शब्दांच्या पाऊलखुणा - लागोभागो दिवाळी! (भाग १९)


भारतातील सर्वच प्रांतातील हिंदू धर्मियांमध्ये दिवाळी सण साजरा केला जातो. तो साजरा करण्याच्या पद्धती प्रांतानुसार भिन्न असतील, पण दिव्यांची आरास हा त्यातील समान धागा आहे. दिवा म्हणजे दीप, सूर्याचे-अग्नीचे प्रतीक, आणि ओघाने प्रकाशाचे, तेजाचे आणि आशेचेही. आदिम अवस्थेत मानवाला केवळ सूर्याच्या प्रकाशाचीच ओळख असणार. मात्र अग्नीच्या शोधाने आणि तो अग्नी आपल्यालाही निर्माण करता येऊ शकतो, या प्रचितीने माणूस हरकला नसला तरच नवल होतं. रोजच निओन साइनच्या झगमगाटात वावरणाऱ्या आपल्याला तेलाच्या दिव्याचं कौतुक दिवाळीपुरतंच उरलं असलं तरी, आदिम अवस्थेतल्या माणसासाठी अग्नीचा शोध हा मोठा चमत्कारच होता. उगवत्या सूर्यबिंबाने काळोख नाहीसा होऊन, दाही दिशा उजळण्याचा अनुभव माणसाने कित्येक वर्षं घेतला असणार आणि मग तीच प्रचिती त्याला अग्नीबाबतही आली असेल, तेव्हा सूर्याइतकाच त्याला अग्नीही पूज्य वाटला असेल. दिवाळी सण म्हणजे त्या अग्नीची, प्रकाशाचीच तर पूजा आहे! केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू यांच्याही धार्मिक विधीत विविध स्वरूपात अग्नीचे अस्तित्व दिसते.
तर अग्नीचेच एक रूप असणारा दिवा मानवासाठी शकुनाचं प्रतीक होणं स्वाभाविक होतं. जुन्या पिढीतली काही मंडळी आताही ‘दिवा विझव’ किंवा ‘मालव’ असं न म्हणता ‘दिव्याला पदर दे’, ‘फूल दे’ असा शब्दप्रयोग करतात. याचं कारण दिवा देवाप्रमाणे पवित्र असल्याने फुंकर घालून तो विझवणं अशुभ मानलं गेलं आहे, त्यामुळे पदराने वारा घालून किंवा फूल धरून तो विझवला जातो. एवढं महत्त्व असणारा ‘दिवा’ शब्द अर्थातच संस्कृतमधील ‘दीप’पासून  - दीपो-दीव-दिवओ - असा प्रवास करत मराठीत स्थिरावला. इतर भारतीय भाषांतही थोड्याबहुत फरकाने त्याची ही रूपे दिसतात : कुमाउनी – दिवो; बंगाली आणि हिंदी – दिवा, दिया; पंजाबी – दिआ, दिवा; सिंधी – डीओ, डीअथू; गुजराती – दीवो; नेपाळी – दियो. अग्नीचेच आणखी एक रूप असणारा, मशाल या अर्थाचा ‘दिवटी’ शब्द मात्र कानडीतील ‘दीवटिगे’पासून मराठीत आला आहे.
‘दिवा’ शब्द संस्कृत ‘दीप’पासून आला, त्याप्रमाणे दिव्यांची रांग या अर्थाचा दिवाळी शब्दही संस्कृतमधील ‘दीपावलि’ (दीप+आवलि) पासून - दीपालि– दीवावली–दिवाली - या क्रमाने मराठीत आला. अन् असा एखादा शब्द एखाद्या भाषेने एकदा स्वीकारला, की त्याचा मुक्तपणे होणारा वापर बघायचा तर त्या शब्दाशी संबंधित म्हणी – वाक्प्रचार पाहणं ओघानं आलंच!
महाराष्ट्रातील दिवाळीचा सण म्हणजे, अश्विन वद्यत्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंतचा म्हणजेच भाऊबीजेपर्यंतचा सण. या सणाच्या प्रत्येक दिवसाच्या महत्त्वाविषयी प्रांता-प्रांतानुसार कितीतरी पौराणिक कथामिथा जोडलेल्या असल्या, तरी आपली कृषिप्रधान – पशुप्रधान संस्कृतीही त्यातून ठळकपणे अधोरेखित होताना दिसते; त्यामुळेच शेतकरी दिवाळीत गुरावासरांनाही न्हाऊमाखू घालून त्यांचीही दिवाळी साजरी करतो. शहरांतील चिनी लायटिंगचा झगमगाट आता गावागावांत पोहोचला आहे, तरी शेतकरी कुटुंबांतून अजूनही पारंपरिक पद्धतीने अंगणात शेणाचे पाच पांडव, सीता, तिचं जातं, उखळ तयार करून पूजलं जातं. या दिवसांत शेतात आलेल्या भरगच्च ज्वारीच्या कणसांची ताटं आणून आरास केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी या सगळ्यांबरोबरच अंगणातच लहानशी चूल करून दूध उतू घालवलं जातं. या सगळ्या कृती शेतकऱ्याच्या भरभराटीच्या प्रतीकच म्हणता येतील. आपल्याकडे भौगोलिक वेगळेपणामुळे दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती थोड्याफार बदलतात, या वेगळेपणात जातीनिहाय व्यवसायाशी संबंधित भरभराटीच्या विशेषांमुळेही  भिन्नता दिसते.
