बदलाचा आनंद (भाग - चार)


घरातल्या पहिल्या शिकत्या पिढीला क्रमिक पाठ्यपुस्तकांइतकीच इतर अनेक जाणिवा, कौशल्ये शिकवणे आवश्यक असते. ठाणे येथील सिग्नल शाळेतील शिक्षिका आणि प्रकल्पप्रमुख आरती पवार - परब अशा जाणिवा, कौशल्ये शिकवण्याच्या आपल्या अनुभवांविषयी सांगतायत -

‘गरज ही शोधाची जननी आहे’, याची प्रचिती आम्हांला सिग्नल शाळेच्या विश्वातून येत गेली. मुळात इथे ‘गरज’ कसली आहे हे देखील आम्हा ‘शिक्षक’ म्हणवून घेणाऱ्या मोठ्या माणसांना मुलांकडूनच हळूहळू उमगत गेले. शिकवणे आणि शिकणे यांतला फरक समजून घेताना, मुलांना नेमके कळले आहे  की नाही, याचीही समज येत गेली. रस्त्यावरच्या मुलांना नेमके काय हवे आहे? पुस्तकातील खिळवून ठेवणारी चित्रे? भरलेले जेवणाचे ताट की नुसते ताटात मोजमाप शिकवण्यासाठी टाकलेले रंगीत खडे? मुलांच्या गरजेप्रमाणे शाळा उभी राहत गेली. शाळा आणि मूल यांचा प्रवास हळूहळू मूळ शिक्षणाच्या दिशेने सुरू होत होता.

वाचन कट्टा आणि खेळ कट्टा

मध्यंतरी ‘छोटा पक्षी’ नावाचे पुस्तक वाचनात आले होते. या पुस्तकात, उडता येत नाही म्हणून घरट्यात बसून कंटाळलेले पिल्लू खाली उतरून जग बघायला बाहेर पडते. अनेक जणांना भेटते, त्यांचे जगणे समजून घेते. शेवटी, मांजर समोर आल्यावर जिवाच्या भीतीने ते चक्क भरारी मारत उडू लागते! अगदी याप्रमाणेच, आमच्या मुलांमध्ये वाचन कट्टयामुळे बदल झालेला दिसून येतोय. हातात घेतलेले पुस्तक सुलट आहे का उलट, हेही समजत नसलेली आमची मुले आता चक्क तासन्-तास पुस्तके चाळताना दिसतात, हा विलक्षण बदल आहे. बरं, पुस्तक छोटे असो वा मोठे, अधाशासारखे ते आधी कुणाच्या हातात येतेय, यात हल्ली चुरस लागते. मग ज्याच्या हातात ते येते, तो अगदी डोळे फाडून पुस्तकातली चित्रे डोळ्यांत सामावून घेतो आणि त्या चित्रांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो.  झाली, आमची चित्रांद्वारे गोष्ट तयार, मग ती पुस्तकातल्या गोष्टीपेक्षा वेगळी ठरली तरी चालेल.
वाचन कट्टा म्हणजे नुसती पुस्तके आणि पुस्तके. छोटी-मोठी, जाडी-बारकुशी, चित्रे असलेली, चित्रे नसलेली, अशा सगळ्या पुस्तकांची मैफील. या जागेवर मुलांनी कधी यायचे यावर बंधने नाहीत. मुलांच्या वयाची देखील अट नाही. दम लागेस्तोवर खेळणे आणि डोळे कंटाळेपर्यंत पुस्तके चाळणे, हे मुलं खुशीने करू लागली.
संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर काम नसेल तर कंटाळलेली मुले पुन्हा रस्त्यावर भटकत असत.  शाळा सुटल्यानंतरच्या मोकळ्या वेळेत मुले पुन्हा आशेने रस्त्यावर फिरताना दिसायची. हे थांबवणे गरजेचे होते. दिलेला घरचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी शाळेच्या बाहेरील बाकड्यावर बसून मुले तो पूर्ण करत असत. पण अभ्यास झाल्यानंतर काय? हा प्रश्न सतावत होता. त्यातूनच शिक्षकांना खेळ कट्टा आणि वाचन कट्टा यांची कल्पना सुचली. भीक मागणे, रस्त्यावर भटकणे या सगळ्यांतून मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बाहेर काढण्यासाठी हा चांगला उपाय सापडला. त्यामुळे काहीच दिवसांत मुलांमध्ये फरक जाणवायला लागला.
एकतर मुलांचे सतत भटकणे काही प्रमाणात बंद झाले. लहान मुलेदेखील पुलाखाली खेळण्यांसोबत खेळताना दिसू लागली. चित्रांची पुस्तके घेऊन ती चाळू लागली. काहीजण तर नेहमी आम्हांला चित्रांची पुस्तके रंगवताना दिसतात. पुस्तकांसोबत आम्ही काही चित्रकलेची पुस्तके, वह्या बाहेर ठेवल्या आहेत. त्यामुळे मुले फावल्या वेळेत चित्रे रंगवताना दिसतात. चित्रे रंगवणे हे या मुलांचे आवडीचे काम झाले आहे.
मुलांचा अभ्यासातला रस कमी होऊ नये यासाठी खेळघरात खेळ, संवाद, कला या माध्यमांतून मुलांना रोजच्या अनुभवांकडून अभिव्यक्तीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे खेळकट्टा व वाचनकट्टा. मुलांचं शिकणं आनंदाचं व्हावं; खेळघरात समजुतीचं, मैत्रीचं वातावरण टिकावं, हा विचार आणि प्रयत्न आम्ही महत्त्वाचे मानतो; कारण समूहात आनंदाने ‘खेळणं’ हा अनुभव त्यांच्या वाट्याला दुर्मीळच. मुलांच्या अशा समूहातून त्यांच्यात एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांबद्दल स्नेहभावना निर्माण व्हावी, एकमेकांसोबत असताना मुले आनंदी राहावीत, आणि हे सर्व काही त्यांच्या नकळत खेळाच्या माध्यमातून व्हावे यासाठी हा प्रयत्न होता.
ऐकणं, पाहणं, स्पर्श करणं, विचार करणं या संवेदनांचा मुलांनी वापर करणे गरजेचे होते; जे या कट्टयांमुळे शक्य झाले. चित्रमय पुस्तकांचा वापर करून मुलांमध्ये वाचणं, लिहिणं, बोलणं, विचार करणं, चित्रांप्रमाणे ती रंगवणे इ. अनेक क्षमता विकसित झाल्या. बुद्धीबळ, कॅरम, असे खेळ मोठ्या मुलांसाठी मांडले गेले; तर मराठी, इंग्रजी अक्षरांचे ठोकळे जोडणे, शब्द तयार करणे, प्राण्यांचे आकार जोडणे, अशा  खेळांच्या मदतीने  इतर मुलांमध्ये शिकण्याची गोडी लावायचा प्रयत्न केला.
क्षमतांच्या विकासाबरोबरच जाणिवांचा विकास होणेदेखील तितकेच महत्त्वाचे. खेळकट्टा आणि वाचनकट्टा व्यवस्थित चालू राहावा म्हणून आम्ही कुणाचीही नेमणूक केली नाही. मुलांनीच पुस्तके वाचून झाल्यावर किंवा खेळून झाल्यावर पुस्तके, खेळ जागच्या जागी ठेवावेत, अशी अपेक्षा आम्ही बाळगली होती. सुरुवातीला फक्त वस्तू जागच्याजागी ठेवा अशा सूचनाच दिल्या. थोड्या दिवसांनी, खेळण्यांचा, पुस्तकांचा पसारा झाल्याचे लक्षात आले. मुले पुस्तक वाचत आणि तिथेच टाकत. ठोकळ्यांच्या खेळातले ठोकळेही इतरत्र पसरलेले दिसत.
एके दिवशी एका लहानग्याला प्राण्याच्या आकाराचा एक भाग सापडेनासा झाला. त्याने शिक्षिकेकडे तक्रार केल्यावर बाईंनीच त्याला तो भाग का सापडत नाही, याचे उत्तर सगळ्यांसमोर समजावून सांगितले. पुलाखाली एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत सर्वांना पाहायला सांगितले. आपली किती खेळणी अस्ताव्यस्त पडली आहेत, हे मुलांच्या लक्षात आले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मुलांनी खेळणी कपाटात व्यवस्थित आवरायला सुरुवात केली. मोठ्यांनी पुस्तके नीट लावली. जाणिवांचा विकास व्हायलाही खेळकट्टा, वाचनकट्टा मदतीला आले   
आमचा विलास नावाचा छोटुकला विद्यार्थी आहे. शाळेत भेटीसाठी सातत्याने कुणी ना कुणी येत असतात. भेटीसाठी येणारे पाहुणे मुलांसाठी खाऊ घेऊन येतात. त्या दिवशी फ्रुटीचे छोटे पॅकेट होते. त्या छोट्याशा पॅकेटसोबत स्ट्रॉदेखील प्लास्टिक आवरणात बंद असते. सगळ्या मुलांनी स्ट्रॉचे छोटेसे प्लास्टिक आवरण तसेच खाली फेकले, पण विलासने मात्र ते प्लास्टिक आवरण कचराकुंडीत टाकले. शिक्षकांनी कौतुक केल्यावर इतर मुलांना आपली चूक लक्षात आली. खेळघर व पुस्तकघराने आम्हांला अशी जाणीव विकसित होण्यास मदत केली आहे. 
- आरती पवार - परब
(लेखिका ठाणे येथील सिग्नल शाळेत शिक्षक आणि प्रकल्प प्रमुख आहेत.)
संपर्क – ८१०८५१११८५, [email protected]

 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , शाळा , आरती पवार-परब , सिग्नल शाळा , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen