दिवसाचे चार-पाच तास आणि आयुष्याची बारा-पंधरा वर्षं खर्ची करूनही, जगायला उपयोगी पडेल असं फारच कमी शिक्षण मुलांना शाळा- महाविदयालयांतून मिळतं. ती बरेचदा ते बाहेरच्या जगातूनच, नैसर्गिक वृत्तीने आणि आपापल्या वकुबानुसार मिळवतात. बऱ्यावाईटाची सरमिसळ असलेल्या बाहेरच्या अफाट जगातून बऱ्याची निवड करण्यासाठी मुलांना कसं काय प्रवृत्त करायचं?सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी ह्यांनी, ह्या वर्षाच्या सुरुवातीला, करोनापूर्व काळात तेथे वस्तीतल्या मुलांसाठी शाळा चालवली. याविषयीचे आपले अनुभव त्या सांगतायत, ‘गंमतशाळा’ या सदरातून.
--------------------------------------------खूप खूप वर्षांपूर्वी 'स्त्री उवाच'च्या एका अंकात मी नवल एल सदावी ह्यांची दीर्घकथा वाचली होती. नाव आठवत नाही, पण फिरदौस नावाच्या एका मुलीची होती ती. इराकमधली अनाथ मुलगी. ती म्हणते, 'कोणत्याही वेळी पुरुष समोर दिसला रे दिसला, की मला एकच जबरदस्त इच्छा होते, एक सणसणीत थोबाडीत मारण्याची इच्छा!'
मुलांमध्ये काम करायला लागल्यापासून अनेकदा मला एक इच्छा झाली आहे, त्यांच्या पालकांना सणसणीत थोबाडीत मारण्याची इच्छा. रवीन्द्र (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) म्हणतो, आपली पिढी सगळ्यात नादान निघाली. खरं आहे, आधीच्या पिढ्या आणि पुढच्या पिढ्या ह्यांच्यात सगळ्यात जास्त फरक दिसतो तो आमच्या पिढीला. त्या पिढीची प्रतिनिधी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी स्वतःलाच मारून घेतलं पाहिजे.
*****
सेवाग्राम गावात राहायला येऊन तशी आम्हाला आता अडीच वर्षे होतील. त्यापूर्वी दोन वर्षे आम्ही हे घर घेतले होते, पण वर्ध्यातच राहत होतो. सेवाग्राम आश्रम म्हणजेच बापू कुटीवरून नांदुरा गावाकडे एक रस्ता जातो. त्याच्या उजव्या हाताला सेवाग्रामची जुनी वस्ती आहे, सुमारे दीड ते दोनहजार लोकसंख्या. हे आहे जुने शेगाव. बापूंनी त्याला 'सेवाग्राम' हे नाव दिले. भारताच्या मध्यभागी असलेल्या ह्या गावात बापू त्यांच्या उत्तरायुष्यात राहायला आले, राजकारणापासून थोडे दूर होऊन रचनात्मक कार्य करण्यासाठी. सेवाग्रामची वस्ती ही बहुतेक दलितांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे प्रत्यक्ष आले होते म्हणतात. तसेच येथे त्यांची बापूंशी भेट झाली होती, असेही इतिहास सांगतो. विचाराने व कार्याने मुळात एकमेकांना पूरक असलेल्या ह्या दोन महापुरुषांना आजच्या सवंग राजकारणाने एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून रंगविले आहे. आजचा आंबेडकरी समाज गांधींना आपला कट्टर शत्रू मानतो. गावातील जुने लोक त्यांच्या आईबापांनी बापूंच्या सोबत काम केल्याची आठवण आजही जागवतात, पण पुढच्या पिढीत तसे काही नाही. अशा रीतीने, भौगोलिकदृष्ट्या बापू कुटीच्या अगदी जवळ आणि विचाराने त्यांच्यापासून अत्यंत दूर अशी ही वस्ती आहे.
