लीलाताई : प्रयोगशील शिक्षणाचा प्रेरणास्रोत

‘तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य घ्या असं कुणी सांगत नाही. स्वातंत्र्य कुणी कुणाला देत नसतं. ते आपलं आपण घ्यायचं असतं. आपल्या मर्यादेत त्याचा जबाबदारीनं वापर करायचा असतो.’ ही लीलाताईंची भूमिका. याच भूमिकेशी प्रामाणिक राहून आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून त्यांनी सृजन आनंद विद्यालयाने शासकीय अनुदान न घेता समाजाच्या मदतीने हे काम करायचं ठरवलं. आसपास घडणारा कुठलाही प्रसंग असो किंवा एखादी नवीन सुचलेली गोष्ट असो, त्याचं रूपांतर उपक्रमात करण्यासाठी सजग असणारे शिक्षक. क्रमिक पुस्तकातील काही मजकूर विचारपूर्वक वगळण्याचे शैक्षणिक स्वातंत्र्य घेऊन त्याच विषयावर अधिक सुयोग्य मजकूर शोधून अगर स्वतः लिहून त्याचा वापर करण्याची मुभा शिक्षकांना देणारे पहिले विद्यालय. मुलांशी सामाजिक विषयांवर चर्चा करणारे, शिक्षण हे समाज आणि जीवनाशी जोडण्यासाठी स्मशान भेटीपासून ते गूळ तयार करणार्‍या गुर्‍हाळापर्यंत अनेक कल्पक क्षेत्रभेटी योजणारी ही प्राथमिक शाळा. सृजन आनंदची ही भूमिका तत्कालीन शिक्षणक्षेत्राला पूर्णत: नवीन होती.

लीलाताई पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणारा नाशिक येथील आनंद निकेतन शाळेच्या संचालक विनोदिनी काळगी यांचा हा लेख – 

——————————————————

एखाद्या बीजाने झाड कसे व्हावे याचे शिक्षण देणारा माळी कधी तुम्ही पाहिला आहे का?  बीज सुरक्षित राहून त्याचे वृक्षात रूपांतर व्हावे म्हणून माळी त्याचे रक्षण करतो, त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणार्‍या सुयोग्य भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी दक्ष राहतो. विद्यार्थ्यांबाबत शिक्षकाची भूमिकाही अशीच असायला हवी. शिक्षकाने आवश्यक तेव्हा व आवश्यक तेवढे उत्तेजन, आत्मविश्वास, स्फूर्ती देत विद्यार्थ्यांच्या गुणांची कदर केल्यास विद्यार्थी स्वत:च्या सुप्त क्षमतांचा शोध घेत आपले अव्यक्त सामर्थ्य शोधतात आणि त्यांचे स्वत्व प्रकट होते, यावर लीलाताईंचा गाढ विश्वास होता आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच महाविद्यालयातील नोकरी चालू असतानाच एकीकडे त्यांच्या मनात ‘सृजन आनंद विद्यालय’ आकार घेत होते.

सामाजिक कार्यकर्ते व दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या त्या पत्नी. बी.ए., बी.एड्. आणि एम.एड्. केल्यावर लीलाताईंनी कोल्हापूरच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरीची सुरुवात केली. तेव्हापासूनच त्यांचे शिक्षण आणि शिक्षक या विषयावर चिंतन सुरू झाले. स्वत: कॉलेजमध्ये शिकत असताना राष्ट्र सेवा दलात सहभागी झाल्याने त्यांची सामाजिक जाणीव विकसित झाली होती. त्यामुळे महाविद्यालयातील  नोकरीचा त्यांनी देशाचे भविष्य कवेत घेणार्‍या भावी शिक्षकांच्या जाणीवजागृतीची व विकसनाची संधी म्हणून उपयोग केला. त्यावेळी अभ्यासक्रमाच्या चौकटीत राहूनही थोडेफार स्वातंत्र्य घेता येते, हा विश्वास त्यांनी स्वप्रयत्नातून मिळवला. कोणत्याही स्तरावरील शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा साठा करणे नसून विद्यार्थ्यांचे विचार, भावना, आकांक्षा यांना योग्य दिशा देणे हे जर आपण महत्त्वाचे उद्दिष्ट मानले तर कोणताच शैक्षणिक, सांस्कृतिक वा मनोरंजनात्मक उपक्रम शालेयपूरक (extra-curricular) राहणार नाही. शिवाय शालेय (curricular) आणि सहशालेय (co-curricular) उपक्रमही परस्परांना पोषकच ठरतील असे त्यांना वाटत होते. हे सर्व डोक्यात चालू असताना त्या १९८५ मध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.

