संख्यात्मक, मूल्यात्मक आणि गुणात्मक बदल सगळ्यांना कळतातच असं नाही; किंवा कळले तरी महत्त्वाचे वाटतातच असं नाही. या पार्श्वभूमीवर 'भाषेचा मृत्यू' ही संकल्पना समजावून घेऊ या.

हेही वाचाः-

संपादकीय – मराठी राज्याची साठोत्तरी कहाणी

संपादकीय – भाषा आणि धर्म

एखादी भाषा मरते म्हणजे काय? भाषा हे जर संवादाचं आणि अभिव्यक्तिचं माध्यम असेल तर त्यासाठी कोणतीही भाषा बोलणारे किमान दोन लोक जिवंत असण्याची आवश्यकता आहे. याचा अर्थ एखादी भाषा बोलणारा एकच माणूस उरला तर ती भाषा समाज जीवनातून हद्दपार झाली असं म्हणता येईल. एखादी भाषा बोलणाऱ्या माणसांची संख्या कमी होणं, हे आपोआप होत नाही. भाषा संपण्याची किंवा संपवण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षं चालते. 'डेव्हिड क्रिस्टल' हे भाषाविज्ञानाचे प्रख्यात अभ्यासक आहेत. त्यांनी 'भाषेचा मृत्यू' या विषयावर संशोधन केलं आहे. वेगवेगळ्या कारणांनी होणारा भाषांचा ऱ्हास त्यांनी त्यांच्या पुस्तकांतून मांडला आहे. तसंच, त्यांच्या http://www.davidcrystal.community.librios.com/ या संकेतस्थळावरही त्यांचे लेख देण्यात आले आहेत. तसंच जगभरातही लोक धोक्यात असलेल्या भाषांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठीय, प्रशासकीय आणि धोरणात्मक पातळीवर काम करत आहेत. कोणत्या मार्गांनी आपल्या भाषांचा टिकाव लागू शकेल यावर खल आणि प्रयत्न करत आहेत. याबाबतीत आपण भारतीय लोक कुठे आहोत?

स्वतंत्र भारतात हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा, इंग्रजी ही सहभाषा तर इतर अनेक भाषा या राज्यांच्या अधिकृत भाषा किंवा सहभाषा झाल्या. एका अर्थाने आपल्या भाषांचं राजकीय, घटनात्मक आणि वैधानिक स्थान निश्चित झालं आहे. मात्र एवढा एक विधायक उद्योग करून झाल्यावर या देशातले धोरणकर्ते, राजकीय पक्ष, अभिजन आणि विद्यापीठांसारख्या यंत्रणा काही सन्माननीय अपवाद वगळता गाढ झोपेत गेलेल्या दिसतात. मुळात या देशातली गल्लत भाषा आणि साहित्याच्या सरमिसळीत आहे. साहित्याचा विकास म्हणजे भाषेचा विकास नव्हे. साहित्य हे भाषेच्या अनेक अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग आहे. मात्र इतर अंगांचाही तितक्याच गांभीर्याने विचार केला पाहिजे. शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवहार, तंत्रज्ञान या आणि अशा व्यवहारक्षेत्रांमध्ये भाषेचा वापर आणि वावर वाढवणे, याचा अर्थ साहित्यापलीकडची द्वारं तिला खुली करून देण्यासारखं आहे. मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. समाजाचा निर्णयकर्ता वर्ग हा या गोष्टीचं अजिबात भान नसलेला असेल, तर कोणत्याही भाषेची वाताहत व्हायला फार वेळ लागत नाही.

स्वातंत्र्योत्तर भारतात आपण आपल्या भाषा कणाकणाने मरण्यासाठी सोडून दिल्या आहेत,असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. विशेष म्हणजे याच काळात ललित साहित्याचा पूर आल्यामुळे आणि त्या आधारे साहित्यिकांची दुकानं चांगली चालत असल्यामुळे आपल्या भाषेला काहीही झालेलं नाही, 'भाषा अडचणीत आहेत' असं म्हणणारे लोक खोटारडे आहेत असं सरकारपेक्षाही जास्त ठामपणाने सांगू शकणाऱ्या मांडलिक अभिजनांचा वर्ग जन्माला आला. कोणत्याही भाषेच्या ऱ्हासाला यापेक्षा जास्त अनुकूल काळ असू शकणार नाही.

'आपल्या हयातीत आपल्या भाषा मरत नाहीत, तर पुढचा विचार आपण का करावा आणि त्यासाठी आपण रक्त का आटवावं?' असा सोयीचा पण आत्मघातकी विचार करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेतच. अशा लोकांना स्वातंत्र्यलढ्याची उदाहरणं देऊन भागणारं नाही. कारण स्वातंत्र्याचा फायदा काय हे जसं अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही, तसंच एखादी भाषा जगण्याचा फायदा काय, हे ती भाषा जगवत-वाढवत राहिल्याशिवाय कळत नाही. प्रत्येक भाषेच्या असंख्य बोली आहेत. एकदा भाषेचं क्षेत्र संकोचायला सुरुवात झाली की, बोलींचं क्षेत्र त्याहीपेक्षा जास्त संकोचायला लागतं. बोलींमध्ये मुळातच एक सत्तेची उतरंड असते. त्यामुळे या उतरंडीत तुलनेनं खालच्या थरावर असलेल्या बोली लवकर हद्दपार होतात. ज्या तग धरून राहतात त्यांनासुद्धा टिकून राहणं, हाच एक उद्योग होऊन बसतो. वाढणं आणि विकसित होणं या फार पुढच्या गोष्टी होऊन बसतात. भारतातल्या जवळपास सर्व भाषांची, बोलींची  हीच स्थिती आहे.

आपल्या भाषा लोप पावायला नको असतील तर सर्वांत पहिलं म्हणजे त्यांचं लोप पावणं काय असेल आणि त्याचे परिणाम काय होतील, याचं भान बाळगायला हवं. दुसरं असं की, या प्रक्रियेतले जे वेगवेगळे घटक आहेत - शासन, प्रशासन, अभिजन, प्रसारमाध्यमं यांनी त्यात कोणती भूमिका बजावली पाहिजे, याची समज यायला हवी. आपली भाषा मरू न देणं हा आपल्या जीवनधारणेचा भाग कसा होईल यावर विचार आणि कृती व्हायला हवी. अशी कृती किंवा असं बंड ज्या भाषेत रोजच्या रोज घडतं त्याच भाषा जगतात आणि इतर भाषा मात्र धोरणलकव्याने गलितगात्र होऊन जातात. स्वातंत्र्योत्तर भारतात धोरणलकवा ही देशाच्या भाषाधोरणाची सर्वात लक्षणीय बाजू आहे आणि धोरणलकवा हे भाषेच्या मृत्यूकडे तत्परतेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही.

- डॉ. दीपक पवार संपर्क - ९८२०४३७६६५, santhadeep@gmail.com (लेखक मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत.) - 'भाषाविचार' पुस्तकातील लेखांश

समाजकारण , भाषा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.