मराठीप्रेमी पालक महासंमेलन (ऑनलाइन) २०२०


मराठी शाळांतील पालकांचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांनी सजग आणि सुजाण व्हावे म्हणून मराठी अभ्यास केंद्र दरवर्षी ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ आयोजित करत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी अभ्यास केंद्राने मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन केले होते. मात्र करोना संसर्गामुळे अजूनही फिरण्यास असलेले निर्बंध लक्षात घेऊन यंदा हे संमेलन ऑनलाइन घेण्यात आले. १८ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२० या कालावधीत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे हे चौथे वर्ष होते. संमेलनातील सर्व सत्रांचा तपशील पुढीलप्रमाणे –
१८ डिसेंबर २०२० – उद्घाटन सत्र 
१९ डिसेंबर २०२० – सत्र पहिले - मुलांकरिता आम्ही मराठी शाळा का निवडली?  सत्र दुसरे – मराठी शाळांतील यशवंतांशी संवाद –
२० डिसेंबर २०२० – सत्र तिसरे –मराठीतून गणित – विज्ञान : सद्यःस्थिती आणि आव्हाने,  सत्र चौथे – मराठी शाळा आणि कला-क्रीडाशिक्षण
२१ डिसेंबर २०२० – समारोप सत्र

१८ डिसेंबर २०२० – उद्घाटन सत्र
मराठीप्रेमी पालक महासंमेलन (ऑनलाइन) २०२० च्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून ‘मिरर नाऊ’चे वृत्तसंपादक मंदार फणसे होते, तर मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश परब यांनी मान्यवरांचे शब्दपुष्पांनी स्वागत केले. केंद्राच्या उपाध्यक्ष डॉ, वीणा सानेकर यांनी प्रास्ताविक करून मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा असल्याने त्या जगवणे, वाढवणे आवश्यक आहे. आणि अशी संमेलने मराठी शाळांना ऊर्जा देण्याचे काम करतात, ही संमेलनामागील केंद्राची भूमिका स्पष्ट केली. पालकसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये एक स्पर्धा मीम्सची होती. स्पर्धेत आलेल्या मीम्सच्या प्रतिमांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मंदार फणसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी तीन वर्षांतील मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचा आढावा घेतला. तर ‘मराठी प्रथम’ या डिजिटल नियतकालिकाच्या कार्यकारी संपादक साधना गोरे यांनी सदर नियतकालिचे स्वरूप स्पष्ट केले.
‘मूल आईला बिलगून ज्या भाषेत गोष्टी ऐकते, त्याच भाषेत त्याला शिक्षण मिळायला हवे. मुलांना सकस वातावरण आणि तणावरहित आयुष्य देणे ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे आनंददायी शिक्षणासाठी मातृभाषेतून मुलांना शिकवावे’, असा सल्ला अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी दिला. ‘लग्न तसेच इतर समारंभात आपण संस्कृती जपत असताना आपली मातृभाषा आपल्या आयुष्यातून बाहेर गेली तर कसे चालेल?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘हिंदी मालिकांमध्ये काम करताना संहिता रोमन लिपीत लिहिलेली असते, त्यामुळे देवनागरी लिपीच नाहीशी होईल की काय’, अशी भीती चिन्मयी यांनी व्यक्त केली.
‘मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर काय होणार, याची चिंता आपल्याला असते. याच भीतीमुळे सध्या शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे. आपल्या मुलांमध्ये भावनिक क्षणभंगुरता येते आहे. अशा वेळी त्यांना मराठी शाळेत मोकळेपणाने श्वास घेऊ द्यावा. मातृभाषेतील शिक्षणामुळे अभ्यासाचा ताण येत नसल्याने आवडीच्या गोष्टी करता येतात. तिथली मुलं मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात. तसेच इंग्रजी शाळांची एक मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण शासनाकडे मराठी शाळांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा अशी मागणी केली पाहिजे आणि तो अमलात यावा यासाठी पाठपुरावाही केला पाहिजे’, असे मत मंदार फणसे यांनी व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रतीक्षा रणदिवे आणि वृषाली पाटील यांनी केले.
१९ डिसेंबर – सत्र पहिले – मुलांकरिता आम्ही मराठी शाळा का निवडली?
या चर्चासत्राला पुढील मान्यवर उपस्थित होते : गायत्री गणेश (शिक्षण, सृजन आनंद, कोल्हापूर), दीपाली केळकर (वृत्तनिवेदक, मुंबई), डॉ. राजश्री देशपांडे (मनोविकारतज्ज्ञ), अधिवक्ता जागृती गावकर (फौजदारी अधिवक्ता) आणि मयूरेश गद्रे (अनुवादक).
घराजवळ चांगली मराठी शाळा नसेल तर इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, हा विचार सध्या पालकांमध्ये सर्वाधिक चर्चिला जात आहे. यावर उत्तर देताना, मुलांना मराठी शाळेत पाठवू न इच्छिणाऱ्या पालकांनी दिलेले हे एक फक्त कारण आहे. चांगल्या मराठी शाळेसाठी पालकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा सूर या चर्चासत्रात उमटला. ‘घराजवळ चांगली मराठी शाळा नाही हा भ्रम आहे. ज्यांच्या नजीक शाळाच नाही त्यांना हा प्रश्न पडत नाही, असे सांगतानाच कल्याण येथील मराठी शाळेचे संचालक मयूरेश गद्रे यांनी मुरबाड येथे एका गोठ्यात भरणाऱ्या शाळेचे उदाहरण दिले. तिथे दूरवरून पायपीट करत विद्यार्थी येतात. शाळा चांगली करणे हे पालकांचे काम आहे’, असे मत गद्रे यांनी व्यक्त केले. ‘घराजवळ चांगली मराठी शाळा नाही, असे म्हणणारे पालक इंग्रजी शाळांना कोणत्या निकषांवर चांगले ठरवत असतात?’ असा प्रश्न राजश्री देशपांडे यांनी उपस्थित केला. त्यांनी आपल्या मुलांसाठी प्रतिष्ठेचे वलय नसलेल्या शाळेची निवड केली आहे. ‘शाळा चांगल्या किंवा वाईट नसतात. पालकच मराठी शाळांकडे जात नाहीत, मग सरकारला तरी का त्यांच्याकडे लक्ष द्यावेसे वाटेल?’ असा प्रश्न विचारत मराठी शाळा सुधारण्यासाठी पालकांनाच पुढाकार घ्यावा लागेल, असे मत जागृती गावकर यांनी मांडले. ‘दूरच्या मराठी शाळेत जाताना थोडा जास्त प्रवास करावा लागेल, पण पुढील आयुष्याचा प्रवास चांगला होईल’, असे मत मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी व्यक्त केले.
गायत्री गणेश या तामिळ भाषक असून आणि त्यांचे आणि त्यांच्या पतीचे शिक्षण इंग्रजी भाषेत झालेले असतानाही त्यांनी आपल्या मुलींसाठी मराठी माध्यमाची का निवड केली, या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, की त्यांचे कोल्हापूरसारख्या मराठी भाषक समाजात वास्तव्य असल्याने परिसर भाषेचा विचार करून त्यांनी आपल्या मुलींना मराठी माध्यमात प्रवेश घेतला. माध्यमापेक्षा शिक्षणातील गुणवत्तेला अधिक महत्त्व देऊन आपण मराठी माध्यमाची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्राचे सूत्रसंचालन आनंद भंडारे आणि वैष्णवी खोलम यांनी केले.