आमचे घर नांदुरा रोडच्या दुसऱ्या बाजूला आहे. माळरानावर, काहीसे एकाकी. गावातल्या एका बिल्डरने हिंमत करून येथे आठ रो हाऊसेस बांधली आहेत. त्यातील पहिली दोन विकली गेली. दुसरे डुप्लेक्स घर आमचे. बापू कुटीच्या जवळ आणि स्वस्तात मिळाल्याने आम्ही ते घेतले. पुढील सहा घरे आता अर्धवट बांधून जुनी झाली आहेत. त्यावर बुरशीही चढली आहे. रहस्यकथेतील भूतबंगले शोभावेत असे त्यांचे स्वरूप आहे.
आम्ही राहायला आलो त्याच्या आदल्या वर्षी गावातील ४-५ मुलामुलींनी आत्महत्या केल्या होत्या. मुले दहावी-बारावीची होती. परीक्षा व्हायच्याच होत्या. त्यामुळे, परीक्षेतील अपयश हे काही त्याचे कारण नव्हते. तेव्हा माझे लक्ष किशोरवयीन मुलांच्या प्रश्नाकडे वेधले गेले होते. शहरात देखील हा वर्ग मोठ्या प्रमाणावर तणावाला बळी पडताना दिसत आहे. मनात काही विचार सुरू होता. मग इकडे राहायला आल्यावर त्यांच्यात काम करण्याची इच्छा होत होती, पण संधी मिळत नव्हती. सुरुवात होत नव्हती. अशातच एक दिवस तो प्रसंग घडला.सायंकाळी साडेसहाचा सुमार असेल. नांदुरा रोडवरून मी घराकडे येण्यासाठी डाव्या हाताला वळले. प्रशस्त माळरानाचे आता प्लॉट पाडले आहेत. आम्ही घर घेतले तेव्हा येथे शेते डुलत होती. आता आहे नुसताच ओसाड परिसर. तेथे एक स्कूलबस उभी करून ठेवतात. तिच्या बाहेर कोंडाळे करून काही मुले उभी होती. मी थांबले.
“काय रे, इथे उभे राहून काय करताय?” मी विचारले. ह्या परिसरात अनेक मुले वस्तीपासून दूर येऊन जुगाराचा अड्डा भरवतात, बसमध्ये बसून दारू पितात, वगैरे मी ऐकले होते.
“काही नाही, असंच.”
“आत कुणी आहे का?”
“हो. दोघं जण आहेत.”
“काय करतायत?”
“.......”
“सिनेमा बघतायत का मोबाइलवर?”
“हो.”
“मग, तुम्हाला बाहेर घालवून दिलं वाटतं!”
“.........”
“का बरं?”
“नाही. आम्हीच नाही जात तिकडे. पांचट सिनेमा लावलाय त्यांनी.”
“तुम्ही शाळेत जाता का?”
“हो”
“कोणकोणत्या?”
मुलांनी वर्ध्याच्या दोन नामांकित शाळांची नावे सांगितली.
“बरं. त्या मुलांना बाहेर बोलावून आणा बरं”
एक-दोघे जण आत गेले. त्यांनी त्या दोघांना बाहेर काढले. दिवस होता २९ डिसेंबर २०१९. थंडी होती. अंधार पडला होता.
“काय चाललंय आतमध्ये?” मी विचारले.
“काही नाही. हा पाहा सिनेमा पाहत आहोत - ‘वॉर’ त्याने माझ्यापुढे मोबाइल धरला.
मी म्हटले, “मला दाखवायला नकोय. मला सगळे माहीत आहे ते. मी काय लहान आहे का आता? अरे, मी तर तुमची आजी शोभते.”
गावातल्या त्या मुलांच्या आज्या माझ्याच वयाच्या आहेत. त्यामुळे त्यांनी माझे म्हणणे लगेच मान्य केले.
“अरे, तुम्ही इतकी चांगली तरुण मुले आहात, चांगल्या शाळांमध्ये शिकत आहात, तुम्ही काही चांगले काम का करीत नाही? मैदानात जाऊन खेळावे, चांगली पुस्तके वाचावी...”
‘पुस्तके’ हा शब्द उच्चारल्याबरोबर मुले म्हणाली, “आज संडे आहे मॅडम”
“होय. मला माहीत आहे की आज संडे आहे. पण अभ्यासाच्या शिवायही काही चांगली पुस्तके असतात. ती तुम्ही वाचली पाहिजेत.”
असा काही प्रकार त्या मुलांना अजिबातच माहीत नसल्याने ती बिचारी गप्प बसली. ती संधी साधून मी पुन्हा म्हटले,
“तुम्ही जर माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला ती पुस्तके देईन वाचायला. हवं तर वाचूनही दाखवीन.”
मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव काही पालटतायत, असे मला रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात जाणवू लागले.
“शिवाय आपण खेळ खेळू, गाणी म्हणू, मज्जा करू आपण.”
“मग, याल का?”
एक दोन धिटुकली मुले हळूच होय म्हणाली. बाकीच्यांनी मूक संमती दिली. केव्हा येता म्हणून विचारल्यावर त्याच मुलांनी उद्या म्हणून सांगितले. एकाने तर ‘उद्यापासून’ अशी दुरुस्तीही केली.
“नको. उद्या मला जरा काम आहे. परवापासून या. किती वाजता येणार?”
“संध्याकाळी साडेसात वाजता”
“अरे, इतक्या उशिरा? थोडे लवकर या ना! अंधार किती पडतो! शाळा केव्हा सुटते?”
मी अनेक प्रश्न विचारू लागले. मुलांनी सांगितले की, सायंकाळी नळाला पाणी येते. ते भरून झाल्यावर ती येतील.
“तुम्ही पाणी भरता?” मी कौतुकाने विचारले.
मुलांनी होय तर म्हटले. मग मी मोजदाद केली. सात मुले होती. ह्यांपैकी किती जण प्रत्यक्षात येतात ते बघू. मी मनात म्हटले.
त्यानंतर मी घरी आले ते खुशीने उडतच. अनेक वर्षांपासूनचे माझे स्वप्न. ते खरेच साकार होणार होते की काय? परिस्थितीने मला शिकवले आहे, आशाआकांक्षांना वेसण घालायला. 'आत्ताच काही नको एवढे खूश व्हायला, ती मुले खरोखर येतील तेव्हा बघू', मी स्वतःला बजावले. त्यानंतर सोमवार गेला, मंगळवारही गेला. मुले काही आली नाहीत. बुधवारी मी त्या रस्त्याने घराबाहेर पडत होते, तेव्हा पुन्हा तीच मुले त्या जागेवर उभी दिसली. मला पाहून ती जरा गप्प-गप्प झाली. आधी तर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले, पण मग मला राहवले नाही. मी परत फिरून त्यांच्यासमोर उभी राहिले. स्वप्नभंगाचे दुःख लपविण्याइतकी सहजता आवाजात आणून मी त्यांना विचारले,
“काय रे, काल तुम्ही आला नाहीत?”
मुले तशीच स्तब्ध, खाली मान घालून उभी.
“हे बघा, मी आपलं तुम्हाला सहज म्हटलं. यायचं असेल तर जरूर या. आल्याने तुमचं भलं व्हावं असाच माझा प्रयत्न असेल. पण नसेल यायचं, तर मी काही जबरदस्ती करू शकत नाही. मला काही अधिकार आहे का? मी कोण आहे तुमची? तसं पाहिलं तर कुणीच नाही.”
ह्यावर काही धिटुकली पुन्हा म्हणाली की “आम्ही येऊ. आम्हाला यायचे आहे.”
“मग काल का बरं आला नाहीत?”
“.........”
“थर्टी फस्ट साजरा करत होते का?”
“.........”
थोडा विचार करून एक मुलगा म्हणाला, “काल माझ्या मम्मीला बरं नव्हतं. मी तिला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो.” असे म्हणून तो इतरांकडे आशेने पाहू लागला. त्यांनीही असे काही सांगावे म्हणून.
“अरे, हे मला नका सांगत बसू. हे सगळं मला आधीपासून माहीत आहे. सांगितलं ना, मी तुमची आजी आहे म्हणून. तुम्हाला आज यायचं की नाही ते सांगा फक्त.”
“हो हो. येऊ आम्ही.”
(क्रमशः)
- अनुराधा मोहोनी
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)
संपर्क - ९८८१४४२४४८, [email protected]...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अनुभवकथन
, भाषा
, शिक्षण
, प्रयोगशील शिक्षण
, नावीन्यपूर्ण शिक्षण
, मराठी अभ्यास केंद्र
, अनुराधा मोहनी
, बालसाहित्य
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीछान अनुभव!