"पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत घालतात. आईवडील त्यांच्या अपत्यांना शाळेत घालतात. आता ह्या वाक्यांतील कर्ता कोण? म्हणजे आता आले ना लक्षात? शालेय शिक्षण हा आईबाप आणि शिक्षक-मुख्याध्यापक ह्यांच्यातील करार असतो. करार काय, तर आम्ही तुम्हांला पैसे देतो, तुम्ही आमच्या मुलांना ‘ज्ञान’ द्या. ज्ञान हा शब्द जरा मोठाच झाला, शिक्षण म्हणू या. हा करार मुलांच्या संबंधातला असला, तरी मुले काही त्यामध्ये ‘पार्टी’ नाहीत. पार्टी आहेत आईबाप आणि शिक्षक." सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी ‘गंमतशाळा’ या सदरातून मुलांसोबत आलेले अनुभव मांडतायत -
एकंदरीत दिवस बरे चालले होते. म्हणजे मुले येत होती. सुरुवातीला आम्ही म्हणजे मी गोष्टीच वाचून दाखवायचे ठरवले. सगळ्यात पहिल्यांदा मला मिळाले ते साधनेचे दोन बालकुमार अंक. मग त्यामधून गोष्टी वाचून दाखवू लागले. एकदा काय करायचे म्हणून मुलांना विचारल्यावर एक जण म्हणाला, तुम्ही आळीपाळीने मुलांकडून वाचून घ्या. तेव्हा सगळ्यांकडून थोडे-थोडे वाचून घेतले. लक्षात आले की वाचता तर कुणालाच येत नाही. जेमतेम अक्षरओळख काही मुलांना आहे, बाकीच्यांना तीही नाही. गती तर कुणालाच नाही. तेव्हापासून वाचून घेणे बंद केले व मीच साभिनय वाचून दाखवू लागले. त्यात मात्र मुले रमू लागली. त्यातले अनेक शब्द त्यांच्या ओळखीचे नसतील, पण संदर्भाने ती त्यांचे अर्थ लावू लागली. मग कथा वाचून दाखवायची आणि त्यावर प्रश्न विचारायचे असा नवाच खेळ सुरू झाला (आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीजना खेळच म्हणतो.) त्यातही मुलांनी चांगला सहभाग घेतला आणि प्रश्नांची उत्तरे दिली. उत्तम कांबळेंची अंधश्रद्धेवरची कथा आणि एक एलियनवरची कथा, ह्या त्यापैकी काही होत. गंमत म्हणजे ‘एलियन’ म्हणजे काय म्हणून विचारल्यावर मुलांनी ‘परग्रहावरील प्राणी’ म्हणून सांगितले. ते मात्र त्यांना माहीत होते. अहमदाबादला आमचे फूलचंदमामा पुरवार म्हणून होते. ते रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर अनाथ भटकणाऱ्या मुलांसाठी ‘सर्जन’ नावाची संस्था चालवायचे. त्यातून ते खूप चांगले उपक्रम घेत. हे अनेक वर्षे माधान (जि. अमरावती) ला होते आणि माझे त्यांच्याशी मामांचे नाते जुळले ते तेथेच. एकदा त्यांच्या पोरांनी बाहुला-बाहुलीचे लग्न करायचे ठरवले. फुलचंदमामा म्हणाले, तुम्ही हे जरूर करा, परंतु त्यासाठी एक पैसाही खर्च होता कामा नये. आश्चर्य म्हणजे मुलांनी हे ऐकले. आणि बिनखर्चाच्या लग्नाचा त्यांनी असा काही बार उडवून दिला, की विचारता सोय नाही. तर अशा ह्या लग्नाची हकिकत एका पुस्तकात लिहून ठेवली आहे. (गुड्डा गुड्डी का ब्याह) त्यात लग्नवेळचे फोटोही आहेत. ह्या लग्नातला दुल्हा मुसलमान आणि दुल्हन हिंदू आहे. (लव्ह जिहाद हा शब्द तेव्हा नव्हता.) मुळात ते गुजरातीत लिहिलेले अनुवादित पुस्तक असावे. तेही आम्ही वाचले. सगळ्यांना खूप आवडले. त्यातले वर्णन इतके जबरदस्त आहे, की मला तर हरिभाऊंच्या ‘पण लक्षात कोण घेतो?’ चीच आठवण आली. त्याच्या सुरुवातीलाच बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे वर्णन आहे, हे आपल्या साऱ्यांच्या लक्षात असेलच.
कथावाचनाबरोबर गाणी व कविता म्हणून घेणे हा नित्याचाच पाठ होता. मी सहसा प्रार्थनागीते, देशभक्तिपर गीते वगैरे म्हणून घेई. काही वेळा रवींद्रने वर्ग घेतले. त्याने पहिलेच गाणे शिकवले ते कोणते, तर ‘धोंडिबा कांबळ्याचं शेत आलं, चलाचला बघायला होss होss’. कधीकधी त्याला रामराव पाटलाचं शेत आलं असंही म्हणायचे. आणि मग त्या शेतात वेगवेगळे प्राणी कसे भेटतात, ते वेगवेगळे आवाज कसे करतात वगैरे गाण्यात गुंफायचे. Old Mc Donald had a farm, eeia eeia o) चे मराठी रूपांतरण. त्या निमित्ताने मुलांना मजेदार आवाज काढता यायचे. मग ती जाम धमाल करायची. दुसरे त्याने शिकवलेले गाणे ‘लाल टांगा घेउन आला लाला टांगेवाला, ऐका लाला गाणे गातो ल ल ल ल ला’
ही दोन्ही गाणी मुलांना खूप आवडायची व ते ती उच्चरवात म्हणायचे. मी शिकवलेली गाणी म्हणजे - हर देश में तू, हर वेषमें तू तेरे नाम अनेक तू एकही है, किंवा गलत मत कदम उठाओ सोचकर चलो.
रवींद्र म्हणायचा “किती अवघड गाणी शिकवतेस! मुलांना काही रिलेट तर करता आलं पाहिजे.” त्याचे म्हणणे बरोबर होते. मुलांना त्याचा अर्थ कळायचा नाही व ती गायलाही त्रासच व्हायचा. पण मी म्हणायचे, “मुलांना कधीतरी हे शब्द, ह्या कल्पना, काव्याची शैली हे सगळे कळायला पाहिजे ना? आणि त्यासाठी सर्वोत्तम उपाय गाणी म्हणणे.” असे आमचे संवाद चालायचे. दोघांनीही आपापल्या पद्धतीने गाणी शिकवणे आजतागायत चालू ठेवले आहे.
कधीकधी आम्ही खेळ घेत असू. त्यात मुलांचा आवडता खेळ म्हणजे स्मरणशक्तीचा. गोल करून बसायचे. एकाने सुरुवात करायची. एका फळाचे नाव घ्यायचे. पुढच्याने ते नाव परत घेऊन, आपले एक नाव त्यामध्ये जोडायचे. तिसऱ्याने ती दोन नावे पुन्हा घेऊन, आपले तिसरे नाव त्यामध्ये जोडायचे. चिकू, चिकू - संतरा, चिकू- संतरा- अंगूर, चिकू- संतरा- अंगूर- केळे; असे करत-करत हा खेळ पुढे जातो. आमच्या वर्गात एकदा आठ मुले-मुली आले होते. त्यांनी ह्या खेळाचे पाच फेरे पूर्ण केले. म्हणजे शेवटच्या खेळाडूने एकूण ४० फळांची नावे बरोबर क्रमाने आठवून सांगितली. ह्याशिवाय ‘मी कोण?’ हा खेळही आम्ही खेळतो. हा खेळ प्राण्यांच्या नावाचा. तसे हे दोन्ही खेळ मुलामुलींची नावे किंवा फळे, फुले, पशू, पक्षी, ह्यांच्यापैकी कुणाचीही नावे घेऊन खेळता येतात. ‘मी कोण?’ मध्ये एक मुलगा समोर येऊन, एका प्राण्याचे वर्णन प्रथमपुरुषात सांगतो. त्याचबरोबर तसे हावभावही करतो. “मला चार पाय, दोन कान, लांब शेपटी. तुरुतुरू चालतो, कपडे कुरतडतो, कागद कुरतडतो, खाऊ सगळा गट्टम करतो. मी कोण?” मग बाकीची मुले उत्तर देतात. ह्या दोन्ही खेळांमध्ये एरवी फारसे न बोलणाऱ्या मुलांनीही चांगली कामगिरी केली.मुले आणि त्यांचे पालक
सहसा मुलांच्या संबंधात कोणतेही काम वा उपक्रम करायचा झाला म्हणजे पहिला मुद्दा येतो, तो आईवडिलांचा - पालकांचा. त्यांना कळवले का? त्यांना सांगितले का? मुख्य म्हणजे त्यांना विचारले का? त्यांची परवानगी घेतली का? ते काय म्हणाले? त्यांना काय वाटेल? त्यांना हे चालेल का? त्यांना ते चालेल का? असे प्रश्न उपस्थित होतात किंवा ते केले जातात. तसे ते स्वाभाविकच आहे, कारण आपल्या सगळ्यांना सवय आहे शाळेची आणि मग मुलांच्या बाबतीत आपण सगळे तसा विचार करतो. पण शाळेत आणि आपल्या ह्या उपक्रमात मूलभूत फरक आहे. कसा तो पाहा. पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत घालतात. आईवडील त्यांच्या अपत्यांना शाळेत घालतात. आता ह्या वाक्यांतील कर्ता कोण? म्हणजे आता आले ना लक्षात? शालेय शिक्षण हा आईबाप आणि शिक्षक-मुख्याध्यापक ह्यांच्यातील करार असतो. करार काय, तर आम्ही तुम्हांला पैसे देतो, तुम्ही आमच्या मुलांना ‘ज्ञान’ द्या. ज्ञान हा शब्द जरा मोठाच झाला. शिक्षण म्हणू या. हा करार मुलांच्या संबंधातला असला, तरी मुले काही त्यामध्ये ‘पार्टी’ नाही. पार्टी आहेत आईबाप आणि शिक्षक. ह्याउलट आपल्याकडे काय स्थिती आहे? आपण थेट मुलांनाच म्हटले, की तुम्ही माझ्याकडे आलात तर आपण काहीतरी गंमतजंमत करू, आणि ती आली. ह्यात मोबदल्याचाही काही प्रश्न नाही. दुसरे असे, की ही मुले एरवीच आईबापांचे काही ऐकत नाहीत. आईबाप त्यांना फारसे काही सांगण्याच्याही भरीस पडत नाहीत. मग हवे कशाला हे आईबापांचे लचांड? असा विचार मी केला आणि त्याबाबत गप्प राहिले. सुमारे वीस मुलेमुली आजवर ह्यात सहभागी झाली आहेत. त्यापैकी १३-१४ आज नियमितपणे येत आहेत. ह्यांच्यापैकी केवळ तिघांच्या पालकांशी माझा नव्याने संबंध आला. कसा ते सांगते.
...
(क्रमशः)
अनुराधा मोहनी
संपर्कः ९८८१४४२४४८, [email protected]
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Arun Gosavi
4 वर्षांपूर्वीलेखन शैली अतिशय उत्तम आहे. आपल्यातलं बालपण कधीच हरवू नये. या लेखातून मलाही मार्गदर्शन मिळाले आहे.