१९ डिसेंबर - सत्र तिसरे : मराठी शाळांतील यशवंतांशी संवाद
या चर्चासत्राला पुढील मान्यवर उपस्थित होते : अमेय राऊत (प्रयोगशील तंत्रज्ञान उद्योजक), सिद्धार्थ भंडारे (उपजिल्हाधिकारी, अहमदनगर), रचना पोतदार (समुपदेश आणि प्राध्यापक), नम्रता भिंगार्डे (सोशल मीडिया हेड), डॉ. सुप्रिया देवरे (स्त्रीरोगतज्ज्ञ), अतुल गुरव (डिजिटल विश्व). या सत्रातील सर्वच वक्त्यांनी मराठी माध्यमात शिकल्याने आम्ही इतक्या कमी वयात हे यश मिळवू शकलो, असे मत व्यक्त केले. नम्रता भिंगार्डे यांनी मराठी माध्यमामुळे संवेदनशीलतेचा पुरेसा विकास झाला, जी आता पत्रकारिता करताना कामी येते, असे म्हटले. तसेच पारंपरिक नोकऱ्यांचं स्वरूप आता बदलले आहे. तुमच्यात पात्रता असेल, क्षमता असेल, तर मराठी माध्यमामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येत नसल्याचे नम्रता भंडारे यांनी आपल्या कामाचे दाखले देत स्पष्ट केले. मराठी माध्यमात शिकल्याने आकलनक्षमता चांगली तयार होते, त्यामुळे पुढे करिअर करताना लहानपणी विकसित झालेली हीच आकलनक्षमता कामी येते. या विचारातूनच मी माझ्या मुलालाही मराठी माध्यमातच प्रवेश घेतला आहे, असे सुप्रिया हंबीरे यांनी म्हटले.
‘मराठी माध्यमात शिकल्याने करिअरमध्ये काहीच अडचण आली नाही, उलट मानसशास्त्र या पाश्चात्त्य शास्त्रातील संकल्पना समजून घेताना त्या मला माझ्या इथल्या परिससराशी जोडून घेता येतात, कारण मराठी शाळेत विविध विषयांच्या अभ्यासातून मूलभूत संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. त्याचा जगताना उपयोग होतो, तसा माझ्या व्यवसायातही उपयोग होतो’, असे मत रचना जाधव हिने व्यक्त केले. ‘शासकीय अधिकारी म्हणून काम करताना सर्व स्तरांतील लोकांशी संबंध येतो. इंग्रजी माध्यमाच्या कॉर्पोरेट वातावरणात इथल्या सामान्य माणसाशी आपण जोडून घेऊ शकत नाही, उलट मराठी शाळांतल्या मोकळ्या वातावरणात सामान्य माणसाशी जोडून घेण्याची संवेदना वाढीस लागते. लोकांच्यात काम करताना आज मला त्याचा उपयोग होतो’ असे सिद्धार्थ भंडारे यांनी म्हटले. अतुल गुरव यांनी ‘आपल्या ग्राहकांशी मी मराठीतूनच बोलतो. मराठी शाळा आपल्यात आपल्या भाषेचा, संस्कृतीचा सार्थ अभिमान निर्माण करतात, हा आत्मविश्वास जगायला कामी येतो आणि व्यवसायातही कामी येतो. शाळेचं नाव तेव्हाच मोठं होतं जेव्हा त्या शाळेतले विद्यार्थी मोठे होतात, असे मत व्यक्त केले. ‘मराठी शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमांतून व्यक्तिमत्त्वविकास घडण्यास मदत झाली. शाळेतील शिक्षकांनी नेहमी आपुलकीने वागवले, त्याच्यातून सुप्त गुण वाढीस लागले. त्यांनी माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण केला, तोच आता करिअरमध्ये कामी येत आहे’, असे अमेय राऊत यांनी म्हटले.
२० डिसेंबर - मराठीतून गणित विज्ञान : सद्यःस्थिती आणि आव्हाने
या चर्चासत्राला नाशिक येथील आनंद निकेतन शाळेच्या संचालक विनोदिनी काळगी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह जयंत जोशी, विज्ञानप्रसारक आणि शैक्षणिक सल्लागार हेमंत लागवणकर, आणि कॅनडास्थित भौतिकशास्त्रातील संशोधक सलील बेडकिहाळ उपस्थित होते. ‘गणित ही आकलनावर आधारित क्रिया आहे. गणिते सोडवताना सहसंबंध लक्षात येणे आणि तर्कविचार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. घरात बोलली जाणारी भाषा ही विद्यार्थ्यांच्या विचारांची भाषा असते आणि गणितात तार्कित विचार महत्त्वाचे ठरत असतात. त्यामुळे गणित हे मातृभाषेतूनच शिकवले गेले पाहिजे’, असे मत विनोदिनी काळगी यांनी मांडले. तसेच लहानपणी शिकलेल्या गणिताच्या आधारावर वरच्या इयत्तांतील गणित शिकवले जाते. परभाषेतून गणित शिकत असताना शब्दांचा अर्थ समजत नसल्याने प्राथमिक स्तरावरचे गणित कच्चे राहते, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी सेमी इंग्रजीला विरोध केला.
‘उत्तर अमेरिका ते युरोप या भागातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांचा धर्म एकच आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या गणित-विज्ञानावर आधारित लेखनाला एकाच संस्कृतीचा आधार आहे. आपल्या देशात गणित, विज्ञान शिकवताना स्थानिक, सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेतले गेले पाहिजेत. हेमाडपंथी मंदिर हे उत्तम भौमितिक रचनेचे उदाहरण गणिताच्या पुस्तकात आले पाहिजे’, असे मत सलील यांनी मांडले. दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने गणित-विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे अकरावीला इंग्रजीतून विज्ञान शिकताना अडचण आली नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘भाषा शिकणे आणि विषय शिकणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. मातृभाषेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना इतर भाषांमध्येही व्यक्त होता येते. मराठी शब्द क्लिष्ट आहेत, असा गैरसमज विनाकारण पसरवला जातो. शब्द वारंवार वापरले गेले आणि त्यांची अनुभूती आली की ते सोपे वाटू लागतात’, असे सांगत डॉ. जोशी यांनी गणित, विज्ञान मराठीतून शिकण्याची गरज व्यक्त केली. हेमंत लागवणकर यांनी विज्ञानाच्या पुस्तकात ‘मृदा’ असा शब्द वापरला जातो. मात्र व्यवहारात ‘माती’ असा शब्द आपण वापरतो. त्यामुळे संस्कृतप्रचुर शब्दांचा आग्रह सोडून पाठ्यपुस्तकांनी व्यवहारातील भाषेचा वापर केला पाहिजे. भाषा समाजाभिमुख असावी, पण दूषित नको, अशी सूचनाही त्यांनी मांडली. तसेच जी भाषा आपण घरात बोलतो, त्या भाषेत आकलन चांगले होत असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षल कद्रेकर आणि श्वेतिका मोरे यांनी या सत्रात मान्यवरांशी संवाद साधला.
२० डिसेंबर सत्र दुसरे – मराठी शाळा आणि कला-क्रीडाशिक्षण
या सत्रात रंगकर्मी राजू तुलालवार, चित्रकार आणि चित्रपतंगचे संस्थापक श्रीनिवास बाळकृष्ण, क्रीडा प्रशिक्षक रेणू निशाणे, संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते. या सत्रात मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत त्यांना कला-क्रीडा शिक्षण मिळणे गरजेचे आहे, मुलांना अभ्यासात एकाग्रता निर्माण होण्यासाठीही कला- क्रीडा साहाय्यभूत ठरत असतात, असा सूर उमटला.
‘मुलांमध्ये सृजनशीलता वाढीस लागण्यासाठी चित्रकला विषय फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विविध व्यवसायात चित्रकलेचा उपयोग होत असतो, त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना चित्रकलेची ओळख असायला हवी. मराठी शाळेतील कलाशिक्षणासाठी सरकारवर अवलंबून न राहता शाळा, पालक यांनी मिळून लोकाश्रयाच्या मदतीने मुलांना कलांचे शिक्षण द्यायला पुढाकार घेतला पाहिजे. चित्रभाषा ही सर्व मानवांची सहज भाषा आहे’, असे मत श्रीनिवास यांनी मांडले.