तसे तर सगळेच सण आनंदाचे असतात, पण दिवाळी – दसरा हे सण अधिक आनंदाचे मानले गेलेले आहेत. ‘साधूसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या अभंगात संत तुकारामांनीही संत-भेटीच्या आनंदाची तुलना दिवाळीच्या आनंदाशी केली आहे. दसरा – दिवाळी हे सण ऐन सुगीत येतात. सुगीत फार काम असलं तरी मनासारखं धान्य आल्याने  शेतकरी सुखावलेलाही असतो, त्यामुळे त्याचं मन काहीसं सैलावतं, आळसावतं. त्याचीही ही मनःस्थिती कथन करणारी म्हण म्हणजे ‘दिवाळी दसरा, हातपाय पसरा’. नवरात्रीत उपवासाचा सात्त्विक आहार करून तोंड अळणी झालेलं असतं, त्यामुळे दसऱ्याला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात देवाला बोकड कापून झणझणीत मांसाहार खाण्याची पद्धत आहे. तेव्हा या दिवसांत दावणीच्या बोकडाचे काय विचार असतील याविषयीही एक म्हण आहे – ‘दसऱ्यातून जगू तेव्हा दिवाळीचा दिवा बघू’ – सध्याच्या संकटातून सहीसलामत बाहेर पडलो तरच पुढील सुख अनुभवता येईल, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.
मानवी मन भाषेचा वापर करताना कोणत्या अनुभवाची सांगड कशाशी घालेल हे सांगता येत नाही. दिवाळी आनंदाचा सण म्हणून त्याच्याइतक्याच आनंदाच्या – दसऱ्याच्या सणाशी त्याचा मेळ घालून दसरा-दिवाळीचे शब्दप्रयोग तयार झाले आहेत, तर दुसरीकडे आनंदमय दिवाळीची साधेपणाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळी सणाशी तुलना करून बऱ्याच म्हणीही तयार झालेल्या दिसतात. दिवाळी हा भरभराटीचा, चैनीचा सण आहे. म्हणून तर एखादा चंगळ करत असेल तर ‘तुझी दिवाळी आहे’ असं म्हटलं जातं. किंवा, एखादा रोजच सुखात लोळत असेल तर ‘राजाला रोजच दिवाळी’ असा शब्दप्रयोग केला जातो. याउलट, शिमग्यात म्हणजे होळीत बोंब मारली जाते, आणि बोंब मारणे हे दारिद्र्याचे, अभावाचे लक्षण आहे.  यावरून जवळ धन असेल तोवर चैन करायची, नसेल तेव्हा बोंब मारायची, या अर्थाने ‘असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा’ असं म्हटलं जातं. दिवाळी-शिमग्याच्या सणांचा विशेष सांगणारी आणखीही एक म्हण आहे – ‘आधी दिवाळी मग शिमगा’. शालिवाहन कालगणनेनुसार आधी दिवाळी येते आणि वर्षाच्या अखेरीस शिमगा येतो. दिवाळीचे दिवस तसेही सुगीचे, अर्थात चैनीचे; तर वर्षाच्या शेवटी येणाऱ्या शिमग्यात सर्व खडखडाट होतो. यावरून सुबत्ता असेल तेव्हा ऊतमात केली तर शेवटी हालच वाट्याला येणार, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. तसेच दारिद्र्य आणि श्रीमंती प्रत्येक समाजात असते हे सांगताना, ‘एकाची दिवाळी तर दुसऱ्याची होळी’ असंही म्हटलं जातं. एखादा घरी अभावाचे जगत असला तरी बाहेर वावरताना तो तसे न दाखवता, आपण चैनीत असल्याचे भासवत असेल, तर अशा व्यक्तींच्या संदर्भात ‘घरात शिमगा, बाहेर दिवाळी’ असं म्हटलं जातं. काही व्यक्तींना इतरांकडून काही घेताना आनंद होतो, मात्र इतरांसाठी काही करताना त्यांचा हात आखडतो, किंवा त्यांना त्रास होतो; अशा व्यक्तींना उद्देशून ‘घेताना दिवाळी, देताना शिमगा’ म्हणण्याची पद्धत आहे. राजा सुखात राहावा म्हणून प्रजेला कष्ट घ्यावे लागतात किंवा प्रजेला नागवून राजा सुख भोगत असतो, हे सांगण्यासाठी ‘प्रजेची होळी अन् राजाची दिवाळी’ ही म्हण वापरली जाते.
‘ज्याच्या घरी काळी, त्याची सदा दिवाळी’ अशी एक मजेशीर आणि संदर्भ माहीत नसला तर अर्थाच्या अनेक शक्यता व्यक्त करणारी म्हण आहे.  म्हैस रंगाने काळी असते, म्हशीचं दूध गायीच्या दुधाहून घट्ट असतं. त्यावरून दूधदुभतं खायची चंगळ होईल या अर्थाने ही म्हण वापरली जाते.
एखाद्याचा उद्योग – व्यवसाय तोट्यात गेला की ‘दिवाळे निघाले’, ‘दिवाळे वाजले’ असा शब्दप्रयोग केला जातो. खर्चिक, उधळ्या मनुष्याला ‘दिवाळखोर’ म्हटलं जातं. हिंदी, सिंधी, कानडी या भाषांमध्येही याच अर्थाने हा शब्दप्रयोग केला जातो. मात्र या ‘दिवाळे’चा दिवाळी सणाशी काही संबंध नाही, किंबहुना, या शब्दप्रयोगाची समाधानकारक व्युत्पत्ती कुठे आढळून आली नाही. ‘व्युत्पत्ति कोश’ आणि ‘महाराष्ट्र शब्दकोश’ दोन्हीमध्ये म्हटले आहे – कर्जबाजारी मनुष्य आपल्या घरात, दुकानात खिडकीत शेणाचा दिवा लावून तिथून निघून जातो. दिव्याच्या शेजारी तो आपल्या हिशोबाच्या वह्या ठेवतो. तो गेल्यानंतर त्याचे धनको येतात व त्याच्या वह्या पाहून त्याला ऋण परत करण्याचे सामर्थ्य नाही असे समजतात. ह्या पद्धतीवरून हा शब्द रूढ झाला असावा. मात्र कृ. पां. कुलकर्णींनी ही व्युत्पत्ती संशयास्पद वाटत असल्याचेही म्हटले आहे. त्यासाठी वाजणे, काढणे, निघणे अशी विविध क्रियापदे प्रचारात असल्याने नेमकी व्युत्पत्ती सांगताना संभ्रम निर्माण होतो.
आपण दारिद्र्यात वा संपन्नतेत कसेही जगत असू, सुखात वा दुःखात असू, फळाची अपेक्षा न करता मनुष्याने नित्य आपले काम करत राहिले पाहिजे, अशी अगदी आध्यात्मिक अर्थाचीही एक म्हण आहे – ‘लागोभागो दिवाळी’. याचा अर्थ,  लाभ होवो वा भागो म्हणजे नुकसान होवो; दिवाळी तर साजरी केलीच पाहिजे. परिणामाकडे न पाहता आपले कार्य करत राहिले पाहिजे, आपल्या कार्याला फळ लागले नाही तरी खचून जाऊ नये, आनंदाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. मात्र काही चंगळप्रेमी या म्हणीचा - परिणामांची कसलीही तमा न बाळगता आपल्या कार्यक्रमात, विशेषतः चैनीत कोणताही खंड पडू द्यायचा नाही – असा भलताच अर्थ लावतात. अर्थात, कशातून काय अर्थ काढायचा हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून असलं, तरी दिवाळीनंतर शिमगा असतोच याचा मनुष्याला विसर पडता कामा नये…!
- साधना गोरे
संपर्क - ९९८७७७३८०२, [email protected]

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , शब्द व्युुत्पत्ती , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र , ज्ञानरंजन
भाषा

प्रतिक्रिया

  1. Jayashree Kurundkar

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर भावपूर्ण

  2. सौ.मंजुषा बुगदाणे

      3 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख

  3. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान माहिती पर लेख .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen