संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

यंदाचं वर्ष महाराष्ट्र राज्याचं हीरक महोत्सवी वर्ष आहे, शिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, लावणी, पोवाडा, पटकथा यासारख्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्या अण्णाभाऊंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीइतकंच लक्षवेधी आहे. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून लोकांना भाषिक अन्यायाविरुद्ध कसं पेटून उठवलं, हा लढा लोकभाषेतून लोकांपर्यंत कसा पोहचविला याचा लेखाजोखा मांडणारा प्रतीक्षा रणदिवे यांचा हा लेख –

————————————————–

स्वतंत्र भारताच्या इतिहासात संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताची सांस्कृतिक व भाषिक विविधता लक्षात घेऊन भारताची भाषावार प्रांतरचना करावी ही कल्पना भारतातील विचारवंत व राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारली होती. त्यामुळेच महात्मा गांधीनी १९२० साली नागपूरच्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात भाषावार प्रांतरचनेचा ठराव मंजूर करून घेतला, तर १९३८ सालच्या मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषिकांचे वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे, अशा आशयाचा ठराव स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मंजूर करून घेतला. १९४६ साली बेळगावच्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही ग. त्र्यं. माडखोलकरांचा याच मागणीचा ठराव मंजूर झाला. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद या सर्व पक्षीय संघटनेची स्थापना करण्यात आली. याच मागणीच्या विचारासाठी आणि तिचे स्वरूप ठरविण्यासाठी जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभिसीतारामय्या यांची जे.व्ही.पी समिती स्थापन करण्यात आली. तसेच दार कमिशन, फजल अली आयोग इत्यादी आयोगांद्वारे विचारमंथन सुरू झाले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य या मागणीला बगल देत भांडवलदारांच्या दबावाला बळी पडून केंद्रशासित मुंबई, द्विभाषिक राज्य, त्रैभाषिक राज्य असे तोडगे या कमिशनद्वारे सुचविले जाऊ लागले. काहीही करून निव्वळ मराठी माणसांचे राज्य निर्माण होऊ द्यायचे नाही आणि मराठी भाषिकांचे खच्चीकरण करायचे असाच विचार केंद्रातील सत्ताधारी करीत आहेत असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सहजासहजी आपली मागणी मान्य होणार नाही, यासाठी लढ्याचाच मार्ग स्वीकारावा लागेल, असा विचार मराठी भाषिकांत मूळ धरू लागला. सनदशीर मार्गांनी हा प्रश्न सुटत नाही, उलट केंद्र आणि राज्य शासन ही मागणीच दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे लक्षात आल्यावर महाराष्ट्रातल्या काँग्रेसेतर नेत्यांनी या मागणीसाठी एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, क्रांतिवीर नाना पाटील, आचार्य प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, जयंतराव टिळक, दादासाहेब गायकवाड, कॉ. दत्ता देशमुख, लालजी पेंडसे, मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर इ. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी एकजूट होऊन ६ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, डांग, उंबरगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी या समितीने मागणी केली.

हेही वाचलंत का?

संपादकीय – मराठी राज्याची साठोत्तरी कहाणी

संपादकीय – ओळख भाषेची, मराठी महाराष्ट्राची!

या लढ्यात तेवढयाच ताकदीने मैदानात उतरले ते महाराष्ट्रातील शाहीर. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जसजशी फोफावत चालली, तसतशी शाहिरांच्या लेखणीला धार चढत गेली. या सर्व लढ्यातील सर्वात महत्त्वाचे शाहीर म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा खेड्यापाड्यात, घराघरात पोहोचविण्याचे कार्य शाहिरांनी मोठ्या नेटाने, प्रभावीपणे केले. प्रचारासाठी वर्तमानपत्र हे एकमेव साधन असण्याच्या काळात शाहिरांनी वगनाट्याद्वारे, पोवाडयाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा अत्यंत नेटाने प्रसार केला. शेकडो वैचारिक अथवा बौद्धिक भाषणे करू शकणार नाहीत इतके काम शाहिरांच्या लावण्या आणि पोवाडयांनी केले. कारण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील अडाणी जनतेच्या भाषेत संवाद साधण्याचे कसब त्यांच्या शब्दांमध्ये होते. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, शाहिर द. ना. गव्हाणकर या तीन शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९४४ साली टिटवाळा येथील शेतकरी परिषदेत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जे कार्यक्रम सादर झाले, त्यातून ‘लाल बावटा कलापथक’ उदयास आले. गाणी, पोवाडे, लावण्या, वग किंवा लोकनाट्य या शाहिरी पद्धतीच्या दृक्श्राव्य कलाप्रकारांना सामूहिकपणे सादर करणाऱ्या कलावंतांच्या कलापथकाला हे सुटसुटीत व अर्थपूर्ण नाव मिळाले. लाल बावटा कलापथक प्रचंड गाजले. ते लोकांना अन्यायाविरुद्ध पेटून उठवत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कलापथक फक्त शेतकरी, कामगार वर्गातच लोकप्रिय नव्हते, तर मध्यमवर्गातही लोकप्रिय होते. एखादा कलाप्रकार लोकप्रिय झाला की त्याचा प्रभाव जनसामान्यांवर पडतो. लाल बावट्याच्या बाबतीतही हेच झाले आणि या कलापथकाच्या कार्यक्रमांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मौलिक कार्य केले. या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी ‘माझी मुंबई’ नावाने एक तमाशा लिहिला, जो पुढे महाराष्ट्राभर प्रचंड गाजला; इतका की मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्यावर बंदी घातली. सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्यावर पकड वॉरंट काढले. सप्टेंबर १९५२ मध्ये त्यांनी ठाणे येथील पोलिस कॉलनीमध्ये एक कार्यक्रम घेतला. अण्णाभाऊ स्टेजवर येऊन गाऊ लागताच पोलिस तिथे आले आणि ‘तुमच्या तमाशावर बंदी असताना तुम्ही तो सादर करीत आहात. तुम्हाला अटक करीत आहोत’ असे म्हणाले. तेव्हा अण्णाभाऊ त्यांना शांतपणे म्हणाले, ‘सरकारने ज्या तमाशावर बंदी

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. dabhay

    माहितीपूर्ण लेख फार आवडला।

  2. Manali1978

    अतिशय अभ्यासपूर्ण लेख.

  3. rsanjay96

    माहितीपूर्ण लेख आहे.

Leave a Reply