‘आज बाल रंगभूमी टिकली तरच उद्याची प्रौढ रंगभूमी टिकणार आहे. त्यामुळेही शालेय जीवनात नाट्यकलेला महत्त्व असलं पाहिजे. हल्ली आमच्याकडे इंग्रजी माध्यमाची मुलं मराठी शिकण्यासाठी येतात. मुलानं चांगलं मराठी बोलावं एवढ्या एका हेतूने आमच्याकडे नाटक शिकायला येणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे.’ असे राजू तुलालवार यांनी सांगितले. ‘मराठी शाळांकडे मैदान नसेल तर बैठ्या खेळांना प्राधान्य द्यावे. मैदान आहे, पण साहित्य नाही अशा स्थितीत काही स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने असे साहित्य मुलांना उपलब्ध करून देता येईल. शाळा आणि पालक यांनी थोडे प्रयत्न केले तर मुलांना खेळांपासून वंचित राहावे लागणार नाही’, असे मत रेणू निशाणे यांनी व्यक्त केले. ‘संगीतकला हा विषय बऱ्याच शाळांत नसतो. काही शाळांत विषय असतो, पण वाद्ये नसतात, असली तरी ती बरेचदा नादुरुस्त असतात. हल्ली शाळांना वेतनेतर अनुदानही फार तुटपुंजे मिळते. अशा स्थितीत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अडचणींवर मात करता येईल. आम्ही आमच्या शाळेत असे प्रयत्न करत आहोत’, असे मनोहर म्हात्रे यांनी म्हटले. या सत्राचे सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले.
२१ डिसेंबर – समारोप
समारोपाच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले प्रसाद पाटील उपस्थित होते. या सत्राच्या दुसऱ्या पाहुण्या अभिनेत्री भार्गवी चिरमुले या संमेलनात उपस्थित राहू शकल्या नाहीत, तेव्हा मराठी शाळा – भाषा यांविषयीचे त्यांचे मनोगत व्यक्त केलेल्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. प्रसाद पाटील ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील मराठी कुटंबातील मुलांसाठी ‘माझी शाळा’ नावाची शाळा चालवतात. तसेच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहाय्याने ते तेथील पाच राज्यात ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रमही चालवतात. या माध्यमातून ते तिथे आपल्या पुढील पिढ्यांना मराठी भाषेचा, मातीचा वारसा देतात. त्यांच्या मनोगतातून त्यांनी महाराष्ट्र, मराठी यांची महती सांगितली. तसेच मराठी शाळा आज सोयीसुविधांच्या बाबतीत कमी पडत असल्या तरी पालकांनी एकत्रित येऊन मराठी शाळांना भौतिक सुविधा पुरवल्या पाहिजेत, असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आम्ही शिक्षकचे प्रमुख सुशील शेजुळे यांनी संमेलनाच्या तीन दिवसांत झालेल्या चर्चासत्रांचा आढावा घेतला, तर प्रतीक्षा रणदिवे यांनी संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांविषयींची माहिती सादर केली. संमेलनाच्या समन्वयक डॉ. वीणा सानेकर यांनी संमेलन आयोजित करण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
'मराठीप्रेमी पालक महासंमेलना'मित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेते :
शालेय विद्यार्थी गट
निबंध स्पर्धा – विषय : मला ऑनलाइन शिक्षण आवडते? 
उत्तेजनार्थ – कु. निशा चोपडे
तृतीय -  कु. प्रणाली पवार
द्वितीय क्रमांक  -  कु. दीप डेरे
प्रथम क्रमांक  कु. मानसी पडवळ