निवृत्तीनंतर सामान्यपणे लोक आपले छंद जोपासत आरामात आयुष्य जगण्याचा विचार करतात, पण स्वस्थ बसतील त्या लीलाताई कसल्या! त्यांनी आपल्या स्वप्नातील शिक्षणाचे प्रयोग करण्यासाठी कंबर कसली. आपल्या स्वप्नातील शाळा साकार होताना त्यांना बघायची होती. शिवाय ‘हे शक्य आहे’ आणि ‘आवश्यक आहे’ हे इतरांनाही दाखवून द्यायचे होते. या कामाला एक दुःखाची किनारही होती. लीलाताईंचा एकुलता एक मुलगा श्रीरंगचे चोविसाव्या वर्षी अपघातात निधन झाले होते. त्याच्यासोबत त्याच्या बालपणी करायच्या अनेक गोष्टी त्यांना या  रूपाने पूर्ण करायच्या होत्या.

हेही वाचाः –

शिक्षणप्रेमींसाठी पुस्तक यादी

नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार – भाग दोन

भाषेचा सच्चा शिलेदार – अरुण फडके

त्यावेळेला त्यांच्याकडे जागा, पैसा, इमारत, शिक्षक यांपैकी काहीही नव्हते, होती फक्त प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यांचा शिक्षण विचार.  ‘स्वातंत्र्य मिळून तीन दशके उलटली तरी स्वतंत्र देशात प्राथमिक शिक्षण मुलांना कशा प्रकारे मिळायला हवे याबाबत फारसा खल आणि प्रयत्न झालेले दिसत नव्हते. पाच ते दहा हा वयोगट म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी. या कालावधीत आपण मुलांच्या मुक्ततेला वाव देण्याऐवजी अभ्यासक्रम, पुस्तके, परीक्षा अशा एका साच्यात त्यांना बंदिस्त करतो. लहान मूल हे स्वतंत्र माणूसच असते. त्यांची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये अतिशय क्रियाशील असतात. पहिल्या पाच वर्षात ते कुटुंबातून भाषा समजून घ्यायला व वापरायला शिकलेले असते. आजूबाजूला दिसणार्‍या वास्तवाबद्दल त्यांच्या मनात नाना शंका, प्रश्न असतात. ज्ञानग्रहण करण्यासाठी मुले अतिशय उत्सुक असतात, परंतु शाळेच्या दरवाजातून आत गेल्यावर क्रमिक पुस्तकांशिवाय अन्य कशाशीही मुलांचा संबंध येणार नाही, अशी दक्षता शिक्षणव्यवस्थेकडून घेतली जाते. या परिस्थितीत बदल घडवून आणणारे विद्यालय उभे राहिलेच पाहिजे.’ त्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या आंतरभारती शिक्षण मंडळाच्या शाळेच्या आवारात छोटीशी जागा मिळवली आणि १९८५ सालीच ‘सृजन-आनंद’ या पहिली ते चौथीच्या प्राथमिक विद्यालयाची सुरुवात केली. अशी शाळा उभी राहू शकेल आणि पालकांना त्या शाळेत मुलं पाठवायला तयार करता येईल हा तेव्हा हवेतला इमलाच होता. शिवाय हे क्षेत्र बदलायला अवघडच, इथे एक माणूस बदलून चालत नाही तिथे शिकवणारे सगळे शिक्षक बदलले पाहिजेत आणि एरवीच्या चिंताग्रस्त पालकांनाही हे मान्य झालं पाहिजे. आज लीलाताई आणि सृजन-आनंद विद्यालय हे महाराष्ट्रभरातील प्रयोगशील शिक्षकांचे, शाळांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले आहे.

सृजन आनंद म्हणजे बालककेंद्री, सृजनशील, आनंददायी व सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण प्राथमिक शिक्षणाच्या संकल्पनांचे प्रात्यक्षिक स्वरूप. मुलांना मोकळेपणाने बोलता येणे, विचार करता येणे, ते विचार व्यक्त करता येणे हे लीलाताईंना महत्त्वाचे वाटत होते. त्यामुळे शाळेचे माध्यम म्हणून मराठी शिवाय त्यांनी दुसरा विचारही केला नाही. शाळा चालवणे हे एकटीचे काम नाही याची लीलाताईंना चांगलीच जाणीव होती. म्हणूनच त्यांनी सुरुवात केली ती शिक्षक प्रशिक्षणापासून. त्यासाठी त्यांनी शिक्षक प्रशिक्षण वर्ग घेतले, शाळेतल्या शिक्षकांची दर शुक्रवारी शिक्षक सभा घेऊन तिथे सर्व सामाजिक आणि शैक्षणिक विषयांच्या शिक्षणपद्धतीची सखोल चर्चा केली. शिवाय शिक्षकांना वैयक्तिक मार्गदर्शन केले, त्यांना नियोजन, नोंदींची सवय लावली.

शाळा चालवताना मोठा खर्च शिक्षकांच्या वेतनावर होत असतो. विद्यालयाकडे तर पैसेच नव्हते. लीलाताईंनी हे आव्हान कल्पकतेने सोडवले. समाजामध्ये विविध विषयांची जाण असणाऱ्या, मुलांवर प्रेम असणाऱ्या, शिक्षणाबाबत आस्था असणाऱ्या, अभ्यासू, ध्येयवादी व्यक्ती असतात, अशा व्यक्तींना त्यांनी आवाहन केले. शिक्षणक्षेत्रासाठी ही सर्वस्वी नवी कल्पना होती. आपला घरसंसार सांभाळून शक्य तेवढा वेळ शिस्तपूर्ण पद्धतीने देण्यासाठी विशेषत: स्त्रिया पुढे आल्या. अशा शिक्षकांची एक फळीच लीलाताईंनी निर्माण केली. या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. कोणताही विषय शिकवताना आपला रोख घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास या तत्त्वांवर असायला हवा. विद्यार्थ्यांच्या वृत्तीविकासात या तत्त्वांच्या आधारे त्यांचा परिपोष व्हायला हवा. शिकवताना एक स्वतंत्र देशातील भावी नागरिकांची मानसिकता आपण साकारत आहोत हे लक्षात ठेवून शिकवायला हवे, ही तत्वे त्यांनी आपल्या शिक्षकांमध्ये रुजवली. अधिकारशाहीची उतरंड नसणारी व लोकशाही प्रशासनाचा अवलंब करणारी व्यवस्था निर्माण केली. शिक्षकांना ताई-दादा संबोधून मुले व शिक्षकांमध्ये जवळीक निर्माण केली. विद्यार्थी – शिक्षक – पालक यांच्यामध्ये समपातळीवरील आदरपूर्वक स्नेह जपला.

शिक्षणपद्धतीतील वेगळेपण तर किती सांगावे! मुलांमध्ये स्वतःच्या अपार क्षमता, कौशल्ये दडलेली असतात यावर गाढ श्रद्धा ठेवणारे हे विद्यालय. आसपास घडणारा कुठलाही प्रसंग असो किंवा एखादी नवीन सुचलेली गोष्ट असो, त्याचं रूपांतर उपक्रमात करण्यासाठी सजग असणारे शिक्षक. क्रमिक पुस्तकातील काही मजकूर विचारपूर्वक वगळण्याचे शैक्षणिक स्वातंत्र्य घेऊन त्याच विषयावर अधिक सुयोग्य मजकूर शोधून अगर स्वतः लिहून त्याचा वापर करण्याची मुभा शिक्षकांना देणारे पहिले विद्यालय. मुलांशी सामाजिक विषयांवर चर्चा करणारे, शिक्षण हे समाज आणि जीवनाशी जोडण्यासाठी स्मशान भेटीपासून ते गूळ तयार करणार्‍या गुर्‍हाळापर्यंत अनेक कल्पक क्षेत्रभेटी योजणारी ही प्राथमिक शाळा. ‘तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य घ्या असं कुणी सांगत नाही. स्वातंत्र्य कुणी कुणाला देत नसतं. ते आपलं आपण घ्यायचं असतं. आपल्या मर्यादेत त्याचा जबाबदारीनं वापर करायचा असतो.’ ही लीलाताईंची भूमिका याला कारणीभूत होती. शैक्षणिक प्रयोग करताना आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून विद्यालयाने शासकीय अनुदान न घेता समाजाच्या मदतीने हे काम करण्याचं ठरवले. विद्यालयाची ही भूमिकाही तत्कालीन शिक्षणक्षेत्राला पूर्णत: नवीन होती.

लीलाताईंची मूल्यांवरील निष्ठा, वैचारिक स्वच्छता, माणसांच्या गुणांचा शोध घेण्याची व फुलवण्याची क्षमता, कल्पकता, प्रयोगशीलता, कामाची पद्धत आणि संपूर्ण प्रक्रियेचं मूल्यमापन करण्याची रीत हे सारेच अचंबित करणारे आहे. पहिली पाच वर्षे त्यांनी आपली शाळा जगवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर स्वतः जागते राहत इतरांनीही राहावे म्हणून कधी वृत्तपत्रांतून लेखन, कधी शिक्षक प्रशिक्षण,  सृजन आनंद शिक्षण वर्ग असे वेगवेगळे उपक्रम घेऊन आणि आपल्याला सापडलेले लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पुस्तके लिहून प्रयत्न केले. त्यांची कडक शिस्त, रोखठोक स्पष्टवक्तेपणा यामुळे अनेकांना त्यांचा स्वभाव कठोर वाटायचा. त्यांच्याशी बोलताना भीती वाटायची. पण याबाबतीत मी आणि आमची शाळा खूप भाग्यवान ठरलो. आम्हाला त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि स्नेह कायम मिळत राहिला.

लीला पाटील यांची ग्रंथसंपदा –

क्र. पुस्तकाचे नाव प्रकाशन
प्रवास ध्यासाचा…आंनद सृजनाचा उन्मेष प्रकाशन
शिक्षणातील ओअसिस उन्मेष प्रकाशन
शिक्षण घेता – देता उन्मेष प्रकाशन
ऐलमा पैलमा शिक्षण देवा उन्मेष प्रकाशन
बालकहक्क – मुलंच जेव्हा बोलू लागतात… ग्रंथाली
अर्थपूर्ण आनंदशिक्षणासाठी उन्मेष प्रकाशन
शिक्षणातील लावण्य ग्रंथाली
परिवर्तनशील शिक्षण उन्मेष प्रकाशन
लिहिणं मुलांचं शिकवणं शिक्षकांचं मॅजेस्टिक
१० संस्काराचा बागुलबुवा
११ पालकपण कधीच संपत नाही
१२ गाजः- बालिकावर्षाची अन्वय
१३ प्रजासत्ताकाची मशागत
१४ क्षमता विकासाची आनंददायी अध्यापन यात्रा
१५ ओलांडताना

समीर शिपूरकर यांनी सृजन आनंद विद्यालयावर तयार केलेल्या माहितीपटाचा दुवा इथे देत आहे. https://www.youtube.com/watch?v=6tNyNVT7WPw&feature=youtu.be&app=desktop हा माहितीपट पाहून सृजन आनंदमधील शिक्षणाची, त्यामागील लीलाताईंच्या भूमिकेची आपल्याला निश्चितच काहीएक कल्पना  येते.

शिकण्यात आणि शिकवण्यात इतकी मजा असते हे लीलाताईंमुळेच अनेकांना समजले. प्रत्यक्ष त्यांच्याकडून, त्यांच्या विद्यालयाकडून किंवा त्यांच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रात अनेक शिक्षक प्रयोगशीलपणे काम करीत आहेत. काही प्रयोगशील शाळाही उभ्या राहिल्या आहेत. रूढ शिक्षण पद्धतीतून तयार होतात ते रोबो. भावनेला थारा नसलेले. भोवतीच्या समाजाबाबत अंधत्व स्वीकारलेले. तिथे सगळ्यांनी मिळून चांगले जगणे माहीतच नाही अशा या अंधारात पस्तीस वर्षांपूर्वी लीलाताईंनी दिवा लावला. आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे ही ज्योत चांगली तेवत ठेवण्याची. मग या प्रकाशात अनेक मुले जातील हातात हात घेऊन आणि त्यांच्या हृदयातही तेवत असेल एक विझू न शकणारी ज्ञानाची, माणुसकीची ज्योत आणि तीच असेल लीलाताईंना खरीखुरी श्रद्धांजली!

( संदर्भ – ‘प्रवास ध्यासाचा . . आनंद सृजनाचा’ हे लीलाताईंचे पुस्तक.)

(टीप – डॉ. लीला पाटील असे नाव लिहिणार्‍या लीलाताई या गारगोटीच्या मौनी विद्यापीठात  प्राचार्य होत्या. त्या आणि ‘सृजन आनंद’च्या लीलाताई वेगळ्या आहेत.)

– विनोदिनी काळगी

(लेखिका नाशिक येथील आनंद निकेतन शाळेच्या संचालक आहेत)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 6 Comments

 1. kmrudula

  खूप छान, प्रेरणादायी

 2. kakash

  प्रेरणा मिळाली.

 3. Anonymous

  सुंदर!!स्वातंत्र्याचा जबाबदारीने मर्यादेत वापर करुन मुलांचा आनंद शिकवणारा उद्बोधक लेख.प्रेरणादायी माहिती.

 4. dabhay

  सर्जनशील उपक्रम।
  लीलाताई नी खूपच चांगले कार्य केले असून सदर कार्य पुढे चालू ठेवले त्यांचे मनस्वी आभार।

 5. Rdesai

  सुंदर लेख !

 6. pranavs

  खूप सुंदर असा लेख,
  प्रत्येकासमोर उत्तम असा आदर्श निर्माण करणारा लेख आहे..

Leave a Reply