वक्तृत्व स्पर्धा – टाळेबंदीतील शाळेच्या आठवणी...!
उत्तेजनार्थ – कु. प्रतीक्षा कदम
तृतीय क्रमांक – कु. धनश्री भराडे
द्वितीय क्रमांक – कु. कुलदीप रजक
प्रथम क्रमांक – कु. संजना पाटील

चित्रकला स्पर्धा : माझी घरातली शाळा
उत्तेजनार्थ – कु. प्रथम बिनसाळे
तृतीय क्रमांक – कु. रसिका काळे
द्वितीय क्रमांक – कु. मधुरा चिंदरकर
प्रथम क्रमांक – कु. दीप डेरे

महाविद्यालयीन गट

निबंध स्पर्धा - विषय : माझी मराठी शाळा अशी हवी...
उत्तेजनार्थ
 – १. अंजली देशपांडे (आर. पी. डी. महाविद्यालय, बेळगाव) २. पांडुरंग केशव बोलय (संदेश महाविद्यालय, विक्रोळी) ३. श्रुती राऊत (वर्तक महाविद्यालय, वसई.) ४. माधुरी कुटे (पुणे विद्यापीठ)
तृतीय क्रमांक – कोमल भोसले (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)
द्वितीय क्रमांक - चैत्राली केळकर (रामनिरंजन रुईया महाविद्यालय, माटुंगा)
प्रथम क्रमांक – सृष्टी सूर्यवंशी (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)

वक्तृत्व स्पर्धा – विषय : माझी मराठी शाळा मला आवडते, कारण...
तृतीय क्रमांक – भाग्यश्री थिटे (श्री भैरवनाथ महाविद्यालय, पाबळ)
द्वितीय क्रमांक – जान्हवी मंजुळे (मातोश्री आभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक)
प्रथम क्रमांक – नेहा जाधव (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)

मीम स्पर्धा – विषय : मराठी शाळेचे मारेकरी
उत्तेजनार्थ – तुषार म्हात्रे (करंजाडे, पनवेल)
तृतीय क्रमांक – अभिषेक वाजे (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)
द्वितीय क्रमांक – वेदांत सावंत (ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई)
प्रथम क्रमांक – नेहा जाधव (क. जे. सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई)

पालक गट

निबंध स्पर्धा – विषय : करोनाकाळ आणि पाल्याच्या शिक्षणातील माझा सहभाग
उत्तेजनार्थ –
 १. दीपिका पावसकर २. प्रणया गुडेकर
तृतीय क्रमांक – प्रमिला वाजे
द्वितीय क्रमांक – नंदिनी महाजन
प्रथम क्रमांक – अर्चना वाघमारे

वक्तृत्व स्पर्धा – विषय : करोनाकाळात शाळा घरात आली आणि...
तृतीय क्रमांक – मनाली मनीष म्हात्रे
द्वितीय क्रमांक – विकास महादेव कांडर
प्रथम क्रमांक – सारिका चौधरी

शिक्षक गट

निबंध स्पर्धा – विषय : ऑनलाइन – ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग
उत्तेजनार्थ –
 १. राजकुमार कडव २. राजेंद्र अंबिके
तृतीय क्रमांक – दीपा बोबडे
द्वितीय क्रमांक – रूपाली राऊत
प्रथम क्रमांक – संजय कानसे

वक्तृत्व स्पर्धा – ऑनलाइन – ऑफलाइन शिक्षणातील आव्हाने
द्वितीय क्रमांक – पूनम पाटील
प्रथम क्रमांक – भाग्यश्री तेंडोलकर

खुला गट

निबंध स्पर्धा – विषय : मराठी शाळांसाठी मी काय करू शकतो?
तृतीय क्रमांक –
 आरती गवादे, पालघर
द्वितीय क्रमांक – विद्या खानखोजे, पालघर
प्रथम क्रमांक – वैभवी माने, उल्हासनगर

वक्तृत्व स्पर्धा – विषय : मराठी शाळांसाठी शासनाने काय करायला हवे?
द्वितीय क्रमांक –
 वैभवी माने, उल्हासनगर
प्रथम क्रमांक – उमेश आवारी, आंबिवली

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२० मधील सर्व सत्रे पाहण्यासाठी यूट्युबचा दुवा - https://www.youtube.com/channel/UCRuEVEtM1LRY67X0HM2b8aQ

- मराठी अभ्यास केंद्र
(मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांसाठी काम करणारी संस्था)
संपर्क : ९९८७७७३८०२

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी शाळा , पालक , गुणवत्तापूर्ण शिक्षण , मराठी अभ्यास केंद्र , आम्ही शिक्षक , मराठीप्रेमी पालक महासंघ

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen